सोमवार, ८ फेब्रुवारी, २०२१

वेचलेल्या विचार कणिका - भाग २

 वेचलेल्या विचार कणिका - भाग २

( लॉक डाऊन च्या काळात व्हाट्सअँपची माहिती करून घेऊन त्यावर रोज वाचनात आलेले विचार पाठवायला सुरुवात केली. त्याचे हे संकलन. )





दासबोध

 आज आपण पंचमहाभूतांपैकी आकाशाचे गुण पहाणार आहोत.

आकाशी वाहिली झुळूक वाऱ्याची

 वायुपासून तेज झाले

 तेजापासून आप निपजले 

आपापासून आकारले भूमंडल 

आकाश म्हणजे अवकाशशून्य। शून्य म्हणजे ते अज्ञान। अज्ञान म्हणजे जडत्व जाण। तेची पृथ्वी।

आकाशाचा गुण शब्द।

आकाश पोकळ निर्मळ निश्चल. व्यापक अचल अढळ। सर्वापेक्षा मोठे। नाशवंत नाही।

काम क्रोध भय शोक मोह यापासून अलिप्त असते.

ते म्हणून शून्य समजले जाते. 

आप तेज वायू आकाशाला हलवू शकत नाहीत, आकाश चळत नाही. 

ते पृथ्वीचे सर्वांग भेदून राहिले आहे. 

----------------------------------------


अनुवाद ज्ञानेश्वरीत अवकाशासंबंधी एक ओळ आज वाचली. 

सूर्य सर्वांना सारखाच प्रकाश देतो, तसेच आकाश सर्वाना सारखाच अवकाश देते. 

आज चतुर्थी. अथर्वशीर्षात गणेशाचे वर्णन करताना म्हटले आहे, ’तू सूर्य आहेस, तू चन्द्र आहेस, अर्थात तू तेजोमय आहेस.’

 आज आपण तेजाबद्दल दासबोध काय म्हणतो, ते पाहू या. 

 तेज कोणाकडून प्राप्त होते? 

चंद्र, सूर्य, तारांगण, अग्नी, वीज, वडवानल व शंकरनेत्र यापासून मिळते. 

तेज हे उष्ण व शीतल ही असते. सूर्य, अग्नी, वीज हे उष्ण तेज देणारे तर चंद्र तारे हे शीत तेज देणारे आहेत. 

या यादीत आज आपण जलविद्युत, वायु विद्युत यांचा समावेश करू शकतो.

तेजाशिवाय जग अंधारमय झाले असते. अशा तेजाला वंदन करू या. 

-------------------------------------------------------

आप 

आप म्हणजे पृथ्वीला असलेले आवरणच होय. याचा धरतीला मोठा आधार आहे. पाण्याचा सर्वात मोठा साठा समुद्र होय. पाण्याची वाफ, वाफेचे ढग, ढगांपासून पाणी असे चक्र निसर्गात सतत चालू असते. 

नद्या, विहिरी, सरोवरे, तळी, झरे, पाझर, पाट, कालवे, डोह, डबकी, कारंजी ई. पाण्याची साठवण करतात. 

काही सागरांची नावे क्षारसिंधू, क्षीरसिंधू, सुरासिंधू, आज्यासिंधू, दधीसिंधू, ईक्षुरससिंधू वगैरे. 

आप हे् पृथ्वीतळी, पृथ्वी मध्ये,पृथ्वीवर सर्वत्र आहे. 

आप कसे आहे? तारक तर आहेच, पण मारकही आहे व सौख्यदायकही आहे. पाण्याचा नाद - ‘धबाबा तोय आदळे’ असे वर्णन रामदास स्वामींनी केले आहे. 

पालथ्या गंगा, व झोविरे म्हणजे वीज पडून निघालेले झरे हेही आढळून येतात. 

वेलीवृक्षांचे रस, मध, पारा, अमृत, तेल याबरोबरच शुक्र, रक्त, मुत्र, लाळ, घाम,अश्रू हेही जलाचेच प्रकार.

महत्व - चौखाणींचे प्राणी उदकेच वाढती 

बीजे उदकेच अंकुरती 

अशा या आप ला वंदन करू या.…

----------------------------------


आज्य म्हणजे तूप 

थोडासा विचार 

हिंदी महासागर व आफ्रिका खंड यामध्ये लाल समुद्र आहे, यावरुन क्षीरसागर. आज्यसागर खरे असायची शक्यता नाकारता येत नाही. 

जेव्हा काही नैसर्गिक कारणांमुळे समुद्राचे पाणी शुभ्र पांढरे दिसते, तेंव्हा तो क्षीरसागर म्हणून ओळखला जातो. काही कारणाने पाणी गोठून घट्ट झाले, तर तो हिमसागर होत असावा. जेंव्हा पाणी सरसकट न गोठता, काही काही थेंब गोठले असतील, तर तो आज्यसागर मानला जात असेल. 

आज अनुवाद ज्ञानेश्वरी वाचत असताना एक उल्लेख सापडला.

किंवा कोणे एके समयी, 

गुरूप्रेम दाटे हृदयी,

 तया अपारा नाव देई,

 क्षीरसागर ऐसे|

आजचा आपला विषय आहे पृथ्वी. 

रोज उठल्या उठल्या आपण, “समुद्र वसने देवी पर्वत स्तनमंडले विष्णुपत्नी नमोस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे” असे म्हणून भूमीला वंदन करतो व मगच जमिनीवर पाय ठेवतो. 

पृथ्वी ही क्षमाशील असते. 



--------------------------------------

गुरू वंदन

मी काय व्हावे? करावे?

तुमच्या सेवेसाठी लागणारी उपकरणे होईन,

गुरुमाऊलीचा एकुलता एक पुत्र होईन,

गुरुकृपेचा पिंजरा होईन,

गुरुसेवा या स्वामिनीला गुणांची लेणी घालेन, 

गुरूच्या स्नेहवर्षाव झेलण्यासाठी धरती होईन, 

मी गुरुचे राहते घर बनेन, 

चाकर होऊन सेवा करेन, 

जातायेता ओलांडले जातात ते ऊंबरे बनेन, 

मी द्वार होऊन द्वारपालही मीच होईन, 

त्यांच्या पायींच्या खडावा व डोक्यावर धरायचे छत्र ही मीच होईन, 

त्यांना चवरी वारेन, चोपदार बनेन,

त्यांना चूळ भरायला पाणी देईन, पुढे तस्तही धरेन, 

गुरूंच्या स्नानाची तयारी करून स्नान घालेन, 

त्यांचा स्वयंपाक करून जेवायला मीच वाढेन, ऊष्टे काढेन, 

अंथरूण घालून ते निजल्यावर त्यांचे पाय चेपेन, 

त्यांच्या साठी आवश्यक ते शब्द स्पर्श रस गंध होऊन, 

जीव असेतोपर्यंत सेवा करेनच, 

पण मेल्यानंतरही माझ्या शरीराची माती त्यांच्या वाटेवर पसरेन, युगानुयुगे त्यांची सेवा करेन. 

(अनंत आठवले यांच्या अनुवाद ज्ञानेश्वरीतून)

------------------------------------------------------------

लंडन येथील सभेत विचारले गेलेले प्रश्न व त्यांना स्वामी विवेकानंद यांनी दिलेली उत्तरे-

प्रश्न - हातातील संत्र्याचा जास्तीत जास्त रस काढून पिणे योग्य, परलोक व पुनर्जन्माचे काय सांगू शकाल?

उत्तर - माझ्या आत्म्याला मरण नाही, म्हणून मला रस काढून घेण्याची घाई नाही. सावकाश रस काढला तर अधिक मिळतो. 

प्रश्न - भारतीय हिंदूंनी आम्हाला जिंकले नाही. 

उत्तर - सहज जिंकू शकले असते, पण उगाचच कोणावर अत्याचार करायचा, रक्ताने धरणी भिजवायची, लोकांची संपदा लुटायची अशी त्यांची पद्धत नाही. 

प्रश्न- प्राचीन काळी हिंदू धर्माचा प्रसार करण्यासाठी भारतीय पाश्चात्य देशांत आले नाहीत व आजही येत नाहीत. आम्हाला भ्याले का

उत्तर - प्राचीन काळी तुम्ही जंगलात रहात होता. वस्त्रे वापरणेही तुम्हाला माहीत नव्हते. त्यावेळी जीवनाचे प्राथमिक धडे देणे आवश्यक होते. शिवाय ‘सर्व देव नमस्कार: केशवंप्रति गच्छति’ हा आमचा विश्वास असल्याने, आम्ही धर्मातरण करण्याचा प्रश्न कधीच उद्भवत नाही.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा