शुक्रवार, १५ एप्रिल, २०१६

भारतभूस्तोत्र -3

शुभ्रं धर्म ध्वजं मातु: किं वा राशीकृतम यश:।
रौप्यं वा मुकुटम दिव्यं वन्देs हं तं हिमालयं ।।३।।
भारतभू म्हटले कि ताबडतोब डोळ्यांसमोर साकारतो तो उत्तरेकडचा उत्तुंग अपराजेय प्रहरीच जणू असलेला हिमालय. ह्या श्लोकात हिम +आलय म्हणजेच बर्फाचे घर असलेल्या हिमालयाला वंदन केले आहे. मातेचा शुभ्र असा धर्मध्वजच जणू. शुभ्र म्हणजे अगदी निष्कलंक! पांढऱ्या रंगावर अगदी बारीकसाही डाग पडला तर लगेच कळतो. ह्या हिमाद्रिने आपली कीर्ती हजारो वर्षांपासून अगदी निष्कलंक राखली आहे.

तो भारतमातेचा धर्मध्वज आहे. धर्म म्हणजे धारयति इति धर्म:। मनुष्य जीवनाचे धारण करणाऱ्या सर्व गोष्टी मग ते शीलचारित्र्य असेल, नियमांचा काटेकोरपणा असेल, सर्वांच्या कल्याणाचा विचार असेल, परोपकार बुद्धी व सेवावृत्ती असेल, सर्वे S पि सुखिन: संतु असा विचार असेल, आदर व आदरातिथ्य करणारे वर्तन असेल. अशा सर्व गोष्टीना दुर्गुणांचा, दुराचाराचा दुर्वृत्तिचा जराही स्पर्श झालेला नसेल तर स्वाभाविकच शुभ्र धवलता तेथे असणार. ही शुभ्रताच जणू बर्फाद्वारे प्रगट झाली आहे कि काय असे वाटते.

दुसरे रूपक आहे, 'राशीकृतम यश:'। यशाची जणू राशीच। यश म्हणजे प्रयत्नांती प्राप्त केलेले साध्य. साध्यही चांगले व योग्य व साधनेही तशीच। म्हणूनच यशाचा रंग शुभ्र. रास शब्द विविध क्षेत्रात मिळवलेले यश सुचवतो म्हणजेच सर्वांगीण विकास. एका कवीने म्हटले आहे, 'सुवर्णभूमी म्हणूनी जियेची त्रिखंड भर कीर्ती " अर्थात संपन्न भूमी! विश्वाच्या कानाकोपऱ्यातून ज्ञान संपादनासाठी ह्या भूमीत येणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवाह. आम्ही प्रगत झालो, तुम्हीही व्हा ह्या उद्देशाने - उंच पर्वत, विशाल सागर, शरीर गोठवणारी थंडी, रणरणती वाळवंटे कशालाही न जुमानता जगभर पोचलेले भारतीय संस्कृतीचे प्रसारक! गणित, विज्ञान, शिल्प, विणकाम, शेतीतील प्रयोग, साहित्य निर्मिती अशा विविध गोष्टीत भारतीयांनी प्राप्त केलेले प्राविण्य, स्त्रीबद्दलचा गौरव भाव असे विविधांगी यश मिळवणारा भारत आणि त्या यशाचे दृश्य स्वरूप हा हिमालय.

भारताने धारण केलेला रुप्याचा दिव्य मुकुटच! खरेतर चांदीपेक्षा सोने अधिक मूल्यवान असते. पण शुभ्रतेच्या कसोटीस मात्र चांदीच उतरते. विज्ञानातले एक सत्य येथे आठवते- तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा, अस्मानी, नीळा, जांभळा ह्या सात रंगांचे मिश्रण म्हणजे पांढरा रंग.!
शुभ्रता हीच ज्याची ओळख त्या हिमालयाला वंदन असो.

भारतभूस्तोत्र -2

सागरा लिङ्गितां लक्ष्मीं जगज्जनक कन्यकां
स्थिताम हिमनगस्यांके पार्वतीमपरां भजे ।।२।।

१)लक्ष्मीचा जन्म सागरात झाला आहे असे मानले जाते. म्हणून सागराला आलिंगन देणारी त्याची कन्या लक्ष्मी असा अर्थ होईल. लिङ्गिनचा अर्थ चिन्ह धारण करणारा असा आहे. चिन्ह प्रत्यक्षात धारण केले नसले तरी सागराइतकी विशाल असाही अर्थ होईल. लिङ्गिनचा आणखी एक अर्थ हत्ती आहे व गजांत लक्ष्मी हा शब्दप्रयोग विपुल संपत्ती ह्या अर्थी वापरला जातो. अशा लक्ष्मीला वंदन असो.

 २)जगज्जनक कन्यकां - जगत +जनक +कन्यकां - जगाचा जनक ब्रम्हा आहे व त्याची कन्या सरस्वती तिला नमन करत आहे. (येथे सरस्वती असा स्पष्ट उल्लेख नाही)

३)हिमानागास्यांके स्थिताम - अपरां पार्वतीम - हिमालयाच्या मांडीवर स्थित असलेल्या अतुलनीय पार्वतीला भजतो.
लक्ष्मी, सरस्वती व पार्वती ह्या तिघींना वंदन असो. मानवी जीवनातील अत्यावश्यक गोष्टी,धन, विद्या व स्थिरता ह्यांचेच जणू दर्शन होते.

हिमालयाच्या अंगाखांद्यावर बागडणाऱ्या तेथील रानावनात विहार करणाऱ्या पार्वतीने, सर्वांचे मंगल करणाऱ्या (शं करोति इति शंकर:) शंकराला तो स्मशानवासी, बैरागी, निर्धन, अविकसित जमातीच्या लोकात वावरणारा आहे हे माहीत असूनही सर्व सामान्यांचा उध्दार करण्याची त्याची वृत्ती, हलाहलासारखे जालीम विष पिउन टाकण्याची त्याची तयारी व ते पिऊनही फक्त कंठ निळा होण्यापलीकडे त्याला काहीच अपाय झाला नाही इतकी त्याची शारीरिक शक्ती ह्या सर्वांचा मोह पडून त्याच्या प्राप्तीसाठी वर्षानुवर्षे केलेलं कठोर तप तिच्या दृढ निश्चयाचे व स्थिरतेचे दर्शन घडवतो.

आपण दिवाळीत लक्ष्मी पूजन करतो. नवरात्रात शारदेची सरस्वतीची आराधना करतो तर प्रत्येक युवती लग्नाआधी गौरीहर - पार्वती व शंकर ह्यांची पूजा करते. हरितालिकेलाही पार्वती तिच्या सखींसह पुजली जाते.

साधारणतया लक्ष्मी सरस्वती व दुर्गा ह्या त्रयीला पूजले जाते. वंदेमातरम गीतातही दुर्गा कमला व वाणी म्हणजेच पार्वती, लक्ष्मी व सरस्वती ह्या सर्वांचे दर्शन हे भारतमाते तुझ्यात घडते असे श्री. बंकिमचंद्र म्हणतात. काली हेही दुर्गेचेच रूप आहे. दुर्गेने अनेक अवतार धारण करून देवांना मदत केली आहे. स्त्रीची विद्वत्ता, स्व संरक्षण सिध्दता व शत्रू विनाशक शक्ती ह्या रुपांमधून दिसते.
वरील श्लोकात भारताचे दक्षिण ते उत्तर दर्शन घडते. सागर हा प्रामुख्याने भारताच्या दक्षिणेला आहे तर उत्तर टोकाला हिमालय आहे.

जगज्जनक कन्यकां - भारतीयांनी ज्ञान विज्ञान कला भौतिक व अध्यात्मिक क्षेत्रात केलेली प्रगती ह्या वरून त्यांना सरस्वतीचे वरदान प्राप्त आहे हे कळते. तिला मध्यवर्ती स्थान आहे. ह्यातूनच स्पष्ट होतो, भारतीयांचा जीवनाबद्दल असलेला समतोल. भारत अध्यात्माच्या उच्च शिखरावर पोचलेला होता. (सरस्वती) पण त्याच वेळी त्याने भौतिक गोष्टींकडे (लक्ष्मी) दुर्लक्ष केलेले नव्हते. तसेच स्वत:चे अस्तित्व टिकावे ह्यासाठी इथे शौर्याची परंपरा निर्माण झाली आहे.(दुर्गा)

योगी अरविंद म्हणतात," कधी कधी भारत राखेचा ढिगारा झाल्यासारखा भासतो पण त्या राखेच्या अंतर्भागात धगधगणारी ठिणगी जर संधी सापडतच प्रज्वलित होते.

 एक विचारवंत श्री. दत्तोपंत ठेंगडी म्हणतात, "भारताने संपत्ती मिळवली पण मदांध बनून इतरांना नृशंस वागणूक दिली नाही. सर्व जगाची शासकीय सत्ता मिळवून इतरांना गुलाम करण्याचा विचारही केला नाही व आजही तशी इच्छा नाही. तरीही भारताच्या सर्वंकष श्रेष्ठतेपुढे नतमस्तक होऊन सर्व विश्व त्याला गुरुस्थानी मानेल ही खात्री आहे व त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
लक्ष्मी,दुर्गा व सरस्वती ह्या तिघींना वंदन म्हणजेच सर्वांगीण प्रगतीची अपेक्षा!
 

 

मंगळवार, १२ एप्रिल, २०१६

भारतभूस्तोत्र -1

 वंदे मातरमव्यक्तां व्यक्तांच जननीं परां
दीनोSहं बालक: कांक्षे सेवां जन्मनि जन्मनि ।।१।।
एका कवीने म्हटले आहे, 
"हा भारत नाचवी ज्याच्या भक्तीचा सिंधू । तोच खरा हिंदू ।।

भारतभू बद्दल अनेक कवींनी अनेक लेखकांनी भारताला भेट देणाऱ्या प्रवाशांनी अगदी भरभरून लिहिलेले आढळते. बंकीमाचान्द्रांचे वन्दे मातरम आजही आबालवृध्दांच्या ओठावर आहे.

तुम्ही आम्ही समितीसेविका रोज "नमो भारत जनन्ये। स्वाभिमान प्रतीमाये"  असे म्हणत सकाळी सकाळी भारतमातेला वंदन करतो. 
"नित्यं वदामि सुगुणान तव जन्मभूमे" यासाठी उत्सुक असतो आणि भारतभूमीचा गौरव, कौतुक, श्रेष्ठता गाता गाता थकून जातो तरी वर्णन संपत नाही. अनंत रत्न मंदिरं अगाध ज्ञान सागरं" अशी कितीतरी विशेषणे एका पाठोपाठ एक उद्गारत 'नमामि राष्ट्र भारतं" म्हणत तिला नमस्कार करतो. प्रत्येक भारतीयाचा भावनासागर उचंबळेल अशा भारत भू स्तोत्राबद्दल आपण विचार करणार आहोत.

 १० कडव्यांच्या या स्त्रोत्रातील पहिले कडवे वन्दे मातरं ने सुरु झाले आहे. त्या परां जननीला आपण अभिवादन करत आहोत. त्याच वेळी व्यक्तां व अव्यक्तां ह्या दोन विशेषणांनी तिचे विशालत्व दर्शवले गेले आहे.

आपल्या प्राचीन ते अर्वाचीन साहित्यात व्यक्तिविकासाचा सोपान व्यक्ति, समष्टि, सृष्टि, परमेष्टी असा वर्णिलेला आढळतो. त्यातील सृष्टीचा विचार चराचर (चर +अचर ), सजीव निर्जीव अशा व्यापक शब्दाने करतो तरीही चराचर सृष्टि ही व्यक्त आहे. तिची निर्मिती झाली आहे म्हणून व्यक्ताम च्या पुढे जननीं -जन्म देणारी असा उल्लेख आहे. त्याहीपेक्षा विशाल कल्पना अव्यक्तां ह्या शब्दांत व्यक्त होते.

माता ही व्यक्त तर मातृत्व भाव अव्यक्त असतो. प्रेमळ स्पर्श, कल्याणाची चिंता, बालकाच्या सुखासाठी चाललेली धडपड ह्या गोष्टी ह्या मातृत्वभावाला काही प्रमाणात व्यक्त करतात. पण जसा हिमनगाचा ५/६ भाग पाण्याखाली असतो, फक्त १/६ भाग पाण्यावर दिसतो. तसा हा मातृत्व भाव मोठ्या प्रमाणात अव्यक्तच राहतो. जननी रूपातून व्यक्त झालेल्या पण कितीतरी पटींनी अव्यक्त असणाऱ्या ह्या भारतभू ला आम्ही वंदन करतो. पर्वत, नद्या, सागर, खनिज संपत्ती, वृक्ष संपत्ती, धान्य समृद्धी वगैरे व्यक्त गोष्टी आहेतच पण विदेशातून प्रवास करून आल्यानंतर भारत भू वर पाउल ठेवल्या ठेवल्या येथील माती कपाळाला लावून आनंदित झालेल्या स्वामी विवेकानंदासारख्यांचे समाधान हे तिचे अव्यक्त रूप आहे.

अशा ह्या मातेची सेवा जन्मोजन्मी करण्याची आकांक्षा आहे. कदाचित मी 'दीन' असेन पण माझा सेवाभाव मात्र समृध्द आहे. म्हणून अनेक जण जन्म जन्मांतरी भारतातच जीवन प्राप्त होवो अशी इच्छा व्यक्त करतात. किंबहुना तशी खात्री बाळगतात. मग फाशीची शिक्षा झालेला एक तरुण सहज उद्गारतो," भेटेन ९ महिन्यांनी "