बुधवार, १७ फेब्रुवारी, २०२१

वेचलेल्या विचार कणिका - भाग 14

 वेचलेल्या विचार कणिका - भाग 14

( लॉक डाऊन च्या काळात व्हाट्सअँपची माहिती करून घेऊन त्यावर रोज वाचनात आलेले विचार पाठवायला सुरुवात केली. त्याचे हे संकलन. )


लोकमान्य आजारी झाले. स्थिती गंभीर झाली होती. 

ठिकठिकाणी लोकांनी अनुष्ठाने सुरू केली. देवाला साकडे घातले, संकल्प केले. गावोगावी प्रार्थना केल्या गेल्या. पुजाऱ्यांनी प्रसाद पाठवले. सरदार गृहात अखंड रीघ लागली होती. बाहेर माणसांचे जमाव रात्रंदिवस उभे होते. 

लोकमान्यावरचे लोकांचे प्रेम व भक्ती उचंबळून‌ आली होती. लोकमान्यांनी सर्वांच्या हृदयात स्वत: च्या कार्याने मिळवलेल्या अढळ स्थानानेच जणू दृश्य स्वरुप घेतले होते. 

------------------------------------


सावित्री ज्योतीराव फुले! ना्व व कार्य अगदी एकरूप! 

यमाचा पाठलाग करून, सत्यवानाचा प्राण परत आणणारी पुराणातील सावित्री तर स्वत:चे सामर्थ्य विसरलेल्या स्त्रीसमाजाला जागृत करून तिच्यातील कार्यशक्तीचा प्राण परत जागवून, तिला कार्यप्रवण करणारी ही आधुनिक सावित्री!

स्त्रीसमाजाच्या अंत:करणातील स्वाभिमानाची, स्वकर्तव्याची ज्योती पेटवून, तिला तिच्या कार्याचा प्रकाश पसरवण्याची प्रेरणा देऊन तिचे जीवन फुलवणाऱ्या या सावित्री ज्योतीराव फुले यांना अभिवादन!

-------------------------------

आपल्याला जगाशी जोडणारे जे अनेक धागे आहेत त्यातला महत्त्वाचा धागा मानवता हा आहे. 

‘अहं ब्रम्हास्मि’ या भारतीय विचारात, सगळे आपले आहेत हा संदेश आहे. ज्ञानेश्वरांनी त्याला ‘अवघे विश्वचि माझे घर’ हे शब्दस्वरूप दिले आणि विनोबांनी त्याचे रूपांतर ‘जय जगत्’ असे सर्वांना सुलभ वाटेल असे केले. 

एकदा फक्त मानवतेलाच नव्हे तर चराचराला जोडणारी एकात्मता मात्र समजून आत्मसात करायला हवी. 

 -ज्ञानेश्वर मुळे

--------------------------------

 शहर कसे असावे?

पायी फिरायला मोकळे रस्ते, सायकली चालवण्यसाठी वेगळी लेन, मुलांसाठी मैदाने, पोहण्यासाठी तरण तलाव, ज्येष्ठ नागरिकांना आरामात गप्पा मरत बसण्यासाठी मोकळ्या जागा व बसायला बाक असावेत, जागोजागी कॉर्नर बागा असाव्यात,स्वस्त पब्लिक बससेवा असावी. पर्यटन क्षेत्रे असलेल्या शहरात डबलडेकर उघड्या रंगीत बसेस असाव्यात. जागोजागी स्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृहे असावीत. माफक दरातील उपाहारगृहे हवीत. कचराकुंड्या व त्या साफ ठेवण्याची व्यवस्था असावी. 

यादी खूपच लांबेल पण असे झाले तर किती छान वाटेल नं?

--------------------------------------

आजची मराठी भाषा

इंडस्ट्रियल प्लांट- औद्योगिक झाड

नेचर ऑफ धिस प्राब्लेम - या प्रश्नाचा निसर्ग

रेल्वेचे स्लीपर्स वाहून गेले - रूळावर झोपलेले लोक वाहून गेले. 

  • अशोक जैन

हे झाले भाषांतराबाबत. 

संपन्न - श्रीमंत पण कार्यक्रम संपन्न झाला. 

षडयंत्र - सहावे किंवा सहा यंत्र, पण षडयंत्र रचले - कट रचला. 

निर्धारित वेळ - पण निर्धारित गाडी आज उशिरा

बोजा - उर्दु शब्द पण या योजनेचा अर्थसंकल्पावर भार नाही, बोजा पडला. 

ॲडमिट - रुग्णालयात दाखल केले या ऐवजी, हॉस्पिटल मध्ये ॲडमिट केले आहे. 

  • मंगेश नायर

अंतर्नाद दिवाळी अंक

----------------------------------------

नाव ओळखा

 स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जनसमूहाला जागृत करून कार्यरत करणारा, विशाल सामर्थ्य असलेला नेता, मनातील न्यूनगंड दूर करून, कार्यप्रवण होण्यासाठी धडपडत असलेल्या जनतेला सावरण्यासाठी कर देणारा पुढारी, या कार्यासाठी काहीच दाम न ईच्छिणारा व उदरभरणाची चिंता न करणारा कार्यकर्ता, शारीरिक व मानसिक कष्ट सोसत असतांनाही उदात्त काव्य रचणारा कवी, उत्तम वक्ता, आवडता नेता. असा कोण?

वर्णनात नाव दडलेले आहे. 

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

----------------------------- 

ताईमहाराज खटला चालू होता. लोकमान्य व त्यांचे मित्र कायद्याच्या पुस्तकात दंग होते. गुप्तहेर त्यांच्या घराच्या आत बाहेर मुंग्यासारखे फिरत होते. लोकमान्य एखाद्या खडकाप्रमाणे निश्चल व खंबीर होते. मी त्यांच्याशी जवळजवळ तीन तास बोलले. पण त्या दरम्यान ते एक क्षणही अस्वस्थ वा विचलित झालेले भासले नाहीत. 

-सरलादेवी चौधुराणी

-------------------------------------------

दहा जन्मांचे काम एका जन्मात केले असे ज्यांचे वर्णन केले गेले अशा एका, अगदी साधी राहणी असलेल्या, अनेक वेळा भेटलेल्या एका कार्यकर्त्याला आज शब्दसुमनांजली वहावी असे वाटले. 

नाव दत्तोपंत ठेंगडी. भारतभर प्रवास. वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने. सहा संघटना स्थापून त्या कार्यरत राहतील अशी व्यवस्था करणारे. ३५ हिंदी, १० इंग्रजी, ३ मराठी पुस्तकांचे लेखक, देशविदेशात भाषणे, भारताच्या विकासासाठी काम करणाऱ्या अनेक संस्थांच्या कामात सहभाग व त्यांच्या जीवनाचे अनेक पैलू पाहून मन भारावून जाते व त्यांना आपोआपच वंदन करते. 

-----------------------------------------

नित्य समाधीसुखाची अपेक्षा करणाऱ्या शिष्याला," तुला हजारोंना छाया देणारा वटवृक्ष बनून, मातेचे ऊत्थान करायचे आहे असे बजावून सांगणारे गुरू व ती आज्ञा शिरसावंद्य मानून कार्य करणारा शिष्य दोघांनाही वंदन!

नक्की काय करायला हवे आहे हे ठरवण्यासाठी भारतयात्रेला सुरवात झाली. 

भारताचा सांस्कृतिक वारसा व त्याने जगाला दिलेली आध्यात्मिक शिकवण यांचा भारतीयांना पडलेला विसर, त्याचबरोबर निर्माण झालेले नैराश्य व किंकर्तव्यमूढता लक्षात आली. यावर काय उपाय करता येईल याचा विचार व तशी योजना याचा विचार भारताच्या दक्षिण टोकाला असलेल्या कन्याकुमारी जवळील समुद्राच्या पलीकडे असलेल्या श्रीपाद शिलेवर बसून झाला व कार्यासाठी देशविदेशात प्रवास झाला. शिकागोच्या धर्मपरिषदेत योजनापूर्वक उपस्थित राहून भारतीय संस्कृती व तिचा ' कृण्वन्तो विश्वम् आर्यम्' हा निर्धार ज्यानी जगाला कळवला त्या स्वामी विवेकानंदाना नमन!

-----------------------------------------------


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा