गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०२१

वेचलेल्या विचार कणिका - भाग 18

 वेचलेल्या विचार कणिका - भाग 18

( लॉक डाऊन च्या काळात व्हाट्सअँपची माहिती करून घेऊन त्यावर रोज वाचनात आलेले विचार पाठवायला सुरुवात केली. त्याचे हे संकलन. )


तो नच राजा, राजकुमारही

नच कोणी श्रीमंत धनाढ्यही

विख्यात न तो कोणी कवीही

नच असल्या काहीच खुणा

जग वंदी तयासच पुन्हा पुन्हा

हे घडत कसे न कळे कवणा

संतांचे वर्णन करणाऱ्या या ओळी महात्मा गांधीना तंतोतंत

लागू पडतात. 

सत्य, अहिंसा, शांती यांचा ऊद्घोष, असहकार,

सत्याग्रह हे मार्ग स्वत: अनुसरून सर्वांना अनुकरण

करण्यास प्रोत्साहन दिले. 

स्वत: चरख्यावर सूत कातून त्या खादीचे धोतर व पंचा

आयुष्य भर वापरून स्वदेशीव्रताच्या पालनासाठी लोकांना

तयार केले. 

शेळीचे सर्व व्हिटॅमिनयुक्त दूध व जे सर्वांना सहज

उपलब्ध असते ते वापरले व ते वापरण्यास प्रोत्साहन दिले. अशा आदर्शवत असणाऱ्या महात्माजींना शत शत प्रणाम!

--------------------------------------------

आज संकष्टी चतुर्थी

एक गंमत आहे, शुक्ल पक्षातील चतुर्थीचे नाव विनायकी

चतुर्थी असते, पण उपवास मात्र या चतुर्थीला केला जातो. 

व्रातपती, प्रमथपती, गणपती ही सर्व नावे ही देवता

संघटनशक्तीची आहेत हे सूचवतात. 

राष्ट्र कार्य, राष्ट्र संरक्षण यासाठी आम्ही संघटितपणे काम

करू या! 

गणपती हा सर्व विद्या व कलांचा अधिपती आहे. 

आमचे राष्ट्र जीवनावश्यक सर्व क्षेत्रात आघाडीवर असावे

यासाठी सदैव कार्यरत राहू!

जीवनाच्या सर्व क्षेत्रांत नवनवीन संशोधन करून ते ज्ञान

समाजकारणी लावून, समाजजीवन संपन्न व प्रगत बनवू

या!

--------------------------------------------

दान

राजा हर्षवर्धन, वारंवार आपली सर्व संपत्ती गरजूंना दान

देत असे. अगदी अंगावरचे चांगले कपडेही देऊन टाके.

यात त्याला सात्त्विक आनंद मिळत असे. 

राजा दिलीपाने आपला देहच सिंहाच्या क्षुधानिवृत्तीसाठी 

दिला. 

शिबी राजाने कबुतराचा प्राण वाचवण्यासाठी आपल्या

शरीरातील मास दिले. 

राजा कर्णाने स्वदेहाचे रक्षण करणारी कवचकुंडले ही

दान केली एवढेच नव्हे तर रणभूमीवर तो मरणासन्न

अवस्थेत असतांनाही कृष्णाला सोन्याचा दात काढून

दिला.  आपले दानशौर्य शेवटपर्यंत पाळले. 

याच दानपरंपरेत आचार्य विनोबा यांनी श्रमदान, भूदान

अशा कालोचित दानप्रकारांची भर घातली. चला तर

मग, आता आपल्या स्वाभिमान रक्षणासाठी राममंदिर

उभारण्यात आपला वाटा उचलू या. 

-------------------------------------

वेल रूजली की तिला पाने फुटतात, मग फुले येतात,

मग फळे येतात. 

पहाटे अरुणोदय, मग सूर्योदय. सूर्यप्रकाशात सृष्टी

न्हाऊन निघते. 

मनात हेतू येतो, मग संकल्प केला जातो, नंतर कृती

घडते. कर्तृत्व सिद्ध करता येते. 

बालपण संपले की बागुलबुवाला थारा मिळत नाही. ताक

घुसळून काढलेले लोणी ताकात परत एकजीव होत नाही.

 

रात्रीच्या पोटातून उदयाला आलेला सूर्याला रात्र कधी

दिसतच नाही. 

रात्री फुलणारी कुमुदिनी कशी दिसते हे सूर्याला माहीत

नसते. 

वाहता वारा थांबला तरी काहीवेळ झाडाची पाने डोलतच

राहतात. 

 - मामासाहेब दांडेकर

----------------------------------------

भाषासौंदर्य

जाणे अजु मी अजरू, 

अक्षयो मी अक्षरू,

अपूर्व मी अपारू,आनंदु मी! 

अचळू मी अच्युतु,

अनंत मी अद्वैतु,

आद्यु मी अव्यक्तु,

व्यक्तुही मी! 

ईश्य मी ईश्वरू,

अनादि मी अमरू,

अभय मी आधारू,आधेय मी! 

स्वामी मी,सदोदितु,

सहजू मी सततू,

सर्व मीसर्वगतु,सर्वातीत मी! 

अक्रियु मी येकु,असंगु मी अशोकु,

अशब्दु मी अस्रोत्रू,अरूपु मी अगोत्रु, 

समु मी सर्वत्रू,ब्रम्ह मी परू!

-----------------------------------

तामस कर्म

जणू पाण्यात रेघ ओढावी

कांजी घुसळावी

राख फुंकावी

वाळू घाण्यात घालावी

भूस ऊफणावे

वाऱ्याला बांधायला पाश टाकावा

हे सर्व जसे वाया जाते,तसे तामस कर्मही निरूपयोगी

असते. सर्व श्रम वाया जातात. शिवाय अनिष्ट फळही

देतात जसे-

पतंग ज्योतीवर झेप घेतो. स्वत: जळतोच पण ज्योतही

विझवतो. 

माशी घासाबरोबर माणसाच्या पोटात जाते. स्वत: तर

मरतेच, पण खाणाराला वांती होते. 

----------------------------------

कोणाजवळ कोण!

चंद्र तेथे चंद्रिका

शंभू तेथे अंबिका

संत तेथे विवेक

राजा तेथे सैन्य

अग्नि तेथे दाह

दया तेथे धर्म

वसंत तेथे वन

वन तेथे सुमन

गुरू तेथे ज्ञान

ज्ञानी तेथे आत्मदर्शन

आत्मदर्शन तेथे समाधान

भाग्य तेथे विलास

सुख तेथे उल्हास

सूर्य तेथे प्रकाश

 ------------------------------

प्रत्येक घटाघटात ईश्वरी अंश आहे. या सृष्टीतील सर्व जीव,

प्राणी, मानव यांच्यात तो विराजमान आहे. त्याचे अस्तित्व

नसलेली एकही जागा नाही. स्वत:च्या अंतरात डोकावून

बघितलेस की तुला ते कळेल. 

आकाश, जमीन, पाणी, सूर्य, पवन या पाचांचा मिळून

तयार होणारा आसरा सर्वांसाठी असतो. 

या सृष्टीत एकच जमीन, पाणी, अग्नि, आकाश, वायू, सूर्य,

चंद्र, तारे एकच आहे. 

 एकच ईश्वरतत्व सर्वत्र भरलेले आहे. 

 -समर्थ रामदास

-----------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा