वेचलेल्या विचार कणिका - भाग ६
( लॉक डाऊन च्या काळात व्हाट्सअँपची माहिती करून घेऊन त्यावर रोज वाचनात आलेले विचार पाठवायला सुरुवात केली. त्याचे हे संकलन. )
----------------------------------------------
कर्दमऋषीची पत्नी अनुभूती. तिला एक मुलगा झाला व थोड्याच दिवसात ऋषींचे निधन झाले. मुलगा अल्पवयीन असल्याने तिला सहगमन करता आले नाही. मुलगा मोठा झाल्यावर त्याला गुरुगृही ठेवून ती मेरू पर्वतावर तपश्चर्येस गेली.
कुकुर राक्षसाला तिच्या सौंदर्याचा मोह झाला. तिला त्याने मोहाने स्पर्श केला.
तप चालू म्हणून शाप देता येत नव्हता. गप्प बसावे तर पातिव्रत्यभंगाची शक्यता. तिने आदिशक्तीची प्रार्थना केली. अष्टभुजेच्या रूपात देवी प्रगट झाली. युद्धाला सुरवात झाली.
असुराने नागाचे, गिधाडाचे, रेड्याचे अशी रूपे घेतली. सिंहवाहिनी अष्टभुजेवर तो धावून आला. अष्टभुजेने त्याला मारले. अनुभूतीचे संकट टळले.
प्रार्थना करतांना त्वरित धावून आलेल्या देवीला तिने ‘त्वरिता’ संबोधित केले. त्वरिता तुरजा व शेवटी तुळजा असे नाव झाले.
अनुभूतीच्या प्रार्थनेला प्रतिसाद देत देवी मृत्युलोकात अवतरली. तीच तुळजापूरची तुळजाभवानी.
भवानीला त्रिवार वंदन.
----------------------------------
काल आपण अष्टभुजेच्या स्वरूपात देवी प्रकट झाली हे पाहिले. मनात प्रश्न येतो आठ हात कशासाठी?
आठही दिशांकडून, एकाच वेळी आलेल्या संकटांचा सामना करण्यासाठी अधिक शक्ती, अधिक कौशल्याची आवश्यकता असते.
अष्ट म्हटले की अष्टकोन, अष्टपैलू, अष्टदिशा, अष्टौप्रहर, अष्टसिद्धि, अष्टांगयोग, अष्टावधान असे अनेक शब्द आठवतात. ‘अष्टपुत्रा सौभाग्यवती भव’ हा आशीर्वाद नववधूला दिला जातो. काही ठिकाणी विवाहानंतर आठव्या दिवशी नववधूला समारंभपूर्वक स्नान घातले जाते.
एकूण आठ या संख्येने विविध प्रकारच्या क्षमतेवर लक्ष केंद्रित होते.
गंमत म्हणून घरबसल्या एक खेळ खेळता येईल. एकेक संख्या घ्यावी व तिच्या पासून सुरू होणारा शब्द लिहावा. कोणाचे जास्त होतात ते पहायचे. त्याचबरोबर एकीने लिहिलेल्या शब्दांमध्ये सर्वानी भर घालायची. गंमत येईलच व एक शब्दसंग्रह तयार होईल.
ऊद्यापासून देवीच्या हातात असणाऱ्या विविध वस्तू व त्यांचे वैशिष्ट्य असा विचार करू या.
नवरात्राच्या शुभेच्छा.
------------------------------------------
कमलधारिणी अष्टभुजा
कमळ पाहताच मन आनंदाने भरून जाते. त्याची कोमलता, मंदसा सुगंध, अनेक पाकळ्यांची परस्परांना घट्टपणे धरुन ठेवण्याची शक्ती, जणू ‘अनेकतामे एकताचे’ प्रत्यक्ष दर्शन घडवते.
एवढे कोमल असूनही विस्तीर्ण जलाशयावर ते ऐटीने निर्भयपणे बिनधास्त डोलत असते.
ते अनेक नावांनी मंडित आहे.
नीरज व पंकज ही नावे, त्याचा जन्म पाण्यात व चिखलात आहे हे स्पष्ट करतात. पण गंमत अशी आहे की पाण्याचा एकही थेंब त्याच्यावर टिकून रहात नाही वा चिखलाचा कणही त्याला मलिन करत नाही, ही त्याची निर्लेपता अवर्णनीय आहे. अशा निर्लेपतेसाठी कठोरपणा आवश्यक असतो. आत्यंतिक कोमलता व कठोरता एकाच वेळी बाळगणारे कमळ, जनसेवेसाठी कटिबद्ध असलेल्या संकटांची पर्वा न करता काम करत राहणाऱ्या संताप्रमाणे भासते.
------------------------------------------------
भगवा ध्वज
वैराग्य व विक्रम यांचा संदेश देणारा भगवा थ्वज, अष्टभुजेच्या एका हातात आहे. वासनांवर विक्रमाने वैराग्य मिळवता येते हे सांगत असतानाच, वैराग्यानंतरही कर्तव्यपालन करायचे असते याची आठवण हा ध्वज करून देतो. स्वामी समर्थानी स्वराज्यरक्षणासाठी तरूणांची एक सक्षम संघटना ऊभी करण्यासाठी जागोजागी मारूती मंदिरे आखाडे उभारले. त्या मंदिरांवर भगवा ध्वज फडकत असे व आजही मंदिरांवर तोच डौलाने फडकत असतो. शिवरायांनीही या ध्वजाचा गौरव पसरवला.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे आजही भारतीयांच्या मनात तो आदराने विलसत आहे. स्वामी विवेकानंदांनी अलीकडील काळात त्याचे भारतीयांच्या मनातील आदराचे स्थान, आंतरराष्ट्रीय परिषदेत पुन्हा एकदा उजागर केले.
त्याग, पराक्रम, स्वाभिमान, राष्ट्रप्रेम, आत्मविश्वास या सर्व गोष्टींच्या या प्रतीकाला त्रिवार प्रणाम!
--------------------------------------
कोमल, कठोर, विक्रम, वैराग्य अशा परस्पर विरोधी वाटणाऱ्या भावनांचा संगम आपण पाहिला.
यासाठी आवश्यक असा मनोनिग्रह प्राप्त करण्याचा संदेश देवीच्या हातातील गीता देत आहे. ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन!’ या शब्दात कर्तव्यदक्षता प्रतिपादिली आहे. ज्ञान मिळवून संदेह नष्ट करायला सांगत आहे.
कर्तव्यपालन करून, संहारक अग्नीला अग्निकुंडात बंदिस्त करून, त्याची विनाशकता नाहीशी करून, त्याचा उपयोग विधायक कार्यासाठी करता येतो हेच अग्निकुंड सुचवते आहे.
पूर्वी मोठमोठे यज्ञ केले जात असत! हवामान शुद्धीकरण होत असे! अनेक राजे ऋषी एकत्र येऊन राष्ट्रातील विद्यमान परिस्थितीबद्दल साधक बाधक विचार होई! सत्कार्याला प्रोत्साहन दिले जाई! राष्ट्र रक्षण, राष्ट्राचा विकास, राष्ट्र संरक्षण या बाबतीत धोरण ठरवले जाई व त्याचे पालन सर्वांना बंधनकारक असे!
शीलरक्षणासाठी केलेले सर्व प्रयत्न असफल झाले तर महिलानी हातात शस्त्र घेणे आवश्यक होते.
-------------------------------
कर्तव्यदक्ष देवीला,’परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्’, हातात शस्र घेणे आवश्यक होते. शत्रू कोठून येईल हे अनिश्चित असते. म्हणून तिने वेगवेगळी शस्त्रे धारण केली आहेत.
त्रिशूल - लांबपर्यंत फेकून मारता येते. शिवाय तीन तीक्ष्ण टोके असल्याने शत्रूला प्रतिकार करता येत नाही.
तलवार - शत्रू जवळून हल्ला करू लागला, तर स्वरक्षणार्थ प्रतिकार आडव्या तलवारीने करून, लगेच ती उगारून शत्रूला मारता येते.
पाठीमागून होऊ शकणारा हल्ला सिंह वाहन असल्याने लगेच कळतो व प्रतिकार करता येतो. सिंहाला थोडे पुढे गेले की मागे वळून पाहण्याची सवय असते. त्याच्या हालचाली ही चपळ असतात. शिवाय शत्रूचा अचूक वेध घेण्यात तो तरबेज असतो. लांब ऊडी मारण्याच्या त्याच्या क्षमतेचाही फायदा मिळतो.
स्वसंरक्षण, शत्रूनिर्दालन, सज्जनरक्षण यासाठी तत्पर असणाऱ्या देवीचे हे सर्व सामर्थ्य व तशी शक्ती बुध्दी आपण प्राप्त करून घेण्यासाठी तत्पर राहू या.
--------------------
देवी अष्टभुजा आम्हा सर्व भारतीयांना सुख शांती प्रदान करो अशी प्रार्थना करते.
आपल्या हाती धारण केलेल्या विविध गोष्टीतून देवीने जो संदेश दिला आहे, तो लक्षात ठेवा, हेच जणू ती हातातील स्मरणीने सांगत आहे. कर्तव्याची आठवण निरंतर राहिली तरच हातून कार्य घडेल.
कार्यात अपयश मिळाले तरी नाउमेद न होता, तसेच यश मिळाले तर हुरळून न जाता, कार्यातील सातत्य टिकवण्यासाठी, मधून मधून तशी जाग देण्यासाठी, हातातील घंटेचा नाद केला जाणार आहे.
या सर्व कार्यासाठी बुध्दी सतेज हवी. आवश्यक साधने मिळण्यासाठी धन हवे. संकटांना तोंड देण्यासाठी बल हवे. म्हणून सरस्वती, लक्ष्मी, काली यांची एकत्रित उपासना करता यावी म्हणून देवी अष्टभुजेला वंदन करू या!
---------------------------------------------
श्रीराम दुष्टसंहारक आहे. भारतीय संस्कृतीचा आदर्श आहे. काळात रामप्रहर आहे, फळात रामफळ आहे. जीवनात राम आहे, जीवनांती रामनाम हवे आहे. भेटीत रामरामचा उच्चार आहे. आज्ञाधारक दाशरथी राम आहे. बंधुप्रेमाचा आदर्श भरताग्रज व सौमित्रवत्सल राम आहे. आदर्श पतीच्या स्वरुपात जानकीजीवन राम आहे. भक्तप्रभू या रूपाने हनुमंतप्रभू राम आहे. आर्य व अनार्य संस्कृतीत पूल बांधणारा सेतुबंधक राम आहे. आदर्श राज्यव्यवस्था निर्माण करणारा राजा राम आहे. आपल्या सर्व जीवनात राम आहे.
(वा. शि.आपटे)
----------------------------------------------
रामकृष्ण की जय।
राम मर्यादा पुरुषोत्तम आहेत, तर कृष्ण पुष्टी पुरुषोत्तम आहेत. कृष्ण माखनचोर म्हणजे मृदू मनाचे चोर आहेत.
रामाच्या नावात एकही जोडाक्षर नाही, तर कृष्णाच्या नावात एकही अक्षर सरळ नाही.
राम दिवसा बारा वाजता जन्मला तर कृष्ण रात्री बारा वाजता जन्मला.
राम दशरथाच्या राजमहालात तर कृष्ण कारागृहात जन्मला.
रामचंद्र समजणे सोपे तर कृष्ण समजणे अवघड आहे.
नरसिंह अवतारात क्रोधनाशाची, वामन अवतारात लोभनाशाची व रामावतारात कामनाशाची रीत दाखवली गेली आहे. क्रोध, लोभ व काम यांचा जेव्हा नाश होतो तेव्हा कृष्ण भगवान प्रकट होतात.
(डोंगरे महाराज)
-------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा