गुरुवार, १६ जुलै, २०२०

दर्शनाने धन्यता सहवासाने कृतकृत्यता! भाग 13

 दर्शनाने धन्यता सहवासाने कृतकृत्यता! भाग 13

श्रीमती सुशील प्रल्हाद अभ्यंकर यांना ज्यांचे दर्शन झाले, सहवास लाभला, अशा प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व राष्ट्रसेविका समितीतील व्यक्तींविषयी लिहिलेल्या आठवणी. या सर्वांविषयी तसेच राष्ट्रसेविका समिती मुळे मिळालेल्या समाज सेवेच्या संधींविषयी कृतज्ञ भाव व्यक्त करण्याचा हा एक मार्ग. आत्ता वयाच्या ९१ व्या वर्षी, वाढत्या विस्मरणातून देखील, जशी आणि जेवढी शाबूत राहिली तितकी - एक स्मरण मालिका.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

राष्ट्र सेविका समितीमुळे मिळालेल्या अनेक संधी


ठाण्याला वर्ग होता. बहुदा प्रवेश असावा. त्यावेळी वर्ग महिन्याचा असे. तेव्हा मी शिक्षार्थी होते. वर्ष आठवत नाही. पण सिंधी निर्वासितांच्या छावण्या मुंबईत झाल्या होत्या. त्यातील वीस-बावीस जणी वर्गाला आल्या होत्या. त्यांना मराठी बौद्धिक फारसे समजत नसे. म्हणून त्यांना त्यातील आशय हिंदीत समजावून सांगायची जबाबदारी शिक्षार्थी असूनही माझ्यावर सोपवली होती. मी हिंदीच्या कोविद परीक्षेत भारतातून पहिली आले होते, हे माननीय बकुळ ताईंना ( त्या वेळच्या कार्यवाहिका- यांचे सासर वाईचे होते ) माहिती होते. 

पण मला त्या कामाचा फायदा असा झाला की बौद्धिक मुद्दे काढण्याची, हिंदी बोलण्याची सवय झाली. पुढे भारतभर प्रवास करताना त्याचा फायदा झाला. अखिल भारतीय बैठकीत फेब्रुवारीत वर्गावरचा प्रवास ठरत असे. त्यावेळी राजस्थानच्या कार्यवाहीका आग्रहाने माझा प्रवास मागून घेत. हिंदी चांगले आहे म्हणून! 

बौद्धिक कार्यवाहीका म्हणजे विषयांचा अभ्यास व मुद्देसूद बांधणी, तसेच भाषेवर प्रभुत्व या गोष्टी आवश्यकच. लहानपणापासून वाचनाचा असलेला नाद उपयोगी पडला. दक्षिण भारतात त्यावेळी हिंदीला काही प्रांतात विरोध होता. इंग्रजीतून विषय मांडणी करावी लागे. जरा कठीण जाई. इंग्रजी चांगले होते तरी सराव करावा लागे. 

वर्गांवरचा प्रवास असला की वर्गाकडून पुष्कळदा वेगवेगळे विषय दिलेले असतात. त्यामुळे अभ्यास वाढला.

प्रवीण वर्ग केंद्रात होईल त्यावेळीही एक दोन दिवस असेच अभ्यासपूर्ण विषय मांडावे लागतात. 

पूर्वी भारतातच विश्व विभागाचे वर्ग होत. त्यावेळी अर्थातच विषय मांडणी इंग्लिश मधून करावी लागे. पुण्याला झालेल्या वर्गात अष्टभुजा विषय मांडलेला आठवतो तर नागपूरच्या वर्गात भारतीय संस्कृतीचा विश्वसंचार हा विषय मांडला होता. इंग्लंडच्या कार्यवाहिका त्या मांडणीने प्रभावित झाल्या होत्या. 


समाजावर आघात झाले अशा प्रसंगी थोडीबहुत सेवा करायला मिळाली. किल्लारी येथील भूकंप, गुजरात मध्ये पुराने केलेला विध्वंस, पडलेले दुष्काळ, काश्मीर मध्ये आलेले विस्थापित, पाकिस्तान, बांगला व 1971 आणि कारगिल या सर्व प्रसंगी समितीने उचललेल्या जबाबदारी मधे खारीचा वाटा उचलायला मिळाला. विस्थापितांसाठी तयार झालेल्या अनेक ठिकाणच्या वस्त्यांना व महिलांसाठीच्या वसतिगृहात भेटी देऊन त्यांचे सांत्वन व मदत करता आली.


मी एक गृहिणी आहे याचे भान ठेवून प्रत्येक ठिकाणी थोडीशी आर्थिक मदत करायची असे ठरवले होते. प्रचंड मोठी रक्कम देणे फारसे जमले नाही पण खारीचा वाटा नक्कीच उचलता आला. आज जे छात्रावास समितीतर्फे चालवले जातात, काश्मीर असो, गोहाटी असो, गुजरात, औरंगाबाद अशा जवळजवळ सर्वांशी संपर्क झाला आहे.


साठे साठ्ये गोंधळेकर मेळावा


 परशुरामाने समुद्र हटवून कोकणाची निर्मिती केली. तिथे वस्ती वाढत गेली. त्यांना कोकणस्थ म्हटले जाऊ लागले. त्यातील ही तीन घराणी.

कुणाच्या डोक्यातून कल्पना निघाली माहिती नाही, पण असा मेळावा पुणे येथे आयोजित केला गेला. तत्पूर्वी साठे कुलवृत्तान्त तयार झाला होता व परशुराम हा त्रैवार्षिक अंक ही निघत असे. सकाळी दहा ते पाच अशी मेळाव्याची वेळ होती. परस्पर परिचय हा मुख्य हेतू. तत्पूर्वी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्यांची माहिती मागवली गेली होती. नाश्ता झाल्यानंतर अकराचे सुमारास जाहीर कार्यक्रमास सुरुवात झाली. वसंतराव साठे त्यावेळची एक राजमान्य व्यक्ती, श्री.रामभाऊ साठे, संघ प्रचारक हैदराबाद व सौ सुमित्रा महाजन ज्या नंतर लोकसभा अध्यक्ष झाल्या हे व्यासपीठावर विराजमान झाले. ज्या व्यक्तींचे कार्य उल्लेखनीय होते अशांना व्यासपीठावर बोलावून त्यांचा सत्कार केला गेला. परशुराम, परशुराम क्षेत्र येथे असलेली शिवपिंड व साठे कुलस्वामिनी अंबाबाई यांचे फोटो असलेली एक प्रेम व शाल दिली गेली. मला मिळालेली फ्रेम बिंदाकडे, तीही साठे असल्याने मी ठेवली. आजही त्यांच्या देव्हाऱ्यात आहे. मला हा सन्मान मिळण्याचे कारण म्हणजे माझे समितीचे काम हेच आहे.


माझे हृदय कमकुवत झाले. हार्ट अटॅक येऊ लागले. एक दोनदा प्रवासातही आला. म्हणून जबाबदारी सोडायची असे ठरवले. तसेच केंद्र बैठकीतही सांगितले. पण त्या वेळी अखिल भारतीय संमेलन दिल्लीला होते. ते झाल्यानंतर मग पाहू असे सर्व जणी म्हणाल्या.

 त्या संमेलनात मुख्य भाषण माझे ठरवले गेले. विषयही निश्चित झाला आणि गंमत म्हणजे त्या विषयाला योग्य अशी पुस्तके माननीय शांताक्का ह्यांनी काढून दिली. एक दोन दिवस नागपूरला जास्त राहून विषय तयार केला. प्रमिलाताई, रुक्मिणी अक्का, चित्राताई वगैरे त्यावेळी कार्यालयात असलेल्या अधिकाऱ्यांना मुद्दे दाखवले व आवश्यक त्या सुधारणा विचारल्या. घरी परतल्यानंतर विषय सखोल तयार केला.

 बौद्धिक झाले व सर्वांचे अभिप्राय बौद्धिक सुरेख झाले आला असे आले. हे भाषण ऐकायला प्रेक्षकात

 मा. सुदर्शनजी, मा. राम नाईक, मा. सुषमा स्वराज, मा. सुमित्रा महाजन असे अनेक विद्वान लोक होते. त्यावेळी निवासाची व्यवस्था थोड्या अंतरावर होती. गाडीने जावे लागे. सर्वांच्या शुभेच्छा घेत बाहेर आले. त्यावेळी सुमित्रा महाजन घाईगर्दीने निघालेल्या होत्या. पण त्या जवळ आल्या व म्हणाल्या," सुशीलताई, मला आधीच निघायचे होते पण तुमचे बौद्धिक ऐकायला थांबले. खूप आनंद झाला"


दिल्लीच्या प्रवासात रेखा राजने सुषमा स्वराज यांच्या घरी नेले होते. त्यावेळी त्या उदयन्मुख पुढारी होत्या. 

अखिल भारतीय समन्वय समितीच्या बैठकीनाही जायला मिळाले.


श्री.राम भाऊ साठे व प्रल्हादजी अभ्यंकर यांच्यामुळे अनेक थोरामोठ्यांच्या भेटी होत होत्या. समितीमुळे ही अनेकांच्या भेटी झाल्या.


लहानपणापासून आपला भारत पाहिला पाहिजे अशी इच्छा होती. लग्न झाले. नंतर वय प्रौढत्वकडे झेपावू लागले तेव्हा ठरवले ही इच्छा पूर्ण करायची. यात्रा कंपन्यांबरोबर सर्व भारत पाहिला. समितीमुळे पुन्हा एकदा भारताचे दर्शन झाले. पूर्वांचल, कर्नाटक, हिमाचल, पंजाब अशा काही भागात एकदाच प्रवास झाला तर इतर भारतात दोन तीन वेळा झाला.


 कोणातर्फे नक्की आठवत नाही पण अहमदाबादला बहुतेक भारतीय संस्कृती प्रचार समितीतर्फे 34 प्रांतांचा मिळून एकत्र कार्यक्रम होता. मला बोलायचे होते. इंदुमती काटदरे अध्यक्ष होत्या. भाषण संपल्यावर अनेक जण येऊन भेटले. सर्वांनाच विषय आवडला होता. इतिहास संकलन समिती तर्फे ही काही भाषणे झाली. मला वाटते माननीय यादवराव जोशी या कामात होते.


 अशा संधी व असे यश आयुष्यातला मोठा ठेवा आहे. मोडलेले हात पाय, हृदयाचे दौर्बल्य, वाढलेले विस्मरण अशा आजच्या अवस्थेत हे जुने सर्व आठवले की आयुष्य वाया गेले नाही हे जाणवते.


-सुशील प्रल्हाद अभ्यंकर


बुधवार, १५ जुलै, २०२०

दर्शनाने धन्यता सहवासाने कृतकृत्यता! भाग 12

 दर्शनाने धन्यता सहवासाने कृतकृत्यता! भाग 12

श्रीमती सुशील प्रल्हाद अभ्यंकर यांना ज्यांचे दर्शन झाले, सहवास लाभला, अशा प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व राष्ट्रसेविका समितीतील व्यक्तींविषयी लिहिलेल्या आठवणी. या सर्वांविषयी तसेच राष्ट्रसेविका समिती मुळे मिळालेल्या समाज सेवेच्या संधींविषयी कृतज्ञ भाव व्यक्त करण्याचा हा एक मार्ग. आत्ता वयाच्या ९१ व्या वर्षी, वाढत्या विस्मरणातून देखील, जशी आणि जेवढी शाबूत राहिली तितकी - एक स्मरण मालिका.

----------------------------------------------------------------------------------------------------------------


कलावती पंडित 

पुणे निवासी, बालपणापासूनच्या सेविका. मराठवाड्यात काम सुरु करणाऱ्या विस्तारिका. यांच्या कार्य काळात नगर मराठवाड्याला जोडले होते. वर्षातून दोन तीनदा नियोजन पूर्ण प्रवास करीत असत. नगर, बीड, संभाजीनगर असा त्यांचा प्रवास होई. 


माणिक ताई टिळक 

चेंबूरच्या राहणाऱ्या. कार्यवाढीसाठी मराठवाड्यात प्रवास करत. साधारणपणे १९७९ ते १९८३. दांडगी जिद्द, सौम्य स्वभाव, सहज संपर्काचा हातखंडा होता. प्रवास व निवास दोन्हीतील गैरसोयींकडे दुर्लक्ष करून प्रवास चालायचा. वय ६०च्या आसपास होते. वर्षेातून सलग २१ दिवस प्रवास करत. वर्ग, विशेष कार्यक्रम यांचे निमित्तानेही येत. जातील तिथे त्यांची लहान मुलांशी देखील मैत्री होत असे. 


प्रभाताई दिक्षित

माहेर वर्ध्याचे. वं. मावशींचा लग्नाआधी सहवास लाभलेला. 

बी. ए. झालेल्या होत्या. नेवाश्यालाही शाळेत नौकरी केली. संभाजीनगरला आल्यावर नंतर गुजराती विद्या मंदिरात सहशिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. दरम्यान बी. एड. प्रथम वर्गात उत्तीर्ण झाल्या. येथील समिती कार्याचा एक आधारस्तंभ बनल्या. अक्षर चांगले होते. कार्यक्रमाचे नियोजन आखीव रेखीव असायचे. व्यवस्थितपणा नावाजण्याजोगा होता. मोठे कुटुंब व कुटुंबातल्या मोठ्या होत्या. मानाने व मनानेही मोठ्या होत्या. इतरांना प्रेरणा व उत्साह देण्यात वाकबगार होत्या. कौतुक करणे सहजभाव असला तरी आवश्यक तेव्हा रागवणेही जमत असे. त्यावेळी मराठवाड्यात काम कमी होते. संभाजीनगरच मुख्य स्थान होते. जिल्हा कार्यवाहिका वगैरे पदे नव्हती. प्रभाताईंकडे खास जबाबदारी कोणतीच नव्हती. पण शहर कार्यवाहिका अवंतिकाबाईंनाही मार्गदर्शन करणारे व्यक्तीमत्व होते. बौद्धिक, गीत, कथाकथन, बैठक घेणे, उत्सवाचे नियोजन तसेच प्रवासही करत असत. वाचन बरेच होते.


अवंतिकाबाईं जोशी

शहर कार्यवाहिका म्हणून बरेच वर्षे काम केले. संभाजीनगर मध्ये समिती कार्य वाढवले. सौम्य स्वभाव, संपर्क दांडगा व आपले म्हणणे पटवून देऊन कृती करायला लावायच्या. हे कसब चांगले होते. आवाजही खूपच गोड व चांगला होता. 

श्री. जोशी हेही संघ स्वयंसेवक असल्याने घरात पाहुण्यांचा राबता सतत असे. केलेल्या वाचनातील मनाला भावेल ते लिहून ठेवत. रोजनीशी देखील लिहीत. बैठक परिणामकारक घेत. मराठवाड्यात ही थोडा बहुत प्रवास करत. आजारी पडून अंथरूणावर खिळल्यानंतर ही आठवणीने गुरूदक्षिणा पाठवत. १० अंक व दिनदर्शिका सुद्धा घेत असत. मोठा मुलगा विवेकानंद केंद्रात (कन्याकुमारी) चा २ वर्ष प्रचारक होता. मुलगी ही समितीच्या कामात होती. आता सूनही समिती कार्यक्रमात सहभागी असते. 


 नलिनीताई कोल्हटकर 

 मुलगी रंजना आणि त्या दोघी मिळून सरस्वती कॉलनीत शाखा घेत. उपस्थिती ८०--१०० असायची. भजनाचे वर्ग घेत असल्याने बऱ्याच ओळखी होत्या. अनेक बैठका त्यांच्या कडे त्यांचे घर मध्यवर्ती असल्याने होत असत. एकदा वं. मावशी त्यांच्याकडे मुक्कामाला होत्या. आकाशवाणीवर आद्य शंकराचार्यांवर कार्यक्रम सादर करताना तसेच शहरातील काही कार्यक्रमात पेटीवादनाचा सहभाग होता. भजनी वर्गात समिती गीते शिकवत. 


 विमल ताई राव 

 लग्ना पूर्वीच्या वर्तक. पुण्याच्या होत्या. समितिच्या महाराष्ट्रातील व इतर प्रांतातील वर्गावर शिक्षिका म्हणून गेल्या होत्या. जराश्या अबोल वाटायच्या. श्री. राव संभाजीनगरला बदलून आले तेव्हा त्या इथे आल्या. स्वतः चौकशी करून कार्यक्रमाला येऊ लागल्या. सिंदखेड राजाला जिजामाता त्रिशताब्दी मोठ्या प्रमाणात झाला. त्याला ही त्या उपस्थित होत्या.


 नंदिनी कोरटकर 

 जवाहर कॉलनी शाखेच्या सब कुछ! 

तेथे एक चांगला गट तयार झाला होता. दैनंदिन शाखेवर ही ५०-६० उपस्थिती असायची. शहर बस वाहतूक फारच कमी होती. तरीही चालत येऊन सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहत असत. वाढत्या वयाच्या दुखण्यांमुळे संपर्क व काम कमी झाले. 


 अक्का करंदीकर 

 भाऊसाहेब करंदीकर यांच्या पत्नी. संघ कार्यकर्त्यांच्या घरी राबता. सर्वांशी मोकळे बोलणे. त्यामुळे बरीच माहिती असायची. तसेच आवश्यक ते काम काम करून घेण्याची हातोटी होती. अर्थात त्यासाठी आवश्यक असे आपुलकीचे संबंध होते. घरात ५०-६० जणू बसू शकतील असा एक हॉल होता. पावसाळ्यातील काही कार्यक्रम, बैठका तेथे होत व साप्ताहिक शाखा ही लागत असे. समितीच्या सेविका त्यांच्या जणू सुना,नातीच असायच्या. त्यांच्या रूपाने माता ही मिळायची, हक्काने कामही सांगितले जायचे. नियोजन मनात असायचे. त्यामुळे कुठलीही व्यवस्था पटकन होत असे. कार्यक्रमाला वेळेवर उपस्थित असत. १-२ जणींना सोबत घेऊन येत असत. अडीअडचणींच्या वेळी भक्कम आधार होता.


मंगळवार, १४ जुलै, २०२०

दर्शनाने धन्यता सहवासाने कृतकृत्यता! भाग ११

 दर्शनाने धन्यता सहवासाने कृतकृत्यता! भाग ११

श्रीमती सुशील प्रल्हाद अभ्यंकर यांना ज्यांचे दर्शन झाले, सहवास लाभला, अशा प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व राष्ट्रसेविका समितीतील व्यक्तींविषयी लिहिलेल्या आठवणी. या सर्वांविषयी तसेच राष्ट्रसेविका समिती मुळे मिळालेल्या समाज सेवेच्या संधींविषयी कृतज्ञ भाव व्यक्त करण्याचा हा एक मार्ग. आत्ता वयाच्या ९१ व्या वर्षी, वाढत्या विस्मरणातून देखील, जशी आणि जेवढी शाबूत राहिली तितकी - एक स्मरण मालिका.

-------------------------------------------------


जम्मू ची एक मजेशीर आठवण -


इथल्या छात्रावासातील मुली वयाने आठ ते बारा वर्षांच्या होत्या. सकाळचे कार्यक्रम झाल्यानंतर धुतलेले पातळ वाळत टाकायला लागले तर त्या मुलींनी माझ्या हातातून पातळ जवळ जवळ ओढून घेतले. त्यांना इतके मोठे नऊवारी पातळ वाळत टाकायला जमणार नाही हे सांगितले. पण त्या ऐकायलाच तयार नव्हत्या. एका कार्यक्रमाची वेळही झाली होती. शेवटी त्यांच्या कडे ते पातळ वाळत टाकायला देऊन मी बाहेर गेले.

 दिवसभर कार्यक्रम चालू होते. रात्री खोलीत कपडे गादीवर आणून ठेवलेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळची रेल्वे होती. नेसायला घेतले तर पातळ मातीने माखलेले होते. पण बदलायला वेळ नव्हता. तशीच नेसून निघाले. दिवसभर मातीच्या वासातच प्रवास झाला. पण त्या मुलींचे ताईजी हम डालते है.. हे वाक्य मात्र कायम लक्षात राहिले. प्रवासात बहुतेक वेळा छात्रावासात मुक्काम असायचा.


सीआयडीच्या अशाच काही आठवणी


पाकिस्तानचे लियाकत अली खान नेहरूंना भेटायला आले त्यावेळी गडबड नको म्हणून संघ कार्यकर्त्यांना आठ दिवस पकडून ठेवले होते. आग्री पाड्याला आम्ही रहात होतो. त्या वेळी मधल्या पॅसेजच्या समोरच्या कोपऱ्यावर सीआयडी उभे असले की चटकन लक्षात यायचे. आग्रीपाडा पोलिस स्टेशनही जवळच होते. 

हे घरी येऊन पाय धुतात तोच इन्स्पेक्टर दारात आले. मी सांगत होतेच सीआयडी बद्दल. तुम्हाला न्यायला आलो असे म्हणाले. 

हे म्हणाले,” थांबा, दोन घास जेवतो व येतो.”

 इन्स्पेक्टर दारात उभे राहिले. बिऱ्हाडाची जागा म्हणजे एक खोली व तीन फुटाचे स्वयंपाकघर. मजल्यावरची एकेक जण येऊन पाहून गेली. आधीच मी दोघा-तिघांना सांगितले होतेच. जेवण झाल्यावर चला म्हणाले. 

तेव्हा मी त्यांना विचारले,” कुठे पोलीस स्टेशन वर नेणार आहात का?”

 ते म्हणाले,” नाही “. 

“ मग कुठे?”

“ का विचारताय?”

“ दोन तीन तासात सोडणार असाल तर प्रश्न नाही. पण ठेवून घेणार असला तर आंघॊळीचे व घालायचे कपडे द्यायला हवेत.”

“ कपडे द्या.”

 जाताना यांना म्हणाले,” धन्य आहे. यांच्यासारख्या गृहिणींमुळेच तुमचे काम वाढत असावे.”

हे आठ दिवस ऑर्थररोड जेलमध्ये होते. मग सुटका झाली. गंमत म्हणजे अगदी घरी आणून सोडले. 


साने गुरुजी गेले तेव्हा असेच घरावर लक्ष ठेवले गेले. हे आल्या आल्या एक अधिकारी आत आला, खुर्चीवर बसला आणि म्हणाला,” साने गुरुजींनी प्राणत्याग केला त्याचे कारण काय असेल?”

 हे उत्तरले,” ते शोधून काढणे तुमचे काम आहे, माझे नाही.”

 दुसऱ्या दिवशी शोकसभेत मला बोलायचे आहे असे सांगितल्यावर जमणार नाही, ठराविकच लोकच बोलतील व सभा संपेल असे सांगितले गेले व विचारल्यानंतर दोन तीन नावे सांगितली. हे उत्तरले," यांच्याखेरीज कोणीही स्टेजवर आला तर मात्र मी बोलणारच" आणि गंमत म्हणजे यांचे बोलणेही झाले.


रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाच्या वेळी काही ठिकाणी निदर्शने तर काही ठिकाणी सभा असा कार्यक्रम चालू होता. क्रांती चौकात सभा होती. मी भाजीची पिशवी घेऊन उस्मानपुऱ्यातून क्रांती चौकातून नूतन कॉलनी कडे गेले. पण वाटेतच सीआयडीने पकडले. म्हणाले चला तुरुंगात, आम्ही तुम्हाला ओळखतो. 

पोलिसांच्या गाडीत बसवले व पदमपुऱ्यातील पोलीस स्टेशनमध्ये नेले. तेथे असेच पन्नास साठ जणांना आणले होते. मनावर ताण होता. पण वरचेवर विचारपूसही चालू होती. दुपारी सर्वांना जेवण मिळाले व अडीच वाजण्याच्या सुमारास सोडले. त्यावेळी फोन नव्हते. घरी कळवायला हवे असे म्हटल्यावर पोलीस म्हणाले, आम्ही कळवतो व त्यांनी कळवले होते. 

  • सुशील प्रल्हाद अभ्यंकर 









सोमवार, १३ जुलै, २०२०

दर्शनाने धन्यता सहवासाने कृतकृत्यता! भाग १०

 दर्शनाने धन्यता सहवासाने कृतकृत्यता! भाग १०

श्रीमती सुशील प्रल्हाद अभ्यंकर यांना ज्यांचे दर्शन झाले, सहवास लाभला, अशा प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व राष्ट्रसेविका समितीतील व्यक्तींविषयी लिहिलेल्या आठवणी. या सर्वांविषयी तसेच राष्ट्रसेविका समिती मुळे मिळालेल्या समाज सेवेच्या संधींविषयी कृतज्ञ भाव व्यक्त करण्याचा हा एक मार्ग. आत्ता वयाच्या ९१ व्या वर्षी, वाढत्या विस्मरणातून देखील, जशी आणि जेवढी शाबूत राहिली तितकी - एक स्मरण मालिका.

--------------------------------------------------------------------------------------------------------------


प्रतिभाताई भावे


 संस्कृत डॉक्टरेट व प्रोफेसर. अहिल्या मंदिरात वरचेवर येत असत. त्यावेळी भेट होई. अगदी निरभिमानी व्यक्तिमत्व. मराठी प्रार्थनेचे संस्कृत भाषांतर कोणी केले माहिती नाही. कदाचित प्रतिभाताईंनीही केले असेल. पण नमस्काराचे संस्कृत भाषांतर त्यांनी केले आहे असे वाटते. नमस्कारात पृथ्वी, आप, तेज, आकाश होते. पंचमहाभूतांपैकी वायू नव्हता हे माझ्या लक्षात आले. त्यांच्याशी बोलले आणि त्यांनी लगेच "चतुर्थ मे नमस्कार नमो वायू देवताय" हा श्लोक जोडला..


शकुनताई वऱ्हाडपांडे


 विदर्भ प्रांताच्या कार्यवाहिका. सर्व लहान मोठ्या सेविकांना मायेने सांभाळून घेणे हे वैशिष्ट्य होते. मनातल्या शंकेचे निरसन योग्य व्यक्तीकडून सहजपणे करून घेत असत. नीटनेटकी राहणी होती.


मीनाताई देव


अहिल्या मंदिर मध्ये रहायला ठरवून आल्या होत्या. अहिल्या मंदिर च्या जणू व्यवस्थापक होत्या. गृहिणी सारखा त्यांनी कारभार सांभाळला. खूप काम पडले तरी सदैव प्रसन्न असायच्या. मा. सिंधुताई,वं.उषाताई यांचे पथ्यपाणी व्यवस्थित सांभाळले. सकाळी नेमाने फिरायला जात असत. भजनी वर्गातही सहभाग असायचा. मला हार्ट अटॅक आला तेव्हा जवळच्या दवाखान्यात तीन-चार दिवस होते. दुपारच्या वेळी मीनाताई सोबत असत.


माननीय सिंधूताई फाटक 


श्री आबाजी थत्ते यांची बहीण. समितीच्या एक जेष्ठ प्रचारिका. यांचे निवासस्थान दादरला होते ते ओझरते आठवते. वैधव्य तारुण्यातच आले. एकदा आग्रीपाड्याला आल्या होत्या. काहीतरी विषय निघाला आणि फाटक यांच्या आठवणीने त्यांना रडू आले. मी वयाने लहान. त्यांच्या शेजारी बसून फक्त हात फिरवत राहिले. 

आबांच्या सल्ल्याने व समिती कार्यकर्त्यांच्या आग्रहाने हळूहळू समिती कार्यात रुळल्या. उत्तर भारत व पुढे दिल्ली हे त्यांचे केंद्र बनले. आवश्यक असेल तर सेविकांची दोन तीन पथके सैन्याच्या मदतीला पाठवू असे आत्मविश्वासाने सांगण्याजोगे उत्तर भारतात काम वाढले. प्रवासही चालू असे.

 वय झाले, प्रवास होईनासा झाला. मग नागपूरला केंद्र कार्यालयात राहिल्या. छात्रावासातल्या मुलींना छोट्या छोट्या गोष्टी सांगत असत. टेबलाजवळ बसून आल्या गेल्याची नोंद, दूरध्वनी घेणे, उत्तर देणे वगैरे चालू असे. व्हीलचेयरवरून येणे जाणे असे. त्यांना भेटायला कोणी गेले कि छान हसून स्वागत होई व उजवा हात जणू आशीर्वादासारखा वर उचलला जाई. शेवटपर्यंत पांढरी साडी ब्लाऊज हाच वेष कायम राहिला.

 त्यांना खारे दाणे खूप आवडायचे म्हणून नागपूर ला जाताना त्यांच्यासाठी व इतरांसाठी नेहमी करून नेत असे तसेच आणखी एक गोष्ट त्या माझ्याकडे हक्काने मागायच्या. ती म्हणजे नऊवारी साडीची चौघडी. मी शिवलेलीच पसंत पडत असे.

 काही वेळा इतर प्रचारिका त्यांच्याकडून चौघडी घेऊन जायच्या. मग मला निरोप यायचा कि चौघडी पाठव संध्याकाळी गच्चीत जाऊन बसणे त्यांना खूप आवडायचे


माननीय कुसुमताई साठे

पहिल्या अखिल भारतीय बौद्धिक कार्यवाहिका! संस्कृतचा आणि अनेक विषयांचा सखोल अभ्यास होता. विद्वत्तेचे तेज होते पण कधीच धाक नव्हता. शिक्षा वर्गावर पहिली भेट झाली. त्यावेळी मीही साठेच होते. सुशीलताई महाजनही त्यावेळी साठे होत्या. शीलाताई लेले यांचेही माहेरचे आडनाव साठे होते असे अंधुक आठवते. रुईया कॉलेजमध्ये वर्गावर मी व सुशिलताई महाजन शिक्षार्थी होतो.

चर्चेच्या वेळी त्या म्हणायच्या,” ए वाईची साठे, उठ!”. त्यांची कधी भीती वाटली नाही. नाशिकच्या प्रबोधच्या वर्गावर त्या आल्या असताना मी वर्गाधिकारी होते. त्या वेळी ठरवून त्यांच्या उपस्थितीत ‘गायत्री मंत्र’ हा विषय प्रथमच मांडला. सुरुवातीलाच,” चुकले तर सांगा व आवश्यक त्या सुधारणाही सांगा” अशी त्यांना विनंती केली होती. त्यांना विषय मांडणी खूप आवडली. 

ह्या वर्गापूर्वी प्रबोधचे वर्ग केंद्रात होत असत. माननीय बकुळताईंच्या आग्रहाने तो प्रथमच नाशिकला झाला अन वर्ग ठरल्या ठरल्या मला निरोप आला,” तुला सर्वाधिकारी म्‍हणून पूर्णवेळ राहायचे आहे. पुढे पूर्णवेळ प्रचारिका व काही काळासाठी विस्तारिका निघालेल्या अनेक जणी वर्गावर होत्या. त्यांच्याकडे अधिक लक्ष पुरवायचे आहे ह्याही सूचना होत्या.


माननीय नीलाताई जोशीराव 


संस्कृतच्या प्राध्यापिका. नागपूरला शक्तीपीठात वर्ग असला की त्यांचे मार्गदर्शन मिळत असे. व्यक्तिमत्वाचा जरासा दबदबा असे. एकदा त्यांच्या घरी गेल्याचे आठवते. माझी रामायण प्रवचने त्यांना आवडली होती.


-सुशील प्रल्हाद अभ्यंकर 



















रविवार, १२ जुलै, २०२०

दर्शनाने धन्यता सहवासाने कृतकृत्यता! भाग ९

 दर्शनाने धन्यता सहवासाने कृतकृत्यता! भाग ९

श्रीमती सुशील प्रल्हाद अभ्यंकर यांना ज्यांचे दर्शन झाले, सहवास लाभला, अशा प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व राष्ट्रसेविका समितीतील व्यक्तींविषयी लिहिलेल्या आठवणी. या सर्वांविषयी तसेच राष्ट्रसेविका समिती मुळे मिळालेल्या समाज सेवेच्या संधींविषयी कृतज्ञ भाव व्यक्त करण्याचा हा एक मार्ग. आत्ता वयाच्या ९१ व्या वर्षी, वाढत्या विस्मरणातून देखील, जशी आणि जेवढी शाबूत राहिली तितकी - एक स्मरण मालिका.

------------------------------------------------------------------------------------------------------------------


माननीय प्रमिल ताई मुंजे 


माननीय प्रमिल ताई मुंजे ह्यांचे प्रसिद्ध घराणे व श्रीमंतही. मी त्यांना पाहिले ते त्यांच्या प्रौढ वयात. समितीच्या कार्याची रचना प्रांत, जिल्हा, तालुका, शहर अशी झाली तेव्हा त्या पश्चिमांचल च्या प्रमुख झाल्या. 

महाराष्ट्र गुजरात व राजस्थान या तिन्ही प्रांतांचे मिळून पश्चिमांचल होते. त्यांचा चेहरा गंभीर असे पण हसत तेव्हा समोरच्याचे मन जिंकत. केंद्र कार्यालय अहिल्या मंदिर नागपूर येथे वरचेवर भेट होई. तेव्हा एका बैठकीत त्यांच्याच आग्रहाने मला प्रांत बौद्धिक कार्यवाहिका, आंचल बौद्धिक कार्यवाहिका या पदावरून अखिल भारतीय बौद्धिक कार्यवाहिका या पदावर उडी मारावी लागली. औरंगाबादला एकदा घरीही आल्या होत्या. माझ्या कामाबाबत त्या एकदा म्हणाल्या माझी त्यांनी केलेली निवड योग्य ठरली. 


माननीय बकुळताई देवकुळे 


माननीय बकुळताई देवकुळे ह्यांचे माहेर पुण्याचे. वंदनीय ताई आपटे ह्यांचा सहवास लाभलेली हि बकुळ नातू. देवकुळे मंडळी वाईची. काहीतरी नवीन योजना असेल त्यावेळी आधी काही जणीशी चर्चा करायची पद्धत होती. अशा वेळी माझा उल्लेख माझे माहेर वाईचे असल्याने नणंद म्हणून व्हायचा! गौरवर्ण, उंचापुरा देह, शारीरिक चांगले. वर्गावर शिक्षिका म्हणून असायच्या. दंड फिरवण्यात कौशल्य होते. आवाज मोठा होता. शिस्त कडक असे. दादरच्या हिंदू कॉलनीत राहत असत.

रुईया कॉलेजमध्ये प्रारंभिक प्रवेश वर्ग होते. मी त्या वर्गावर प्रारंभिक ची विद्यार्थी होते. मी देखील दंड सफाईदार करते याचे त्यांना कौतुक होते. तेव्हा त्या मुंबईच्या कार्यवाहिका होत्या.

एकदा समितीच्या विविध आयामांसकट विस्तारित कामाची माहिती देणारे बौद्धिक झाले. साधारणपणे १९४५ साल असावे. माझे वय पंधरा-सोळा. बौद्धिक ऐकल्यानंतर शंका निरसनासाठी वेळ असे. एवढ्या मोठ्या कामांसाठी आपण योग्य आहोत का? असा विचार मी बोलून दाखवला. वक्त्या काही बोलायच्या आधीच बकुळ ताई कडाडल्या,” असे वाटत असेल तर उद्यापासून येऊ नकोस. सायं शाखा, सायंस्मरण झाले व घरी जायला निघालो. त्यावेळी मुक्कामाची सोय वर्ग स्थानी नव्हती. संध्याकाळी घरी जायचे व सकाळी जेवणाचा डबा घेऊन यायचे. निघताना मी ज्या मैत्रिणी झाल्या होत्या त्यांचा निरोप घ्यायला लागले. सगळ्यांनाच हा प्रसंग बोचला होता. खरं म्हणजे बकुळताईंनाही जरा जाणीव झाली असावी. त्यांनी शिक्षिका इंदुताई देव, विमलताई वर्तक ह्यांना लक्ष ठेवायला सांगितले होते.मी निघाले त्यावेळी विमलताई वर्तक म्हणाल्या,” तुला बकुळ ताईंनी बोलावले आहे. मी म्हटले,” मला त्यांना भेटायचे नाही. जिना उतरून खाली आले तो बकुळ ताई समोर उभ्या! म्हणाल्या,” उद्या यायचे आहे. नाही म्हणून चालायचे नाही. मोठ्यांचे ऐकायला हवे.

 माझ्या वर्ग पुरा झाला. वाईला परतले पण लग्नानंतर मुंबईला गेल्यावर समिती कामामुळे वरचेवर भेटी होत गेल्या. माझा प्रवेश वर्ग ठाण्याला झाला त्यावेळी काही लहान मोठ्या जबाबदाऱ्या माझ्यावर सोपवल्या गेल्या होत्या.

 

रुक्मिणी अक्का.


 केंद्र सहकार्यवाहिका म्हणून अनेक वर्षे त्यांच्याकडे जबाबदारी होती. प्रकृती अस्वास्थ्यामुळे काम करायच्या थांबल्या. स्वतः करून सर्वांना खायला घालणे खूप आवडायचे. नागपूरला आल्या तरी रोज काहीतरी करत असत. स्वभाव वैशिष्ट्य म्हणजे मातेसारखे वात्सल्य. दृष्टीमध्ये कौतुक भरलेले असे. लोकरीचे विणकाम हा छंद होता. एकदा मी ठाण्याला वृंदाचे घरी गेले होते त्यावेळी त्या ठाण्याला घरी आल्या होत्या. आत्ताच्या प्रमुख संचालिका माननीय शांताक्काही बरोबर होत्या. 


इंदुताई देव 


या गोऱ्या उंच होत्या व सडपातळ होत्या. शारीरिक बरोबरच चर्चा घेण्यात त्यांचा हातखंडा होता. स्वभावाने सौम्य होत्या.


 विमलताई वर्तक


 या पुण्याच्या होत्या. काळ्यासावळ्या, बेताचा बांधा पण पाहताच करारीपणा जाणवत असे. बोलणे कमी होते. जरासा धाकच वाटायचा. अनेक वर्षे समिती कामात सहभागी होत्या. 


 वीणाताई बोडस 


समिती काम विस्तारले त्या काळातील बकुळताईंच्या सहकारी. सगळ्यांशी हसून बोलून राहण्याची पद्धत असल्याने सर्वांच्या आवडत्या होत्या. त्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे डोळे मोठे होते. प्रवासात ज्या घरी उतरत तेथे मोकळे वातावरण निर्माण करत. नक्की आठवत नाही पण बहुदा दादरला राहायला होत्या. श्री राजाभाऊ बोडस यांचीही ओळख होती. मग नंतर पार्ल्याला राहात होत्या असे वाटते.


  • सुशील प्रल्हाद अभ्यंकर 

दर्शनाने धन्यता सहवासाने कृतकृत्यता! भाग ८

 दर्शनाने धन्यता सहवासाने कृतकृत्यता! भाग ८

श्रीमती सुशील प्रल्हाद अभ्यंकर यांना ज्यांचे दर्शन झाले, सहवास लाभला, अशा प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व राष्ट्रसेविका समितीतील व्यक्तींविषयी लिहिलेल्या आठवणी. या सर्वांविषयी तसेच राष्ट्रसेविका समिती मुळे मिळालेल्या समाज सेवेच्या संधींविषयी कृतज्ञ भाव व्यक्त करण्याचा हा एक मार्ग. आत्ता वयाच्या ९१ व्या वर्षी, वाढत्या विस्मरणातून देखील, जशी आणि जेवढी शाबूत राहिली तितकी - एक स्मरण मालिका.

--------------------------------------------------------------------------------------------------------------

 

वंदनीय ताई आपटे 

यांच्या घरी आम्ही उभयता एकदा गेलो होतो. नंतर सेविकांबरोबर अनेक वेळा जाणे झाले. घरी आलेल्याला काहीतरी दिल्याशिवाय त्या जाऊ देत नसत. पुष्कळदा आल्याच्या वड्या त्यांनी स्वतः केलेल्या असत. आणखी एक लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे त्या सर्वांना निरोप द्यायला जिना उतरून खाली येत असत. 

औरंगाबादला त्याही घरी राहिल्या होत्या. घराच्या गच्चीत त्यांचे बौद्धिक झाले होते.

वंदनीय ताईंची आणखी एक आठवण म्हणजे माझे पहिले पुस्तक वंदे मातरम. त्याच्या प्रकाशनाचा कार्यक्रम होता. वंदनीय ताईंनी हळूच विचारले," हे तुम्हीच लिहिलेत ना?" मी हो म्हटले. पण ताई पुढे म्हणाल्या मला वाटले प्रल्हादजीनी मदत केली आहे का?!! यांना त्या माझ्या आधीपासून ओळखत होत्या. 

किल्लारी ला भूकंप झाला. हादरे बीड धाराशिव भागातही बसले होते. मदतीसाठी लातूरला पोचले. डॉक्टर कुकडे यांच्याशी बोलणे झाले आणि त्यांच्याच गाडीने किल्लारी ला पोचलो. दवाखान्यात दाखल झालेल्यांची चौकशी, आवश्यक ती मदत, त्यांना चहा व नाश्ता म्हणून सांजा दिला. काही जणांना भरवायला लागला. त्यांच्या घरची चौकशी करून निरोप पाठवले गेले. नंतर पैसे, कपडे, भांडी, औषधे, धान्य व इतर वस्तू पोचवायला परत गेलो होतो. त्यावेळी त्यांना राहण्यासाठी झोपड्या बांधल्या होत्या. 

वंदनीय ताईंची आठवण म्हणजे या दरम्यान त्यांचे घरी पत्र आले होते. तेव्हा फोनची फारशी सुविधा नव्हती. तुम्ही तेथे आहात त्यामुळे काळजी नाही, आवश्यक त्या गोष्टी तुम्ही केल्या असतील ही खात्री आहे.


वंदनीय उषाताई 

वंदनीय उषाताई घरी आल्या होत्या तेव्हा काही सेविका त्यांच्याकडून गीतांच्या चाली शिकायला आल्या. हॉलमध्येच सर्व बसल्या होत्या. स्वाभाविकच आवाज बाहेर जात होता. शेजारपाजारच्या महिला ते ऐकून पाहायला आल्या होत्या. फार छान म्हणायच्या त्या गीते. 

 वंदनीय उषा ताईंचे राहणे, वागणे, बोलणे अत्यंत साधे होते. तेथील छात्रावासातील मुलींच्या त्या जणू आजी होत्या. माझा अर्ध्या बाह्यांचा स्वेटर त्यांना खूप आवडला होता, पण त्यांना तो लहान होत होता. मग त्यांना तसाच स्वेटर त्यांच्या मापाच्या विणून दिला. त्यांनी तो पुढे अनेक वर्षे वापरला. 

एकदा त्या बऱ्याच आजारी पडल्या. झोपून राहायच्या. काहीच खायच्या नाहीत. प्रमिलाताई आणि चित्रा ताईंचे प्रवास ठरलेले होते. मला निरोप आला, नागपूरला राहायला या. योगायोगाने माझा प्रवास तेव्हा नव्हता. नागपूरला गेले. भात कालवून बळजबरी भरवणे, खुर्चीवर बसायला लावणे, व्हील चेअर मागवून घेतली, कार्यालयात हिंडवून आणणे, वाचून दाखवणे असे सगळे केले. त्यांची प्रकृती सुधारली. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर म्हणाल्या की औषध आहेच. पण तुमचा सहवास देखील त्यांना गुण यायला कारणीभूत आहे.

एक वर्ष शाळाशाळांतून संपर्क असा कार्यक्रम होता. शाळेशी संपर्क साधून त्यांच्या सोयीच्या वेळी जाऊन मुलांना संस्कारक्षम कथा व गीते सांगायची. त्या शाळेने कळवले तर त्यांना आवश्यक विषयावर विषय मांडणी करायची. अशी योजना होती. एका शाळेत मी व उषाताई गेलो होतो. त्यांनी कळवलेला विषय भारदस्त होता. कल्पना होती की आठवी नववी दहावीची मुले समोर असतील. पण प्रत्यक्षात समोर आली ती पाचवी सहावी सातवी ची मुले! उषाताई हसून म्हणाल्या," सुशीलताई, परीक्षाच आहे ही. " मी उत्तरले," काळजी करू नका. 

प्रारंभीकपासून प्रवीण वर्गापर्यंत विषय मांडायची सवय उपयोगी पडेल." विषय मांडून खाली बसल्यावर उषाताईंनी हळूच मांडीवर थोपटले. 


-सुशील प्रल्हाद अभ्यंकर


शनिवार, ११ जुलै, २०२०

दर्शनाने धन्यता सहवासाने कृतकृत्यता! भाग ७

 दर्शनाने धन्यता सहवासाने कृतकृत्यता! भाग ७

श्रीमती सुशील प्रल्हाद अभ्यंकर यांना ज्यांचे दर्शन झाले, सहवास लाभला, अशा प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व राष्ट्रसेविका समितीतील व्यक्तींविषयी लिहिलेल्या आठवणी. या सर्वांविषयी तसेच राष्ट्रसेविका समिती मुळे मिळालेल्या समाज सेवेच्या संधींविषयी कृतज्ञ भाव व्यक्त करण्याचा हा एक मार्ग. आत्ता वयाच्या ९१ व्या वर्षी, वाढत्या विस्मरणातून देखील, जशी आणि जेवढी शाबूत राहिली तितकी - एक स्मरण मालिका. 

--------------------------------------------------------------------------------------------------------------------


राष्ट्र सेविका समिती


वंदनीय मावशी 


 वंदनीय मावशी वाईला आल्या होत्या. त्यांचे बौद्धिक मधल्या ओळीतील रंगमंदिरात झाले. त्यावेळी परिचय व प्रास्ताविक मी केले होते. माझे वय तेव्हा पंधरा-सोळा असेल. मावशींना बहुदा प्रास्ताविक आवडले असेल. बौद्धिक संपल्यावर पुढच्या कार्यक्रमाचे निरोप द्यायला मी काही घरी गेले आणि इकडे त्यांनी मला त्या मुलीच्या घरी जायचे आहे असे सांगितल्यामुळे एक प्रौढ सेविका त्यांना घरी घेऊन आलेल्या होत्या. आई माजघरात मशीन वर शिवत बसली होती. तिलाही काहीच कल्पना नव्हती आणि मावशी तिच्या शेजारी जमिनीवर बसून गप्पा मारू लागल्या. मी घरी आल्यावर ते पाहिले तेव्हा मावशींना खाली जमिनीवर बसवले म्हणून आईचा खूप राग आला व मावशींच्या साधेपणा मनात भरून राहिला. ही पहिली ओळख.

 मग वरचेवर भेटी होत गेल्या. औरंगाबादला त्यांची रामायणावरची पाच दिवस प्रवचने झाली.नंतर प्रश्नोत्तरांच्या वेळी त्यांनी रोज एक दोन प्रश्नांची उत्तरे मला द्यायला लावली होती. 

औरंगाबादच्या रामायण प्रवचनांच्या वेळेची आठवण. माझ्याबरोबर चि वृंदा होती. सात-आठ वर्षांची असेल. प्रवचन संपल्यानंतर वंदनीय मावशी उतरल्या होत्या त्या घरी कोल्हटकर ह्यांच्याकडे गेलो होतो. वंदनीय मावशींनी वृंदाला विचारले ऐकलेस ना रामायण? सांग बघू काय ऐकलं ते? वृंदाने मावशीनी सांगितलेले एक-दोन प्रसंग सांगितले. वंदनीय मावशी उद्गारल्या," सुशीलताई, ही तुमच्या वरचढ होईल. मावशींचा आशीर्वाद सुफळ झाला नसता तर नवलच!

नंतर घरी हि एक दिवस राहायला आल्या होत्या सोबत एक प्रचारिका होती. साडेदहाच्या सुमारास काही ठिकाणी भेट द्यायला यायचे होते. सकाळी बागेत जाऊन त्यांनी फुले तोडून आणलेली आठवतात.

वंदनीय मावशी राधामोहन कॉलनीतल्या घरी आल्या होत्या. त्या वर्षाचा कार्यक्रम मागास वस्त्यांना भेट देणे व सार्वजनिक संस्थांना भेटी देणे असा होता. सकाळीच शेजारीच असलेल्या वस्तीला भेट झाली. नंतर रमा नगरला भेट झाली. महिला कामाला जाणाऱ्या असल्यामुळे सकाळीच भेटणे आवश्यक होते. घरी जाऊन जेवण, थोडीशी विश्रांती व दुपारी तीन वाजता रोकडा हनुमान कॉलनीत जायचे होते. त्यावेळी सर्वसाधारणपणे प्रत्येक घरासमोरच्या अंगणात रांगोळी होत असे. जाताना मावशींचे लक्ष रांगोळ्याकडे होते. एक रांगोळी त्यांना खूप आवडली. कार्यक्रमाहून परत येताना त्यांच्या म्हणण्यावरून त्या घरात गेलो. गंमत म्हणजे रांगोळी घरातल्या 14 वर्षाच्या मुलीने काढलेली होती. प्रेमाने तिची पाठ थोपटली व जवळची खडीसाखर तिला दिली. त्यांच्या याच गुणग्राहकतेमुळे समितीला कार्यकर्त्या मिळाल्या असतील.

 रामायण सांगताना सुरुवातीला त्यांनी घातलेली मांडी प्रवचन संपेपर्यंत कधीच हलत नसे.


मी असलेल्या एका वर्गावरची वंदनीय मावशींची आठवण. दुपारच्या विश्रांतीच्या वेळी मुलींच्या गप्पा चालू असत. वंदनीय मावशी दोन-तीन दिवस वर्गावर आल्या होत्या. त्या मुलींना म्हणायच्या," झोपा आता. बोलू नका".मावशींची चाहूल लागली की मुली डोळे मिटून गपचूप पडत. एकदा त्या आल्या तेव्हा म्हणाल्या,” दुपारची झोप म्हणजे वामकुक्षी. डाव्या कुशीवर झोपायचे.” झोपेचे सोंग घेतलेल्या सर्वजणी पटकन डावीकडे वळल्या! मावशी म्हणाल्या," आत्तापासून चांगलेच जमते आहे, झोपेतही आज्ञा पाळली." सर्वांनाच हसू आले.

पुढे मी बौद्धिक कार्यवाहिका झाल्यावर बैठकांच्या वेळी वंदनीय मावशींची भेट होत असे.


-सुशील प्रल्हाद अभ्यंकर


शुक्रवार, १० जुलै, २०२०

दर्शनाने धन्यता सहवासाने कृतकृत्यता! भाग ६

 दर्शनाने धन्यता सहवासाने कृतकृत्यता! भाग ६

श्रीमती सुशील प्रल्हाद अभ्यंकर यांना ज्यांचे दर्शन झाले, सहवास लाभला, अशा प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व राष्ट्रसेविका समितीतील व्यक्तींविषयी लिहिलेल्या आठवणी. या सर्वांविषयी तसेच राष्ट्रसेविका समिती मुळे मिळालेल्या समाज सेवेच्या संधींविषयी कृतज्ञ भाव व्यक्त करण्याचा हा एक मार्ग. आत्ता वयाच्या ९१ व्या वर्षी, वाढत्या विस्मरणातून देखील, जशी आणि जेवढी शाबूत राहिली तितकी - एक स्मरण मालिका. 

----------------------------------------------------------------------------------------------------------------


 रामभाऊ साठे

 माझे मोठे बंधू रामभाऊ साठे, बीएस्सी झाल्यावर प्रचारक निघाले. सुरुवातीला मुंबई व महाराष्ट्रात काम केले व नंतर प्रामुख्याने आंध्र, केरळ, कर्नाटक हे क्षेत्र होते. राहणी अगदी व्यवस्थित. हैदराबादचे संघ कार्यालय हे प्रमुख केंद्र. क्षेत्र बदलल्यानंतर कानडी, तेलगू भाषा शिकले. इतकेच नव्हे तर तेलुगु तून व्याख्यानेही दिली. अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. मराठी पुस्तकेही आहेत. तीन चार इंग्रजी पुस्तके देखील आहेत. दोन-चार पदेही लिहिली आहेत. शारीरिक उत्तम होते. रोज पहाटे व्यायाम करत असे. कोणतेही काम करण्याची तयारी व त्यात चुकारपणा अजिबात नाही. आई वडिलांच्या आजारपणात त्याने अगदी मनापासून सेवा केली.

 संघाबरोबर समितीचेही काम वाढले पाहिजे असा आग्रह असायचा व त्या साठी आवश्यक ती मदत करायची तयारी असे. अनेक सेविका त्यांच्यामुळे घडल्या आहेत. आत्ताच्या समितीच्या प्रमुख कार्यवाहिका माननीय अन्नदानम सीता यांना सतत मार्गदर्शन असे. श्रीमती शकुंतला दवे या देखील रामभाऊंना भेटत व त्यांचा सल्ला घेत. हैदराबादचे समिती कार्यालयही उभे राहण्यात रामभाऊंनी दिलेल्या देणगीचा मोठा वाटा आहे. इतिहास संकलन समिती चे कामाची जबाबदारी त्यांना देण्यात आली होती.

भारतीय संस्कृती प्रचार समिती -ह्या समितीतर्फे काही विषय ठरवून त्यावर लेखन करून घेतले जाई. चार पुरुषार्थ, चार आश्रम अशा काही पुस्तकात माझा सहभाग होता. काही पुस्तके मी लिहिलेली होती. किंमत कमी ठेवणे हाआग्रह होता. 

 

श्री.रामभाऊ हळदेकर 

औरंगाबाद जवळील हळद्याचे राहणारे! संघमय कुटुंब. रामभाऊ प्रचारक निघालेले वडिलांना (काका म्हणत असत) फारसे आवडले नव्हते. दक्षिण भारत हे त्यांचे कार्यक्षेत्र होते. सुनिता हळदेकर (पूर्वांचल मध्ये समितीची प्रचारिका म्हणून गेली. आता ती केंद्र सहकार्यवाहिका आहे.) यांची पुतणी. तिला रामभाऊंचा भक्कम पाठिंबा व मार्गदर्शन होते. ते माझ्यापेक्षा फक्त दोन-तीन महिन्यांनीच लहान होते. पण आले की,”ताई नमस्कार” म्हणून नमस्कार करत. भाऊबिजेला औरंगाबादला असले की ओवाळून घ्यायला येत.


 या दोघा रामांनी संघाचे काम भरपूर वाढवले.


श्री गणपतराव ब्रह्मपूरकर 

 ह्यांच्या पत्नी शारदा ताई. यांच्याकडे अनेक वेळा राहणे व जेवण झालेले आहे. हैदराबाद मधील समिती कार्याला भक्कम आधार देणारे हे कुटुंब.


श्री माधवराव कुलकर्णी

 खूप जुना परिचय. अगदी तरूण असताना औरंगाबादला होते. वरचेवर घरी येणे व्हायचे. चहा हा आवडीचा विषय. केव्हाही चालायचा. मी घरी शिकवण्या घेत असे. शिकवण्यांच्या वेळी आले तर स्वतः देखील चहा करून घ्यायचे. पुढे गुजराथ ला गेले व मधुभाई झाले.

 एका अखिल भारतीय कार्यकर्त्यांच्या बैठकीत, बहुदा समन्वय समितीची असेल, अहमदाबादला आम्ही दोघेही होतो. जेवणाची वेळ झाली. मधूभाईंनी आपल्या शेजारचे पान माझ्यासाठी धरुन ठेवले होते. गप्पा मारता येतील म्हणून! एका अर्थी मला ते खूप सोयीचे झाले, कारण ताटभर पदार्थ मला संपवणे शक्यच नव्हते.मधुभाईंच्या पानात मी त्यातले पुष्कळसे वाढले!! गुजरात प्रांत प्रचारिका संध्या हिला खूप आश्चर्य वाटले. आता प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्या प्रवास थांबला आहे. बऱ्याचदा औरंगाबादला असतात. औरंगाबाद ला असले तर रक्षाबंधनाला राखी बांधून घ्यायला आठवणीने येतात.


श्री.हरिभाऊ बागडे

 चिते गावचे राहणारे. नेहमी घरी येणे होई. अत्यावश्यक असेल तेव्हा नेऊरगाव हुन यांना मोटरसायकलवर औरंगाबादला घेऊन येत. मलाही त्यांनी १९७६/७७ मध्ये अनेक वेळा पिंपरी राजा ला नेले आहे व आणूनही सोडले आहे. भेटले की वाकून नमस्कार ठरलेला असे. एकदा स्व. प्रल्हादजी अभ्यंकर स्मृती व्याख्यानमालेत बोलायला आले होते. परिचय करून देणार्‍याने श्रोत्यांच्या उल्लेख करताना माझा उल्लेख केला. व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी हरिभाऊ बागडे खाली उतरले, मला नमस्कार केला व व्याख्यानाला सुरुवात केली. आधी आमदार होते, नंतर विधानसभा अध्यक्ष झाले तरी त्यांच्या वागण्यात फरक पडलेला नाही.


-सुशील प्रल्हाद अभ्यंकर 


गुरुवार, ९ जुलै, २०२०

दर्शनाने धन्यता सहवासाने कृतकृत्यता! भाग 5

 दर्शनाने धन्यता सहवासाने कृतकृत्यता! भाग 5

श्रीमती सुशील प्रल्हाद अभ्यंकर यांना ज्यांचे दर्शन झाले, सहवास लाभला, अशा प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व राष्ट्रसेविका समितीतील व्यक्तींविषयी लिहिलेल्या आठवणी. या सर्वांविषयी तसेच राष्ट्रसेविका समिती मुळे मिळालेल्या समाज सेवेच्या संधींविषयी कृतज्ञ भाव व्यक्त करण्याचा हा एक मार्ग. आत्ता वयाच्या 91 व्या वर्षी, वाढत्या विस्मरणातून देखील, जशी आणि जेवढी शाबूत राहिली तितकी - एक स्मरण मालिका.

----------------------------------


मा. आबाजी थत्ते

 मला बहिण मानायचे. माननीय सिंधुताई फाटक ह्या त्यांच्या भगिनी. परमपूज्य गुरुजींचे ते स्वीय सहाय्यक अशी त्यांची प्रामुख्याने ओळख होती. त्यामुळे गुरुजींच्या प्रत्येक भेटीच्या वेळी तेही घरी आलेले आहेत. गुरुजींची व्यवस्था व्यवस्थित ठेवताना त्यांचा साहजिकच ज्यांचे घरी मुक्काम असे त्या कुटुंबीयांशी जवळचे संबंध असत. आत्मीयता निर्माण होई.


मा. यादवराव जोशी 

दक्षिण भारतात क्षेत्र प्रचारक होते. हैदराबाद संघ कार्यालयात त्यांची अनेकदा भेट झाली. संघाचे ज्येष्ठ प्रचारक श्री.रामभाऊ साठे, माझे बंधू त्या कार्यालयात असायचे. प्रवासात मी हैदराबादला गेले की स्वाभाविकच संघ कार्यालयात जायची. माझा मुक्काम समिती कार्यालयात असे. दोघांच्याही खोल्या एकाच मजल्यावर होत्या. यादवरावांकडेही जाणे होत असे.


एक आठवण- 

प्रवासात मी जम्मूला गेले होते. ठरलेल्या कार्यक्रमात संघ कार्यालयात भेट होती. मी व पंकजा गेलो. त्यावेळी तिथे यादवराव जोशी होते का जगन्नाथराव जोशी आता नक्की आठवत नाही. त्यादिवशी आग्रहाने कार्यालयात थांबवून घेतले. अन्य प्रचारकांच्या बरोबर जेवण झाले. नंतर म्हणाले, वहिनी तुमच्या हातची साबुदाण्याची खिचडी खायची आहे. उद्या सकाळचा नाश्ता तोच! सामान सांगा, इथे तयारी करून घेतो. जम्मूला त्यावेळी शेंगदाण्यांचा फार वापर होत नसे. कार्यालयात त्यांनी शेंगदाणे भाजून कूट करायला सांगितले. साबुदाणा मात्र मी समितीच्या कार्यालयात बरोबर घेऊन गेले. साबुदाणा रात्री भिजवून तयार करून घेतला. खिचडी सर्वांनीच मनापासून खाल्ली. विस्थापित मुलींचे आमचे छात्रावास होते. त्यांच्यासाठीही थोडी पाठवली. पुढचा प्रवास विचारून घेतला व आवश्यक त्या सूचना व घ्यावयाची काळजी सांगितली. 


के सूर्यनारायण राव

 बेंगलोर च्या प्रवासात त्यांच्या घरी गेले आहे.. त्यांची बहिण म्हणजे आमच्या रुक्मिणी अक्का. केंद्र सहकार्यवाहिका म्हणून अनेक वर्षे त्यांच्याकडे जबाबदारी होती. 


श्री इंद्रेशजी 

पहिली भेट दिल्ली कार्यालयात झाली. तेथूनच मी जम्मू-काश्मीर कडे गेले. त्यावेळी काही वेळा त्यांच्या भेटी झाल्या. काश्मीर बचाव अभियाना अंतर्गत जम्मूला सभा होती. इंद्रेशजी अध्यक्ष व मी वक्ता होते. 

त्या नंतर, त्याच प्रवासात, आणखी एक कार्यक्रम होता सरहद्दीवर मृत्युमुखी पडलेल्या जवानांना अभिवादन व त्या वीरपत्नींच्या सत्काराचा. सुरुवातीला वीरपत्नींचे नाव उच्चारले जाई व त्यांनी स्टेजवर येऊन सत्कार स्वीकारावा अशी कल्पना होती. पण पती निधनाला सहा महिने जेमतेम झाले असताना स्टेजवर येऊन सत्कार स्वीकारणे त्या वीरपत्नींना अवघड वाटत असावे असे जाणवले. मग मी खाली उतरले व त्या जेथे असतील तेथे जाऊन शाल व पाकीट देऊ लागले. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. एक म्हणाली कि त्यांनी त्यांचे कर्तव्य केले. आम्हाला सत्कार नको. मी तिला म्हटले,” हा सत्कार तुझा नाही. त्या जवानांनी केलेल्या कार्याचा आहे. एकीने तर तिचे तान्हे मूल माझ्या हातात दिले व म्हणाली,” यह भी पिता जैसा देश कार्य के लिए तयार होगा ऐसा आशिष दो.”

कार्यालयात परत आल्यानंतर सर्वजण गप्प गप्प होते. इंद्रेशजीनी नमस्कार केला व ते निघून गेले. ते पण भारावलेले होते.


-सुशील प्रल्हाद अभ्यंकर