चारित्र्य म्हणजे अनेक भल्याबुऱ्या प्रसंगांना तोंड देत असताना अवलंबिलेली नीति वा धोरण. एकदा दोन तरुण भिक्षु नदीकाठाने चालले होते. तेवढ्यात त्यांना नदीत बुडत असलेली एक स्त्री दिसली. एकाने विचार केला, "आपल्या धर्मात स्त्री स्पर्श अनैतिक मानला आहे.तिला वाचवणार कसे? दुसऱ्याने तत्काळ पाण्यात उडी घेतली व स्त्रीला बाहेर काढले. पहिला दुसऱ्याला धर्मभ्रष्ट समजू लागला. दोघांच्यात थोडा वाद झाला. दोघेही तथागतांसमोर गेले व झालेली घटना सांगितली. बुद्धांनी विचारले, "या गोष्टीला किती वेळ झाला?" उत्तर आले, "साडेतीन तास'. बुध्द उत्तरले, "दुसऱ्याने केले तेच योग्य. दया हे धर्माचे एक लक्षण आहे. आता स्त्री स्पर्शाबद्दल म्हणशील तर वाचवणाराच्या मनात तिला बाहेर काढल्या क्षणापासून स्त्रीचा विचारही आला नाही. पण तू मात्र तेव्हापासून त्याच विचारात बुडालेला आहेस. धर्मभ्रष्ट तुलाच म्हणावे लागेल."
गोष्ट वाचत असताना एक विचार मनात आला, समजा वाचवणाराच्या मनात स्त्रीबद्दल अभिलाषा उत्पन्न झाली असती तर? तिला मी वाचवले असा अहंकार निर्माण झाला असता तर? त्याने तिच्यावर केलेल्या उपकारांची फेड तिने येनकेनप्रकारेण करावी अशी अपेक्षा बाळगली असती तर?
मनाने लगेच निर्णय जाहीर केला," दयेबद्दल मिळालेल्या १० गुणातून ९.५ गुण वजा करावे लागतील आणि आलेले विचार जर कृतीत परावर्तित झाले तर त्यासाठी -९ गुण राहतील. पहिल्याची स्थितीही काही वेगळी नाही. कारण एका व्यक्तीचे दुसऱ्या व्यक्तीप्रती असणारे कर्तव्य त्याने पार पाडले नाही म्हणून गुण ०, कर्तव्यच्युतीची शिक्षा व स्त्रीचा सातत्याने विचार यामुळे त्यालाही उणे गुणच मिळतील."
एक छोटा प्रसंग. पण त्याची योग्यायोग्यता ठरवण्याचे निकष कितीतरी! अगदी 'गहनो गति:' म्हणावयास लावणारे हे निकष कोणासाठी? अर्थातच ज्याला नीतिमत्तेची चाड आहे व जाण आहे त्यांच्यासाठी. नीतिमत्तेची बंधने तरी कशाला हवीत? उत्तर आहे समाजधारणेसाठी कोणतीही अनिर्बंध गोष्ट तापदायकच ठरते. उदा. कामभावना - मला हवे आहे ही वृत्ती. त्या पाठोपाठ येते लबाडी, चोरी, अन्याय, लुबाडणे, मारपीट करणे, बलात्कार करणे वगैरे! मग समाजात विश्वास, शांती, स्थैर्य, आपुलकी दिसेल का? तसेच अनिर्बंध स्वातंत्र्याची कल्पना मनात आली की कर्तव्य बंधन वाटते. रहदारीचे नियम तोडावेसे वाटतात. कामाच्या ठिकाणी ठराविक वेळा जाणे नकोसे वाटते. टी.व्ही.चा आवाज वाढलेला राहतो. ध्वनिक्षेपक कर्कश ओरडत राहतात. वाहनांचा वेग वाढतो.सदाचाराच्या कल्पना गायब होतात. तंबाखूच्या पिचकाऱ्या कुठेही मारल्या जातात. कचरा रस्त्यावर टाकला जातो. राष्ट्रीय संपत्तीची तोडफोड होते.
मग 'मी' हाच एक भाव वरचढ ठरतो. स्वत:ची जबाबदारी टाळली जाते. समाजात वृद्धाश्रम, पाळणाघरे, शिकवणीवर्ग, अनाथालये, अपंग गृहे, भिकारी यांची संख्या वाढते. व्यक्तिगत स्वार्थ श्रेष्ठ ठरतो. मग बोफोर्स, भ्रष्टाचार, चारा घोटाळा, पेटंट मिळवण्यासाठी लांडीलबाडी, चोरी, समाजद्रोह, राजद्रोह, match fixing, जळगाव वासनाकांड, एखाद्या अधिकारपदासाठी झुंबड, परस्परांचे पाय खेचणे, आरोप प्रत्यारोपाच्या फेरी, गलिच्छ राजकारण, भेसळ ह्या सगळ्या गोष्टी दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनतात.
कलियुगात नीतिमत्ता कितीही ढासळली तरी अजूनही ह्या सगळ्या गोष्टी अयोग्यच मानल्या जातात. कारण त्या समाजविघातक असतात. या पार्श्वभूमीवर आमच्या त्रिकालदर्शी ऋषीमुनींचे शाश्वत विचार मनाची पकड घेतात. व्यावहारिक पातळीवर तसेच देहाची आवश्यकता म्हणून अर्थ व काम ह्यांनाही पुरुषार्थ मानले गेले आहे पण त्यांच्यावर नियंत्रण आहे धर्माचे व मोक्षप्राप्तीच्या इच्छेचे. कडक ब्रम्हचर्य पालनाच्या सवयीने जीवनाची सुरुवात होते व तो स्वभाव बनतो. गृहस्थाश्रमात अर्थ व काम ह्यांना स्थान मिळते पण ते वरचढ होऊ नयेत अशी काळजी घेतली जाते. वानप्रस्थ व संन्यासाश्रमात सर्व काही पैसा, ज्ञान, अनुभव समाजहितासाठी वेचले जाते. माझे इतरांप्रती असलेले कर्तव्य मनाआड होत नाही. स्वत: कष्ट सोसूनही इतरांना सुखी करण्याची इच्छा बळावते. स्वावलंबन, आत्मविश्वास, स्वाभिमान हा जीवनाचा कणा बनतो. लाचारी, लांगुलचालन, दुष्टवृत्ती, विश्वासघातकीपणा, अहंकार सगळ्यांना हद्दपार केले जाते.
राज्यं येन पटान्तलग्नतृणकं त्यक्तं गुरोराज्ञया। (गुरूच्या आज्ञेवरून राज्य ज्यांनी कपड्याला लागलेल्या गवताप्रमाणे त्यागले) अशी उदाहरणे जागोजाग आढळतात. कारगील जवानांना अन्न पोचवणारा एक तरुण उद्गारतो, ' काम पुरे होण्याआधीच मृत्यू समोर ठाकला तर एकच विचार मनात येईल, माझ्या जवानाला उपाशीपोटी लढावे लागेल" एक डॉ. कमला सोहोनी अमेरिकेत नोकरीची संधी नाकारते. एक डॉ. अब्दुल कलाम भारताला सर्वश्रेष्ठ स्थान मिळावे म्हणून रात्रंदिवस झटत असतात.
अशा एकेका व्यक्तीचे चारित्र्यच राष्ट्रीय चारित्र्य घडवत असते म्हणूनच प्रत्येक 'मी' ला राष्ट्राचा जबाबदार घटक असण्याची जाणीव सतत जागृत ठेवावी लागेल. माझ्या चारित्र्याने राष्ट्राचा गौरव वाढणार आहे तर माझ्या एखाद्या अयोग्य वर्तनाने राष्ट्राला मान खाली घालावी लागेल हे लक्षात ठेवावे लागेल. राष्ट्राचा अपमान मला 'बाणासारखा' बोचला पाहिजे. स्वभुमी, स्वभाषा, स्वभूषा, स्वभोजन, स्वसंस्कृती व इतिहास ह्यांचा अभिमान बाळगला पाहिजे. त्याच बरोबर हेही लक्षात ठेवायला हवे कि अश्या चारित्र्य संपन्न व्यक्ती तुरळक असून चालणार नाही.सगळ्या समाजजीवनाची उंची वाढायला हवी.
आजकाल एक प्रश्न समोर येत आहे, वैयक्तिक चारित्र्य व राष्ट्रीय चारित्र्य यांचा परस्पर संबंध काय? वैयक्तिक चारित्र्यानेच राष्ट्रीय चारित्र्य घडते हे खरे आहे, पण कधी कधी तरतमभावाचा विचार करावाच लागतो. सत्यनिष्ठ युधिष्ठिराला 'नरो वा कुंजरो वा ' म्हणावे लागते. हनुमंताला माझा प्राण शेपटीत आहे सांगावे लागते. 'संभाजी मेला' असे कटू शब्द शिवाजीराजांना मातेसमोर उच्चारावे लागतात. तसेच वैयक्तिक चारित्र्याच्या अहंभावाने कर्णाला कवच कुंडले गमवावी लागतात. बळीराजाला पाताळ गाठावे लागते तर राजे जयसिंहाना स्वजातीयांकडून अनादर प्राप्त होतो.
पण हा प्रश्न मुख्यत: उपस्थित होतो त्या लोकांकडून जे विचार करतात कि माझे वैयक्तिक चारित्र्य हे सामाजिक वा राष्ट्रीय मान्यतेपेक्षा वेगळे आहे. एकपत्नी रामाची भूमिका करणारा नट मदिरा व मदिराक्षीच्या विळख्यात अडकलेला आढळतो. एखादा पुढारी हवाई सुन्दरीबरोबर अश्लील चाळे करतो. अशांचा आग्रह असतो कि ह्या गोष्टी क्षम्य मानल्या जाव्यात. पण हे नेहमीच लक्षात ठेवायला हवे कि समाज अशा गोष्टींकडे कधी कधी कानाडोळा करत असला तरी अशा गोष्टी निन्द्यच आहेत. भारतीय विचार पध्दती समग्र दृष्टीकोन ठेवते. अलग अलग तुकड्यांचा विचार न होता एकसंध जीवनाचा विचार होतो. म्हणूनच वैयक्तिक चारित्र्य व राष्ट्रीय चारित्र्य हे वेगळे मानले जात नाही व जाउही नये.