वेचलेल्या विचार कणिका - भाग ८
( लॉक डाऊन च्या काळात व्हाट्सअँपची माहिती करून घेऊन त्यावर रोज वाचनात आलेले विचार पाठवायला सुरुवात केली. त्याचे हे संकलन. )
ईसापाची एक कथा
एकदा एका गाढवाने सिंहाला लढण्यासाठी आव्हान दिले. सिंह गुपचूप निघून गेला. असे का केले? सिंहाने ऊत्तर दिले, “गाढवाशी लढलो अशी बदनामी होईल. गाढव हरले तर त्यात त्याचा काहीच अपमान होणार नाही. सिंह जिंकला तर त्यात आश्चर्य करण्याजोगे काही नाही. पण गाढव जिंकले तर मात्र त्याची बदनामी होईल. त्याला कायम तोंड लपवून फिरावे लागेल. लढायचे तर आपल्या पेक्षा मोठ्याशी लढावे.
--------------------------------------------------------
अगस्ती
पहिला आर्य धर्मप्रचारक
कलशात जन्म - गंगानदीवरील कलश नामक तीर्थस्थानी जन्मले.
अगस्त - अग्नी. अग्नीही कुंभात ठेवत असत.
रामाआधी कितीतरी वर्षे विंध्य ओलांडून दक्षिणेत उतरले व मागासलेल्या जाती जमातींना आर्य संस्कृतीच्या कक्षेत आणले. त्यामुळेच वानर हनुमान संस्कृत बोलत होता व लंकेत वेदघोष होत असे.
कार्य - सतत वाढत असलेल्या विंध्य पर्वताला नमवले. म्हणजेच विकसित ऊत्तर भारत व अविकसित दक्षिण भारत यांच्यातील दरी मिटवली. अगस्ती या शब्दाचा अर्थ अगाचे म्हणजे पर्वताचे स्तंभन करणारा. मनात प्रश्न निर्माण होतो कार्यामुळे नाव पडले का नावानुसार कार्य घडले?
काहीही असो, अगस्तींनी राष्ट्रीय एकात्मता साधली हे महत्व लक्षात घ्यायला हवे.
कार्य - प्रथम विदर्भ, तेथील ऊंच गवत( दर्भ) कापून वसाहतीयोग्य केला.
समुद्रप्राशन - कालकेय दानव समुद्रात दडून बसले होते त्यांना शोधून काढले व त्यांचा नि:पात केला.
-----------------------------
श्रीराम
सागराच्या लाटांच्या आवाजाप्रमाणे गंभीर
हिमालयाप्रमाणे स्थिर
सद्गुणांना जणू लाभलेली पूर्णता
जणू प्रत्यक्ष आनंद
कौसल्येचा परमानंद
योगीजनांचा परमानंद
बलवान विष्णुप्रमाणे सामर्थ्य असलेला
चंद्राप्रमाणे प्रियदर्शी
पृथ्वीप्रमाणे क्षमाशील व दयावंत
कालाग्नीसारखा क्रोध असलेला
त्यागात जणू धनवंत कुबेर
आचरणात जणू धर्मराज असा श्रेष्ठ
गुणवंत प्रजाहितदक्ष
सत्यवचनी कर्तृत्वसंपन्न
श्रीरामचंद्राना मनोभावे वंदन करु या.
परवापासून सुरू होणारी दीपावली साजरी करण्यास सज्ज होऊ या.
सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा!
------------------------------------
भारत म्हणजे तेजाचा पूजक
प्राचीन भारतीय खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांनी सर्व मुख्य ग्रह पृथ्वीपासून किती अंतरावर आहेत हे निश्चित अंतर सांगितले होतेच. शिवाय त्यांच्या भ्रमणकक्षेला लागणारा वेळही अचूक सांगितला होता.
अमेरिकेच्या रत्नांसंबंधी संशोधन करणाऱ्या संस्थेने नोंदवले आहे, ‘सन १८९६पर्यत संपूर्ण विश्वात फक्त भारतातच हिरे मिळत असत.’
सन १००१ मध्ये विश्वव्यापारात भारतीय व्यापाराचे प्रमाण ३३ टक्के होते.
खगोलशास्त्रज्ञ भास्कराचार्य यांनी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालायला पृथ्वीला लागणारा वेळ किती याचे गणित ३६५'-२५८७५६६४३४ इतके सूक्ष्म नोंदवले होते.
----------------------------------------------------
आज वसुबारस - गोवत्सद्वादशी
सवत्स धेनुचे पूजन केले जाते. वंश वाढता असावा अशी सर्वांची अपेक्षा असते. गाय व्याली की सर्वांना आनंद होतो. विशेषतः घरातील लहान मुलांना! गायीला व्यायला वेळ लागला की सर्व अस्वस्थ होतात. काही वेळा तर वासरू ओढून काढावे लागते.
गोऱ्हा झाला तर शेतीला उपयोगी पडतो, तर कालवड मोठी झाली की दूध देणार असते. गायीचे दूध काढताना वासरासाठी दूध राहील अशी दक्षता घेतली जाते. काही कारणाने दूध कमी असले, तर गाय वासराला दूध हवे म्हणून पान्हा चोरते.
गायीचे दूध सकस व सर्व प्रथिनांनी युक्त असते. ते पचायला हलके असते, म्हणून नवजात बालकांना दिले जाते.
गायीचे शेणही निर्जंतुक असते. ऊष्णतानाशक व मऊ असते. तिचे कातडेही विविध वस्तु करायला उपयोगी पडते.
दत्तगुरु तर नेहमीच गायी पुढे ऊभे असतात.
गौतम ऋषी, गोरक्षनाथ ही नावे प्रसिद्ध आहेत.
पूर्वी घरात किती गायी बैल आहेत यावरून श्रीमंती ठरवली जायची.
----------------------
आज धनत्रयोदशी
अपमृत्यु टाळण्यासाठी आजपासून दिवाळी साजरी करावी, असा यमाने दिलेले वचन सर्वांनाच माहीत आहे.
धन म्हणजे संपत्ती हे खरेच,पण धन शब्द धन्वंतरीशी पण जोडलेला आहे. जीवनात आरोग्य चांगले राहण्यासाठी सर्वच गोष्टी प्रमाणात असाव्यात. खान- पान, कष्ट, विश्रांती, आळस सर्वच गोष्टी वर बंधन हवे.
आज सारवलेल्या अंगणात रांगोळी काढून रा्त्री दक्षिणेकडे ज्योत करून पणती ठेवली जाते. दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. त्याला जणू सांगितले जाते,’अवेळी येऊ नकोस’.
धनं ईच्छेत हुताशनात्! अग्नीकडे धनाची ईच्छा व्यक्त करावी. अग्नी म्हणजे तेज.
तेज व धन या दोन्ही जीवनावश्यक गोष्टी एकत्रित असाव्यात, असे आजची ही धनत्रयोदशी सांगते.
------------------------------------------------
आपली लग्नाची बायको सोडून बाकी सर्व महिलांना माता भगिनी मानावे असा अलिखित नियम भारतात आहे.
‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:’ हे भारतीय संस्कृतीचे एक बोधवाक्य आहे.
म्हणूनच हजारो स्त्रियांना पळवून कैदेत ठेवणाऱ्या नरकासुराचा वध करून श्रीकृष्णाने त्या सर्वांना सोडवले. कृष्णाची यामागील स्रीसन्मानाची भावना लक्षात घेऊन, तसे आचरण करण्याचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचविणे हे काम ही चतुर्दशी करते.
पापी लोकांना मृत्यूनंतर यमराज नरकवासाची शिक्षा देतो.
नरक ही एक अत्यंत घाणेरडी व अंधारी जागा असून, तेथे पापी माणसाचा क्रूरपणे छळ केला जातो. या सर्व गोष्टींतून सदैव सदाचरण करावे ही शिकवण दिली जाते व तिचा विसर पडू नये यासाठी दरवर्षी आठवण दिली जाते.
काही संदेश
नरक अंगावर घेऊ नये म्हणजे दुसरा कोणी करत असलेल्या वाईट गोष्टीं आपण स्वीकारू नयेत.
नरक ऊपसणे - वाईट गोष्टी उकरून वर काढणे.
-----------------------------------------------------------
आज आश्विन अमावास्या
यंदा आश्विनी पौर्णिमा दुपारी सुरू झाल्याने चतुर्दशी व पौर्णिमा एकाच दिवशी आली होती व कालही चतुर्दशी व अवस एकाच दिवशी आल्याने सकाळी अभ्यंगस्नान व संध्याकाळी लक्ष्मीपूजन झाले.
आश्विन महिन्यात नवरात्र दसरा कोजागिरी पौर्णिमा वसुबारस व अर्धी दिवाळी येते. त्यामुळे महिना गडबडीत पण आनंदाने जातो.
आज प्रतिपदा वर्षप्रतिपदा व दीपावली प्रतिपदा या दोन महत्त्वाच्या आहेत.
आज वर्षाच्या दुसरा अर्ध सुरू होतो.
योगायोग असा की या महिन्याच्या पहिल्या प्रतिपदेला घरातील गृहिणीच्या दिवंगत वडिलांना श्रद्धांजली वाहिली जाते तर अमावस्या सासरच्या गणगोतात व्यतीत होते.
विजयादशमीला सोने लुटले जाते तर दीपावलीला सोने खरीदले जाते.
अश्या या आश्विन महिन्याला निरोप देऊ या.
-------------------------------------------
आज बलिप्रतिपदा!
हिरण्यकश्यपूला मारणाऱ्या प्रल्हादाचा, बली हा नातू! मोठा दानशूर पण देवांशी वैर करणारा! विष्णूने वामनाचे रूप घेतले, त्रिपाद भूमी मागितली. दोन पावलांत पृथ्वी व आकाश व्यापले. तिसरे पाऊल ठेवण्यासाठी जागा राहिली नाही, तेव्हां आपल्या व्रतापासून न हटता, स्वत:चा मृत्यू दिसत असूनही, पाऊल ठेवण्यासाठी आपले मस्तक पुढे केले, पण वचनाला बट्टा लागू दिला नाही. वचनपालनाचा आदर्श जगापुढे ठेवला.
आजच द्वितीया पण आहे. नाव आहे यमद्वितीया.
संपूर्ण विश्वातल्या सर्व सजीवांचे प्राण हरण करणारा कठोर यम! पण आपल्या प्रेमाने त्याला वश करणारी त्याची बहीण यमी! भावाबहिणीचे प्रेम ऊजागर करणारी ही यमद्वितीया.
दिवाळीतला हा पाडवा व भाऊबीज हे दोन्ही दिवस महिलांबद्दल समाजाला असणारा आदर व्यक्त करतात.
पाडव्याला पत्नीला तर भाऊबीजेला बहिणीला ओवाळणी घातली जाते. ( पण ती पत्नीने व बहिणीने ओवाळल्यानंतरच बरं का!)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा