सोमवार, ८ फेब्रुवारी, २०२१

वेचलेल्या विचार कणिका - भाग ५

 वेचलेल्या विचार कणिका - भाग ५

( लॉक डाऊन च्या काळात व्हाट्सअँपची माहिती करून घेऊन त्यावर रोज वाचनात आलेले विचार पाठवायला सुरुवात केली. त्याचे हे संकलन. )

आज गणेश चतुर्थी. अथर्वशीर्ष सांगते की माझे रक्षण करा. हा मी कोण? तर भारतीय संस्कृतीत ‘सर्वेपि सुखिनः संतु’ असे म्हटले आहे. संतांनी ‘अवघे विश्वची माझे घर’ असे म्हटले आहे. म्हणजेच,’ मी म्हणजे एक व्यक्ती’ नसून आपण सर्व असा त्याचा अर्थ होतो. रक्षण कशापासून अपेक्षित आहे? तर आधी व्याधी, चंचलता, संदेह, प्रमाद, आळस, खंड पडणे, दुसऱ्या कशाचा तरी मोह पडणे, अपेक्षित प्रगती झाली नाही असे वाटून आलेल्या निराशेने प्रयत्न ढिले होतात त्यापासून रक्षण, त्याचप्रमाणे एकाग्रता न होणे या सर्व गोष्टींपासून रक्षण कर. माझे, सर्व साधकांचे सत्प्रवृत्त, निरहंकारी, स्थिर बुद्धी, अनालसी अश्या सर्वांचे, त्याच बरोबर माझा समाज, माझे राष्ट्र यांचेही सर्व दृश्य व अदृश्य शत्रूंपासून रक्षण कर. 

-----------------------------------------------------------

काल आपण कोणापासून रक्षण हा विषय सुरू केला आहे. 

 अव वक्तारम्      - सत्य बोलण्याने होऊ शकणाऱ्या त्रासापासून वाचव. अपूर्ण ज्ञान असले तरी बोलण्याची खुमखुमी, यापासून सावध कर.

श्रोतारम्              - लक्ष विचलित होऊ न देता ऐकून, ग्राह्य गोष्टीच तो स्वीकार करेल असे कर. 

दातारम्              - कीर्ती मिळावी म्हणून केवळ, दान देण्याच्या मोहापासून वाचव. 

धातारम्              -न्यूनगंड मनात निर्माण होऊ देऊ नकोस. मिळालेल्या दानाचा सदुपयोग करण्याची त्याला बुद्धी दे. 

अव अनुचान्       - क्षणिक मोहांमागे येणाऱ्याला वाचव. 

अव शिष्यम्         - गुरूपासून जे ज्ञान मिळाले त्याचा त्याला गर्व होऊ देऊ नकोस. 

अव पश्चात्तात्       - पाठीमागून विश्वासघात होऊ देऊ नकोस. 

अव पुरस्तात्       - पुढून होणा-या आक्रमणाला तोंड देण्याची शक्ती दे

अवोत्तरात्तात्       - ऊत्तर दिशेने येणाऱ्या संकटांचे निर्दालन कर. सुवर्णभूमी भारतावर अनेक वेळा ऊत्तरेकडून आक्रमणे झालेली आठवतात. 

अव दक्षिणात्तात   - दक्षिण दिशेकडून येणाऱ्या संकटांचे निर्दालन कर. 

-----------------------------------------------------------------

 विष्णुसहत्रनाम - प्रत्यक्ष जाणवतो त्यापेक्षा जरा वेगळाच अर्थ आहे असे शब्द पाहणार आहोत

सर्प       - साप नव्हे तर पकडण्यास कठीण

अज      - बोकड नाही, ज्याला जन्म नाही असा

नर        - जीवांना कल्याणाच्या वाटेने नेणारा 

आणखी अर्थ आहेत मनुष्य, अर्जुन, खुंटी, घोडा

शिखंडी  -  शिखंड - मोराचे पीस ते धारण करणारा कृष्ण किंवा मोर. महाभारतातला शिखंडी वेगळाच आहे. 

--------------------------------------------------

पुढे चालू

अनुत्तम            -आपल्याला वाटते उत्तम नसलेला असा. अर्थ आहे, ज्याच्यापेक्षा अधिक ऊत्तम कोणी नाही असा. 

दामोदर           -  दामन् = ऊदार 

२ दोरी,दावे      -  यशोदेने ज्याला दोरीने ऊखळाला बांधून ठेवले तो

३ दाम             -   लोक, सर्वलोक ज्याच्या ऊदरात सामावलेले आहेत असा

विकर्ता            - चित्रविचित्र विश्वाची रचना करणारा

शब्दकोशात अर्थ आहे विघडवणारा, विघ्नकर्ता

संस्थान           - कोणाचे तरी आधिपत्य स्वीकारलेले, पण अंतर्गत स्वतंत्र असलेले राज्य. पण येथे अर्थ आहे- सर्व भूतमात्र ज्याच्या ठिकाणी ऊत्तम राहतात असे. अन्य अर्थ - स्थावर, समुदाय, स्थिती

वैकुंठ            - विष्णुलोक, अन्य अर्थ- हल्ला करण्यास कठीण. हे विशेषणही आहे. सर्वांच्या मती कुंठीत करून त्यांना आपल्या ईच्छेनुसार वागायला लावणारा. 

सुदर्शन           - या नावाचे कृष्णाचे चक्र आहे. 

अन्य अर्थ         - १. चांगला दिसणारा २. पर्वत ३. ,गिधाड

----------------------------------------------------------------------

आकाश        - सारसपक्षी, देव मानव पितर अघसुर हे ज्याच्यात राहतात ते

नंदन             - पुत्र, आनंदित करणारा, बेडूक

त्रिदशाध्यक्ष     - त्रिदश म्हणजे स्वर्ग, त्याचा अधिकारी. तीन दशा जागृती, स्वप्न, सुषुप्ती याची काळजी घेणारा, ईश्वर

-------------------------------------------------

शब्दकोशात तेजाचे खूप अर्थ दिले आहेत. 

सूर्य वा अग्नी प्रमाणे तीव्र ऊष्णता, प्रकाश, वैभव, गुण, प्रचंडता, प्रभाव, चमक, कीर्ती, वैभव, तेजस्विता, सौंदर्य, उदात्तता, सामर्थ्य, वीर्य, बल, कांती, पराक्रम, ऊत्साह वगैरे

ओज म्हणजे बल, पराक्रम, ऊत्साह

यावरून ओज हा शब्दाचा अर्थ मर्यादित आहे म्हणजे त्याचा ऊपयोगही कमी आहे

ऊदाहरणार्थ एक वाक्य देते

सभेतल्या ओजस्वी भाषणाने त्याच्या बुद्धीचे तेज लक्षात आले. येथे आपण ओजस्वीच्या ऐवजी तेजस्वी वापरू शकतो, पण बुद्धीचे ओज म्हणता येत नाही. 

मलातरी एवढेच सुचले आहे. 

------------------------------

काही शांतिमंत्र


ओंम् सहनाववतु।सह नौ भुनक्तु। सहवीर्यं करवावहै।तेजस्वी नावधीतमस्तु। मा विद्विषामहे। ओम् शांति: शांति: शांति:

श्वेताश्वतरोपनिषद्


ओम् भद्रं कर्णेभि: श्रुणुयाम देवा:। भद्रं पश्येमाक्षर्भिर्यजत्रा:। स्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्तनुर्भि:। व्यशेम देवहितं यदायु:। 

ओम् शांति: शांति: शाति:।

 ईशावास्योपनिषद


ह सर्व आपल्या परिचयाचे आहेत. 

------------------------------------ 

अर्थ

१. तोपरमात्मा आम्हा नौ - आम्हां गुरुशिष्यांचे रक्षण करो. 

२. एकत्र पालन करो

३ आम्हाला शक्ती प्रदान करो

४ तेजस्वी इ. - आम्ही शिकलेल्या विद्येचे अध्ययन तेजस्वी होऊ दे।

५ परस्परांचा द्वेष होऊ देऊ नकोस

 सर्वांना त्रिविध तापांपासून मुक्ति मिळावी. 


दुसरा मंत्र 

 १. कानावर चांगलेच पडू दे. 

२. डोळ्यांना चांगलेच दिसू दे. 

३. शरीराची सर्वांगे स्थिर राहोत. 

४. अशा स्वस्थ शरीराने सर्व आयुष्य देवहिताचे काम करण्यात जाऊ दे. चांगल्याच गोष्टी ऐकायची व पहायची सवय लागू दे. मानसिक, शारीरिक व आत्मिक शांती मिळू दे. 


तिसरा मंत्र 

परब्रम्ह सर्व प्रकारे पूर्ण आहे, तसेच हे जगही पूर्ण आहे. कारण आधीच्या पूर्णातूनच हे निर्माण झाले आहे. पूर्णातून पूर्ण काढले असता पूर्णच ऊरते. समजायला अवघड आहे. गणितात आपण अनुभवतो की शून्य ही एकमेव संख्या अशी आहे की शून्य उणे शून्य बरोबर शून्य.  

‘शून्यमय जगत्सर्व’ असे एका संताने म्हटले आहेच. 

----------------------------------------------

ऐतरेयोपनिषद


ओम् वाग्मे मनसि प्रतिष्ठिति मनो मे वाचि प्रतिष्ठितमाविशवीतर्म एधि। वेदस्य मे आणीस्थ श्रुतं मे मा प्रहासी। अनेनाधीतेनाहोरात्रान्संदध्यामृतां वदिष्यामि। सत्यं वदिष्यामि। तन्माववतु।तद्वक्तारमवकतु। अवतु मामवतु वक्तारमवतु वक्तारम्।

ओम् शांति: शांति: शाति:।

हे परमात्मन् माझी वाणी मनात, मन वाचेत सुप्रतिष्ठित होऊ दे. माझ्यासाठी तू प्रकट हो. मन व वाणी दोन्ही माझ्यासाठी वेदविषयक ज्ञान आणोत. मी श्रवण केलेले ज्ञान सदैव माझ्या जवळ राहू दे. या अध्ययनाने मी दिवस रात्र एक करेन. श्रेष्ठ वेदवाणीने बोलेन. सत्य बोलेन. माझे रक्षण होवो. ब्रम्ह आचार्यांचे रक्षण होवो. सर्वांचे रक्षण होवो. त्रिविध ताप शांत होवो. 

--------------------------------------------------------

केनोपनिषद

ओम् आप्यायन्तु ममांगानि वाक्प्राणचक्षु, श्रोतमथो बलमिंद्रियाणिच सर्वाणि सर्वं ब्रम्होपनिषदं माहं ब्रम्ह निराकुर्यिं मा। मा ब्रम्ह निराकरोद निराकरणमस्त्वं निराकरमेस्तु तदात्मानि निरते य उपनिषदत्सुं धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु।

ओम् शान्तिः शान्तिःशान्तिः।

जे सर्व उपनिषदप्रतिपादित ते ब्रम्ह मी आहे. मी ब्रम्हाचा अस्वीकार न करावा व ब्रम्हाने माझा परित्याग न करावा. 

उपनिषदात सांगितलेले धर्म ते आत्म्यामध्ये निरत असलेल्या माझ्या ठिकाणी असोत, माझ्याकडे येवोत. 

त्रिविध तापांची शांति होवो. 

---------------------------------

अंगणवेदी वसुधा कुल्या जलधी, स्थली च पातालम्। वल्मीकश्च सुमेरूः। कृत प्रतिज्ञश्च धीरस्य।

प्रतिज्ञित धैर्यशील व्यक्तीला संपूर्ण पृथ्वी ही अंगणात असलेल्या ओट्याप्रमाणे भासते. महासागर एखाद्या डबक्याएवढा जाणवतो. पाताल एक लहानशी जागा भासते. सुमेरू पर्वत मुंग्यांचे वारूळ वाटते. 


कदर्थितस्यापिही धैर्यवृत्तेर्न शक्यते धैर्यगुणः प्रमार्ष्टुम्। अधोमुखस्यापि कृतस्य वन्हेर्नाधः शिखा यान्ति कदाचिदेव। 


वेळप्रसंगी तिरस्कार झाला तरी धैर्यवान व्यक्तीचा धैर्यगुण नष्ट होत नाही. पेटती ज्योत खाली ऊलटी केली तरी ती वरच ऊफाळते. 

--------------------------------------------

सेनापती कसा असावा?


क्रोधावर नियंत्रण, ईतिहासाचा जाणकार, वर्तमानाबद्दल सजग, शीघ्र निर्णय क्षमता, वीरांना प्रोत्साहन देणारा, युद्धविद्या जाणणारा, सेनेच्या आवश्यकता जाणणारा व त्या पुरवणारा, अतिकराल शस्त्रांना रोखू शकणारा असावा. 

सूर्य जसा आकाशस्थित मेघाला खाली पाडून पृथ्वीला जगवतो तसेच सेनापतीने शत्रूला मारून प्रजेला निरंतर सुखी करावे. 

ऋग्वेद प्रथम मंडल सूक्त ३२ 

-------------------------------------------

सोन्याचे गुणधर्म बदलता येत नाहीत पण दागिन्याचा घाट बदलता येतो. सागवान एकच असते पण फर्निचरचा थाट वेगळा असतो. प्रकृती तीच पण संस्कृती बदलते. 

कंठ मूळचा संगीत नंतरचे,

पाषाण मूळचा मूर्ती नंतर,

माती मूळची पीक नंतर,

जे नंतरचे ते संकल्पाने घडते. 

-------------------------------

निरीक्षण व अनुकरण


मनुष्य दोन पायांवर तर पशु चार पायांवर चलतात. लहानपणीच कोल्हयांनी पळवलेले मानवाचे बाळ, दोन हातांचाही उपयोग पायांसारखाच करू लागते व कोल्हयासारखाच आवाज काढते, हाअनुभव आहेच. 

शेळ्यांबकऱ्यात वाढलेला सिंहाचा छावा बेंबें करतो व सिंह दिसताच पळू लागतो. मग आडाच्या पाण्यात प्रतिबिंब दाखवावे लागते. 

गायकाचे मूल तालासुरात रडते असे म्हणतात. चांगले काही निर्माण करायचे असेल तर समोर चांगल्याच कथा उदाहरणे अनुभव ठेवायला पाहिजेत. 

 आम्ही भारतीय या बाबतीत सुदैवी आहोत. आमचा पुरातन कालापासूनचा तेजस्वी ईतिहास आम्हाला सदैव तेजस्विता प्रदान करत आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा