वेचलेल्या विचार कणिका - भाग १२
( लॉक डाऊन च्या काळात व्हाट्सअँपची माहिती करून घेऊन त्यावर रोज वाचनात आलेले विचार पाठवायला सुरुवात केली. त्याचे हे संकलन. )
चार पुरूषार्थातील चौथा काम
तो वाईट मार्गाकडे वळवतो. मानवी मनाला भ्रमवतो. अभिलाषा वाढवतो. मर्यादाहीन बनवतो. पाण्यावाचून बुडवतो. अग्निवाचून जाळतो. प्राणीमात्रांना घेरतो. ज्ञान व सात्त्विक वृत्तीचा नाश करतो. विवेक नाहीसा करतो. शस्त्र नसतानाही मारतो. दोरावाचून बांधतो. चिखलात बुडवतो. अग्नीमध्ये तुपाची धार ओतल्यावर तो जसा ऊसळतो, तसा काम इंद्रियांचे विषयसेवन वाढवतो. मग विवेक ढळतो. ज्ञान झाकले जाते.
म्हणून सदैव जागृत रहावे.
---------------------------------
चिनगारी
१४डिसेंबर१९३१
स्टीव्हन्सच्या वधासाठी हा दिवस निश्चित झाला. शांति घोष व सुनीती चौधरी या दोघींनी जबाबदारी स्वीकारली होती. कोमिल्लात मुलींसाठी पोहण्याची स्पर्धा आयोजित करणार आहोत, त्यासाठी रीतसर परवानगी साठी अर्ज देण्यासाठी आलो आहोत, अशी बतावणी केली. अर्ज देण्यासाठी स्टीव्हन्सनच्या जवळ गे्ल्या व पिस्तुले झाडली. स्टीव्हन्सन ठार झाला.
स्वातंत्र्यप्राप्ती नंतर अनेकांनी स्वातंत्र्यसैनिक म्हणून निवृत्ती वेतन स्वीकारले पण चौधरींनी अर्जच केला नाही. १९७२ च्या रौप्यमहोत्सवाचे वेळी त्यांना ताम्रपट दिला गेला तेव्हा बंगाल सरकारने आपण होऊन त्यांना निवृत्तीवेतन द्यायला सुरुवात केली.
शांती व सुनीती यांना सादर प्रणाम!
----------------------------------------------------------
भागानगर मुक्तिसंग्राम
भाग्यनगर शहरात सत्याग्रह होणार होता. लोकांची गर्दी वाढत होती. पोलीस लोकांच्या झडत्या घेऊनच त्याना पुढे जाऊ देत होते.
इतक्यात एक आसन्नप्रसवा शांतपणे पोलीसांच्या समोरून शांतपणे सत्याग्रह होणार होता त्या जवळच्या इमारतीत शिरली. सत्याग्रही घोषणा देऊ लागले व पत्रकांचा वर्षाव होऊ लागला. सत्याग्रही पकडले गेले.
मघाचची ती स्री समोर गच्चीत ऊभी होती पण आता तिचे पोट सपाट झाले होते. सर्व पत्रके संपली होती. त्या पत्रकांनाच तिने जन्म दिला होता.
त्या होत्या प्रतिभाताई वैशंपायन !
------------------------------------
कार्तवीर्य पुत्र अर्जुनाने मागितलेला वर
मला ऐश्र्वर्य शक्ती प्राप्त व्हावी. त्यामुळे मी प्रजेचे नीट पालन करू शकेन.
अधर्माचा कधीच भागीदार होणार नाही.
दुसऱ्याच्या मनातील ओळखता यावे.
युद्ध करतांना हजार बाहू मिळावेत, पण ते हलके असावेत, म्हणजे त्यांचा भार वाटणार नाही.
मला मरण माझ्या पेक्षा श्रेष्ठ व्यक्तीकडून मिळावे.
यदाकदाचित कुमार्गी झालोच तर उपदेश करणारा भेटावा.
सातत्याने दान केले तरी धन कमी पडू नये.
मागणेही किती योग्य!
-------------------------------------------
गीता म्हणजे हिंदू समाजाचे स्फूर्तिस्थान आहे. तिने हिंदू धर्माला तारले आहे. समाजाला ग्लानी आली की पुन्हा पुन्हा हिंदू विचारवंतांनी, तिच्या सहाय्याने समाजाला तिच्यातून जागे केले आहे. तिच्या सहाय्याने समाजाचे पुनरुत्थान केले आहे. गीतेवर हात ठेवूनच अजूनही कोर्टात लोक जबान्या देतात. गीता हातात घेऊनच दामोदर चाफेकर व अनेक क्रांतिकारक निर्भयपणे फासावर चढले.
तुरुंगात असताना लोकमान्यांनी गीतारहस्य लिहून मिळालेल्या वेळाचा सदुपयोग तर केलाच शिवाय लोकांना कर्तव्याची जाण व आठवण सदैव देण्याची एक चिरंतन व्यवस्था झाली.
----------------------------------------------------
महीदास
आईचे नाव ईतरा. लहानपणापासून लखलखीत बुद्धी असलेली! पतिही विद्वान, एका गुरूकुलाचा आचार्य! पण पुरूषी अहंकाराने ग्रस्त.
एकदा पती सूक्त म्हणत असता अडखळले, तेव्हा तिने पुढे येऊन ते सांगितले.
कौतुक तर दूरच, पण पतिने याची शिक्षा फर्मावली," तिने व तिच्या मुलाने घरात न राहता शेतात झोपडी बांधून रहावे "
पण याची फारशी पर्वा न करता तिने महीदासाला चांगले शिकवले. महीदासांनी सूक्ष्म चिंतनातून विश्वरचनेचे गूढ उलगडले, विविध ग्रंथ लिहिले.
राजाने सत्कार केला, तेव्हा ते अभिमानाने उद्गारले, " मी ऐतरेय महीदास! माझी ग्रंथसंपदा ऐतरेय नावानेच ओळखली जाईल"
विद्वत्तेला व मातृगौरव भावनेला शत शत प्रणाम.
-------------------------------------------------------------
केळीचे झाड, केळ्यांचा लोंगर लागला की त्या फळभाराने वाकते. तसे विद्या संपत्ती अधिकार यासारखे कोणतेही वैभव मिळाले की आपण अधिक नम्र व विनयशील होण्यातच मोठेपणा आहे.
आपल्याला नंदादीप लावता येत नसेल तर तेवत्या नंदादीपाची वात पुढे सारली तरी नैपुण्य मिळते. समाजाला फार बिचकावून न टाकता, त्याच्या श्रद्धांना फार मोठे धक्के न देता, त्याला पचवता येतील अशाच सुधाअरणा करायला हव्यात!
------------------------------------------------
डेक्कनक्वीनच्या मागे खटारा बांधला व ती आपल्या पूर्ण वेगात निघाली की त्या खटार्याची जी आदळ आपट होईल तशी टिळकांच्या मागे माझी होई. तो वेग जेव्हा मला सहन होत नसे, तेव्हा आमच्यात खटके उडत. पण त्यांची ध्येये पटली की आमची गाडी सुरळीत चाले. मग ती कुणाला थांबवता यायची नाही.
टिळक नादिष्ट होते. गेले तिकडे रमत. घरातला उरलासुरला रुपया तांदूळ आणायला दिला तर त्याची सुंदर काचेची दौत आणतील व मी रागावले तर म्हणतील " तुला कौतुकच नाही. "
-लक्ष्मीबाई टिळक
--------------------
लोकमान्य उवाच
कामगारांनी हे लक्षात ठेवायला हवे की त्यांना खरा लढा द्यायचा आहे तो नोकरशाहीशी! हे गोरे ब्राम्हणच त्यांना दारिद्र्यात ठेवत आहेत, मला अभिमान आहे की, मी गोरा ब्राम्हण नसून काळा ब्राम्हण आहे. काळ्या हृदयाचा गोरा ब्राम्हण असण्यापेक्षा शुद्ध हृदयाचा काळा ब्राम्हण असणे शतपटीने बरे!
ज्याचे हृदय काळे आहे तो मनुष्य ना ब्राम्हण ना क्षत्रिय ना वैश्य ना शूद्र असतो!
---------------------------------
सरकारी नोकरांनी संघात जाऊ नये असे एक गुप्त पत्रक निघाल्याचे कळल्यनंतर" याने नुकसान सरकारचेच होईल कारण ते अशा सद्गूणी सेवकांना मुकेल"
ही प्रतिक्रिया होती.
एकेकाळी संघाचे सरसहकार्यवाह असणाऱ्या श्री. भैय्याजी दाणी यांची!
नागपूरच्या संघ शिक्षा वर्गात भैय्याजींचे बौद्धिक होते. गुरूजींनी यावेळी उपस्थित राहू नये अशी त्यांनी गुरूजीना विनंती केली. विषय होता " एकचालकानुवर्तित्व." गुरूजीना तर बौद्धिक ऐकायचे होते. ते कोणाला नकळत बाजूच्या खोलीत बसले. बौद्धिक ऐकून त्यांना खूप समाधान वाटले.
सतत प्रवास, भेटीगाठी, बैठका यातच त्यांचा वेळ जाई. घरात लक्ष द्यायला वेळच नसे. घरी येणारांची वर्दळ असे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या सौभाग्यवतीनी, श्री गुरूजी व भैय्याजी यांना नर नारायणाची ऊपमा दिली होती.
भैय्याजीच्या कार्याबद्दलच्या गौरवभावनेबरोबरच त्यांच्या मनाचा मोठेपणा ही यातून स्पष्ट होतो अन् म्हणावेसे वाटते " समसमा संयोग जाहला."
-----------------------------------------------
आज गीता जयंती. नातलगांना कसे दुखवायचे? श्रेष्ठाशी कसे लढायचे? या विचाराने किंकर्तव्यमूढ झालेल्या अर्जुनाला, त्याचे कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रेरित करणारी ही गीता सर्व कार्यकर्त्यांना सदैव मार्गदर्शन करत आहे.
दुख्खमित्येव यत्कर्म कायक्लेशभयात् त्यजेत्स क्रूत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत्!
दु:ख होईल, शरीराला त्रास होईल या विचाराने कर्तव्याचा त्याग करणे हे राजस कर्म होय. शिवाय त्या त्यागाने फलप्राप्ती तर नाहीच, पण कर्तव्यच्युतीचा दोष मात्र पदरी येणार; १८:८
---------------------------------------
अनेक क्रांतिकारकांनी फासावर जातांना हातात गीता घेतली होती, असे वर्णन आहे. असे का?
कारण " स्वधर्मे निधनं श्रेय: " या गीतेने दिलेला संदेश त्यांनी अनुसरलेला होता व सर्वांनी तो आचरणात आणावा असे त्यांना वाटत होते.
स्वधर्म - येथे ‘धर्म’चा अर्थ तुम्ही आम्ही समजतो तसा हिंदू धर्म, मुस्लीम धर्म असा नसून कर्तव्य असा आहे. प्रत्येक व्यक्तीला तिच्या वेगवेगळ्या भूमिकेनुसार वेगवेगळी कर्तव्ये असतात. उदाहरणार्थ, एक स्त्री, कन्या, भगिनी, सून, पत्नी, माता, गृहिणी, समाजघटक वगैरे भूमिका एकाच वेळी वठवत असते व या सर्व भूमिकांना योग्य न्याय द्यावा लागतो. अशा वेळी कधीकधी दोन भूमिकांमध्ये विरोधही निर्माण होण्याची शक्यता असते. अशा वेळी श्रेष्ठ कर्तव्य कोणते ते लक्षात घेऊन ते कठोरपणे पाळावे, असेच गीता " स्वधर्मे निधनं श्रेय: " या वचनाने सांगते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा