वेचलेल्या विचार कणिका - भाग ११
( लॉक डाऊन च्या काळात व्हाट्सअँपची माहिती करून घेऊन त्यावर रोज वाचनात आलेले विचार पाठवायला सुरुवात केली. त्याचे हे संकलन. )
अश्रूनो थांबा.
कोर्टात महत्वाचा खटला चालू होता. लोकप्रिय हुशार, करारी वकिलांचे भाष्य चालू होते. मध्येच त्यांच्या मदतनीसाने एक तार आणून दिली. वकिलानी ती वाचून खिशात ठेवून दिली व भाष्य तसेच चालू ठेवले.
त्या दिवसाचे काम संपल्याचे न्यायाधीशांनी जाहीर करताच त्या वकीलांचा संयमाचा बांध फुटला व डोळ्यात अश्रू दाटले. ती तार त्याच्या पत्नीच्या मृत्यूची होती. हे वकील होते सरदार, वल्लभभाई पटेल!
--------------------------------------
रजोगुणाचा अतिरेक झाला की मानव कामासक्त होतो. मग तो अध:पतित होऊन पापाचरणाला प्रवृत्त होतो. त्याचे कुमार्गाकडे प्रवर्तन होते.
काम पाण्यावाचून बुडवतो, अग्निवाचून जाळतो, प्राणीमात्रांना पूर्णपणे घेरून टाकतो. ज्ञानात अडथळा आणतो. शस्त्रावाचून मारतो, दोराशिवाय बांधतो, चिखलात बुडवतो.
म्हणून काम हा काळरुप वैरी आहे हे लक्षात ठेवून त्याच्यापासून लांबच रहायला हवे.
------------------------------------------------------
यश हे आत्मबलाने मिळते, फक्त साधनांमुळे नाही.
घटात जन्मलेले, कंदमुळे हाच आहार असलेले, अशा अगस्तींनी, विशाल असा सागर एका घोटात प्राशन केला.
रथाला एकच चाक आहे, सारथी पंगू आहे, आकाश अथांग आहे तरीही सूर्य ते अंतर एका दिवसात कापतो व सर्व जगाला प्रकाश देतो.
जडात्मा चंद्र शरीररहित असूनही सारया विश्वात सत्ता चालवतो
सागर ओलांडणे कठीण होते, त्यावर सेतू बांधणे अधिकच कठीण होते पण वानरगणाने ते साध्य केले.
बाहुबल, धनबल, बुद्धीबल या सर्वांपेक्षा आत्मबल हे श्रेष्ठ आहे.
-------------------------------------
रतलाम संस्थानचे शासक सज्जनसिंह होते. त्यांच्या राज्यातील श्रीनिवास शास्त्री यांच्या हातून काही अपराध घडला. खटला भरला गेला. योगायोगाने त्यांचा मुलगा न्यायाधीश होता. त्याच न्यायालयात खटला दाखल झाला. ६ महिने तुरुंगवास व ६०० रूपये दंड अशी शिक्षा सांगितली गेली.
मुलाने वडलांना शिक्षा केली म्हणून आई रागावली. मुलगा म्हणाला,"जर सत्ताधार्ऱ्यांनीच योग्य न्याय दिला नाही तर सामान्यांनी काय करावे?”
ही बातमी जेव्हा सज्जनसिंहांना कळली तेव्हा त्यानी त्या न्यायाधीशांना बढती दिली. रामशास्त्री यांचा जणू नवा अवतारच!
-----------------------------------------
सप्तपदी
विवाहसोहळ्यातील एक कार्यक्रम ! वधुवरांचे अद्वैतच जणू साकार करणारा! पहिले पाऊल अग्निलाभासाठी, दुसरे बललाभ व्हावा यासाठी, तिसरे नित्यकर्म सांगणारे, चवथे सुख मागणारे, पाचवे पशुधन मिळावे यासाठी, सहावे धनप्राप्ती अशी ईच्छा प्रकट करणारे, सातवे यज्ञयागातून मिळणाऱ्या लाभासाठी!
वधु प्रथम पद टाकतांना जणू सांगते," घरातील धनधान्याची काळजी मी घेईन”.
दुसरे पद " मी सदैव गोड बोलेन, कुटुंबाचे रक्षण करेन दु:खाचे वेळी धीर धरेन.”
तिसरे पाऊल,” पतिपरायण राहेन.”
शृंगाराने सुखवेन. ” असे चवथ्या पावलाने सांगते.
“दु:खात सहभागी होईन, सुखात संतुष्ट असेन, मोठ्यांचे आज्ञापालन करेन.” अशी खात्री पाचव्या पावलाने देते.
“यज्ञ, होम, दानादी कार्यात बरोबर असेन” असे सहावे पाऊल टाकतांना म्हणते.
या सर्व गोष्टी देवतागणासमोर कबूल करत आहे. या सर्व गोष्टी पाळण्यात कधीही कसूर करणार नाही असे म्हणून सात पावले टाकली जातात.
----------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा