वेचलेल्या विचार कणिका - भाग ४
( लॉक डाऊन च्या काळात व्हाट्सअँपची माहिती करून घेऊन त्यावर रोज वाचनात आलेले विचार पाठवायला सुरुवात केली. त्याचे हे संकलन. )
विश्वपालक विष्णुचे काही गुण-
पूतात्मा -अत्यंत पवित्र व उपाधिविरहित
साक्षी -अलिप्ततेने पण ज्ञानाने सर्व काही पाहणारा
महोत्साह -अतिशय ऊत्साही,कार्यात सदैव तत्पर
महाबल - सर्वश्रेष्ठ, बलवान. या शब्दाचा दुसरा अर्थ भरीव बांबू. हा बांबू अतिशय टणक असतो.
महाबुद्धी - सर्वश्रेष्ठ, बुद्धीमंत
महावीर्य - सर्वश्रेष्ठ पराक्रम असलेला. या शब्दाचा दुसरा अर्थ ब्रम्हदेव असा आहे. नवनवीन सृष्टी निर्माण आपल्या सामर्थ्याने करू शकणारा
महाद्युती -अत्यंत तेजस्वी
गुरूतम - सर्व विद्यांचा ज्ञानदाता, विद्यावंतांनाही विद्या शिकवणारा
सत्य - सत्यभाषक, सत्यवर्तनी
सत्यपराक्रम - सत्यासाठीच पराक्रम करणारा, पराक्रम कधीही व्यर्थ जात नाही असा
सुप्रसाद - उत्तम प्रसाद देणारा, अपकर्ता असला तरीसुद्धा त्याच्यावर उपकार करणारा
विभु व्यापक - विविध रूपांनी प्रकट होणारा
असंख्येय - अमोल असे रुपगुण असणारा
अप्रमेयात्मा … ज्याची तुलना कोणाशी होणार नाही असा
---------------------------------------------------------
शारीर तप
देवदर्शनाला जाण्याची आतुरता, देवालये स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न. मूर्ती सुंदर दिसावी म्हणून शोभिवंत पूजा सामग्री मिळवण्यासाठी आटापिटा, देवापुढे साष्टांग दंडवत.
श्रेष्ठ जनांची नम्रतेने सेवा, विद्वान व परोपकारी अशा लोकांचा सन्मान.
प्रवासाने वा संकटाने शिणलेल्या लोकांना सुख मिळेल अशा योजना.
सर्व तीर्थांपेक्षा श्रेष्ठ अशा आई-वडीलांची सेवा.
संसार दुःख हरण करणाऱ्या सद्गुरूना भजणे
सदाचरणाचा अभ्यास, स्वधर्माचरण, अग्नी अहंकाराचे दहन.
सर्व प्राणीमात्रामध्ये एकच परमात्मा आहे हे जाणून सर्वांना वंदन व सेवा.
महिलांविषयी आदरभाव.
------------------------------------------------------------
भोपाळला असणारा इंग्रज रेसिडेंट अत्याचारी होता. कलकत्याच्या अमृतबझार पत्रिकेने त्याची अत्याचारी कृत्ये उजेडात आणायची असे ठरवले. त्यासाठी चपळ, साहसी, देशभक्त तरुणाची नेमणूक झाली. एक दिवस त्या रेसिडेंटच्या दारात फाटके कपडे घातलेला एक मनुष्य आला व काही तरी काम द्या,असे विनवू लागला. झाडलोट व भांडी घासण्याचे त्याला काम मिळाले. काम वेळच्यावेळी व स्वच्छ होत असे, शिवाय त्याचा प्रामाणिकपणा पाहून सर्वांचा त्याच्यावर विश्वास बसला.
इकडे अमृतबझार पत्रिकेत रेसिडेंटच्या अन्यायी कृत्याची माहिती येऊ लागली. त्याची कटकारस्थाने उघड होऊ लागली. रेसिडेंट त्रस्त झाला. माहिती देणारास पकडून देण्याबद्दल बक्षीस जाहीर झाले. पण काही उपयोग झाला नाही. शेवटी इंग्रज सरकारने त्या रेसिडेंटला काढून टाकले. याचीही नोकरी गेली.
काही दिवसांनी तो रेसिडेंट भोपाळ स्टेशनवर आला असता तो गडी सूटबूटात त्यांच्या समोर उभा होता.
------------------------------------------
विष्णुसहस्त्रनाम
आपल्याला वाटतात त्यापेक्षा वेगळा अर्थ असलेली नावे
वृषाकपि - वानरासंबंधी नाही, वृषचा अर्थ इच्छा पूर्ण करणारा धर्म
क म्हणजे जल, त्यातून पृथ्वीचा उद्धार करणारा वराह.
वसुद: - वसुमती, वसुंधरा यावरून अर्थ पृथ्वी असेल, अशी कल्पना. पण अर्थ आहे संपत्ती. वसुद: - धन देणारा.
वसुमना: - ऐश्वर्यशाली मन असणारा
व्याल: - अर्थ रानटी श्वापद नसून, ज्याला पकडणे कठीण असा साप वा वाघ
अज: - अर्थ बोकड नसून जन्मरहित आहे
सर्व व शर्व - हे परस्पर विरोधी आहेत. जगाची उत्पत्ती व जीवन ज्यांच्या मुळे तो सर्व, प्रलयावेळी सर्वसंहारकर्ता तो शर्व.
----------------------------------------
राग आला म्हणून कर्तव्य सोडू नये.
अंधाराचा राग येतो म्हणून डोळे फोडून चालेल का?
अर्धशिशीचा त्रास होतो म्हणून डोके तोडायचे का?
रस्ता अवघड असला तरी चालावेच लागते, पाय तोडून टाकता येत नाहीत.
खूप भूक लागली आहे, समोर अन्न आहे, पण ते खूप कढत आहे म्हणून ते लाथेने ऊडवून दिले तर ऊपाशीच राहावे लागेल.
सर्व कर्मे आधी त्रासदायक वाटू शकतात, पण ती करायलाच हवीत. जे्वण शिजवायला लागते. तेंव्हा त्रास वाटतो. पण शिजवले नाही तर खाणार कायॽ शरीराला आवश्यक तेंव्हा कडूलिंब कडू लागला तरी खायला हवा. हिरडा तुरट असतो पण आरोग्यासाठी उपयोगी असतो.
गोड दूध देणाऱ्या गायींच्या शिंगांची भीती वाटते. सुंदर फुले देणाऱ्या शेवंतीला काटे असतात. त्रासदायक असले तरी कर्तव्य करायलाच हवे.
( ज्ञानेश्वरी)
-------------------------------------------
मानवाने जीवनात काहीतरी सत्कर्म करावे, जेणेकरून मरणानंतर देखील लोक धन्यवाद देत राहतील.
जसे वारा वहायचा थांबला तरी झाडे काही वेळ डोलत राहतात. डबीतील कापूर संपला तरी सुगंध मागे दरवळत असतो.
गाण्याची बैठक संपली तरी सूर कानात घुमत राहता. पाणी वाहून गेले तरी ओल मागे राहते. सूर्य अस्ताला गेला तरी संध्याप्रकाश मागे रेंगाळत असतो. लक्ष्याचा भेद झाल्यानंतरही बाण जरासा पुढे जातो. फिरत्या चाकावरचे भांडे कुंभाराने खाली उतरवले तरी चाक थोडावेळ फिरत राहते. ‘मरावे परी कीर्ती मागे ऊरावी’ असे समर्थांनी सांगितले आहे. आवश्यकता आहे ती हे लक्षात ठेवून हातपाय सक्षम आहेत तोवरच असे कार्य करण्याची.
-------------------------------------------
परंपरा
राजा विद्वांनाचा चाहता होता. एकदा त्याच्या दरबारात शिष्यासह एक विद्वान व त्याचा मित्र आले. दरबारातील विद्वानांनी त्यांची परीक्षा घेतली . सर्वानी विद्वत्तापूर्ण उत्तरे दिली . राजाने मित्राला एक हजार रूपये, शिष्याला पाचशे रुपये व गुरूला दोन हजार रुपये दिले.
मित्राने विचारले,असा भेदभाव का?
शिष्य तरूण आहे. तो अजून गुरू व्हायचा आहे, म्हणून त्याला पाचशे. तुम्ही विद्वान आहात पण अजून शिष्य तयार केला नाहीत म्हणून तुम्हाला हजार रूपये, तुमचा मित्र स्वत: विद्वान आहेच व त्याने चांगला शिष्यही तयार केला आहे, म्हणून त्याला दोन हजार दिले आहेत.
---------------------------------------------------
स्वधर्मे निधनं श्रेय:
अनंतराव आठवले, अनुवाद ज्ञानेश्वरीत सांगतात.
स्वधर्म पाळायला कठीण वाटत असते, पण परिणाम सुखदायक असतो. कडू्लिंब औषध म्हणून उपयोगी असतो, मग त्याच्या कडूपणाला कंटाळून कसे चालेल? आई कुबडी असली तरी तिची माया कुबडी नसते. पाण्यापेक्षा तूपात कितीतरी अधिक गुण असतात, पण माश्याला त्यात राहता येत नाही. म्हणून स्वधर्मासी आचरावे हे श्रेयस्कर होय.
--------------------------------------------------------------
समर्थ म्हणतात,”अकार लक्ष्मण आहे, उकार भरत, मकार शत्रुघ्न, अर्धमात्रा सीता, नादबिंदु हनुमान. हे सर्व मिळून राम ओंकार बनला आहे. ” समर्थांचे श्रवण परीक्षित राजासारखे होते, समर्थांचे कीर्तन देवर्षी नारदांसारखे असे. समर्थांचे नामस्मरण भक्त प्रल्हादासारखे भासे,
आत्मनिवेदन राजा बळीसारखे जाणवते. दास्य हनुमंतासारखे घट्ट होते, तर सख्य अर्जुनासारखे पक्के होते.
वामनपंडितांनी वर्णन केले आहे,’शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे। वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिकासारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा।’
आपण पण संघटक समर्थ रामदास स्वामी यांना वंदन करू या।
------------------------------------------------------------------
वृक्ष स्वत: जमिनीत पाय रोवून उभे राहतात, वादळवारे पाऊस यांच्या पासून स्वत:च्याबरोबर आश्रयास येणाऱ्याचेही रक्षण करतात. रक्षणाचे काम करणाऱ्या विष्णूचा हा गुण त्यांनी घेतला आहे. विष्णु सहस्र नामात काही वृक्षांची नावे आली आहेत.
न्यग्रोध: - वटवृक्ष हा चिरंजीव आहे. त्याच्या पारंब्या जमिनीत जातात व दुसरा वृक्ष तयार होतो.
उदुंबर: - औदुंबर - अंबराच्याही पलीकडे असणारा. अंबर म्हणजे आकाश.
अश्वत्थ - पिंपळ, याचा विस्तार खूप मोठा असतो. पादचतूर असेही याचे नाव आहे.
----------------------------------------------------------
आज मंगळवार सहज मनात विचार आला अन् लक्षात आले की आपण नेहमी देवीची आरती म्हणतो. पण तिच्या अर्थाकडे फारसे लक्ष कधीच दिले नाही.
रचयिता आहेत नरहरी. रचनेत सौंदर्य आहे ते दुर्गे दुर्घट, अनाथ नाथे, वारी वारी व, रचनेवरून लक्षात येते.
मला समजलेला अर्थ-
दुर्ग म्हणजे किल्ला. दुर्घटचा अर्थ कठीण. जिंकण्यासाठी कठीण अशा किल्याप्रमाणे तू सहजप्राप्य नाहीस. तरीही तू अनाथांची नाथ आहेस. माझी जन्ममरणाची येरझार तू थांबव. माझी हार झाली आहे. माझ्या संकटाचे निवारण कर. त्रिभुवनात तुझ्या सारखे कुणीच नाही. तुझे वर्णन करताना चारी वेद थकले, षटशास्त्रेही विवाद करतांना थांबले. तू आमचे भवपाश तोडून, क्लेशापासून आम्हाला सोडव. हे अंबे, हे माते, आमची ही ईच्छा तुझ्यावाचून अन्य कोण पुरी करेल? तुझ्या पायावर वाहिलेल्या, कमळाच्या पाकळीच्या एका लहान बारीक तुकड्यासारख्या असलेल्या, माझ्यावर कृपा कर!
------------------------------------------
विष्णु सहस्रनामातील काही नावांचा आज विचार करू या।
काही वृक्षांची नावे आपण पाहिली.
आता फुले.
प्रामुख्याने पद्मचा उल्लेख आहे.
पद्मी, पद्मनिभेषण - हातात कमल धारण करणारा
अरविंदाक्ष - कमळासारखे डोळे असलेला
पद्मगर्भ - हृदयकमलात ज्याची उपासना केली जाते तो
कुमुद - चंद्रविकासी कमळ
मुकुंद - पांढरी कण्हेर
कुंदर,कुंद -स्वच्छ सुंदर फुले देणारा
पुष्पहास्य -विकसित पुष्पाप्रमाणे विलोभनीय हास्य असणारा
प्राणी व पक्षी
हंस - हंसावतारात विष्णुने सनकादिकांना तत्त्वज्ञानाचा उपदेश केला. हंस पाण्यात विहार करतो, पण पाण्यावाचूनही राहू शकतो.
सर्वप्रसिद्ध आहे तो हंसाचा नीरक्षीरविवेक- दुधात मिसळल्यानंतर पाणी दुधाचा रंग धारण करते तरी हंस त्यातून दूध वेगळे काढू शकतो.
----------------------------------------------------------
आज एक गोष्ट भागवत पुराणातील
नारदांना वृकासुराने विचारले, ब्रम्हदेव विष्णू शंकर यापैकी कोण लवकर प्रसन्न होईल?
उत्तर आले 'शंकर’. ऊपासनेला सुरवात झाली. रोज शरीराचे मास काढून अग्नीत हवन होऊ लागले. सहा दिवस झाले. सातव्या दिवशी मस्तक तोडू लागला. शंकर प्रसन्न झाले. वर मागितला गेला,’ज्याच्या मस्तकावर हात ठेवेन, तो मरेल’ आणि वर शंकरांवरच उलटला.
वृकासुराने पार्वतीचे हरण करण्याचा व शंकराच्या मस्तकावर हात ठेवण्याचा प्रयत्न केला. शंकर पळू लागले. असुर पाठलाग करू लागला.
विष्णूंनी ब्रह्मचाऱ्याचा वेष घेतला. असुरासमोर आले व म्हणाले,” मी तुला मदत करेन. शंकरांना तू उगाच महत्व देत आहेस. खरे तर ते प्रेतपिशाच्यांचे स्वामी आहेत. आता त्यांचे देवत्व शिल्लक राहिलेले नाही. खरे खोटे पहायचे असेल तर स्वतः च्या डोक्यावर हात ठेवून पहा, वर खरा आहे का खोटा.” वृकासुराच्या मनात वराबद्दल शंका आली. प्रचीती पाहण्यासाठीत्याने आपल्या डोक्यावर हात ठेवला व तो मेला.
--------------------------------------------
आज आणखी काही नावे. अनुप्रिता थत्ते यांनी लिहिलेल्या पुस्तकात ही माहिती दिली आहे.
शशबिंदु - सश्याचे चिन्ह धारण करणारा चंद्र. आकर्षक रुप, सशक्त शेपूट, धावण्याची शीघ्र गती, पांढरा शुभ्र रंग या गुणवैशिष्ट्यानी युक्त गोंडस ससा.
वत्सी - गोमातेचे दुधाने पुष्ट. गोवत्सद्वादशीने दिवाळी सुरू होते.
गोपति - परत उल्लेख पण अर्थ वेगळा. गो म्हणजे इंद्रिय, त्यावर नियंत्रण असणारा. गोचा अर्थ पृथ्वी असाही आहे. म्हणजे पृथ्वीचा
राजा.
कपींद्र - कपि म्हणजे वानर, त्यांचा राजा मारुती वा सुग्रीव.
वानर वा नर - जणू काही नरच. मनुष्याचे अनेक गुण धारण करणारा.
हनुमंताचे एक विशेषण आहे बुद्धिमतां वरिष्ठ:
शेपटी ही त्याने शस्त्र म्हणून वापरलेली आहे. तिच्या विळख्यात तो शत्रुला आवळतो. शेपटी गुंडाळून कमरेला वेढे बांधलेले असत. रावण दरबारात ते सोडवून, तिचे ऊंच आसन करून, हनुमान बसला होता. लांब व ऊंच ऊडी हे आणखी एक वैशिष्ट्य.यामुळे सीता शोधासाठी मारूतीला रामेश्वराहून लंकेत पोचता आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा