फार पूर्वी एक सिनेमा पहिला होता. ऐतिहासिक होता. शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्यांच्यानंतर संभाजी राजे गादीवर आले. औरंगजेबाने त्यांना पकडले व हालहाल करून ठार मारले. त्यांच्या पत्नी येसूबाई व पुत्र शाहू यांना कैदेत टाकले. पण शिवरायांचे दुसरे पुत्र युक्तीने जिंजीला पोचले व स्वराज्याची सूत्रे हलवू लागले. ह्या काळात गनिमी कावा व वेगवान दौडी यांच्या मदतीने शूर मराठा सरदारांनी औरंगजेबाच्या सळो कि पळो करून सोडले होते. यामध्ये प्रमुख होते संताजी व धनाजी. त्यांनी तर औरंगजेबाच्या छावणीत शिरून तंबूचा कळसच काढून आणला होता. हे सर्व वर्णन त्या सिनेमात होते आणि देश हा देव असे माझा हे गीत देखील सतत म्हटले जात होते.
देवाचे स्थान आपण पवित्र ठेवतो. त्याला फुले, पत्री, धूप, गंध सर्व अर्पण करतो व तो आपला मदतकर्ता आहे असा विश्वास मनात बाळगून त्याची पूजा अर्चा करतो. देशाला देव मानले की त्याला वाहायची फुले कोणती? स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हटले आहे, 'गुणसुमने मी वेचियली'. मी गुणांची फुले वेचून आणली आहेत. ते सर्व गुण देशासाठी उपयोगात आणणार आहे. आपल्या चांगल्या चारित्र्याचा धूप लावणार आहोत. गंध उगाळताना खोड स्वत: झिजते व सुगंधित गंध तयार होते. आमच्या सर्व शक्तीचा, गुणांचा, बुद्धीचा उपयोग आम्ही देशासाठी करणार आहोत. आमच्या कुठल्याही कृतीमुळे देशाला दोष लागणार नाही ही काळजी घेऊन देश पवित्र ठेवणार आहोत. आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत होऊन तिथे प्रथम क्रमांक मिळवून देशाला गौरव प्राप्त करून देणार आहोत. आणि हे सर्व का? तर देश माझा आहे म्हणून!
देशाला आपण मातृभूमी म्हणतो. आपल्या आईप्रमाणेच ही मातृभूमी आपले लालनपालन करते. अन्न, निवास, पाणी सर्व उपलब्ध करून देते. आम्ही तिला आईप्रमाणे मानले असल्याने तिची सेवा करून तिला गौरव मिळवून देणार आहोत.
आमचा हा भारत देश जगात सर्वात प्राचीन आहे. सर्व जगाने वंदनीय मानला आहे. गुरुस्थानी मानला आहे. मध्यंतरीच्या काळात आमची थोडी पीछेहाट झाली असली तरी तिला तेच गौरवाचे स्थान पुन्हा मिळवून द्यायचा आम्ही निश्चय केला आहे. आम्हाला देशाचा गौरव, मान सांभाळायचा आहे.
देश हमे देता ही सब कुछ। हम भी तो कुछ देना सीखे - हे लक्षात घेऊन, तसे वागून आम्ही आमचे राष्ट्र तेजस्वी बनवणार आहोत. आम्ही त्यासाठीच रोज प्रार्थना व तशी कृतीही करत आहोत.