बुधवार, १७ फेब्रुवारी, २०२१

वेचलेल्या विचार कणिका - भाग 15

वेचलेल्या विचार कणिका - भाग 15

( लॉक डाऊन च्या काळात व्हाट्सअँपची माहिती करून घेऊन त्यावर रोज वाचनात आलेले विचार पाठवायला सुरुवात केली. त्याचे हे संकलन. )


राष्ट्रमाता जिजाका स्मरण हम करे! आज तारखेनुसार जिजाऊ जयंती. त्यांच्या कार्याचे स्मरण व अभिवादन! 

वह न माता थी केवल शिवाबालकी

चिंता रखती मनमे सभी राष्ट्र की!

 सर्वात महत्त्वाचे तिने एक स्वराज्यसंस्थापक घडवला! त्यासाठी स्वाभिमान जागरण, देशाच्या परवशतेची जाणीव, वीर भाव निर्माण याबरोबरच इतिहास, पुराणे यातील कथा सांगून, काय करायला हवे आहे याचे स्पष्ट दिग्दर्शन तिने शिवबाला केले. 

रामकथा सांगून रावणाच्या अत्याचाराने राष्ट्र कसे त्रस्त झाले होते व रामाने त्याचा नि:पात कसा केला हे सांगता सांगता, त्याने अयोध्येहून सैन्य न मागवता वानरसैन्य कसे तयार केले,

राष्ट्र सुखी केले हेही सांगितले. 

जिजामातांना प्रणाम!

-------------------

जिजाउंची आत्मसन्मानाची भावना अत्यंत तीव्र होती व हृदय वज्रासारखे कठिण होते. तर धर्मभावना सखोल व अत्यंत जागरुक होती. तसेच सर्व संस्कार शिवबांवर पण झालेत. दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षण शिवबाला दिले. धर्मा बद्दलची जिजाउंची दूरदृष्टी अत्यंत प्रशंसनीय होती. बजाजी निंबाळकरांना जबरदस्तीने मुसलमान धर्म स्वीकारावा लागला होता. पण ह्या शूर वीराला परत हिंदुधर्मात घेण्याचे धैर्य दाखविले. असे करणे त्याकाळी फारच धैर्याचे होते. येवढेच करुन त्या थांबल्या नाहीत तर त्यांनी निंबाळकरांचा पुत्र महादजी याचेबरोबर शिवबाची कन्या सखुबाई हिचा विवाह लावून दिला व एक आदर्श निर्माण केला. म्हणूनच " बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाउले!" या समर्थ उक्ति प्रमाणे

मातृत्वाचा आदर्श असणार्‍या जिजामातेला आजच्या दिवशी विनम्र अभिवादन!

-----------------------------

नुकतीच लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी झाली. ‘मूर्ती छोटी किर्ती मोठी’ अशी ही व्यक्ती!

अत्यंत गरीबी असतानाही जिद्दीने शास्त्री ही पदवी मिळवली व पुढे तेच त्यांचे आडनाव झाले. 

मीठ सत्याग्रहात भाग घेतला होता. काँग्रेसच्या सर्वच कार्यक्रमात सहभागी असत. 

स्वातंत्र्य प्राप्ती नंतर रेल्वे मंत्री, वाहतूक व दळणवळण मंत्री, गृहमंत्री, परराष्ट्र व्यवहार मंत्री अशी विविध पदे भूषवली व त्यांना योग्य न्यायही दिला. 

९ जून १९६४ ला ते पंतप्रधान झाले. आत्यंतिक शांततेचे धोरण सोडून आक्रमकांना धडा शिकवायला हवा हे लक्षात घेऊन, १९६५ साली पाकिस्तानचे आक्रमण यशस्वीपणे परतवले. 

परिणामत: रशियाने पाकिस्तान व भारत यांच्यात समझौता घडवण्याचा आव आणून ताश्कंद येथे विचार विमर्षासाठी बोलावले. 

चर्चेत काय ठरले हे कळण्याआधीच शास्त्रीजींच्या मृत्यूची बातमी पोचली. हृदयाघात का विषप्रयोग हे अजूनही स्पष्ट झालेले नाही व आता ते शक्यही नाही. त्याचवेळी प्रेताची तपासणी व्हायला हवी होती. पण त्यांच्या निधनाने तरूण पिढी मात्र शोकमग्न, हताश व क्रोधसंतप्त झाली होती हे आजही आठवते. 

-------------------------------------

आज भारतीय लोकांना एक अनोखी भेट मिळाली आहे. आजपासून दिवस हळूहळू मोठा होत जाणार म्हणजे तेज प्रकाश उष्णता व वेळ अधिक मिळणार!

आज मकरसंक्रमण! सद्विचार, सद्भावना, सद्वासना, सत्कृती यांचे संक्रमण करू या!

आनंद मिळवू या व वाटू या! 

तिळातील स्नेह व गुळातील गोडी क्रूतीत उतरवून सर्वांना आनंद देऊ या! सम्यक क्रमण करीतच जीवन व्यतीत होईल अशी काळजी घेऊ या!

----------------------------

आज एक खेळ- ज्याच्या शेवटी क्रांत आहे असे शब्द लिहणे ऊदा' किंक्रांत

आजपासून आद्य शंकराचार्य यांच्या निर्वाण षटकाचा विचार करणार आहोत. 

षटक म्हणजे सहा श्लोक. रोज एक श्लोक घेऊ या! प्रत्येक श्लोकाची शेवटची ओळ आहे' चिदानंदरूपं शिवोहम् शिवोहम्! मी शिव_ शुभ, कल्याणकारी आहे हे निश्चित पणे सांगत असतानाच तितक्याच खात्रीपूर्वक मी चिदानंद आहे हेही म्हटले आहे. पूर्ण जागृतावस्था व एकमेवता याची जाणीव आहे. 

या म्हणण्याला अधिक उठाव मिळावा वा ते अधिक स्पष्ट व्हावे म्हणून आधीच्या तीन ओळीत मी कसा नाही ते सांगितले आहे. 

उद्यापासून सुरवात करू या. समजायला सोपे आहे. 

------------------------------------


आज कालच्या खेळाचे ऊत्तर क्रांत हे दरवेळा न लिहिता नुसते आधी चे लिहणार आहे ऊत्क्रांत यातील फक्त ऊत् लिहिले आहे

वि उत् व्युत् क्षुधा त्रूष्णा आपदा निद्रा समा अभ्रा व्याधि विपदा समा भया पादा. 

एकूण चौदा झाले याखेरीज काही सुचले तर कळवावे. 

-------------------------

कालच्या षटकातील पहिल्या श्लोकातील पहिल्या तीन ओळीत मी काय नाही ते सांगितले आहे. 

मन, बुद्धी अहंकार चित्त

मन विचार करते, बुद्धी सारासार विचार करून काय योग्य ते ठरवते. यश मिळाले की अहंकार निर्माण होतो. या सर्वात गुंतणारे चित्त, यातील काहीच मी नाही. 

ऐकण्यासाठी कान, बोलण्यासाठी जीभ, वासासाठी नाक, पहाण्यासाठी डोळे- मी नाही. 

पंचतत्वातील आकाश भूमी तेज वायू ( आप गाळले आहे ) मी नाही. 

--------------------------------------

 दुसरा श्लोक

काय नाही

ज्याला प्राण म्हणतात तो. 

प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे पंचवायू. 

कातडी, मांस, चरबी, रक्त, स्नायू, हाडे व मज्जा हे सात धातू. 

अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, व आनंदमय हे पाच कोश. 

वागेंद्रिय, हात, पाय, शुद्धीकरण इंद्रिय व जननेंद्रिय ही पाच कर्मेंद्रिये. 

यापैकी मी काहीच नाही. 

---------------------------

श्लोक तिसरा

द्वेष, राग, लोभ, मोह, मद,मत्सर हे भाव, धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरूषार्थ नाही. 

या सर्व ऊपाधींच्या पलीकडे मी आहे, म्हणूनच मी चिदानंद रूप आहे. 

-------------------------------------

चौथा श्लोक

मानवाला द्वेष राग व भावना असतात. त्यामुळे त्याच्या हातून चांगली वाईट कर्मे घडतात. त्यामुळे माझ्या हातून पुण्य वा पाप घडले असे वाटते. पण मी फक्त चिदानंदरूप असल्याने मी पुण्यही नाही वा पापही नाही. स्वाभाविकच मला सुख दु:खही नाही. 

आत्मानुभव प्राप्तीसाठी आवश्यक मानले जाणारे मंत्र, तीर्थ, वेदाभ्यास वा यज्ञयाग मी नाही. मी भोजन भोज्य भोक्ताही नाही. म्हणजे मी जे प्राप्त करावे असे साध्य नाही, त्यासाठी करावयाची साधना नाही, किंवा साधकही नाही. 

------------------------------------

पाचवा श्लोक

गुरुंच्या आशीर्वाद मिळाला की मोक्ष वा ब्रम्हप्राप्ती होणार आहे. मग मला मृत्यूची भीती नाही. जातिभेदाची पर्वा नाही. मग मला पिता, माता, बंधू, मित्र, गुरू कोणी ही आडवू शकणार नाही. 

------------------------

सहावा श्लोक

 माझ्या मनात काही विकल्प नाहीत. मी निराकार आहे. मला माझे अस्तित्व सर्वत्रच जाणवत आहे. माझी इंद्रिये ही सर्वगामी, सर्वस्पर्शी.. 

--------------


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा