रविवार, ३० मार्च, २०१४

श्री गणपत्यथर्वशीर्ष -प्रकरण चौथे

अध्यात्म स्वरूप
अध्यात्मस्वरूप- चौथा व सहावा श्लोक
त्वं वाड:मय: -
जे लिहिले जाते त्याला साहित्य म्हणतात. जे साहित्य अमर होते त्याला वाड:मय म्हणले जाते. वाड:मय ह्या शब्दामागे बव्हंशी ’अक्षर’ हे विशेषण आलेले असते. वाचस्पती म्हणतात," ज्या वाणीला ईशतत्वाचा स्पर्श झालेला असतो ते अक्षर वाड:मय.
वाड:मय=वाक +मय. मय शब्द सुचवतो तल्लीनता, विलीनता. सर्व वाड:मयात तू व्याप्त आहेस. आपल्या लक्षात येईल की अक्षरवाड:मयाच्या प्रारंभी गणेशवंदन आहे.

त्वं चिन्मय: -
चित+मय. चित=चैतन्य. तू चैतन्यमय आहेस. तू ह्या विश्वाची चेतना आहेस. चैतन्य नष्ट झाले की जडत्व येते.

त्वं आनंदमय: त्वं ब्रम्हमय: -
आनंद हा विविध प्रकारचा व स्तरावरचा असतो. साधारणपणे लक्षात येते की अपेक्षापूर्ती झाली की आनंद होतो. अपेक्षा या परिस्थिती, उद्दिष्ट, क्षमता यावर अवलंबुन असतात. तैत्तिरीय उपनिषदातील वर्णनानुसार आत्मज्ञान प्राप्त झालेल्या मनुष्यानंदाच्या ९०० पट आनंद म्हणजे ब्रम्हानंद होतो.
ब्रम्हाचे वर्णन ’नेति नेति' असेच करावे लागते. वर्णन करताना शब्द अपुरे पडतात. ब्रम्हाच्या तुलनेसाठी काहीच सापडत नाही.

त्वं सच्चिदानंदा द्वितियोसि -
सत+चित+आनंद+अद्वितिय.
सत, चित, आनंद ह्या तिन्ही चैतन्यमय गोष्टी प्राप्त केलेला तुझ्यासारखा दुसरा कोणी आढळत नाही. शंकराचार्य म्हणतात, "चिदानंदरूपं शिवोsहम् । "
सत=शाश्वत सत्य, चित=चैतन्य!

त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसि-
विज्ञान=विशिष्ट ज्ञान. म्हणुन साधारणतया ज्ञान हे आत्मस्वरूपाचे तर विज्ञान हे भौतिक वस्तुसंबंधी असे मानतात. ज्ञानासाठी सद्गुरूला शरण जावे लागते. तेव्हाच,
" ज्ञामिन: तत्वदर्शिन्:उपदेक्ष्यन्ति " व ते ज्ञान प्राप्त होईल.

त्वं गुणत्रयातीत: -
त्रिगुण- सत्व, रज, तम. या त्रिगुणांनी सर्व जग व्यापलेले आहे. अन्न, आनंद, यश, वृत्ति, धन, ज्ञान, कृती सगळ्याच गोष्टी त्रिगुणाबाधित असतात. तू मात्र त्या वर मात केली आहेस.

देह्त्रयातीत:,कालत्रयातीत,मूलाधारस्थितोसि नित्यं-
स्थूल, सूक्ष्म, कारण देह व भूत, वर्तमान, भविष्य काल यावर तू विजय मिळवला आहेस. मूलाधाराचे वर्णन वाणी वर्णनावेळी आले आहेच.

त्वं शक्तित्रयात्मक: -
उत्पत्ति, स्थिति, लय या शक्ति. ह्यांचे वर्णन अधिदैवत वर्णनात आहे.

त्वाम् योगिनो ध्यायन्ति नित्यम् -
योगी सर्वदा तुझेच ध्यान करतात. योगी-आत्मौपम्येन सर्वत्र सम य:पश्यति स:योगी।
आत्मैकभावाने सर्वांना सम मानणारा तो योगी. अर्थात ही स्थिती प्राप्त करायला त्याला बराच काळ लागला, बराच प्रयत्नही लागला. सद्गुरूकृपा प्राप्त करावी लागली. पण मनाची ही स्थिति कायम ठेवण्यासाठी ते योगी तुझेच ध्यान करतात.

त्वं ब्रम्हा........ स्वरोम् -
ब्रम्हा, विष्णु, महेश- उत्पत्ति, स्थिति, लय करणारे. इंद्र- सेनापती अर्थात संरक्षण, पराक्रम.
अग्नि- उष्णता देणारा
वायू- हवेशिवाय जीवन नाही.
सूर्य- प्रकाश व उष्णता दाता.
चंद्र- औषधी निर्माता
भू- पृथ्वी
भुव:- अंतरिक्ष
स्व:- स्वर्ग
ओम- वाक् चा प्रथम उच्चार या सर्व सामर्थ्याने युक्त आहेस.

फलश्रुति-
(एतदथर्व..पासून) या अथर्वशीर्षाचे जो पठन करतो तो ब्रम्हस्वरूपी लीन होतो. (पठन=वाचन+पाठांतर+अर्थ समजणे +म्हणणे )
अनेक वेळा वाचल्यानंतर पाठ होईल. पाठ करण्याकडचे लक्ष कमी होईल व ते आपोआपच अर्थ समजून घेण्याकडे वळेल. अर्थ समजला की काय करायचे आहे ते कळेल. पुन्हापुन्हा म्हणण्याने तशी कृती होऊ लागेल.
विघ्न-पाप-दोष-
(अ) विघ्न म्हणजे संकट, जे विविध स्वरूपाचे असते.
१)नैसर्गिक आपत्ती- यात वादळ, पूर, भूकंप, हिंस्त्र पशूंचे आक्रमण वगैरे गोष्टी येतात.
२)शारीरिक आपत्ती- यात दुर्बलता आजार यांचा समावेश होईल
३) मानसिक आपत्ती- मन एकाग्र न होणे.
(आ) पाप- समाज सुचारूरूपाने चालावा यासाठी नीतिनियम असतात. त्यांच्या विरुद्ध वागणे म्हणजे पाप.
(इ)- दोष- शारीरिक, मानसिक, बौद्धिक दोषांबरोबरच कृती करताना होणाऱ्या चुका यात गणल्या जातील. उदा. स्पष्ट व योग्य उच्चार न होणे, विस्मरण होणे, एखादी गोष्ट राहून जाणे, योग्य प्रकारे कृती न होणे.
या सर्वांपासून मुक्तता होते असे फलश्रुतीत सांगितले आहे.

सायमधीयानो दिवसकृतं पापं नाशयति --
म्हणताना कधीकधी वाटते हा पाप करण्याचा जणू परवानाच आहे. पाप करा व ते नष्ट करण्यासाठी अथर्वशीर्ष म्हणा असा वरवर अर्थ त्यातून निघतो. पण ’पाप’ हा शब्द न कळता घडून गेलेले पाप ह्या अर्थी वापरला आहे. उदा. माता आपल्या अपत्याला कधीकधी मारते. हेतु चांगला असला तरी मारणे ही एक प्रकारची हिंसाच असते. अशा पापापासून मुक्त्तता मिळेल.

स सर्वत: सुखमेधते -
दाही दिशांकडून सुखच प्राप्त होइल. खरे तर सुख ही कल्पनादेखील सर्वांची सर्व वेळी एक असत नाही. सुख हे परिस्थिती, आवश्यकता, सुखसंकल्पना व परिणाम यावर अवलंबुन असते. थंडीत शेकोटी तर उन्हाळ्यात पंखा, भुकेलेल्याला अन्न तर गरीबाला धन, रोग्याला निरोगीपणा असे सुखाचे प्रकार परिस्थितीवर अवलंबून असतात. सुख हेही चार प्रकारचे असते. शारीरिक, मानसिक, बौद्धिक व आत्मिक.

धर्मार्थकाममोक्षंच विंदति-
मनुष्यजीवनाचे नियोजन चार आश्रम, चार पुरुषार्थ, व चार मुक्तिंमधे केलेले आहे. धर्म, अर्थ, मोक्ष व काम हे चार पुरुषार्थ प्राप्त होतात.

अशिष्याय न देयम् -
ही धोक्याची सूचना दिलेली आहे. ’शिष्य’ विषयी विचार आपण रक्षासूत्राच्या वेळी केलेला आहे. हे म्हणताना आठवते ती गोकर्ण महाबळेश्वर कथा! रावण शंकरभक्त होता. त्याला भोळ्या शंकराने आत्मलिंग काढून दिले. मुळात दुष्ट प्रवृत्ती असलेल्या रावणाच्या हातात ही अमोघ शक्ती गेली तर विश्वाचा नाश होईल हे जाणून श्रीगणेशाने युक्तीने ते त्याच्या हातातून काढून घेतले.
अणू विस्फोटातून निर्माण होणाऱ्या उर्जेचा उपयोग जेव्हा अणूबॉंब बनवण्यासाठी केला गेला तेव्हा त्यातून विनाशच घडला. सर्व पाप तापांचा नाश करणारी ही शक्ती अशिष्याच्या हाती दिली जाऊ नये अशी स्पष्ट सूचना म्हणूनच करावी लागली.

यो यदि मोहात् दास्यति-
इथे मानवी स्वभावाचे अचूक वर्णन केले गेले आहे. मोह हा फक्त पैशांचाच
असतो असे नाही. सत्ता, पद, गौरव, शारीरिक मानसिक सुख कशाचाही होऊ शकतो. मोहाने असे केले तर ’स:पापीयान् भवति ’- अथर्वशीर्ष पापनाशक असूनही पापकारक होईल.
पठन कसे करावे याबद्दल काही सुचना आहेत. सहस्त्र आवर्तने करावी. आवर्तनांबरोबर अभिषेक करावा. चतुर्थीच्या दिवशी न खाता पाठ करावेत. दुर्वांचा होम करावा. लाह्या,समिधा व तूप-सहस्त्रमोदक यांनी यजन करावे. आठ ब्राम्हणांनी एकत्र येऊन करावे. सूर्यग्रहणाचे वेळी, महानदीच्या काठावर, गणपती मूर्तीजवळ याचा पाठ करावा वगैरे. यामुळे उत्तम वक्तृत्व, विद्यावंतता, ब्रम्हाची जाणीव होणे, सर्व भयांपासून मुक्तता होईल, यशवंत व्हाल, इच्छित फळ प्राप्त होइल, सूर्यासारखे तेज प्राप्त होईल, सर्वज्ञ व्हाल इत्यादि फळ सांगितले आहे.

दुर्वा- औषधी गुण आहे. शीतलता व वंशवृद्धी उपयुक्तता आहे. कुठेही जोमाने वाढ होते हा नैसर्गिक गुण आहे. पहाता पहाता दुर्वांचे बेट तयार होते, ही आहे संघटनकुशलता. त्याचबरोबर त्या बेटात अनेक मुळे तयार होतात हे आहे कामाचे व जबाबदारीचे विकेंद्रीकरण व नवनेतृत्वनिर्माण!
२१ दुर्वांची जुडी बांधायची पण वहाताना मात्र ती सोडून वहावयाची. त्यांची देठे मागे तर अग्रे साधकाकडे अशी पद्धत आहे. २१ चे महत्व मागे आले आहे. अग्रभागी तीन टोके असतात. देहकाल अवस्था,गुण त्रयातीत: असे वर्णन मागे केले आहेच.
लाह्या-
साळी, ज्वारी, बाजरी, राजगिरा वगैरे धान्य तापले की त्याच्या लाह्या बनतात. धान्य कोणत्याही रंगाचे असले तरी त्याची लाही मात्र फिकट पांढुरक्या रंगाची असते. मूळ धान्यकणापेक्षा आकाराने मोठी, वजनाला हलकी व पचायला सोपी असते. औषधी गुणही असतो.
मोदक-
मोद+क- आनंद निर्माण करणारा. आतल्या गोड सारणाला कठीण कवच धारण करून रक्षणारा. विविधतेतून एकता या भावाचे दर्शन स्वत:च्या रूपातून घडवणारा, गजाननाला अत्यंत प्रिय असणारा.

समिधा-
’वन्हि तो चेतवावा रे' हे ध्येय उराशी बाळगून स्वप्राणांचे समर्पण करणे हे व्रत आचरणाऱ्या या समिधा. ’अग्नये स्वाहा इदं न मम' हाच संदेश देतात.

शेवटी आहे य एवं वेद। इत्युपनिषद।
उपनिषद हा वेदांचा भाग होय. अथर्वण वेदाचा अथर्वशीर्ष हा एक भाग आहे. अपेक्षा काय? ओम सहनाववतु-मागणे आहे ते एकट्यासाठी नाही. नौ-दोघे गुरू व शिष्य- पण अंतर्भूत आहे सर्व समाज! पराक्रमी, विद्वान, तेजस्वी व्हावा, द्वेषापासून मुक्त असावा, सर्वत्र शांतीचे राज्य असावे. आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक सर्व प्रकारची शांती लाभावी.

॥ श्रीगजाननार्पणमस्तु ॥

श्री गणपत्यथर्वशीर्ष - प्रकरण तिसरे - भाग २

लंबोदरम् शुर्पकर्णकम् -
मोठ्या पोटाचा व सुपासारखे कान असलेला. गजमुख असल्याने सुपासारखे कान अपेक्षितच आहेत. एकनाथांनी सुपाचे वर्णन केले आहे,
" सुपाची दशा ते ऐसी। त्यजी रज:कण भुसासी ।
 निडारल्या निजबिजासी । निजहृदयेसी राखत ।( एकनाथी भागवत ७/३३७)
माती व भूसाचा त्याग केल्यानंतर शुद्ध निजबीज जे आहे त्याला सुप निजहृदयाजवळ राखते. जे असार, अनुपयुक्त आहे ते टाकून देऊन उपयुक्त व सारभूत साठवणे हे सुपाचे वैशिष्ट्य आहे. जो नेता असतो त्याला अनेकांकडून अनेक गोष्टी ऐकायला मिळतात. त्यातले खरेखोटे, सत्यासत्य, योग्यायोग्य निवडुन घेणे हे त्याला करावे लागते. कानांना झाकण नसते अशी एक म्हण आहे. ’ईच्छा असो वा नसो जे कानी पडेल ते ऐकले जातेच. म्हणूनच सुपाची आवश्यकता अधिक असते. नेत्याला आपले कान सदैव उघडे ठेवायला लागतात. याचा अर्थ त्याने सर्वांचे म्हणणे ऐकायचे असते, ’ऐकावे जनाचे ’. पण त्यावर प्रक्रिया करून सर्वांमुखी झालेला निर्णय मनात साठवुन, ’करावे मनाचे ’ असे वागायचे असते.
पाखडून घेतले खरे, पण कानांवर पडले की शरीरात जाते. नको असलेल्या गोष्टीचीही साठवण करण्याची जागा म्हणजे पोट. दृष्टीनेही जे पाहिले जाते तेही पोटात साठवले जाते. म्हणूनच या गणपती गणनायकाचे पोट विशाल आहे. पोट अन्न साठवते. पाचकरसाने ते पचवते. रक्त तयार होते व सर्व शरीराकडे पाठवले जाते.

श्री.आनंद जयराम बोडस यांनी संगणकाच्या भाषेत या सर्वांची उपपत्ती लावली आहे. संगणक म्हणजे सम्यक गणक. गणक शब्दाचा एक अर्थ आपण ध्वनीचे गण करणारा असा मागे पाहिलाच आहे. गणक चा दुसरा अर्थ आहे गणना करणारा. संख्या मोजणारा. जनगणना करण्याची पद्धत गणपतीनेच सुरू केली.
बोडस म्हणतात,’आचार्य गणक हे उर्जाविज्ञानाचे शास्त्रज्ञ होते. जनकल्याणार्थ संशोधन करणारे वैज्ञानिक होते. उर्जा ही तीन प्रकारची असते. म्हणून शक्तीत्रयात्मक: हे विशेषण योजले गेले. लंबोदर ही उर्जेची साठवण करणारी बॅंक होय. ज्ञानशक्तीची अब्जावधी मेगॅवॅट असलेली ही डेटा बॅंक आहे. फडफडणारे कान म्हणजे या डेटाबॅंकसाठी दुरदुरून येणारे संकेत व ज्ञानसंदेश. ग्रहण करण्यासाठी असलेल्या या डिस्क ऍटेना आहेत. म्हणूनच त्या वेगवेगळ्या दिशांना व वेगवेगळ्या अंशात सतत फिरत्या ठेवाव्या लागतात. सोंड ही शुद्धीप्रक्रियेतील नळी आहे.

रक्तानुगंधलिप्तांगं रक्तपुष्पै सुपूजितम् -
वेगवेगळ्या असुरांचा नाश केल्यानंतर त्यांच्या रक्ताचा टिळा लावला गेला असाही अर्थ ( रक्त+ गंध + अनुलिप्त +अंग ) लावला जातो. बाकी माहिती रक्तम मधे आली आहेच.
याखेरीज वक्रतुंड हे विशेषण अथर्वशीर्षात आलेले आहे. वक्रतुंडचा सरळसरळ अर्थ वाटतो वाकडे तोंड असणारा. मानवापेक्षा गजमुख हे नक्कीच वाकडे आहे. पण वक्रतुंडचा अर्थ आहे, "वक्रान् तुंडयति स: "जे वाकडे आहेत, वक्र बोलणारे, वागणारे आहेत त्यांना शिक्षा करणारा! गणेशचरित्र वाचताना गणेशाने शारीरिक शक्ती, संघटन शक्ती, बुद्धी व युक्ति यांचा वापर करून अनेक दुष्टांचा नाश केला आहे तर काहींना वठणीवर आणले आहे, हे आपल्या लक्षात येते.

गंमत वाटते ती एका गोष्टीची! गजाननाच्या सोंडेचा कुठेच उल्लेख नाही. गजमुखात ती ’गृहीत’ धरलेली आहे. सोंड ही नाक, तोंड व हात तिन्हीचे काम करते. शुद्धीप्रक्रियेतील नळी, पाशासारखे शस्त्र हे उल्लेख मागे आलेले आहेत. लांबच्या लांब असली तरी तोंड म्हणूनचा भाग लहानच आहे. हत्तीला मोठे फळ खाण्यासाठी टाकले तर आधी तो ते पायाने दाबतो मग उचलुन तोंडात घालतो. तोंडाचे दोन उपयोग, खाणे व बोलणे. नेत्याने शरीराला आवश्यक तेवढेच खावे व समाजहितकारक तेवढेच बोलावे अशी अपेक्षा असते. पोटांत कितीही साठले तरी बोलणे माफकच असावे. आवेशाचे भरात नको ते, नको तितके बोलले गेले तर काय होते, हे वर्तमानपत्रावरून लक्षात येतेच. अधिक खाल्ले तर कधी ते डोळ्यावर येते, कधी शिक्षा होते. पण यातून सुटले तरी जनमानसात आदर मिळत नाही हे नक्की.

सोंडॆचा उपयोग हत्ती हातासा्रखा करतो. उचलून खाणे, झाडांना विळखा घालणे, माणसांना उचलणे वगैरे. सर्व बाजूंना फिरत असल्याने ढालीसारखीही वापरली जाते. हा हात डोक्याशी जोडलेला आहे हे विशेष आहे. बुद्धीचा उपयोग करून कृती करावयाची तसेच कृतीमागे बुद्धी असली पाहिजे.
श्री.विवेक लक्ष्मण गोडबोले म्हणतात, गणेशाने गजमुख धारण केले आहे कारण हत्ती हा शाकाहारी, बलाढ्य, समुहाने रहाणारा, जलप्रिय, उशीरा वयात येत असल्याने कामविकार कमी असणारा, क्वचितच रागावणारा आहे. नजर सूक्ष्म व दूरदृष्टी असणारा आहे."

श्री.जयंत साळगावकर लिहितात, "गणनायक असल्याने शिस्तीचा भोक्ता व वेषांतर करून लढणारा आहे. गजमुखापासून बनवलेली किंवा गजमुखासारखी दिसणारी ढाल त्याने वापरली आहे."
’२१ ’ ह्या संख्येबद्दलही ते म्हणतात, "गणपतीने सैन्यरचना केली ती अशी- २१ सैनिकांचा एक गट, त्या गटावर एक प्रमुख, अशा २१ गटांचा एक समूह- त्यावर एक प्रमूख अशी ! आजही ह्याच तत्वावर सैन्यरचना केली जाते.

अध्यात्मिक वर्णन व वर उल्लखलेले सगुणरूप वर्णन याखेरीज आणखी काही विशेषणे अथर्वशीर्षात आलेली आहेत. गणेशाचा जो गांयत्री मंत्र आहे,’ एकदंताय विन्महे वक्रतुंडाय धीमहि । तन्नो दंति : प्रचोदयात॥ ’
आम्ही एकदंताला जाणतो, वक्रतुंडाचे ध्यान करतो, त्या ’दंति' ने आम्हाला प्रेरणा द्यावी. ’दंति’ शब्द उच्चारताच वाटते की एकदंताशी संबधितच हे विशेषण असेल. रचनाकाराच्या शब्दप्रभुत्वाचा हा आविष्कार आहे. दंत- कित्येक योजने प्रदेश व दंति म्हणजे या दंतचा स्वामी!

महात्मा गांधींचे वर्णन एका कवीने केले आहे,
" तो नच राजा,राजकुमारही, नच कोणी श्रीमंत धनाढ्यही।
विख्यात ना कोणी कवीही। नच असल्या काहीच खुणा।
पण जग वंदी तयासच पुन्हा पुन्हा. "
असे का? पुढे ते म्हणतात," कारण स्वत:च्या वृत्तीने व कृतीने ते जनतेच्या हृदयसिंहासनावर आरूढ झाले होते."
भारताच्या सर्व भागात गजाननाला मान्यता मिळालेली आहे. म्हणजेच सर्व भारत देशच तो राजा नसूनही त्याच्या स्वामित्वाखाली आहे म्हणुन तो ’दंति "!

अथर्वशीर्षातील शेवटचा श्लोक ( यापुढे फलश्रुती आहे-)
नमो व्रातपतये..नम:।
व्रातपतये -
व्रातांचा पति असलेल्याला वंदन असो. बाकी सर्व देव स्वर्गात रहातात. शंकरही कैलासावर रहातात. पण त्यांचा वावर आहे तो समाजातील उपेक्षित असलेल्या जमातींमध्ये. व्रात, भूत, गंधर्व, पिशाच्चादि समाजातील लोकांना त्यांनी आपले मदतनीस, आपले सहकारी, आपले अनुयायी म्हणून स्वीकारले आहे. शंकरांचे हेच कार्य पुढे गजाननानेही चालू ठेवले होते. हे (व्रातपति म्हणुन गजाननाच्या उल्लेखाने) आपल्या लक्षात येते. इतकेच नव्हे तर त्यातील ’प्रमथ ’ या एका गणाची खास जबाबदारीही त्याच्याकडे आहे. म्हणून प्रमथपतये म्हटले आहे. श्री. शंकर अभ्यंकर व्रात चा अर्थ व्रत करणाऱ्या ऋषींना आश्रय देणारा असाही करतात.

विघ्ननाशिने -
विघ्नहर्ता, संकट्मोचन अशीही नावे प्रचलित आहेत. समाजाच्या हिताकरता तसेच समाजरक्षणाकरता गणपतीने केलेल्या कार्याचा उल्लेख हे विशेषण करते.

शिवसुताय -
शंकरपुत्राला वंदन असो! शं करोति इति शंकर:। सर्वांचे कल्याण करणारा तो शंकर. वडिलांचे हेही कार्य ( व्रातपतये ) गजाननाने पुढे चालवले आहे.

वरदमूर्तये -
वर देणारांचे मूर्तिमंत रूप असा गणपती। वर देणे या मागे, दिलेला वर खरा होईल असे सामर्थ्य त्या व्यक्तीमधे असण्याची आवश्यकता असते.

शांतिमंत्र -
( २ श्लोकांचा)-हा आधी व फलश्रुतीनंतर शेवटीही म्हणला जातो.
शांतिमंत्राच्या पहिल्या श्लोकात अपेक्षा किंवा संकल्प वर्णन केला आहे. आम्ही कानाने भद्र म्हणजे शुभ तेच ऐकू. डोळ्यांनी शुभ तेच पाहू. स्थिर शरीराने व संतुष्ट मनाने आयुष्याचा उपयोग तुझ्या स्तवनासाठीच करू. या संकल्पानंतर कल्याण करण्यासाठी इंद्राला प्रार्थिले आहे. इंद्र हा पराक्रमी व दुष्टांचे निर्दालन करणारा होता. ( सु+अस्ति=स्वस्ति=कल्याण)
पूषा
भौतिक व अध्यात्मिक दोन्ही प्रकारची भरभराट विश्ववेदाने (विश्व जो जाणतो व विश्व ज्याला जाणते) करावी.
तार्क्ष्य -
या देवाचे वर्णन वेदात आहे. तो अरिष्टांचा नाश करणारा आहे. काही ठिकाणी हा सूर्याचे वाहन आहे असाही उल्लेख आढळतो. त्याने आमचीही संकटे दूर करावीत तसेच देवांचा गुरू जो बृहस्पती त्याने आम्हाला कल्याण प्रदान करावे.
अधिदैवत -
नंतर ’ओम नमस्ते गणपतये ’ या प्रार्थनेनंतर आधिदैवताचे वर्णन पहिल्या व पाचव्या श्लोकात आहे. या सृष्टीचा तू कर्ता, धर्ता,हर्ता आहेस. ’त्वमेवं केवलं कर्तासि’ हा भाव अथर्वशीर्षात तीन वेळा वर्णन केला गेला आहे. केवलं कर्तासि धर्तासि हर्तासि ( निर्मिती, संरक्षण व नाश) सर्वच तू आहेस. पुन्हा पाचव्या श्लोकात तुझ्यापासूनच जगाची निर्मिती झाली. तुझ्यातच सर्व जग सामावलेले आहे. तुझ्यातच त्याचा विनाश होतो व तुझ्यामुळेच हे जग प्रत्ययास येते. पुन्हा सहाव्या श्लोकात तूच ब्रम्हा, विष्णू, रुद्र आहेस असे म्हटले आहे.
पंचमहाभूतापासून मानव, देव व सृष्टी निर्माण झाली आहे. त्याचा उल्लेख या अधिदैववर्णनात आहे.
’त्वम भूमिरापोSनलोsनिलोSनभ:। ’ ही पंचमहाभूते तूच आहेस. मानव देहात ही पंचमहाभूते् आहेत व त्यांची स्थानेही ठरलेली आहेत.
१) तळपाय ते मांड्या- पृथ्वीतत्व
२)मांड्या ते नाभि- आपतत्व
३)नाभि ते हृदय- तेजतत्व
४)हृदय ते नासिका- वायूतत्व
५)नासिका ते मस्तक-आकाशतत्व
पायापासून मस्तकापर्यंत ही स्थाने आहेत. साधारणपणे पंचमहाभूतांचा निर्देश आपण पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश असाच करतो.
पण त्यांची निर्मिती मात्र प्रथम आकाश, त्यांतुन वायु, वायुवहनाने तेज, तेजापासून आप व आपापासून पृथ्वी अशी झाली आहे. एकनाथी भागवतात व ज्ञानेश्वरीत याचे वर्णन आहे.

त्वं चत्वारि वाकपदानि-
वाक ही चार पदांची आहे व ही चार पदे तूच आहेस.
परा-
ध्वनी हा मूलत: निर्माण मूलाधारातून होतो. समर्थांनी म्हटले आहे, "मूलारंभ आरंभ तो निर्गुणांचा ।"
प्रथम निर्माण होतो तो प्रणव ओंकार व गणेशाला प्रणवरूपच मानले गेले आहे. ज्ञानेश्वरांनी ओंकारस्वरूपा म्हटले आहे. उभा ओम आडवा केला की गणेशरूप दिसते. म्हणूनच अथर्वशीर्षात ’त्वं मूलाधारस्थितोसि
नित्यं ’ असा उल्लेख आहे.
पश्यंति-
परा वाणी स्फुरित झाली की नाभीस्थानात तेथील चक्रात येते तेव्हा तिला पश्यंति म्हणतात.
मध्यमा-
पश्यंति मनोमय होऊन हृदयस्थानच्या चक्रात येते तेव्हा ती बुद्धीमय मध्यमा होते.
वैखरी-
मध्यमा कंठस्थानात येते तेव्हा तिचा उच्चार होतो. त्यालाच वैखरी मानतात. कंठस्थानात आल्यावरही त्यावर काही प्रक्रिया होतात व उच्चारण होते. आपण ओम् चा उच्चार करत असताना या सर्वाचा प्रत्यय येत असतो


श्री गणपत्यथर्वशीर्ष - प्रकरण तिसरे - भाग १

 सगुणरूपवर्णन

एकनाथी भागवताच्या अकराव्या अध्यायात म्हटले आहे, "निर्गुणाचा बोध कठीण। मन बुद्धी वाचे अगम्य जाण। (क्र.१४६०) तर सगुण मूर्ती ही "सुलभ आणि सुलक्षण। देखतां जाय भूकतहान " (क्र. १४६२ ) अशी. सर्वसामान्य तुम्हा आम्हाला सगुण मूर्तीचे ध्यान अधिक सोपे असते. शिवाय अगदी मानसपूजा करायची म्हटली तरी बंद डोळ्यांपुढे व मनापुढे जे चिंतायचे त्याचे काहीतरी रूप असावे लागते.
अथर्वशीर्षात आधी गणेशाचे आध्यात्मिक वर्णन केलेले असले, गणेशविद्येतही गॅंचे वर्णन केलेले असले तरी नंतर एकदंतं चतुर्हस्तं पासून ते रक्तवाससं असे सगुणरूपवर्णनही आहे. त्यातील प्रत्येक शब्दांला काही पार्श्वभूमी व वेगळा असा अर्थ आहे. विज्ञानकथेचे ही स्वरूप आहे.

आपल्याकडे अशा अनेक विज्ञान कथा रूपक कथेच्या स्वरूपांत प्राचीन काळापासून प्रचलित आहेत. उदा.उत्तरेकडे धृवतारा, हा आपले स्थान बदलत नाही. त्यासाठी धृवबाळाची गोष्ट, कृत्तिका मावळल्यावर सप्तर्षी उगवतात म्हणून सप्तर्षी कृत्तिकांचे तोंड पहात नाहीत असे वर्णन, सप्तर्षीतील वसिष्ठ तारा जोडतारा (बायनरी स्टार ) म्हणून वसिष्ठ अरुंधतीची कथा वगैरे कथा प्रसिद्ध आहेत. या दृष्टीने त्या स्वरूपाचाही अर्थ आता आपण लक्षात घेणार आहोत.

एकदंत-
एकच दांत असलेला म्हणजे एकच दांत शिल्लक राहिलेला! देवांतकाशी गणेशाचे युद्ध चालले होते. देवांतकाने गणेशाचा एक दांत उपटला. (मोठा व लांब दांत असल्याने त्याला ते सहज शक्य झाले.) वास्तविक पहाता एकच दांत राहिला, शत्रूने एक उपटला, ही गोष्ट अवमानकारक ठरली असती. पण ती भूषणावह ठरली व यांतच गणेशाचे मोठेपण लक्षात येते. देवांतकाने दांत उपटल्यावर अधिक खिजवण्यासाठी त्याला तो दाखवला. गणेशाने तोच पकडला व त्या धारदार दांतानेच देवांतकाला मारले. उपटलेला दांत हेच शस्त्र बनवले. प्राप्त परिस्थितीत हताश न होता, त्या परिस्थितीचा त्याने संधी म्हणून उपयोग केला व एक मौलिक संदेश दिला.
या वेळी आठवतात ते माजी पंतप्रधान अटलबिहारी यांचे उद्गार! गुजराथमधे भूकंप झाला. घरांची पडझड झाली.अपरिमित हानी झाली. पण दु:खावेगात बुडून न जाता भारतीयांच्या अंगभूत विजिगीषु वृत्तीला साद घालत ते म्हणाले, "या गोष्टीचा संधी म्हणून उपयोग करू या. पुन्हा सुंदर, सुरचित गांवे व शहरे उभी करू या!"

एकनाथांनी एक वेगळाच दृष्टीकोन मांडला आहे. ते म्हणतात, "एकी दाविसी अनेकता। परी एकात्मता न मोडे। (अध्याय १.२) दोन्हीत एकी होती. वरवर दोन दिसत असले तरी कार्यशक्ती व ध्येय एकच असल्याने एक मोडला तरी त्याने काही फरक पडत नाही.
स्वामी स्वरूपानंद याचे वर्णन आणखी वेगळेच करतात. इतिहास त्यातून लक्षात येतो. ते म्हणतात,
 "बौद्ध वार्तिकांचे। जे कां बौद्धमत। तोचि छिन्नदंत। योगाहाती ॥
वाचल्यावर लगेच आद्य शंकराचार्यांचे जीवनकार्य डोळ्यांसमोर तरळते. सर्व धर्म वा संप्रदाय यांची मुलभूत तत्वे चांगलीच असतात. पण सर्वसामान्यांच्या धारणाशक्तीनुसार व कर्तृत्वाच्या क्षमतेनुसार त्यांना कधीकधी वेगळे वळण लागते.

बौद्ध संप्रदाय सुरू झाला. गीतेतील अहिंसेचे तत्वज्ञान त्याने उचलून धरले. सर्वसामान्यांना त्याचे नीट आकलन झाले नाही. चुकीचा अर्थ लावला गेला. सर्व समाज दुबळा बनला. भोगप्रवृत्तीवर नियंत्रण असावे या दृष्टीने काही अध्यात्मिक गोष्टी सांगितल्या गेल्या. घड्याळाचा लंबक एका दिशेलाच गेला होता. त्याला मध्यवर्ती आणण्यासाठी प्रयत्न करता करता तो विरुद्ध टोकाला गेला. समाजात उदासीनता पसरली. स्वसंरक्षणाचेही भान राहिले नाही. भिक्षुंची संख्या खूपच वाढल्यामूळे गृहस्थाश्रमी वर्गावर त्याचा आत्यंतिक ताण पडला. अर्थव्यवस्था बिघडून गेली. त्याचवेळी समाजांत अनेक पंथोपपंथात चुरस निर्माण झाली. समाज असंघटित झाला. विजिगिषु वृत्ती जाऊन जीवनांत नैराश्य आले. समाजाला पुन्हा सबल, एकसंध, विजिगिषु करण्यासाठी शंकराचार्यांनी कंबर कसली. अन्य आचार्यांना वादात जिंकले. प्रभावी असलेल्या बौद्ध संप्रदायाशी त्यांना अधिक शक्तीने झगडावे लागले. बौद्ध संप्रदायातील अयोग्य गोष्टी नाहीशा कराव्या लागल्या व पुन्हा एकसंधता निर्माण केली गेली. जणू बौद्ध भिक्षुंचे बौद्धमत हा दंत योगाहाती आला. योग = एकत्रीकरण असाही अर्थ हिंदीत केला जातो.

चतुर्हस्तं -
चार हात असलेला. ’चार’ या संख्येला एक वेगळेच महत्व भारतीय संस्कृतीत आहे. चार आश्रम, पुरुषार्थ, वर्ण, मुक्ती, चार वाक वगैरे. एक ही एकमेव संख्या एक ह्या अर्थी असते. नंतर असतात त्या अनेक(अन+एक). चारचा अर्थ तसाच आहे. विविध आवश्यक कार्ये करण्यासाठी विविध प्रकारच्या क्षमता असाव्या लागतात. त्या त्या क्षमतांनुसार कृती घडत असते. पण सर्व कार्य समाजहितकारक होण्यासाठी त्यांच्यात एकीची, एक विचाराची, परस्परसहाय्याची आवश्यकता असते. चार हात त्याचेच निदर्शक आहेत. आपल्या बव्हंशी देवतांना चार, सहा, आंठ, दहा, सोळा असे हात आहेत. कारण समाजहितचिंतकांनाच आपण देवस्वरूप मानत.
गणेशाचे रूपही विविध कालावधीत विविध स्वरूपाचे होते असे वर्णन आहे. गणेशकवचातही तसा उल्लेख आढळतो. प्रथम युगात-सत्ययुगात त्याला आठ हात असून त्याचे वाहन सिंह होते. त्याचे महाविनायक नाव होते व देवांतकाचा वध हे प्रमुख कार्य होते. त्रेतायुगात सहा हात व मयुर वाहन होते. शिवपुत्र नाव होते व दुंदु दैत्य वध हे प्रमुख कार्य होते. द्वापारात चार हात व रक्तवर्णी होता. शिवपुत्र गजानन हे नाव होते व सिंदुरासुर वध हे प्रमुख कार्य होते. कलियुगात तो द्विभुज असुन धूम्रवर्ण आहे.अर्थात सामान्य मानवापेक्षा त्याच्या अधिक असलेल्या क्षमतेची जाण आपण अनेकहस्ती मूर्तीतून दाखवत असतो. हात अनेक पण कार्य एकच हा संदेश लक्षात रहातो.
भारतीय संस्कृतीचे एक प्रतिक स्वस्तिक आहे. मुळातल्या दोन रेघा विविध दिशांना जातात. त्यांनी त्या दिशेने किती वाढावे यावर बंधन नाही. पण चारही दिशांनी वाढणाऱ्या रेषांनी सारखेच वाढायला हवे. एकच रेषा खूप वाढली आणि दुसरी तितकीच राहिली तर चालणार नाही. तसेच त्यांच्या दिशाही ठरलेल्या आहेत आणि तरी त्यांचा केंद्रबिंदु एक आहे. तो केंद्रबिन्दु नष्ट झाला तर सर्व रेषा भरकटतील.काटल्या गेलेल्या पतंगाप्रमाणे दिशाहीन होतील. मग स्वस्तिक हे (सु +अस्ति +क) हितकारी रूप नष्ट होऊन जाईल. हात कितीही असले तरी ते धडालाच जोडलेले रहायला हवेत व त्यांचे नियंत्रण मेंदूकडूनच व्हायला हवे. एका अर्थी हे समाजपुरूषाचेच वर्णन असावे असे वाटते.

पाशांकुशधारिणं
विठ्ठलाखेरीज आपले सर्व देव शस्त्रधारी आहेत. विठ्ठल हा शस्त्रधारी नसला तरी त्याचे हात खंबीरपणे कटीवर ठेवलेले आहेत. संकटाला घाबरून तो पळणारा नाही हे त्याचे निशस्त्र हातही सांगतात. टीकाकार विशेषत: बुद्धिभेद करू पहाणारे म्हणतात, "शस्त्रधारी आहेत याचा अर्थ युद्धप्रवृत्त
म्हणजेच साध्या शब्दात भांडायला केव्हाही तयार असे भांडकुदळ आहेत." गंमत म्हणजे अशा लोकांनीच सतत इतरांवर आक्रमणे केलेली आहेत. अणुबॉंब तयार करण्यात व वापरण्यात तेच अग्रेसर राहिलेले आहेत.
भारताचे देव शस्त्रधारी असले तरी भारताने कोणावरच अन्यायाने आक्रमण केलेले नाही. पण आपल्यावर आक्रमण होऊ नये म्हणून स्वसंरक्षणसिद्ध तो राहिला आहे. हे भान जेव्हा सुटले किंवा आपल्यासारखेच इतरही सद्विचारीच असतील असे भोळेपणाने मानले गेले तेव्हा तेव्हा तो आक्रमणाचे लक्ष ठरला. अगदी आत्ता आत्ताच्या काळात ’हिंदी चिनी भाई भाई' ही घोषणा वातावरणात निनादत असतानाच चीनने आक्रमण केलेले आपण पाहिले आहेच.

गजाननाच्या हातातही शस्त्रे आहेत. पाश व अंकुश. गणेशपुराणात सहा वर्षाच्या गणेशाला ही शस्त्रे विश्वकर्म्याने दिली अशी गोष्ट आहे. विश्वकर्म्याच्या मुलीचे संज्ञाचे, सूर्याशी लग्न झाले. पण तिला सूर्याचे तेज सहन होईना म्हणून ती घोडीचे रूप घेऊन वनात लपली. विश्वकर्म्याने तिची समजूत घातली व सांगितले,"मी सूर्याला तेज कमी करायला सांगतो." सूर्यानेही संमती दिली. विश्वकर्म्याने त्याला चक्रावर धरुन घासले. सूर्याचे तेज कमी झाले. संसार सुखाने चालू झाला.
चक्रावर घासताना खाली जो चुरा पडला त्याची विश्वकर्म्याने शस्त्रे बनवली. गदा व चक्र विष्णूला, त्रिशुल शंकराला, पाश, अंकुश, परशु व कमळ गणेशाला दिले. गणेशाच्या शौर्यकथा ऐकून विश्वकर्मा त्याला बघायला आला होता, तेव्हा त्याने ही दिली.
पाश हा फेकून फास टाकून जवळ ओढून घेण्यासाठी वापरतात तर अंकुश नियंत्रण ठेवण्यासाठी योजतात. वानरांची शेपटी व हत्तीची सोंड यांचाही पाशासारखाच उपयोग केला जातो. सर्वसामान्यांतील विषयवासना, धनलोभ, व्यसनांची आवड या साऱ्या गोष्टी गणेश पाश टाकून नाहीश्या करतो. तर विवेक, बुद्धी, संयम, उपासना या अंकुशाने दुर्वासनांवर नियंत्रण ठेवतो.
स्वामी स्वरूपानंद म्हणतात, "तर्क तो परशू। न्याय तो अंकुश ।"

रदं च वरदं हस्तैबिभ्राणं मूषकध्वजं।
गजाननाच्या विविध मूर्ती व फोटो पाहिले तर त्याच्या हातात वेगवेगळी शस्त्रे दिलेली दिसतात. वरील कथेत परशु व कमळाचा उल्लेख आहे. पण अथर्वशीर्षात तो नाही. देवांतकाने उपटलेल्या दातानेच गणेशाने त्याला मारले ही कथा आपण पाहिलीच आहे. या ठिकाणी तो दांत गणेशाच्या एका हातांत आहे व चौथा हांत वरदहस्त आहे. वरद म्हणजे वर देणारा, अभय देणारा. गणांचा प्रमुख असल्याने आपल्या लोकांना धीर देणे, आश्वासन देणे ( कोरडी नव्हेत ) यासाठी हा वरदहस्त आहे. तो दिसतांच पहाणाऱ्याच्या मनातील भय कमी होते. आपला रक्षणकर्ता कोणीतरी आहे ही भावना विश्वास निर्माण करते.

मूषकध्वजं
मूषकाचा वाहन म्हणून उल्लेख नसून मूषकचिन्हांकित ध्वज असे वर्णन आहे. उंदीर हा सामान्यातील सामान्य. आपल्या कार्यात सर्वसामान्यांचा सहभाग घेणारा हा गणनायक आहे. रामाने रीस वानर यांच्या सहकार्याने रावणासारखा प्रबल शत्रू नष्ट केला. शिवरायांनी मावळ्यांना आपल्या कार्यात सहभागी करून घेतले. लोकमान्य टिळकांना इंग्रजांनी पदवीबहाल केली होती, "तेल्या तांबोळ्यांचे पु्ढारी." सर्वसामान्यांसह सर्वांचा सहभाग असेल तर कार्य यशस्वी होते. सैन्य हेही सामान्य माणसांचेच असते. अशांना मार्गदर्शन करून यश प्राप्त करतो तो सेनापती, नायक, राजा!
उंदीर हा कुठेही प्रवेश करू शकतो. सर्व गोष्टी कुरतडू शकतो. त्याच्या हालचाली चपळ व वेगवान असतात. पहाता पहाता बिळात अदृश्य होऊन यशस्वी माघार घेतो.जणू सम्राटाचे कुशल हेरखातेच! या सर्व गुणांचा उपयोग समाजकार्यासाठी गणेशाने करून घेतला आहे. उंदीर गणेशाचे वाहन कसे बनला याची एक गोष्ट आहे. क्रौंच गंधर्व आपल्याच नादात घाईघाईने जात असताना वामदेव ऋषींना त्याचा पाय लागला. पण त्याबाबत जराही अपराधित्व त्याला वाटले नाही. ऋषींनी त्याला शाप दिला व तो उंदीर झाला. उंदराच्या नैसर्गिक गुणांनुसार त्याने पराशर ऋषींच्या आश्रमात नासधूस करून धुमाकूळ घातला. ऋषींनी गणेशाला, त्याला आवरायची विनंती केली. गणेशाने त्याला बोलावले. (एवढ्याश्या प्राण्याने आश्रमवासीयांना दे माय धरणी ठाय केले आहे असे पाहून बहुधा आश्चर्य वाटले असेल.) व म्हणाला, "वर माग". आपल्या विध्वंसक शक्तीचा विजय झालाय ह्या कल्पनेने उंदराला जरा गर्व झाला असेल. तो म्हणतो, "मी का वर मागू? तूच माग." गणपतीने वर मागितला,"तू माझे वाहन हो." वाहनावर नियंत्रण ठेवता येते. म्हणूनच गणेशाचे कौतूक वाटून एकनाथी भागवतांत नाथ म्हणतात,"सुक्ष्माहूनी सूक्ष्म सान। त्या मानी तुझे अधिष्ठान ॥
अथर्वशीर्षात मात्र मूषकवाहन न म्हणता मूषकध्वज म्हणले आहे. असे का ? यासाठी थोडे खगोलशास्त्राकडे वळू या!
दक्षिणेकडे एक हलणारा तारकासमूह आहे. त्या नक्षत्राचे नाव ’एकदंत गजमुख’ आहे. यालाच ग्रीक भाषेत मोनोसेरॉस असे म्हणतात. गजमुखाखाली एक तारकापुंज आहे. त्याचा आकार मूषकासारखा आहे. बदलत्या आकारामुळे या मूषक आकाराभोवती इतर ताऱ्यांची ध्वजासारखी आकृती तयार झाली असेल व म्हणूनच मूषकध्वज उल्लेख असेल. यात २१ प्रखर तारे आहेत म्हणुन २१ ह्या संख्येला गणेशपूजेत महत्व प्राप्त झाले आहे. २१ दुर्वा, २१ मोदक, २१ आवर्तने वगैरे. यातलाच एक तारकापुंज NGC 2264 हा परस्परांस जोडला तर जुडीचा आकार दिसतो.
मूषकध्वज, गनिमी काव्याचा प्रणेता गजानन आहे असे सुचवतो.

रक्तम् -
अस्थिर असा जो हुबलचा तेजोमेघ आहे त्यात M 50 या प्रकारचे लाल तारे आहेत. जणू काही त्यांचा हार गजमुखाभोवती घातलेला आहे असे वाटावे असा त्यांचा आकार आहे. लाल रंगाची किरणे दृष्टी आकर्षून घेतात. (सिग्नलचा दिवा सर्व जगात लालच असतो.) म्हणून गजाननाला लाल रंग आवडतो असे मानतात. लाल रंगाची फुले वाहतात. पुढे रक्तवाससं चा उल्लेख आहे. लाल वस्त्र धारण करणारा असा तो आहे.
नेता, मुख्यत: सेनापती सर्वांना दिसत असला तर कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळते म्हणुन लाल रंगाची योजना असेल. मंगळ हाही लाल आहे व निरभ्र आकाशात तो लक्ष वेधून घेतो. स्वामी स्वरूपानंदांनी अनेकवेळा उल्लेख केला आहे,"जो मंगल करत नाही (मंगळ पत्रिकेत असला तर लग्न जुळत नाही ) त्याला आपण नाव दिले आहे’मंगळ "! गजाननाची लाल वस्त्रे शत्रूला धोकादायकच वाटत असतील.