ऋण संकल्पना
ऋण हा शब्द कानावर पडताच चार्वाकाची ‘ऋणं कृत्वा घृतं पिबेत ‘ अन पाठोपाठच ‘ ऋण काढून सण साजरा करू नये ‘ हा समाजव्यवस्थेसाठी केलेला नियम आठवतो . भोगवादी प्रवृत्ती व संयमाची आवश्यकता परस्परांसमोर उभ्या ठाकतात . घरातील ज्येष्ठ मंडळी सांगत असतात,” कोर्टाच्या पायरीप्रमाणेच सावकाराची पायरीही कधी चढू नये “
आज मात्र जमाना बदललेला आहे . गाडीसाठी ,घरासाठी कर्ज काढणे हे सर्वमान्य झाले आहे ,नव्हे .. काही अंशी कौतुकाचेही झाले आहे .
योगायोग असा की ऋण संकल्पना मांडणे ही मात्र खरोखरच गौरवाची गोष्ट आहे . ऋण काढणे वेगळे व ऋण असणे वेगळे . ऋण मानणे व ऋणाची फेड करण्यासाठी तत्पर असणे ह्या गोष्टी मानवाच्या मानवतेचाच प्रत्यय देतात . इतर सजीवांपेक्षा ईश्वराने मानवाला एक वेगळी व महत्वाची गोष्ट बहाल केली आहे . ती म्हणजे बुद्धी ! ( अगदी सहज लिहिल्या गेलेल्या ह्या वाक्यातही ईश्वराचे मानवजातीवर असलेले ऋणच व्यक्त होत आहे .)
ही चराचर सृष्टी ‘एकोsहं बहुस्याम ‘ या प्रेरणेमुळे निर्माण झाली असे म्हटले जाते . एकातून अनेकत्व निर्माण व अनेकातून एकत्वाचा अनुभव प्राप्त होण्यासाठी परस्पर सहकार्याची आवश्यकता असते हे आपल्या लक्षात येते . काहीतरी चांगले निर्माण करण्यासाठी , परस्परांची आवश्यकता जाणून ‘जिथे कमी तिथे आम्ही’ या भावनेने एकमेकांची मदत करत सर्वांनी सर्वांचा विकास घडवून आणणे ह्या ‘स्वाभाविक ‘ प्रवृत्तीमुळेच ह्या सृष्टीचा व्यापार युगानुयुगे व्यवस्थितपणे चाललेला आहे . ‘स्वाभाविक’ ( प्रवृत्ती ) हा शब्द हेतुपूर्वकच वापरला आहे कारण सहकार्य भाव हा सर्वच जीवसृष्टीत,निसर्गात,स्वभावदत्तच आहे असे स्पष्टपणे अनुभवास येते. ‘एकमेकां साह्य करू । अवघे धरू सुपंथ रे “ ह्या वृत्तीने सृष्टीतील जीवन अखंड चालू आहे व अधिकाधिक समृध्द होत आहे .
शेळ्यांच्या कळपात वाढलेला सिंहाचा बछडा बें बें करतो व दुसऱ्या सिंहाची गर्जना ऐकल्यावर पळत सुटतो . लहानपणीच लांडग्याने पळवलेले मानवाचे अर्भक हातांचा उपयोग पायांसारखाच करते ह्या गोष्टीवरून समाजाकडून आपोआप घडणाऱ्या संस्कारांचे महत्व लक्षात येते . अनुकरण ही सजीवांची नैसर्गिक प्रवृत्ती आहे म्हणूनच आपण जे काही चांगले आहोत त्यात ज्यांचा ज्यांचा हातभार लागलेला असतो , त्यांचे आपल्यावर ऋणच असते हे लक्षात ठेवायला हवे. जननी ,जल , जमीन ,जंगल ,जनावरे ,शिक्षक,पालक,वैद्य ,शिंपी ,लोहार, कासार ,सोनार,कुंभार,न्हावी ,सुतार,शेतकरी,चांभार,सेना,ग्रंथ,इतिहास,संस्कृती असेच कितीतरी सजीव व निर्जीव ह्यांच्या सहकार्याने आपले जीवन सुसह्य होत असते हे लक्षात घ्यायला हवे व लक्ष्मीची ,झाडाची पूजा असेल वा अन्न शिजवणाऱ्या चूल ,शेगडीला नमस्कार असेल.
फ्रेंच राज्यक्रांतीने स्वातंत्र्य ,समता,बंधुता ह्या त्रयींचा उद्घोष केला तर ‘अवघे विश्वचि माझे घर ‘व ‘सर्वे अपि सुखिन: सन्तु ‘हा उदार भाव भारतीयांनी प्रसारित केला . सागरावर निर्भय संचार इंग्लंडने रूढ केला . असह्य छळामुळे विविध देशांतून आलेले व अमेरिकेत स्थायी झालेले लोक एक राष्ट्रीयत्वाच्या भावनेने काम करू लागले व संपन्न झाले . वैज्ञानिक प्रगतीत अग्रेसर झाले . हिरोशिमा नागासाकीच्या प्रचंड नरसंहारा नंतर थोड्याच वर्षात जपान जिद्दीने उभे राहिले . इटलीच्या जोसेफ माझीनीच्या चरित्राने भारतीयांना पारतंत्र्याविरुध्द लढण्यास ठाम उभे केले . अशा अनेकानेक परस्पर प्रभावी घटनांतून मानवी जीवनाला आकार प्राप्त होत आहे . या गोष्टीची जाण ठेवायला हवी . आज वैज्ञानिक शोधांमुळे जग जवळ आले आहे व म्हणूनच विश्वातील सर्वच राष्ट्रांच्या भल्या बुऱ्या गोष्टींचा प्रभाव परस्परांवर पडत आहे . चांगले ते स्वीकारण्याच्या भारतीयांच्या पध्दतीमुळे अन्य राष्ट्रांचेही ऋण आपल्याला मानायला लागेल .
हे लक्षात घेणे व त्याची जाण ठेवणे म्हणजेच त्या त्या गोष्टीचे आपल्यावर असणारे ऋण मानणे होय . भारतीय संस्कृतीने पाच ऋणे प्रधान मानली आहेत . मातृ ऋण ,पितृ ऋण ,गुरु ऋण ,समाज ऋण व देव ऋण !
आमचा दिवस उगवतो ,’कराग्रे वसते लक्ष्मी ‘ह्या श्लोकाने !संपूर्ण दिनचर्येत अशा अनेक ऋणांची जाण आपल्याला आहे हे लक्षात येते .
गुरुपोर्णिमा ,नागपंचमी ,पोळा ,रथसप्तमी ,गायत्री मंत्र पठण ,वसंत पूजा ,वट पूजा ,पितृ पक्ष,नवरात्र ,दीपपूजा अशा सणांतूनही ऋण व्यक्त केले जाते हे लक्षात येते . साजऱ्या केल्या जाणाऱ्या जयंती व पुण्यतिथी ह्या मधून त्या त्या विशिष्ट व्यक्तीने केलेल्या कार्याचे ऋण प्रगट होत असते .
ऋण जाणणे ,मानणे व व्यक्त करणे एवढ्याने आपले कर्तव्य पुरे होत नाही तर त्यातून मुक्त कसे व्हायचे हे पहावे लागेल .” मला छान आंबे खायला मिळाले . “Thank you baba,ajoba” एवढ्याने काम भागणार नाही . त्या वृक्षाची निगा तर राखावी लागेलच पण पुढच्या पिढ्यांसाठी नवी झाडेही लावायला हवीत . आयुष्यात आपल्याला जे जे चांगले मिळाले ते ते पुढच्या पिढीत संक्रमित करायला हवे . मग ते ज्ञान असेल,विज्ञान असेल,धन असेल,शारीरिक सामर्थ्य असेल ,मानसिक आरोग्य असेल वा ऐतिहासिक श्रेष्ठत्व असेल .
ऋण संकल्पना व कृतज्ञता भाव यात काही फरक आहे का असा विचार चमकून जातो . मला वाटते असलाच फरक तर तो एका तसूएवढाच असेल . कृतज्ञता उच्चारताच आठवतात उपकार . मन लहानपणी ऐकलेली एक कविता गुणगुणू लागते . “थोर तुझे उपकार आई “ लहानपणी त्या कवितेतल्या भावांशी मन एकरूप झाले होते हे ही आठवते . “आई “ झाल्यानंतर मात्र असे जाणवले की ह्या शब्दांत कुठेतरी एक शतांश कण का होईना दुरावा आहे . माझ्या लहानपणी ‘आई ‘ हे संपूर्ण समर्पण होते . नंतरच्या काळात त्या ‘आईत्वात’ कुठेतरी ‘व्यक्तित्व ‘डोकावू लागले होते . आता त्या व्यक्तित्वाने हात पाय पसरले आहेत व ‘आईत्व ‘ ही कायम आहे . कळत नकळत का होईना त्याची फरफट चालू आहे .
पूर्णवाद प्रणेते डॉ . पारनेरकर ह्यांनी ‘उपकाराची परतफेड ‘ ह्या विषयावर विचार व्यक्त करताना म्हटले आहे ,”दुसऱ्याने जे केले त्याची तशीच परतफेड करायची तर कृतघ्नपणा पदरी येईल . ज्याने ‘वार’ लावून स्वतः चे शिक्षण केले त्याला तशीच परतफेड करण्यासाठी , त्याला जेवू घालणाऱ्यावर वार लावायची वेळ यावी अशी इच्छा बाळगावी लागेल “ म्हणून परतफेड तशीच करायला हवी असे नव्हे तर कृतज्ञता बुद्धी असावी व ती मनापासून असावी . त्यांनी पुढे म्हटले आहे ,” आपल्यासारखेच अनेकांवर त्यांचे उपकार होत राहोत अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करावी .
संक्रांतीच्या वाणात ‘वाढता वसा’ हा एक प्रकार आहे . आपल्याला जे वाण मिळाले त्याच्या सव्वा पट दुसरीला द्यायचे . येथे ऋण संकल्पनेत दान संकल्पनेचाही समावेश झालेला आहे .
‘आभार प्रदर्शनाची’ पध्दत मूलत: आपली नाही . ऋणाची जाणीव आहे हे नमस्काराने दर्शित केले जायचे . आजकाल समारंभानंतरच्या आभारप्रदर्शनात ‘ त्यांच्या आम्ही सदैव ऋणातच राहू ‘असे म्हणायची ‘पध्दत ‘पडली आहे . त्या वेळी म्हणावेसे वाटते ,” ऋण जाणा पण त्यातच न रहाता ‘ जे जे चांगले आहे त्यात भर घालून पुढच्या पिढीला द्या ‘ तरच खरे ‘ ऋणमोचन ‘ होईल .
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका प्रचारकाने ‘ ऋणमोचन’ नावाची पुस्तिका लिहिली आहे . संघ प्रचारक म्हणजे स्वतः चे सारे जीवन समाजासाठी खर्च करणारी व्यक्ती ! अनेक संकटे ,अडचणी ,समस्या यातून मार्ग काढत त्या सर्वांवर मात करत विकास व प्रगती यांचे कडेच अग्रेसर होत राहणे हेच त्यांचे जीवन !! स्वतः च्या त्यागाचा ‘उदो उदो ‘ तर नाहीच पण नुसता उल्लेखही न करता त्या जीवनात ज्यांचे ज्यांचे सहकार्य मोठ्या प्रमाणावर लाभले ते समाजासमोर मांडणे हे आपले कर्तव्य आहे ह्या भावनेतून पुस्तिका साकारली आहे . आपल्या ऋण संकल्पनेची सार्थ अशी ही एक छोटीशी झलकच आहे .
विशेषता: आजच्या ‘ वापरा व फेकून द्या ‘ च्या जमान्यात ऋण संकल्पना अधिक दृढ करायला हवी हे नक्कीच !
