चमक विभाग
मानवी जीवनाला आवश्यक ते सर्व तुझ्या कृपेने प्राप्त होवो असेच सर्व ऋचातून म्हटलेले आहे. याचेही ११ अनुवाक आहेत ( ११ या संख्येचा संबंध ११ रुद्रांशी असावा असे वाटते ). रुद्रीपाठ ( डॉ अनिल मोदी ) या पुस्तकात ११ रुद्रांची नावे दिली आहेत. ती आहेत शंभू, पिनाकी, गिरीश, स्थाणु, भर्ग, सदाशिव, शिव, हर, शर्व, कपाली, भव. या सर्वांची प्रामुख्याने पूजा कोठे केली जाते हे सांगितले आप्रत्येक अनुवाकात लहान मोठी अशी एकच ऋचा आहे व तिच्या शेवटी 'स्वाहा' म्हणून आहुती द्यावयाची आहे धन, धान्य, संपत्ती, दीर्घायुष्य, संतती, बल, जल, सुख, संरक्षण, नोकरचाकर, सौंदर्य, नांगर वगैरे शेतीची अवजारे, वृक्षवल्ली याबरोबरच श्रवणशक्ती, वशीकरण शक्ती, विवेचक बुद्धी, श्रेष्ठता या गोष्टी मागितल्या आहेत. पूज्यत्व, महत्व प्राप्त व्हावे, चित्त -वाणी -मन चांगले असावे असे म्हटले आहे. थोडेसे वेगळे व उल्लेखनीय म्हणजे खेळ व खेळांचे साहित्य, निष्कंटक मार्ग, सुखकर प्रवास व विश्रांती अपेक्षिले आहे. सुखाचा क्षय होऊ नये व रोगांचा अभाव असावा ही मागणी आहे. विविध प्रकारच्या धान्यांचा(११) उल्लेख चौथ्या अनुवाकात आहे. पाचव्या अनुवाकात खनिजातील काळे लोखंड व ताम्र धातू यांचा निर्देश आहे व यज्ञेन कल्पताम - सर्व गोष्टी यज्ञाद्वारे मिळोत असे म्हटले आहे.
अनुवाक ८ मध्ये यज्ञाच्या सर्व साहित्याचे वर्णन आहे. यज्ञ मंडपातील कोनातले खळगे, हवन सामग्रीचा ओटा, सोमवल्ली व ती कुटण्याची साधने, सोमरस साठवण्याची भांडी, सातू व तांदळाच्या पीठाचे घारगे, यज्ञ समाप्तीनंतरचे अवभृथस्नान व यज्ञाची सूक्ते यांचे वर्णन आहे. अनुवाक १० मध्ये खोंड व कालवडी विशेषतः अमुक वयाच्या असा उल्लेख आढळतो. अनुवाक ११ गणित विषयातील प्रगती व अणु संकल्पना यांच्या वर्णनाने नटला आहे. १ ते ३३ पर्यंतच्या विषम संख्यांच्या अणुसमुच्चयाने निर्माण वस्तू व ४ च्या पाढ्याने ४८ पर्यंतच्या अणुसमुच्चयाने निर्माण वस्तू प्राप्त होवोत अशी अपेक्षा वर्तवली आहे. एकच गोष्ट जाणवते कि राज्य व राष्ट्र संकल्पना यांचा कुठेच उल्लेख नाही. कदाचित त्या काळात त्या नसतीलही.
शांतीपाठ
रुद्राचा पाठ करताना प्रारंभी व शेवटी शांतीपाठ म्हटला जातो. या शांतीपाठात मनूचा उल्लेख यज्ञाला प्रवृत्त करणारा असा आहे ( नमक विभागात ' सृष्टीनिर्माता' असा आहे ).
पृथ्वी ही देवांना आवाहन करणारी असे वर्णन आहे ( इडा देवद्रुः ) बव्हंशी जलव्याप्त असणाऱ्या या पृथ्वीवर भूपृष्ठा खालील हालचालींनी बरेच बदल घडवून आणले. काही भाग वर उचलला गेला तर काही खचला गेला. उत्तर भारतात असणारे मोठे सरोवर, जमिनीचा पृष्ठभाग वर उचलला गेल्याने आटले मग गंगावतरणाचा प्रयत्न झाला.
तसेच आफ्रिका व आशिया हे खंड जमीन खचल्याने वेगळे झाले हे आपण जाणतोच. हिमालयाची उंचीही वाढली. हिमालयाच्या दक्षिणेकडचा भाग हा मानवलोक मानला जाऊ लागला. हिमालय व त्याच्या उत्तरेकडचा भाग देवलोक मानला जाऊ लागला. मानव व देव यांनी परस्परांना अनेक वेळा सहाय्य केलेले आहे.
मनु - मानवलोकाचा निर्माता - यज्ञाला प्रवृत्त करणारा - अशा उल्लेखाने यज्ञ संस्कृतीकाळ दर्शवला आहे. त्याग, पर्यावरणशुद्धता, श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची संधी, राज्य विस्ताराचा उपक्रम अशा अनेक गोष्टींशी यज्ञ संकल्पना जोडली गेली आहे व ती मानवी जीवनाच्या प्रगतीतला एक महत्वाचा टप्पा आहे.
नंतरचा महत्वाचा उल्लेख बृहस्पतीचा! देवांचा गुरु! येथे स्तुत्य अशा गोष्टींचा पुरस्कर्ता असे वर्णन आहे. विश्वेदेवांचा उल्लेख प्रारंभापासूनच असलेल्या भारतीयांच्या विशाल दृष्टीचा प्रत्यय देतो. 'मी'चे वर्तुळ- व्यक्ती, कुटुंब, ग्राम, तालुका असे विस्तारत राज्य राष्ट्र या संकल्पना ओलांडून विश्व कल्पनेत विस्तार पावलेले आहे. भारतीयांची हि विशेषता आहे. असा हा विश्वेदेव सु+उक्त+वाचः = सर्वांचे कल्याण होवो असे म्हणत आहे.
मी सद्विचारी आहे, शुभनिर्माता आहे, शुभ वक्ता आहे व सतत शुभच बोलीन. देव व मनुष्य उभयतांसाठी माझी वाणी शुभच असेल असे म्हणून आम्हा सर्व मानवांचे रक्षण देव करोत अशी इच्छा प्रगट केली आहे. मग पितरांना आनंद होईल व त्यांच्या आशीर्वादाने माझी सर्व कार्ये स्तुत्य व शोभायमान होतील असा विश्वास व्यक्त केला आहे. ओम शांतिः शांतिः शांतिः या त्रिवार उच्चाराने पृथ्वी अंतरीक्ष व स्वर्ग सर्वत्र शांती नान्दो अशी शुभकामना दर्शवली आहे.
लघुन्यास
न्यास म्हणजे ठेवणे. शरीराच्या एकेक अवयवावर एकेका विशिष्ठ देवतेची स्थापना करावी अशी रचना आहे. शेवटी माझे म्हणजे रुद्र म्हणणाराचे व रुद्र्याग करणाऱ्या यजमानाचे रक्षण करावे अशी विनंती आहे.
प्रजनन :- एखादी निर्मिती, एखादे कार्य जर वर्षानुवर्षे सातत्याने चालावयास हवे असेल तर ते कार्य स्वीकारून तत्परतेने करणारी पुढची पिढी शारीरिक, मानसिक, बौद्धिक दृष्ट्या तयार करून सक्षम करावी लागते म्हणूनच जणू काही 'प्रजनन ' प्रथम उल्लेखिले गेले असेल व सृष्टी निर्मात्या ब्रम्हदेवाची स्थापना तेथे केली गेली.
पाय :- पायांचे ठिकाणी विष्णूची स्थापना केली गेली. विष्णू हा सृष्टीचा प्रतिपालक आहे.
हात :- हातांसाठी ' हरा ' ची योजना केली गेली आहे. 'हर' चा अर्थ धरणारा, व्यापणारा आहे. हातांचे कार्य 'धरणे आहे. हर चा आणखी एक अर्थ नाश करणारा असाही आहे. हर या देवतेकडे सृष्टीच्या अंताचे कार्य सोपवलेले आहे.
बाहू:- इंद्राची स्थापना बाहुंमध्ये केली आहे कारण बाहू म्हणजे पराक्रम, कार्य करण्याची क्षमता, वार पेलण्याचे सामर्थ्य तर इंद्र हा देवांचा सेनापती!
जठर :- ग्रहण केलेल्या अन्नाचे पचन करून पाचक रस निर्माण करणे हे त्याचे कार्य. सर्व अवयवांच्या धारणासाठी, त्यांना शक्ती मिळावी म्हणून पाचक रसाचा उपयोग होतो व या कार्यात जठराग्नी मदत करत असतो. स्वाभाविकच जठर हे अग्नीच्या हवाली सोपवलेले आहे.
हृदय :- हृदयाचे काम रक्त शुद्ध करून सर्व अवयवांना पोचवणे. जठरापेक्षाही हे काम अधिक महत्वाचे आहे. सर्व अवयवांना क्षेम करणाऱ्या हृदयाचे ठिकाणी शिव भावना असणे आवश्यकच आहे यासाठी हृदयाचे ठिकाणी 'शिव' याची स्थापना केलेली आहे. शिव हे हर याचेच दुसरे रूप आहे.
कंठ:- वसवः यांचे हे स्थान. 'तिष्ठन्तु ' रुपावरूनच वसवः अनेक आहेत हे लक्षात येते. वसू चे ते अनेकवचन आहे. वसु हे अष्टवसू म्हणूनच ओळखलेले जातात. वसवः चा आणखी एक अर्थ जाणे येणे असा आहे. नाकाने घेतलेला श्वास फुफ्फुसांपर्यंत पोचवण्याच्या कामातील कंठ हा एक घटक आहे.
वक्त्र:- वक्त्र म्हणजे मुख, चेहरा. लक्ष्मीचे तेज सर्वांगावर दिसते तर सरस्वतीचे तेज प्रामुख्याने मुखावर ओसंडलेले असते. अष्टावक्र ची कथा आपण जाणतोच. आठ ठिकाणी वाकडा असल्याने
सहजच कुचेष्टेचा विषय पण त्याच्या मुखावरील तेज पाहताच कुचेष्टेचे शब्द आपोआपच गिळले जायचे. सरस्वतीची स्थापना मुखावर झाली आहे.
नासिकयो: = अनेकवचन आहे म्हणजेच अर्थ दोन्ही नाकपुड्या. त्यांचे काम श्वास घेणे व सोडणे. म्हणून तेथे वायूची योजना आहे.
नयनयो: = दोन नयन. - प्रत्येकासाठी स्वतंत्र देव! तेजस्वी डोळे सहजपणे समोरच्याला आकर्षून घेतात फक्त सूर्याची प्रखरता असेल तर कोणी जवळ येणार नाही व फक्त चंद्राची शीतलता असेल तर कोणीही सहज वार करेल. प्रखरताही हवी अन सौम्यताही हवी. यासाठी सूर्य चंद्रांची योजना डोळ्यासाठी केलेली आहे.
कान: अश्विनिकुमाराना येथे स्थानापन्न करावयाचे आहे. अश्विनीकुमार हे दोघे आहेत व कान दोन आहेत या एकाच कारणाने योजना झालेली नाही. अश्विनीकुमार हे देवांचे वैद्य आहेत. शरीर प्रकृती निट राहण्यासाठी आवश्यक ती काळजी घेणारे व आवश्यकते नुसार उपायांची योजना करणारे वैद्य! कानांनी ग्रहण केलेल्या चांगल्या वाईटाचा परिणाम मनावर किती व कसा होऊ द्यायचा हे ठरवण्यासाठी या वैद्यांना येथे नेमले आहे.
ललाट : येथे भाग्य लिहिलेले असते असे मानले जाते. हे स्थान रुद्रांना प्रदान केले गेले आहे. अनेक रुद्र म्हणजे बहुधा ११ रुद्र असावेत. याचाच अर्थ परस्परांना मदत करणारांचा समूह! व्यक्ती व्यक्ती मिळून समूह बनतो व समूहामुळे समाजामुळे व्यक्तीला ओळख व महत्व प्राप्त होते.
मुर्ध्नि :-मुर्ध्नि म्हणजे मस्तक. टाळू असलेला भाग होय. टाळूवरती ९ इंद्रियांचे ऐक्य होण्याचे काकिमुख हे स्थान आहे. कुंडलिनी जागी झाल्यावर सर्व शरीरावर आपला ठसा उमटवते. ती जेव्हा मारूत नाव प्राप्त करते तेव्हा या स्थानाचा भेद करून मुर्धन्याकाश रुपी पहाडावर जाते( ज्ञानेश्वरी अध्याय ६ ) येथे आदित्यांचे वास्तव्य असावे असे म्हटले आहे. शब्द अनेकवचनी आहे. आदितीचे पुत्र ते आदित्य होत. शरीरातील अत्यंत महत्वाच्या नाडीचे केंद्रस्थान हे अनेक चांगले गुण असणाऱ्या देवांच्या अधिपत्त्याखाली असावे म्हणजे व्यक्ती सत्प्रवृत्त राहील अशी कल्पना आहे.
शेंडीचा भाग - मस्तकाचा मागील भाग : हा चामुंडा देवीच्या स्वाधीन केला आहे. शेंडीच्या भागात पिनिअल ग्रंथी असते. ही ग्रंथी मन व आत्मा यांची जाणीव करून देते. या ग्रंथीतील स्राव शरीरातील नसांची व्यवस्थित वाढ घडवून आणतो, त्यांना संजीवनी देतो, कामेंद्रीयांची योग्य वाढ करतो. या स्रावामुळे उर्जा प्राप्त होत असते. उष्णता व थंडी यांचेपासून या ग्रंथीचे रक्षण करावे म्हणून हा भाग केसांनी आच्छादित ठेवला जात असावा. हा भाग ज्या चामुंडा देवीच्या स्वाधीन आहे ती शक्तिस्वरूपा आहे. अष्टभुजा सरस्वतीबरोबर तिच्या ९ शक्तींचीही पूजा करतात. ब्राम्ही, म|हेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, नारसिंही, ऐन्द्री व चामुंडा या त्या शक्ती आहेत.
शीर:- खरे तर 'शिरसि महादेवः तिष्ठतु' हे आधी आले आहे ते 'शिखायाम' च्या नंतर यायला हवे असे वाटते कारण वक्त्रेपासून शिखायाम पर्यंत वर्णन आहे ते शिराचे! मान व वरचा भाग मिळून शीर बनते तेथे महादेवाला अधिष्ठान असावे अशी इच्छा प्रगट केली आहे. आतापर्यंत हर, शिव, रुद्र वगैरे उल्लेख आले आहेत व पुढेही पिनाकि. शूली, शिव, शंकर ही नावे आली आहेत या सर्वांचा अर्थ शंकर आहे मग वेगवेगळी नावे का असा प्रश्न मनापुढे उभा रहातो. विचार केल्यावर त्या त्या नावाचा विशेष अर्थ ध्यानी येतो. महादेव म्हणजे देवश्रेष्ठ. सर्व शरीरावर नियंत्रण ठेवणारे दोन्ही मेंदू ज्या एका टणक पेटीत सुरक्षित ठेवलेले आहेत ती पेटी म्हणजे ललाट ते शिखा हा भाग होय. डोळे, कान, नाक, कंठ हे त्या पेटीचे मदतनीस
होत. असा हा महत्वाचा भाग देवश्रेष्ठ महादेवांकडे सुपूर्द केलेला आहे. जणू समसमा संयोगच.
पृष्ठ म्हणजे पाठ व पाठ म्हटले कि पाठीचा कणा आठवतोच. तो ताठ असणे आवश्यक व अपेक्षितअसते. पण पाठीला डोळे नसतात म्हणजेच डोळ्यांना पाठ दिसत नाही त्यामुळे तिकडून होणारा आघात अडवणे कठीण असते. म्हणूनच पिनाक नावाचे धनुष्य धारण करणाराला तिथे स्थान दिले आहे. शस्त्रांचे वेगवेगळे प्रकार आहेत. धनुष्यबाण हे दुरून आघात करण्याचे साधन आहे म्हणजेच लांबवरचे दृश्य टिपून वेध करायचा आहे. पाठीशी पिनाकी असेल तर पाठीचे रक्षण शक्य आहे. पुरतः = पुढचा भाग 'शूली'ला सोपवला गेला आहे. शूल हे शस्त्रही लांबून वेध घेते. पुढचे डोळ्यांना दिसत असतेच म्हणून शूल हातात घेऊन मारणे सोयीचे आहे.
पार्श्वभाग:- पाठीचा विचार झाला आता संपूर्ण पार्श्वभाग! ते स्थान शिव व शंकर या जोडीला दिले गेले आहे. शिव म्हणजे कल्याणकारी भाव असलेला तर शंकर म्हणजे प्रत्यक्ष कल्याण करणारा.
संपूर्ण देह :- अन्न व पाण्यावाचून शरीर काही दिवस तग धरू शकते पण हवेशिवाय २-४ मिनिटेही राहणे कठीण असते. म्हणून सर्व अवयवाचे ठिकाणी एकेका देवाला स्थापित केले आहे तर संपूर्ण देह वायूच्या हवाली केला आहे. तरीही संपूर्ण बाह्य भाग अग्नीच्या ज्वालेच्या माळेने वेढलेला असावा असे म्हटले आहे. म्हणजेच संपूर्ण संरक्षण असावे अशी अपेक्षा केली आहे.
अशा प्रकारे सर्वांगावर अनेक देवतांची स्थापना केली गेली. त्यांनी यथायोग्य स्थानी राहावे अशी अपेक्षा व्यक्त करून स्वतःचे व यजमानाचे रक्षण व्हावे अशी इच्छा प्रदर्शित केली आहे.
देहाचा दृश्य स्वरूपाचा विचार झाला. आहेत पण दिसत नाहीत, दाखवता येत नाहीत अशाही काही गोष्टी देहाशी संलग्न असतात त्यांचा विचार पुढे केला आहे. यात आणखी एक वैशिष्ट्य आहे. 'ती गोष्ट' हृदयात, हृदय माझ्यात, मी अमृतत्वात व अमृत ब्रम्हात असो असे प्रत्येकाच्या बाबत म्हटले आहे. शरीराच्या विविध अवयवांवर ज्यांचे वास्तव्य असावे असे म्हटले आहे त्यांच्यातील काही देवांना आणखी एक काम सोपवले गेले आहे.
१] श्रितः म्हणजे बाळगणारा, धनी. माझ्या वाणीचा धनी अग्नी आहे म्हणजेच अग्नीने माझी वाणी सांभाळावी. अग्नी म्हणजे तेज, प्रकाश व उष्णता. वाणीत तेज असावे, तिने इतरांना ज्ञानाचा प्रकाश द्यावा व दिलासाही द्यावा. वाणी हि अमूर्त आहे पण तिचा उच्चार अनुभवाला येतो. ( आधी अग्नीला जठराचे स्थान दिलेले आहे)
२] माझ्या प्राणाचा धनी वायू आहे. वायू व प्राण, श्वासोच्छ्वास व जीव यांचा अगदी निकटचा संबंध आहे हे आपण अनुभवतोच. एखादी व्यक्ती जिवंत आहे का मृत झाली आहे याची परीक्षा नाडीवरून केली जाते तशीच नाकाजवळ सूत धरूनही केली जाते. ( नाक हे स्थान वायूसाठी योजलेले आहे.)
३] चक्षु : याचा अर्थ डोळा आहे तसाच दुसरा अर्थ दृष्टी असा आहे. माझी दृष्टी सूर्याने सांभाळावी. दृष्टी प्रखर व तेजस्वी असावी. अशा दृष्टीचे स्वसंरक्षणासाठी महत्व आहे. दृष्टीद्वारे समोरच्या व्यक्तीचे मन ओळखता येते. हे काम तेजस्वी दृष्टी करतेच पण आवश्यक तेव्हा जरब, आदर, आत्मविश्वास, ज्ञान यांचेही दर्शन घडवते. ( आधी डोळे सूर्य व चंद्र यांचेकडे सोपवले आहेत.)
४] मन: चंद्रमा म्हणजे शीतलता! वास्तविक चंद्र सूर्यप्रकाशाने प्रकाशित होणारा आहे तरीही सूर्यप्रकाश धारण करताना त्याला सौम्य बनवण्याचे सामर्थ्य त्याच्यात आहे. औषधी वनस्पतींच्या वाढीसाठी चंद्रप्रकाश हा अधिक उपयुक्त ठरतो. अशा चंद्राने माझ्या मनाचे धनी व्हावे. अथांग सागराला भरती येते तीही चन्द्रप्रकाशानेच! माझे मन सौम्य असावे पण अनेकांच्या मनातील चांगुलपणा उचंबळायचे सामर्थ्य त्यात असावे.
५] माझ्या कानांना दिशांनी सांभाळावे. हे वाचत असताना आकाशवाणीची कार्यपद्धती आठवली. सगळीकडच्या विविध आवाजांचे ग्रहण करण्यासाठी सर्व दिशांकडे वळू शकणाऱ्या तबकड्यात ते आवाज ग्रहण केले जातात व मग त्यावर आवश्यक ती प्रक्रिया करून प्रसारित केले जातात. बुद्धिदेवता गणेशाचे कानही हत्तीच्या कानासारखे मोट्ठे व हलणारे असतात. मोठ्या प्रमाणात आवाजाचे ग्रहण करून ते मनात (पोटात) साठवून योग्य व उपयुक्त तेवढेच मुखावाटे (सोंडेच्या शेवटच्या छोट्याशा छीद्रावाटे ) उच्चारले जाते. मानवाचे कान हलत नसले तरी एकाच वेळी विविध दिशांचे आवाज ग्रहण करण्यास समर्थ असतातच. ( आधी कर्ण अश्विनीकुमारांकडे )
६) रेत म्हणजे शुक्र किंवा वीर्य. याची मालकी 'आप'कडे म्हणजे पाण्याकडे सोपवली आहे. निर्माणशक्ती ज्यात आहे ते रेत पाण्यासारखे प्रवाही असणे त्याच्या कार्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. पृथ्वीवरील वनस्पति जगताची निर्मिती पाण्यामुळेच होते. रेत चा दुसरा एक अर्थ पारा असा आहे. पाऱ्याची चंचलता, त्याच्या बिंदूंची एकत्र होण्याची प्रवृत्ती याचेही साम्य आढळते.
७) शरीराचे मालकत्व पृथ्वीकडे सोपवले आहे. पृथ्वीचे जडत्व, स्थिरत्व येथे अपेक्षित नाही तर तिची धारणाशक्ती, सहनशक्ती, नम्रता व क्षमाशीलता अपेक्षित आहे. जास्तीत जास्त कष्ट सहन करण्याचा काटकपणा शरीरात असावा त्याचबरोबर लवचिकताही असावी.
८) लोम म्हणजे शरीरावरील केस. रोम चाही हाच अर्थ आहे. सर्वसाधारणपणे जे सांधे सतत कपड्यांनी झाकलेले असतात, जेथे घाम जास्त येतो अशा ठिकाणी असे केस जास्त असतात. घामावर घाण साचून रोग होण्याची शक्यता जास्त असते म्हणून बहुधा त्यांची मालकी औषधी वनस्पतींकडे सोपवलेली असावी.
९) बळ, सामर्थ्य यांचा स्वामी इंद्र असावा असे म्हटले आहे. ( 'बाहवो' च्या विवेचनात याचे कारण आले आहे )
१०) मस्तकासाठी पर्जन्याला आवाहन केले आहे. टाळू हा भाग अत्यंत नाजूक असतो, तेथे उष्णताही जास्त असते व तो कवटी पेक्षा जरासा खोलगट असतो. लहान मुलांची टाळू भरणे हा अंगमर्दनाचा एक भाग असतो. मोठेपणीही तेथेच तेल चोळले कि झोप चांगली लागते असा अनेकांचा अनुभव आहे. स्नानाचे वेळी पहिली लोटी डोक्यावर ओतावी असा प्रघात आहे. तेथील उष्णता कमी व्हावी म्हणून पर्जन्याला स्वामित्व प्रदान केले असावे.
११) ईशान नावाचे रुद्र आहेत ( मन्यु चा अर्थ सापडला नाही )
१२) आत्म्याने आत्म्याचे धनी व्हावे - आत्मा 'हृदये' असल्याने आत्मनि हि त्याची सप्तमी असावी.
आत्मा पुन्हा पुन्हा पुढच्या युगीही असावा. एकदा निर्माण झालेले ( आगत त्यात पुन्हा पुन्हा प्राण यावा
( आकूत ) अशी इच्छा आहे. रश्मी ( दोरी, किरण) किरणात अग्नी ( वैश्वानर ) शिरून वृद्धी व्हावी, आत असलेल्या अमृताचे रक्षण व्हावे ( गोपाः म्हणजे रक्षक ) हि ऋचा म्हणताना मस्तक ते चरण असा सर्व शरीरावरून उजवा हात फिरवावा असे संगितले आहे.
- सुशील अभ्यंकर.