वेचलेल्या विचार कणिका - भाग ३
( लॉक डाऊन च्या काळात व्हाट्सअँपची माहिती करून घेऊन त्यावर रोज वाचनात आलेले विचार पाठवायला सुरुवात केली. त्याचे हे संकलन. )
भारतीय काल गणना
सौर कालगणना- पृथ्वी सूर्याभोवती फिरते, त्या प्रदक्षिणेला जवळपास ३६५'२६दिवस लागतात. याला सौरवर्ष मानतात.
चंद्र पृथ्वीभोवती फिरतो त्या एका प्रदक्षिणेला, सौरवर्षापेक्षा साधारणपणे अकरा दिवस व दीड तास कमी लागतो.
हा फरक भरुन काढण्यासाठी साधारणपणे साडे बत्तीस महिन्यानी, एक अधिक मास मानला जातो. यंदा तसा अधिक मास या महिन्यानंतर आहे.
चंद्राची पौर्णिमा ज्या नक्षत्रात येते, त्या नक्षत्रावरून त्या महिन्याला नाव दिले गेले आहे.
एका वर्षात चंद्र चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, आषाढा,श्रवण, भाद्रपदा, अश्विनी, कृतिका, मृगशिरा, पुष्य, मघा व फाल्गुनी या नक्षत्रात फिरत असताना तो पूर्ण होतो. म्हणजेच त्या दिवशी पौर्णिमा येते म्हणून त्या त्या नक्षत्राचे नाव त्या त्या महिन्याला दिले गेले आहे. जसे चैत्र, वैशाख वगैरे.
-----------------------------------------------
खारीचा वाटा
१९५०. बांगलादेशातून अनेक शरणार्थी भारतात आले होते. त्यांच्या मदतीसाठी वास्तुहारा सहायता समिती स्थापन झाली होती. घरोघरी जाऊन निधी जमा केला होता. भिवंडी तालुक्यातील पाच्छापूर गावात कार्यकर्ते फिरत होते. निधी कमी जास्त मिळाला तरी प्रत्येक घरात जायचेच असे ठरले होते.
एका गावात ते गेले. मोडक्या बाजेवर अपुरे कपडे घालून एक म्हातारे ग्गृहस्थ बसले होते. स्थिती अत्यंत गरिबीची दिसत होती. कामाची माहिती सांगून कार्यकर्ते निघाले. त्यांना थांबवून त्या गृहस्थाने नातीला बोलावले. घरातले थोडेसे गहू घेऊन, वाण्याकडे जाऊन ते विकून पैसे आणण्यासाठी. तिला पाठवले व आलेले दोन आणे त्या कार्यकर्त्यांना दिले.
रामायणातील खारीचा असा अमिट संस्कार जनमानसावर आहे.
---------------------------------------------
मध्यंतरी आपण गुरू सेवेसाठी मी काय करेन? मी गुरूच्या पायातील खडावा होईन वगैरे वर्णन वाचले.
भावना तीच पण वेगळ्या प्रकारच्या सेवेची ईच्छा आज पाहणार आहोत.
माझे अंत:करण हा चौरंग ठेवून, त्यावर गुरूंची पावले स्थापन करेन.
ऐक्यभावाच्या ओंजळीत इंद्रियांची फुले भरून त्यांनी अर्घ्य देईन.
अनन्यतेच्या जलाने स्नान घालेन. एकनिष्ठ भावाचे गंध लावेन.
प्रेमरूपी सुवर्णाचे पायातील दागिने करून, त्यांच्या पायात घालेन.
अव्यभिचारी शुद्ध भक्तीची जोडवी करून घालेन.
आनंदाच्या सुगंधाने परिपूर्ण अशा सात्त्विक भाव रूपी कमलाने सद्गुरू चरण पूजेन.
अहंकाराचा धूप जाळेन. निरभिमान ज्योतीने ओवाळेन. समरसभावाने गुरूचरणांना आलिंगन देईन.
देह प्राण या पादुका गुरूचरणी घालीन. भोगमोक्षांनी निंबलोण उतरेन.
अशा सेवेचे भाग्य मला मिळाले तर माझी वाणी अधिक सामर्थ्यवान होईल व गुरू स्तवन अधिक चांगले करेन. इतके की जणू अमृताचा समुद्र निर्माण झाला असे वाटेल.
(अनंतराव आठवले ह्यांच्या अनुवाद ज्ञानेश्वरीतून)
--------------------------------------
दास बोध
आपले शक्ती नुसार भावे पूजावा परमेश्वर
आपण समुद् ऐसी साठवण सक्रिया करावी।
सन्मार्ग दाखवी जना। ज्ञान सिकवी अज्ञाना।
धर्म स्थापना करावी।नीती अवलंबावी।
क्षमा सांभाळावी।सत्कार्य करावे
सर्व ऐकावे।सार शोधून घ्यावे
बहुत पाठांतर करावे। ग्रंथांतर अंतरी धरावे।
झिजोन सत्कीर्तीस ऊरवावे।
ऊपाधी करावी पण ऊदासवृत्ती सोडू नये।
पराधीनपणे कनिष्ठ होऊ नये।
संशय छेदावा।
मरोन ऊरावे कीर्तीरूपे।
-----------------------------------------------------------------
ब्रम्हा, विष्णु, महेश। विश्वनिर्माता, विश्व रक्षिता, व विश्वसंहारकर्ता।
आता आपण जगाचा पालक रक्षक असलेल्या विष्णूच्या कार्याबद्दल, गुणांबद्दल विचार करणार आहोत व तो विष्णुसहस्रनामावलीतील
विशेषणांच्या आधारे करणार आहोत.
रक्षक म्हणजे त्याच्या जवळ शस्त्रे, अस्त्रे असायला हवीतच, त्या बरोबरच तशी क्षमता पण हवी.
म्हणून विष्णू महाबल, महावीर्य, महाशक्ती आहेच. आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी आवश्यक म्हणून तो महोत्साह पण आहे. या सर्व सत्कार्याचे तेज त्याच्या अंगावर दिसून येत. यासाठी महाद्युती हे विशेषण आले आहे. हे काम करताना सत्यधर्माचे आवश्यक पालन करणारा सत्यधर्म परायण आहे. असे व्रत पत्करणारा तो सुव्रत आहे. हे सर्व करूनही प्रसन्नात्मा आहे. कारण आपण चांगले काम करतो आहोत. सत्कर्ता आहोत हा विश्वास त्याला आहे. म्हणून त्याला सत्कृत असे उल्लेखलेले आहे.
--------------------------------------------------------------
दासबोध
लोकमान्य दासबोधाचे नित्य वाचन करीत.
महात्मा गांधीजीनी वाचला होता. दासबोध हा संघटक निर्माण करणारा कारखाना आहे कसे त्यांचे मत ह़ोते.
वासुदेव बळवंत फडके ह्यांना भारतीय स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणा, शिवचरित्र व दासबोध यातून मिळाली.
सावरकर म्हणत,” मी समर्थ यांचा शिष्य आहे. ”
यशवंतराव चव्हाण नियमित दासबोध वाचत असत.
अटलबिहारी यांनी आणीबाणीत, तुरुंगात दासबोधाचे हिन्दी भाषांतर वाचले होते.
स्वामी विवेकानंद यांच्या शिवछत्रपती गौरव या पुस्तकात स्वामी समर्थांचा पुष्कळ ठिकाणी आवर्जून उल्लेख केलेला आहे. त्यात दासबोधातील शिकवण प्रामुख्याने सांगितलेली आहे.
आपणही दासबोधातील विचार अभ्यासून, ते वागणुकीत उतरवण्यासाठी प्रयत्न करु या.
------------------------------------------------------
परवा आपण पालक व रक्षक विष्णूचे काही गुण पाहिले. आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी विचारशक्ती व निरीक्षण शक्ती चांगली असणे आवश्यक, म्हणून तो सहस्र मूर्धा व सहस्त्र अक्ष आहे.
रक्षकांना सर्वत्र संचार करावा लागतो, त्यासाठी तो सहस्त्र पाद आहे.आपले अनुभव सर्वांना समजावेत यासाठी सप्तजिव्हा आहे. ते सांगणे परिणामकारक व्हावे यासाठी त्याला वेदशास्त्ररूपी शब्दसमूह मिळाला आहे. स्वत:च्या ईच्छांवर विजय मिळवून तो सिद्ध बनला आहे. लोकांना मार्गदर्शन करणारा नेता व अग्रणी आहे. विरोधकांना त्रस्त करणारा शत्रूतापन आहे व त्यात यशस्वीही झाला आहे. तो शत्रुजित आहे. सर्वांचा तारणहार आहे. हे सर्व करताना कदाचित काही अयोग्य गोष्टी कराव्या लागल्या असतील तरी, त्याबाबत तो अशोक आहे.
--------------------------------------------
समर्थ रामदासांनी तरूणांनी शक्तिशाली व संघटित होऊन राष्टकार्य करावे यासाठी जागोजागी मारुतीची देवळे बांधली व आखाडे तयार केले. त्यापैकी सोळाशे एकतीस साली स्थापित टाकळीचा गोमयाचा मारूती हा पहिला.
गुराखी मुलात ही मूर्ती शेणाची का सोन्याची असा वाद निर्माण झाला. खरे खोटे पाहण्यासाठी सर्व देवळात आले. एकाने लाकडाच्या लहानशा काडीने शेपटी खरवडली. तो भाग सोन्यासारखा चमकला. पैज ठरल्याप्रमाणे आता आपल्या सर्व गायी देऊन टाकाव्या लागतील हे लक्षात येऊन तो रडू लागला.
आवाज ऐकून समर्थ मंदिरात आले. वाद ऐकून ते म्हणाले,”दोघेही बरोबर आहात. मूर्ती शेणाचीच आहे. पण शास्त्र सांगते की ‘गोमये वसते लक्ष्मी’. शेणाने शेतात सोन्यासारखे पीक येते, म्हणून सोन्याचीही म्हणता येईल. दोघांनीही गायींची सेवा मनापासून करा. गोमाता प्रसन्न होईल.
-----------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा