रविवार, २६ मार्च, २०२३
फेब्रुवारी २०२३- विचारकणिका
( लॉक डाऊन च्या काळात व्हाट्सअँपची माहिती करून घेऊन त्यावर रोज वाचनात आलेले विचार पाठवायला सुरुवात केली. त्याचे हे संकलन. )
02/02/2023
करंटलक्षणे
आळसाची आवड
अधर्माकडे वासना
झोपाळूपणा
लेखन वाचन नाही
वाईट संगत
चांगल्या लोकात राहण्याची लाज वाटणे
बोलण्यावर निर्बंध नाही
कोणावर विश्वास नाही. कोणाचाही त्याच्यावर विश्वास नाही.
इतरांचे ऐकायचे नाही ही भावना
झिजल्यावाचून कीर्ती मिळत नाही हे माहीत नाही.
वागण्यात शिस्त नाही.
कळत नसले तरी सभेत बोलण्याचा उर्मटपणा
अशाची सगळीकडे छीथू होत राहते.
—-----------------------------------------------
03/02/2023
दळण व विहीर
एक गरीब तरूणी! दळण करून निर्वाह करत होती. त्यातच पतीचा मृत्यू झाला.
रोज मिळालेल्या पैशातून काही शिल्लक ठेवत असे. ते पैसे एका मडक्यात साठवत असे.
तिच्या गावाजवळून जाणाऱ्या वाटसरूंसाठी पिण्याच्या पाण्याची काहीच सोय नव्हती.
म्हणून गाववाल्यांनी एक विहीर खोदायची ठरवल. हे कळल्यावर या तरूणीने मडक्यात साठवलेले सर्व पैसे त्या कामासाठी दिले. गाववाल्यांना खूप कौतुक वाटले.
या विहीरीचे नाव पीसनहारी कुआ म्हणजे दळणारीची विहीर असे पडले.
ही विहीर मथुरा दिल्ली मार्गावर आहे.
—---------------------------
04/02/2023
श्री गणेश
देवगण, मनुष्यगण, राक्षसगण या तीनही गणांचा अधिपती
विघ्नहर्ता हे त्याचे वैशिष्ट्य.
गजवदन हे त्याचे अनोखे रुप.
हत्ती हा बुद्धिमान प्राणी. त्याची घ्राणेंद्रिये तीक्ष्ण असतात.
लांब सोंड शक्तिशाली असल्याने सूक्ष्म व अवजड वस्तू तो लीलया उचलतो. कोणते कार्य केव्हा करायचे याचा विवेक तो करू शकतो. कान सुपासारखे व डोळे बारीक हे बुद्धीमत्तेचे लक्षण आहे.
त्याच्या हातातील अंकुश धर्माविरुद्ध वागणाऱ्याला शिक्षा करण्यासाठी आहे तर दुसऱ्या हातातील परशु धर्मरक्षकांच्या सुरक्षिततेसाठी आहे. लंबोदर शरणागतांचे अपराध लीलया साठवते.
श्री रामकृष्ण उवाच
—---------------------
05/02/2023
औषधी वनस्पती
नागवेल- विड्याचे पान
अन्नपचनास मदत
सुगंधी फुले
नाकात फोड, डोळ्यात रांजणवाडी झाली तर दिवसभर या फुलांचा वास घेत रहावा.
रूद्राक्ष
रक्तदाबासाठी उपयुक्त
तुळस
चार-पाच पाने रोज खाल्ल्यास गॅसेसचा त्रास होत नाही.
व्यवस्थित पचनास मदत
बोबडेपणा कमी होतो. वाणी शुद्ध होते.
जनावरांना कोणती वनस्पती आपल्याला उपयोगी आहे याचे ज्ञान उपजतच असते.
श्री रामकृष्ण उवाच
—--------------------
08/02/2023
स्नान
प्रात:स्नान - सूर्योदयाच्या पूर्वी केलेले! यावेळी पूर्वेला किंवा उत्तरेकडे तोंड असावे. मध्यान्ह स्नान फारसे प्रचलित नाही.
सायंस्नान- यावेळी पश्चिमेला किंवा उत्तरेकडे तोंड करावे. हे सूर्यास्तानंतर करावे.
स्नानावेळी दक्षिणेकडे कधीच तोंड नसावे.
क्षेत्राचे ठिकाणी नदीच्या उगमाकडे तोंड असावे.
स्नानावेळी भगवंताचे स्मरण करावे. याला निर्गुण स्नान म्हणतात.
स्नानावेळी गंगा,यमुना,गोदावरी आदी नद्यांचे ही स्मरण केले जाते.
स्नान म्हणजे मस्तकावर पाणी घेऊन केलेले.
आंघोळ म्हणजे खांद्यावरून पाणी घेऊन केलेले.
स्नानाने शरीराच्या आरोग्याबरोबरच मनाचे आरोग्य टिकते.
श्री रामकृष्ण ऊवाच
—-------------------
09/02/2023
मापाने खूप धान्य मोजले पण त्या मापाला एकही कण मिळाला नाही.
उदंड पाठांतर आहे पण अर्थ मुळीच माहीत नाही.
सार असार वेगळे काढता आले नाही तर उदंड वाचण्याचा काय उपयोग?
फाडफाड बोलणाऱ्या वक्त्याला श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देता आली नाहीत तर त्याच्या ज्ञानाबद्दल शंका येणारच.
जात्यात पसाभर वैरण घालून जाते भरभर ओढले तर पीठ बारीक कसे येणार?
अंगात ताकद नाही मग युद्धावर जाऊन काय फायदा?
—----------------------
10/02/2023
काही विचार
आगगाडीत बसलेली सर्व माणसे - वेगवेगळ्या वर्गाची तिकिटे काढलेली व न काढलेलीही जशी स्टेशन पर्यंत पोचतात तशी संतांची संगत असणारी सर्व माणसे भगवंतापर्यंत पोचतात.
श्रद्धेने जे काम होते ते तपश्चर्येने होत नाही.
भगवंताने आपले नाम संतांना दिले म्हणून संतांच्या कृतीला, शब्दाला भगवंत मान्यता देतो.
प्रपंच हा मीठासारखा आहे. ते चिमूटभरच घालायचे असते. आपण उलटे करतो.
संसाराच्या भाकरीत चिमूटभर परमार्थाचे मीठ टाकतो.
श्री गोंदवलेकर महाराज
—-------------------------------------
11/02/2023
शब्दांची गंमत
बडीशेप- शेप लहान असून बडी.
लिफ्ट खाली जातेय-
लिफ्ट म्हणजे वर! खाली कशी जाईल?
विकेटकीपर -विकेट उडवण्यासाठी दबा धरून बसलेला!
अंगठी-अंगठ्यात कधीच घालत नाही.
दिव्याचे बटन ऑन करा- प्रत्यक्षात खाली ओढले जाते.
केस कापायला चाललोय - कापायला नव्हे कापवून घ्यायला!
—-------------------
12/02/2023]
जे जे घडते त्याचा कर्ता परमात्मा आहे. मी फक्त कर्तव्यापुरता आहे असे वाटणे म्हणजे निष्काम कर्म होय.
आले तर भोगले, गेले तर सोडले हे सहजकर्म.
दोष बाधू नयेत अशा रीतीने केलेले कर्म ज्ञानयुक्त कर्म.
ईश्वराच्या स्मरणात केलेले कर्म म्हणजे निरासक्त कर्म.
बंधनाला कारण कर्म म्हणजे अज्ञान.
मोक्षाला कारण ते ज्ञान.
श्री. गोंदवलेकर महाराज
—----------------------------------
13/02/2023]
नाममहात्म्य
देव व नाम दोन्ही भिन्न नाहीत, नाम म्हणजेच देव व देव म्हणजेच नाम.
नाम एकदा मुखात आले की देव हातात आलाच.
मुले पतंग उडवतात, काहीवेळा पतंग आभाळात एवढा ऊंच जातो की दिसतच नाही. तरी तो पतंग उडवणारा म्हणतो की" माझ्या हातात आहे पतंग." कारण पतंगाचा दोरा त्याच्या हातात असतो. जोपर्यंत अखंड नामस्मरणाची दोरी आपल्या हातात आहे तोपर्यंत परमेश्वर आपल्या हातात आहे हे नक्की.
—---------------------
14/02/2023
काशीला जाणारे रस्ते पुष्कळ आहेत. कोणत्याही रस्त्याने जायचे ठरवले तरी आपले घर सोडल्याशिवाय जाता येत नाही. तसे वासना सोडल्याशिवाय साधना करता येणार नाही.
आपल्या अंगातले रक्त काढून ते तपासून आपल्याला काय झाले आहे ते डॉक्टर ठरवतात. तसे आपले चित्त कुठे गुंतले आहे ते आपण पहावे.
हिमालयावर बर्फ आकाशातून पडते तेव्हा अगदी भुसभुशीत असते. काही काळाने ते दगडापेक्षाही घट्ट होते. तसे सूक्ष्म व लवचिक वासनेलाही आपण देहबुद्धीने अगदी घट्ट बनवून टाकतो.
प्रवचनकार श्री गोंदवलेकर महाराज
—-------------------------------
15/02/2023
आज दासनवमी. रामाचा जन्म नवमीचा व त्याच्या या दासाचाही जन्म नवमीचा. रामदासांनी रामनवमीचा उत्सव सुरु केला.
सायुज्यमुक्तीने या ब्रम्हचाऱ्याला वरले. आत्यास्वामीने उडता पक्षी बाणाने जमिनीवर पाडला तेव्हा रामदासांनी त्याला परत जिवंत करून आकाशात सोडला असे मोरोपंतांनी लिहिले आहे. शिवरायांना त्यांनी मार्गदर्शन केले.
शुकासारखे वैराग्य, वसिष्ठांसारखे प्रसिद्ध होते.
—-------------------------
16/02/2023
शेताचे राखण करण्यासाठी काठीवर कांबळे घालून त्याचे सोंग करतात. तसेच सगुण उपासनेचे आहे. राखणदार हजर नसतांना ते सोंग जसे शेताचे रक्षण करते तसे निर्गुणाचे अभावी परमात्म्याची आठवण करून देण्यासाठी सगुण उपयोगी पडते. डोंगराच्या माथ्यावर गेल्या शिवाय आपले पलीकडे असलेले गाव जसे दिसत नाही, तसे सगुणरूप झाल्याशिवाय निर्गुण होता येत नाही.
-प. पू. गोंदवलेकर महाराज
—-------------------------
17/02/2023
नाम घेणाराने अखंड सावधान असावे. भगवंताचे नाम हे औषध आहे. भगवंताची प्राप्ती हे त्याचे फळ होय. औषध मात्र थेंब थेंब पोटात गेले पाहिजे व सतत गेले पाहिजे.
नामस्मरण जर शेवटपर्यंत चालू राहिले तर तो योग आहे.
नाम घेणाराला सत्कर्म टाळू म्हटले तरी टाळता येत नाही.
एकच ठिणगी कापसाच्या राशीचा नाश करते त्याप्रमाणे भगवंताचे नाम हे सर्व पापांचा नाश करते.
—--------------------------------------
18/02/2023
उत्तर शोधा
आज शिवरात्र. दिवसाला रात्र का म्हटले आहे?
भक्ती
हनुमंताने दास्यभक्ती केली. रामाला आपल्या हृदयातच ठेवले. गूहकाचे रामावर तसेच प्रेम होते. रावणाने शत्रू रुपात, भरताने भाऊ म्हणून, सीतामाईने पती म्हणून, बिभीषणाने मित्र म्हणून, हनुमंताने स्वामी म्हणून भगवंताला आपलासा करून घेतला.
साध्य साधन
वरच्या मजल्यावर जाण्यासाठी आपण जिना चढतो. वर जाणे हे साध्य. जिना हे साधन! परमेश्वर प्राप्ती हे साध्य! तीर्थयात्रा, व्रते, नेमधर्म ही साधने होत.
-प. पू. गोंदवलेकर महाराज
—-------------------
19/02/2023
पाच
पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश ही पंच महातत्वे
पृथ्वी - अस्थी, मांस,त्वचा, नाडी, रोम हे पाच गुणधर्म
आप - शुक्लीत, शोणित, लाळ, मूत्र, स्वेद
तेज- क्षुधा, तृषा,आलस्य, निद्रा, मैथून
वायू- चलन, वलन, प्रसारण, निरोध, आकुंचन
आकाश- काम, क्रोध, शोक, मोह, भय हा स्थूल शरीराचा विचार
—---------------------------
20/02/2023
काल आपण शिवरायांना वंदन केले.
आज देवांना करू या.
लहान थोरांना विद्या, बुद्धी देणाऱ्या गजवदनाला वंदन.
जी सर्व विद्या देते त्या सरस्वतीला नमन.
सृष्टी निर्माण करून चारी वेद षट् शास्त्रे निर्माण केली त्या चतुराननाला नमस्कार.
सृष्टी पालनकर्ताविष्णूला अभिवादन.
ज्याच्या दातृत्वाला सीमा नाही व जो सतत रामनाम जपत असतो त्या भोळ्या शंकराला प्रणिपात.
सर्व देवांचा देव असलेल्या इंद्राला प्रणाम.
धर्माधर्म निवाडा करणाऱ्या यमाला नमस्कार.
पिवळा भंडारा ज्याच्या नावे उधळला जातो त्या खंडेरायाला दंडवत.
भक्तांवर प्रसन्न होणाऱ्या तुळजाभवानीला नमस्कार.
ज्याच्या नामाचा गजर अखंड होत असतो त्या पांडुरंगाला प्रणिपात.
क्षेत्रपाळ भैरवाला नमस्कार.
आज सोमवती अमावस्येला सर्व देवांना वंदन.
-दासबोध 14/4
—----------------------
21/02/2023
श्रवणातील विक्षेप
कडकडा जांभया येणे.
शरीर आखडणे.
जो विषय चालू असेल त्याबद्दल आधी ऐकलेले आठवत राहणे.
नवीन येणारांकडे लक्ष जाणे.
वक्त्याच्या शब्दांपेक्षा हालचालींकडे अधिक लक्ष जाणे.
आधी पोटभर जेवण झाले असल्याने तहान लागणे.
कर्पट ढेकरा, उचक्या, जांभया, वारा सरणे, लघवीला लागणे व.
विषयी लोकांचे बायकांकडे लक्ष असते.
चोरटे वहाणा चोरतात.
चालू विषयावर वाद.
हे वर्णन दासबोधातील आहे.
—---------------------------
22/02/2023
काही विचार
वेगवेगळ्या दिशेने वाहत येणाऱ्या वेगवेगळ्या नद्या समुद्रात मिळतात व एकरूप होतात.
पक्षी एका झेपेत झाडावरील फळापर्यंत पोचतो. मानवाला मात्र फळापर्यंत पोचायला हळूहळू झाडावर चढून जावे लागते.
सायासाने अंगावर पिणाऱ्या बालकाला पक्वान्ने खायला देऊ नयेत. तसे कर्म करण्यास अयोग्य व्यक्तीला थट्टेतही कर्मत्यागाचा उपदेश करू नये.
पाण्यातून बाहेर काढल्यावर मासा तात्काळ गतप्राण होतो तसे स्वधर्माचरण सोडलेल्या व्यक्तीचे होते.
दुथडी भरलेल्या नद्या सागराला मिळाल्या म्हणून सागर मर्यादा सोडत नाही. उन्हाळ्यात नद्यांचे पाणी कमी मिळते म्हणून तो आटतही नाही.
—-----------------------
23/02/2023
चार देह- सूक्ष्म, स्थूल, कारण, महाकारण
मात्रा- अकार, उकार, मकार,अर्धमात्रा
गुण- तम, रज, सत्व, शुद्धसत्व
शक्ती- क्रियाशक्ति, द्रव्यशक्ति, ईच्छाशक्ति, ज्ञानशक्ति
भोग- स्थूळ, प्रविविक्त, आनंद, आनंदावभास
—-----------------------------
24/02/2023
उपाधीरहित
सागर- दुथडी वाहणाऱ्या कितीही नद्या येऊन मिळाल्या तरी किंचितही वाढत नाही. ग्रीष्मकाळी नद्यांचे पाणी आटून सागरात येत नाही म्हणून रोडावत नाही.
सूर्याच्या घरात उजेडासाठी वात लावावी लागत नाही. ती लावली नाही म्हणून अंधार होत नाही.
मुनीश्वर आपल्यात निमग्न असतात. सिद्धी मिळाल्या न मिळाल्या तरी त्यांच्यात काहीही फरक पडत नाही.
आपल्या संपन्नतेत इंद्रभुवनालाही तुच्छ लेखणारा भिल्लांच्या पालात रमेल का?
अमृत पिणाराला कांजी आवडेल का?
आत्मसुखापुढे स्वर्गसुख ही अशा लोकांना तुच्छ वाटते.
सम ओवी ज्ञानेश्वरी
—----------------------
25/02/2023
कामक्रोध
जणू यमच
ज्ञाननिधीवरचे भुजंग
विषयदरीतील वाघ
भजनमार्गी लोकांना मारणारे
देहगडाचे दगड
मृत्यूनगरीचे मानकरी
यांच्या भुकेला विश्वही अपुरे
यांची धाकटी बहीण भ्रांती
ही भातुकली खेळताना त्रैलोक्याचा चट्टामट्टा करते
तृष्णा ही तिची धाकटी बहीण
यांनी साध्वी शांतीला नागवले व माया मांगिणीला दागिन्यांनी मढवले.
निग्रहाची मान मोडली.
धैर्यदुर्ग पाडले.
आनंदाचे रोपटे उपटून टाकले.
सुखाची अक्षरे पुसली.
अंजली ठकार
—------------------------
26/02/2023
स्थूल दृष्ष्टीच्या लोकांना वाटते भगवंतांनी प्रकृतीला आपले म्हटले आहे. पण सूताचे धागे एकमेकांत मिसळतात व वस्त्राची वीण तयार होते, विरजणामुळे दुधाचे दही होते. तशी प्रकृती सृष्टीचा आकार धारण करते.
चांदणे पाण्यावर आपोआप पसरते, चंद्राने ते पसरवलेले नसते.
पाण्याचा लोट मिठाचा घाट अडवू शकत नाही.
धूम्रकणांचे पटल सुसाट वारा थांबवू शकत नाही.
सूर्यबिंबात अंधार शिरू शकत नाही.
पर्वताला पर्जन्य धारा खुपत नाहीत.
मृगजळाने पृथ्वी भिजत नाही.
कोळ्याच्या जाळ्यात चंद्रबिंब अडकत नाही.
लोकव्यवहाराला सूर्य साक्षी असतो पण तो त्यात अडकत नाही.
तसा भगवंतही अकर्ता असतो.
—-----------------------------
27/02/2023
निरभिमानता असावी
सहत्रवदन शेष! किती बोलू शकला असता! पण वेदांच्या नेति! नेति पुढे गप्प झाला.
श्रेष्ठ तपस्वी शंकर! त्यालाही अभिमान सोडून माझे चरणोदक असलेल्या गंगेला शिरावर धारण करावे लागले.
ऐश्वर्यवान लक्ष्मीने खेळात अमरपुरी वसवली. मग इंद्रादिक देव आपोआप तिच्या हातातील बाहुले झाले.
सहस्त्रकिरण प्रकाशला की चंद्रही लोप पावतो. मग काजव्याला तेजाचा गर्व कशाला? या मोठ्यामोठ्यांची ही गत! मग सामान्यांची काय कथा?
म्हणून देशाभिमान सोडून देवाला शरण जावे हे चांगले!
—-----------------------------
28/02/2023
घडामोडी
कावळा एकच बुबुळ दोन्हीकडे फिरवतो. आपल्याला मात्र वाटत असते त्याला दोन बुबुळे आहेत.
भिंगरी इतक्या वेगाने गरगर फिरत असते की वाटते ती उभीच आहे.
कोलती अंधारात फिरवली की प्रकाश चक्राकार फिरलेला जाणवतो.
पाणी पुढे वहात जाते. त्याला मागून येणारे पाणी मिळत जाते ते अस्थिर असूनही स्थिर प्रवाह वाटतो.
मोडत घडत असला तरी संसार वृक्ष अक्षय वाटतो.
सम ओवी ज्ञानेश्वरी