वेचलेल्या विचार कणिका - भाग १२
( लॉक डाऊन च्या काळात व्हाट्सअँपची माहिती करून घेऊन त्यावर रोज वाचनात आलेले विचार पाठवायला सुरुवात केली. त्याचे हे संकलन. )
पाप करावे असे कोणासच वाटत नाही. तरीही ईच्छा नसताना कोणीतरी बळजबरीने पाप करावयास लावतो. अर्जुनाने प्रश्न केला. ( भगवद् गीता ३:३६)
भगवंत उत्तरतात," काम एष, क्रोध एष" येथे कामचा अर्थ कामवासना असा नसून कामना, ईच्छा, अपेक्षा असा आहे.
मला एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करणारे मूल आठवले. आपल्याला हवी असलेली वस्तू मिळवण्यासाठी आरडाओरडा, रडणे, हातपाय आपटणे, वस्तूंची फेकाफेक वगैरे ते करत असते. गंमत म्हणजे राग आल्यावरही त्याची प्रतिक्रिया पण अशीच असते. म्हणूनच कदाचित भगवंतालाही दोन्ही शब्द लागोपाठ आठवले असावेत.
शिवाय जो जो हट्ट पुरवला जातो तो तो मागण्या वाढतच जातात. म्हणून कामक्रोध हे खादाड - महाशनो- असे म्हटले आहे. अशी येनकेन प्रकारेण अपेक्षा पूर्ण करून घेणे हे एक पापच होय. कारण त्यासाठी काही वेळा अयोग्य गोष्टी कराव्या लागतात. म्हणूनच या काम व क्रोधाला शत्रू मान, शक्यतो त्यांच्यापासून दूर रहा. वेळप्रसंगी त्यांचा नायनाट कर."
किती योग्य ऊपदेश!
------------------------------------
कामक्रोधासंबंधी आणखी एक उल्लेख (भगवद् गीता २-६२)
कामामुळे क्रोध निर्माण होतो, मग सारासार विचार करता येत नाही. संमोह निर्माण होतो. संमोहामुळे बुध्दीत गोंधळ उडतो, निर्णय घेता येत नाहीत. हळूहळू बुध्दीनाश होत जातो. मग मनुष्य जीवनाला काही अर्थ उरत नाही. म्हणून काम व क्रोध यावर वेळीच नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
---------------------------------------
कामक्रोधावर विजय मिळवतो तोच खरा योगी. (भगवद् गीता अध्याय ५ .२३)
-तेच ज्ञानी पुरुष असतात. श्लोक २६.
काम, क्रोध व लोभ यांना नरकाची दारे म्हटले आहे. त्यांचा त्याग करा असे १६ व्या अध्यायात २१ व्या श्लोकात सांगितले आहे. त्या तीन दोषांचे तोटे व त्यांचा त्याग केल्याने होणारे फायदेही सांगितले आहेत.
----------------------------------
उद्धरेत् आत्मनात्मानम्
स्वत:च स्वत:चा उद्धार करायला हवा. या बाबतीत स्वावलंबी असायला हवे व मला माझी उन्नती करून घ्यायची आहे हे सदैव लक्षात ठेवून, तसे प्रयत्न सातत्याने चालू ठेवायला हवेत! कारण मीच माझा शत्रू वा मित्र असते.
प्रयत्नाने वाल्या कोळी वाल्मीकी बनला, अनेक क्रांतिकारक, स्वातंत्र्य योद्धे, देशभक्त, त्यांना मदत करणारे सामान्यलोक यांच्या प्रयत्नातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे.
वाचन अभ्यास व वक्तृत्व यांच्या योगे ऊत्तम वक्ता घडतो. पण त्यासाठी सातत्याने अभ्यास, वाचन, विचार स्पष्ट मांडण्याचा अभ्यास व त्याबरोबरच येणाऱ्या आक्षेपांना, प्रश्नांना ऊत्तरे देण्याची तयारी या सर्व गोष्टी स्वत: प्रयत्नाने साध्य करायच्या असतात. कला, कौशल्य, व्यवसाय, नेतृत्व, उपचार पद्धती अशी कोणतीही गोष्ट स्वप्रयत्नानेच साध्य करायची असते. तरच आपण आपले मित्र बनून स्वतःची उन्नती करून घेऊ.
--------------------------------------------------
आपण ठरवलेला गीता सप्ताह वंदनाने पूर्ण करू या!
अद्वैत रूपी अमृताचा वर्षाव करणाऱ्या गीतेला नमन! पार्थाला उपदेश करण्यासाठी स्वत: भगवंतानी सांगितलेल्या गीतेला वंदन व सांगणाऱ्या भगवंतांनाही नमस्कार!
ज्या विशाल बुद्धी असलेल्या व्यासांनी हा ज्ञानदीप प्रज्वलीत करून भारताला तेजोमय केले त्यांना प्रणाम! सर्व उपनिषद रुपी गायीचे दोहन करून पार्थ या वत्साला हे गीतामृत रूपी दूध पाजणाऱ्या, कंस चाणूर अशा दुष्ट राक्षसांचा नाश करून विश्वाला शांती प्रदान करण्याऱ्या, वसुदेव व देवकी यांच्या या जगतगुरू असणाऱ्या गोपालकृष्णाला साष्टांग प्रणिपात!
‘व्यासोच्छिष्टं जगत्सर्वं’ असे म्हटले जाते. त्यांनी सांगितलेल्या विश्वकल्याणकारी ज्ञानाला प्रथम वंदन करू या व ते आत्मसात करण्यास सिद्ध होऊ या.
--------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा