शनिवार, २४ ऑगस्ट, २०१९
गुरुवार, २७ जून, २०१९
विष्णू सहस्रनाम भाग 5
प्राणी व पक्षी
हंस- (191)- हंसावतारात सनकादिकांना तत्वज्ञानाचा उपदेश केला. पाण्यात अधिक वेळ विहार करत असला तरी पाण्यावाचूनही तो जगू शकतो. सर्वप्रसिद्ध आहे तो हंसाचा नीरक्षीरविवेक. दुधात मिसळलेले पाणी तो ओळखतो. वास्तविक पाण्याने दुधाचाच रंग धारण केलेला असतो. त्याचे उडण्याचे सामर्थ्य तर आहेच.
सुपर्ण - (192), (855)- गरुड हा शब्द उच्चारताच आठवते ती गरूडभरारी. खूप उंच व लांब उडण्याचाही त्याचा आवाका आहे. विष्णूचे तो वाहन बनला आहे. ह्या भरारीसाठी आवश्यक असणारे त्याचे मजबूत पंख सुंदर ही आहेत हे विशेष. प्रवृत्ती व निवृत्ती ह्या दोन पंखानी युक्त असा धर्म असे ह्याचे स्वरूप आहे. छंदासि यस्य पर्णानि असेही वर्णन आहे.
सिंह(270) - आकर्षक व मोठा शरीर बांधा, मानेवरची आयाळ, ऐटबाज शेपूट, पुढे जात असताना ही सावधगिरी म्हणून मागे वळून पहायची सवय
(सिंहावलोकन). सर्वांच्या हृदयात भीती निर्माण करणारी त्याची गर्जना, पावलांचा आवाज होउ न देता धीर गंभीर अशी चाल, शिकार केली तरी सर्व मांस आपणच न संपवता इतर पशूंसाठी काही भाग ठेवण्याचा त्याच्या मनाचा मोठेपणा ह्या सर्व गोष्टीमुळे नेतृत्व व राजेपण त्याला प्राप्त झाले आहे. पुन्हा उल्लेख(488) नृसिंह अवताराकडे लक्ष वेधणारा आहे. काही ठिकाणी प्रलयाचे वेळी हा सर्वांची हिंसा करतो असे म्हटले आहे.
शिपिविष्ट-(273) शिपी-प्राणी. दुसरा अर्थ किरण
शशबिंदू- (285)- सश्याचे चिन्ह धारण करणारा चंद्र. आकर्षक रूप,सशक्त शेपूट, धावण्याची शीघ्र गती, शुभ्र रंग ह्या गुण विशेषांनी युक्त ससा.
वत्सी-(472)-प्रामुख्याने गाईच्या बाळाला वत्स म्हटले जाते. गोवत्स द्वादशी ने दिवाळी ची सुरुवात होते. गाईला फक्त उपयुक्त च नव्हे तर पवित्र मानले जाते.
गोपति- (495)- असा पुन्हा उल्लेख येतो कारण गो म्हणजे इंद्रिय. इंद्रियांवर नियंत्रण असलेला. गो चा अर्थ पृथ्वी असाही आहे. पृथ्वीवर राज्य करणारा.
कपिंद्र-(501)-कपि - वानर. त्यांचा राजा मारुती वा सुग्रीव. वानर- वा नर:. जणू काही मनुष्यच असलेला, मनुष्याचे अनेक गुण धारण करणारा. हनुमंताचे वर्णन बुद्धिमतां वरिष्ठम असे आहे. शेपटी हे त्याचे एक
शस्त्रच आहे.तिच्या विळख्यात तो शत्रूला आवळू शकतो. लांब उडी व उंच उडी हे वैशिष्ट्य. अशीच उडी मारुन मारुती रामेश्वरहून लंकेत पोचला होता.
गोहित(591)-गायीचे रक्षण करणारा, पृथ्वीचे हित करणारा.
गोपति-(592)- गाय, पृथ्वी, इंद्रिय ह्यांचा स्वामी.
गोप्ता- (593) - रक्षक, पण गुप्त हया शब्दाशी साधर्म्य. स्वतः च्या मायेने झाकणारा.
वृषभाक्ष-(594)- वृषभाप्रमाणे नेत्र असलेला.
वृषभ- बैल, धर्म
श्रीवत्साक्ष- (601)- वक्षावर वत्स चिन्ह असलेला.
कपि (899)- कपि म्हणजे वानर हा अर्थ माहिती आहे. क:- जल. जलाचे प्राशन करणारा सूर्य वा कमल, वराह असाही अर्थ आहे.
महावराह(538) वराह डुक्कर, हिरा. तिसरा अवतार, हिरण्याक्षाच्या तावडीतून पृथ्वी सोडवणारा.
सोमवार, २४ जून, २०१९
विष्णुसहस्रनाम भाग 4
विष्णुसहस्रनाम भाग ४
सृष्टीचे रक्षण, संगोपन करणे म्हणजे पृथ्वीवरील माणसे, वृक्ष, फळे, फुले, प्राणी यांचेही रक्षण आणि संवर्धन आहेच. पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांचे संरक्षण करतो आणि त्या सर्वांनाही त्याच्या या कार्याची जाणीव आहे म्हणून तो जनेश्वर (३४१)आहे. ४,५,६,८,९ भूतभव्यभवतप्रभु (तिन्ही काल ) भूतकृत, भूतभृत,भूतात्मा,भूतभावन:आहे.
वृक्ष - स्वत: जमिनीत पाय -मुळे रोवून उभे राहतात. वादळवारे, पाऊस यांच्यापासून स्वत:चे आणि आश्रयास आलेल्यांचे रक्षणही करतात. रक्षणाचे काम करणाऱ्या विष्णूचा हा गुण त्यांनी घेतला आहे. निवडक वृक्षांचा इथे उल्लेख आहे.
न्यग्रोध: (८२२)वटवृक्ष - हा चिरंजीव आहे कारण त्याच्या पारंब्या जमिनीत शिरून त्यापासून पुन्हा वृक्ष निर्माण होतील.पृथ्वीच्या वरही याचा विस्तार असतो व पृष्ठभागाखालीही असतो. वादळवारे, नद्यांना आलेले पूर, पावसाची संततधार, वीज यापासून स्वत:चे रक्षण तो सहज करतो.
उदुम्बर (८२३)- औदुंबर - अंबराच्याही (आकाश ) पलीकडे असणारा.
अश्वत्थ (८२४)-पिंपळ - क्षणभंगुर जग हे याचे स्वरूप आहे. गीतेत ऊर्ध्वमूल अध :शाखं असे ह्याचे वर्णन आहे. पादचतुर : असेही पिंपळाचे एक नाव आहे.
फुले -
प्रामुख्याने पद्माचा उल्लेख आहे.
पद्मी (३४४) हातात कमल धारण करणारा,
पद्मनिभेक्षण(३४५) - कमळासारखे डोळे,
(३४६) पद्मनाभ,
(३४८)पद्मगर्भ - हृदयरुपी कमळात ज्याची उपासना केली जाते. (३४७)अरविंदाक्ष:- कमळासारखे डोळे.
कुमुद:(५८९)चंद्रविकासी कमळ, कुमुद:(८०७),(५१५)
मुकुंद:- पांढरी कण्हेर, (८०८)
कुन्दर:(८०९)कुंद :-स्वच्छ,सुंदर, शुद्ध फळे देणारा,पवित्र
(९५२)पुष्पहास : -विकसित फुलाप्रमाणे विलोभनीय हास्य असणारा.
विष्णुसहस्त्रनाम -भाग ३
विष्णुसहस्त्रनाम -भाग 3
अशी सर्व क्षमता प्राप्त केली असली तरी कधी कधी शस्त्रांची आवश्यकता भासते व ती वापरण्याचे कौशल्यही प्राप्त करावे लागते.
म्हणूनच चक्रगदा (९९५,९९७)धारण केली आहे.
तो हलायुध बनला आहे. (५६२).
सुधन्वा (५६७) आहे.
कधीही खंडित न होणारा परशु (५६८)त्याने हातात घेतला आहे.
तो धनुर्धर:( ८५७) आहे व त्यासाठी आवश्यक असणारे ज्ञान त्याच्याजवळ आहे.
धनुर्वेद: (८५८) शासन व नियंत्रण याचे प्रतीक दंड (८५९) तो स्वत:च बनला आहे.
महाभारत युद्धाचे वेळी कौरव व पांडव सेना समोरासमोर आल्यानंतर दोन्ही सैन्यातील पुढाऱ्यांनी शत्रूच्या मनात धाक उत्पन्न व्हावा म्हणून शंखनाद केला. हा पुढारी शंखभृत (९९३) आहे. असा सर्वप्रहरणायुद्ध: भगवान आमचे नेतृत्व करत आहे.
स्वाभाविकच ह्या सृष्टीतील पंचमहाभूतांशी संबंध येणारच.
पृथ्वी - धारण करणारा शेषनाग, पृथ्वी बुडू लागली असता तिला वाचवणारा वराह, आपल्या टणक पाठीवर तोलून धरणारा कूर्म ह्या वेगवेगळ्या रूपांनी तो धरणीधर बनला आहे.
आप - तो स्वत:च अपांनिधी :( ३२३) जलाचा अथांग संचय करणारा, कधीही न आटणारा, समुद्र आहे.
तो अंभोनिधी आहे. अंभ म्हणजे देव,मनुष्य,पितर व असुर हे चार अंभ त्यांत सामावतात. जलप्रलयाचे वेळी सर्व जलसाठे एकत्र येतात.
अशा महोदधीमध्येही एका वटपत्रावर शांतपणे निद्रिस्त असणारा हा बालक याचेच नाव महोदधीशय: (५१९) व जलाची देवता वरुण याचेच स्वरूप आहे.
तेज- अग्नि,चंद्र,सूर्य,तारे हि तेजाची रूपे.
अग्नी-वन्हि (२३३)यज्ञात हवन केलेली द्रव्ये वाहून नेणारा. पावक -पवित्र करणारा पावत:(८११), अनल: (२९३)जो अमर्याद आहे.
सूर्य -सहस्रांशु म्हणजे सहस्रावधी किरणांनी युक्त. सहस्रार्चि(८२६), गभस्तिनेमी (४८६)प्रकाशमान (८८३) सूर्यसविता (८४४)रवि :(८८१)
वायू -अनिल -सर्वत्र संचार करणारा म्हणून निवासस्थानरहित. सतत हालचाल करत राहणारा. वाहत राहणे हा ह्याचा धर्म.
पवन: (२९१)पवित्र करणारा,
प्राणद:(३२१) -अन्न,पाणी ह्यांवाचून काही काळ राहता येते पण हवेवाचून क्षणभरही राहता येत नाही. हा गतिरूप तर आहेच पण गंधस्वरूपही आहे. अनिल:(८१२)याला वेगळ्या प्रेरणेची आवश्यकता नसते. प्रेरणा हि सदैव त्याच्याजवळच असते. प्राप्त करण्यासाठी तो सहजसुलभ आहे. तो सदैव सोबतच असतो.
आकाश - दिसते,असते,अनुभवास येते पण धरता येत नाही. पृथ्वी आहे तिथे आकाशही आहेच. आप धारण करणाऱ्या मेघांना तेच धारण करते. तेजाचे स्रोत सूर्य चंद्र आकाशात राहतात. आकाशव्याप्त हवेचे वायू हे रूप आहे. असे सर्वधारक आकाश ज्यामध्ये लिन होते असा विहायसमति (८७६)भगवान आहे. सर्वव्यापी आकाशाप्रमाणेच भगवानही विभु :(८८०)आहे. जलप्रलयाचे वेळी पृथ्वी बुडते पण आकाश असतेच. त्याचे रूप सनातनतम्:(८९७)आहे. ते पर्यवस्थित: (९३१)आहे.
रविवार, २३ जून, २०१९
विष्णू सहस्त्रनाम - भाग २
विष्णू सहस्त्रनाम - भाग २
रक्षक म्हटले कि त्याच्याजवळ शस्त्रे,अस्त्रे आणि क्षमता असायलाच हवे. अर्थातच तो महाबल:(१७२), महावीर्य: (१७४), महाशक्ति: (१७५)आहेच. पण आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी आवश्यक म्हणून तो महोत्साह:(१७१) आहे. या सर्व सत्कार्याचे तेज अंगावर असल्याने महाद्यूती (१७६)आहे. हे काम करताना सत्यधर्माचे असे आवश्यक आचरणही (८७०)करणारा आहे. असे व्रत पत्करणारा तो सुव्रत (८१८) आहे. हे सर्व करताना वा करुनही प्रसन्नात्मा (२३७)आहे. कारण आपण चांगलेच काम करत आहोत,सत्कर्ता (२४१) आहोत हा आत्मविश्वास त्याचेजवळ आहे. म्हणूनच तो सत्कृत:(२४२) आहे हे नक्की.
हे सर्व करताना विचारशक्ति व निरीक्षणशक्ति चांगली असणे आवश्यक. "सहस्रमुर्धा: (२२४) व सहस्राक्ष: (२२६)आहे. यासाठी सर्वत्र संचारक्षमताही आहे. तो सहस्रपाद (२२७) आहे. आपला अनुभव सर्वांना समजावून सांगण्यासाठी तो सप्तजिव्हा ( ८२७)आहे. (ते सांगणे परिणामकारक व्हावे म्हणून वेदशास्त्ररूपी थोर शब्द समुच्चय त्याला प्राप्त झाला आहे.) व या सर्व सत्कृतीचे तेज पसरवणारा सहस्रार्चि ( ८२६)आहे.
स्वास्य(८४४)असे हे धर्म संस्थापनेचे चांगले व्रत स्वीकारणारा सुव्रत (८१८) आहे. स्वत:च्या इच्छांवर त्याने विजय मिळवलेला आहे. सिद्ध (८१९)या कामात सहभागी होणारांचे मार्गदर्शन करणारा नेता (२२२) आणि अग्रणी
(२१८) बनला आहे. कार्य करत असताना विरोध होत असतोच. अशा विरोधकांना त्रस्त करणारा शत्रुतापन (८२१)आहे व त्यात तो यशस्वी, शत्रुजित (८२०) झाला आहे. आवश्यक तेव्हा पुरंदरही (३३५) झाला आहे.
रक्षक तर तो आहेच- तारण:(३३७). कार्यावरील विश्वासाने कराव्या लागलेल्या काही अयोग्य गोष्टींचेही त्याला दुःख नाही. -अशोक: (३३६). असा तो अमितविक्रम (५१६),सुवीर(९४४), भीम: ( ९४८),भीमपराक्रम (९४९) आहे. म्हणून तो जितामित्र आहे. तो त्रिदशाध्यक्ष (स्वर्ग,मृत्यू,पाताळलोक) बनला आहे. त्रिपदात तिन्ही लोक व्यापणारा वामन झाला आहे. म्हणून तो महार्द्र -पूजनीय बनला आहे. मुकुंद (मोक्ष देणारा ) बनून त्याने लोकांचा उद्धार केला आहे. त्या साठी आवश्यक तेव्हा महशृंग (५३६),महा वराह (५३८) हि झाला आहे.
विष्णुसहस्रनाम -भाग १
विष्णुसहस्रनाम -भाग १
वाचायला सुरुवात करताच एक शंका मनात उदभवली, नक्की नाव काय? गीताप्रेस गोरखपूरने याचे नाव 'श्रीविष्णूसहस्रनामावलि' असे दिले आहे. श्री. अनंतराव आठवले यांनी ' श्रीविष्णूसहस्रनाम स्तोत्र "म्हटले आहे. तर काही ठिकाणी 'श्री विष्णोर्दिव्यसहस्रनाम स्तोत्र मंत्र' म्हटले आहे. गंमत वाटली.
स्तोत्र म्हणजे स्तुतीपर कवन. जी स्तोत्रे आहेत पण मंत्र नाहीत अशी नवग्रहस्तोत्र, ऋणमोचन मंगल स्तोत्र, शनैश्वर स्तोत्र, राहू स्तोत्र, शिवमहिम्न स्तोत्र, व्यंकटेश स्तोत्र आहेत. तर स्तोत्र व मंत्र दोन्ही आहेत अशी रामरक्षा, दत्तात्रय स्तोत्र, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र, बुधपंचविशन्ति नाम स्तोत्र, बृहस्पतीस्तोत्र, दुर्गा सप्तशती, आदित्य स्तोत्र वगैरे आढळतात. हि स्तोत्रे मंत्र असल्याने त्या स्तोत्राचे ऋषी, छंद व देवता सुरवातीसच आढळतात. तर अथर्वशीर्षात त्यातील गणेशविद्या हा मंत्र मानलेला आहे. तसा उल्लेख मध्यात आहे. विष्णुसहस्रनामावलीच्या आधी वेगळा मंत्र दिलेला नाही. ऋषी वेदव्यास, अनुष्टुप छंद आणि श्रीकृष्ण देवता असे वर्णन आहे.
बव्हंशी स्तोत्रमंत्रांचा छंद अनुष्टुप आहे. फक्त बुधपंचविशन्ति नाम स्तोत्राचा व आदित्य स्तोत्राचा छंद त्रिष्टुप आहे तर चंद्राष्टविंशति नाम स्तोत्राचा छंद 'विराट' आहे. स्तोत्रात किती नावे आहेत याचा स्पष्ट उल्लेख बुधपंचविशन्ति नाम स्तोत्र -२५ व चंद्राष्टविंशति स्तोत्र - २८, या स्तोत्रात आढळतो तसाच विष्णूच्या सहस्र नावांचा उल्लेख ह्या स्तोत्रात आढळतो.
'तेथे हजारो लोक जमले होते. कोट्यवधी भारतीयांच्या मनात भारतमातेबद्दल कृतज्ञतेची भावना आहे.' ह्या वाक्यातील हजारो आणि कोट्यवधी अंदाज व्यक्त करतात पण ह्या स्तोत्रात खरोखरीच हजार नावे आली आहेत. काही नावे दोन तीनदा आली आहेत पण नाव तेच असले तरी अर्थ वेगवेगळा आहे. ७४ नावे दोन वेळा, १४ नावे तीन वेळा आणि २ नावे ४ वेळा आली आहेत.
स्तोत्र असूनही मंत्र आहेत अशी कवने आपण पाहिली. स्तोत्र म्हणजे स्तुतीपर कवन तर मंत्र म्हणजे मननात त्रायते - मनन केले असता रक्षण होते. म्हणजेच मनन हा पाठांतराचा आवश्यक भाग आहे. पाठांतर व उच्चरणाने लाभ होईल पण मननाने मनःशांती मिळेल. म्हणून हे स्तोत्र म्हणत असताना प्रत्येक नावाचा अर्थ लक्षात घेणे आवश्यक आहे.
या विशाल सृष्टीचा जनक ब्रम्हा, रक्षक विष्णू आणि संहारक शंकर असे आपण मानतो. तिघांचेही कार्य महत्वाचे आहे पण रक्षकावर व्यापक व मोठी जबाबदारी असते. संपूर्ण सृष्टीकडे त्याचे लक्ष असावे लागते. म्हणूनच विश्व व्यापणारा तो विष्णू हे नाव त्याला प्राप्त झाले आहे. त्याच्या कार्याचे वर्णन विश्वधृक -विश्वाचे धारण करणारा(२३८) व विश्वभुग -विश्वाचे पालन करणारा (२३९) या दोन नावानी केले आहे. पालन करायचे म्हणजे रक्षणाची जबाबदारी आलीच.
शुक्रवार, ७ जून, २०१९
अखंड असावे सावध
‘अखंड असावे सावधान’ विषय वाचला आणि समर्थ रामदासांची, ’अखंड असावे सावधान‘ हि ओळ आठवली. छत्रपती शिवरायांना समर्थांबद्दल व त्यांच्या कार्याबद्दल आदर असल्याने त्यांनी समर्थांची प्रयत्नपूर्वक भेट घेतली. औरंगजेबाकडे झुकलेल्या संभाजीराजांना स्वराज्याकडे वळवण्याचे काम करणारांत समर्थ रामदास आणि त्यांचे महंत ह्यांचा मोठा वाटा होता. राज्याभिषेकाचे वेळी संभाजीराजांनी समर्थांना निमंत्रण दिले. समर्थांना उपस्थित राहणे शक्य नव्हते. त्यांनी राजांना पत्र पाठवले. त्याची सुरुवातच होती,
“अखंड सावधान असावे। दुश्चित्त कदापि नसावे। तजविजा करीत जावे। एकांती ।”
पुढे ते सांगतात,”पाच वर्षे कठीण आहेत. सावधानतेने राहिले पाहिजे. शिवबाला पाठवलेली ‘क्षात्रधर्म’ आणि ‘अखंड सावधान’ हि दोन पत्रे नीट वाचत जा. त्यावर मनन चिंतन करुन आचरण कर.”
आजूबाजूची परिस्थिती पाहून आपल्याला हि सुधारायची आहे हे अगदी लहान असतानाच ठरवले होते. देशाची दारुण परिस्थिती पर्यटनात लक्षात आली. ती सुधारायची असेल तर लोकांची आत्मविस्मृती घालवली पाहिजे. आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. त्यांना संघटित केले पाहिजे. पारतंत्र्यातून स्वतंत्र होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि त्यासाठी कार्यकर्ते निर्माण झाले पाहिजेत. ह्या सर्व गोष्टी साधण्यासाठी काम सुरु झाले. तत्कालीन परिस्थितीत असे काम करायचे म्हणजे सावधानता हवीच. म्हणूनच रामदासांच्या उपदेशांत वारंवार तसे उल्लेख आढळतात. कार्याबद्दलचे स्पष्ट स्वरूप,’ मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण, सर्वांविषयी” ह्या ओवीत केले आहे. दासबोधात वारंवार सूचना आहे,’सावध ऐका “
सच्छिष्य लक्षणे सांगताना सावधानतेची सूचना करतात. साधकाच्या वृत्तीत संदेह नसावा. ज्ञान संशयरहित असावे. यासाठी सावधानता आवश्यक. पाहिलेली प्रत्येक गोष्ट खरीच असते असे नाही, असे प्रतिपादन करताना ते मृगजळाचे उदाहरण देतात. पण असा खोटा भास तरी का होतो या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणतात,” सावधानतेने विश्वास निर्माण होतो. सावधानता नसेल तेव्हा दुश्चित्तपणा असेल. दुश्चित्तपणाने कार्यनाश, विस्मरण होते. सतत काळजी वाटते. दुश्चित्तपणाने स्वहिताचा क्षय होतो, असे सांगून सावध राहण्याची गरज पटवतात. मनामध्ये अनेक गोष्टींबद्दल भ्रम निर्माण होतात. त्यांचे निरसन सावधानतेनेच होईल असे प्रतिपादन करतात. जे काही करायचे त्यात धूर्तपणा व विचक्षणता असावी असे म्हणतात.
प्राप्त परिस्थितीत काय करायला हवे हे स्पष्टपणे सांगताना म्हणतात,
” महायत्न सावधपणे । समयी धारिष्ट्य धरणे ।अद्भुतचि कार्य करणे ।”
हे सगळे वाचताना वाटते, हे सर्व सांगायला सोपे आहे. करायला अवघड आहे. हे सर्व सांगणाऱ्या रामदासांनी स्वत: काय केले असा विचार मनात येतो.
समर्थांनी स्थापन केलेल्या मठांचे वैशिष्ट्य असे होते कि, बव्हंशी मठ हे स्वराज्याच्या सीमेवर जिथून हल्ला होऊ शकण्याची शक्यता होती अशा ठिकाणी स्थापन केलेले होते. सर्व मठांचा परस्परांशी संबंध असायचा. मठात महंत असायचे. एक/ दोन निवासी तर बाकी सगळेजण भ्रमंती करणारे असत. लोकांत मिसळून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे, शत्रूच्या बातम्या मिळवणे, समाजात धैर्य व एकी निर्माण करणे, लोकांच्या गरजा ओळखून त्यांना मदत करून स्वराज्यकार्यासाठी त्यांचे मन तयार करणे, ठिकठिकाणी बजरंग गदाधारी मारुतीची देवालये स्थापून तरुणांना बलशाली करण्यासाठी व्यायामशाळा स्थापणे, स्वाभिमानी तरुणांची संघटना करणे, तरुणांना समाज उत्थापनाच्या कार्यात जास्तीतजास्त सहभाग देण्यास तयार करणे अशी मठांची कार्यशैली होती. या कार्याची माहिती सर्वांना देऊन समाजाचे आत्मभान जागे करणे हेही काम चालू होते. ‘ इदं न मम ‘ हा भाव स्वीकारुन या महंतांनी एक समर्थ समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या सर्वाचा फायदा समाज स्थापनेसाठी निश्चितच झाला.
धर्म राजकारण समवेत चालती । शक्ति युक्ति एकवटून कार्य साधती ।
पसरे यत्कीर्ती अशी विस्मयावहा । जगी अमुचा एक महाराष्ट्र देश हा । असे गौरवोद्गार सहज निघू लागले.
समर्थांच्या सावधपणाचा आणखी एक लक्षात राहण्याजोगा प्रसंग म्हणजे अफजलखान निघाला आहे हा संदेश त्यांनी काव्यातून कुटपध्दतीने म्हणजे प्रत्येक ओळीचे पहिले अक्षर घेतल्यास ‘विजापूरचा सरदार निघाला आहे. ‘ असा कळवला होता.
स्वतः सावध राहून सर्वांना सावध करणाऱ्या समर्थांना दंडवत!
बुधवार, ५ जून, २०१९
सुधीरा :
१. कदार्थितस्यापिही धैर्यवृत्तौ | न शक्यते धैर्य गुण: प्रमाष्टर्म ||
अधोमुखस्याsपि कृतस्य वन्है: नीधरिखा यान्ति कदाचिदव ।।
तिरस्कृत झाला तरी धैर्यवानाचे धैर्य नष्ट होत नाही. अग्नीची ज्वाळा खाली मुख केले तरी कधी खाली जात नाही. वरच उफाळते.
२. रत्नेर्महार्हेनस्तु तुप्युर्न देवा:। न भेजिरे भीमविशेष भीतम ।
सुधांबिना न प्रययुरविराम न निश्चितार्थातद विरमंती वीरा:।
मौल्यवान रत्ने देवांना संतुष्ट करु शकली नाहीत. महाभयंकर विषानेही त्यांना भीती वाटली नाही. अमृत मिळाले तरी ते थांबले नाहीत. जे साध्य निश्चित केले आहे ते प्राप्त झाल्याशिवाय धैर्यवान लोक विश्रांती घेत नाहीत.
३. अंगणवेदी वसुधा कुत्या जलधी स्थलिच पातालम
वल्मिकश्च सुमेरु: कृतप्रतिज्ञस्य धीरस्य ।।
वसुधा म्हणजे अंगणातील ओटा, समुद्र म्हणजे लहानसे डबके, पाताल म्हणजे एक छोटीशी जागा, सुमेरु म्हणजे एक वारुळ असे प्रतिज्ञा केलेल्या धीराना वाटते.
४. निदन्तु नीतिनिपुणा : यदि वा स्तुवंतु।
लक्ष्मीसमाविशतु वा गच्छति यथेष्टम।
अधेव वा मरणमस्तु युगान्तरे वा
न्यायात्पथ : प्रविचलन्ति पदं न धीरा: ।।
नीतिज्ञ लोक निंदा करोत वा स्तुती करोत, लक्ष्मी तिच्या इच्छेप्रमाणे येवो वा जावो, आज मरण येणार असेल वा युगान्तराने, धीर लोक न्यायपथापासून आपला पाय कधीच विचलित होऊ देत नाहीत.
गणी न आपदा । धीर नर कदा ।
ध्येयी घेई सदा छंदा sss ।।
रवि अपुला पथ आक्रमी ।
जरी पाही वैरीsss ग्रासू
खल मेघ आडवी पाया SSS ।।
५. चलन्ती गिरिय:कामं युगांत पवनाहता:
कृछेपि न चलत्येव धीराणां निश्चलं मन:
कल्पांताच्या वाऱ्याने आहत होउन पर्वत एकवेळ विचलित होईल पण प्रायश्चित्त करावे लागले तरी धीर लोकांचे निश्चल मन कधी बदलत नाही.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)