शुक्रवार, २१ नोव्हेंबर, २०१४

राम कोदंड

एक साधे धनुष्य! पण ते रामाच्या हातात जाते तेव्हा कोदंड बनते. जणू काही सांगत असते,"दंडनीय कोण आहे? त्यालाच फक्त या धनुष्यापासून भीती आहे." राम हा सातवा अवतार. ज्या ज्या वेळी पृथ्वीवर अधर्म माजतो, काही कारणाने हा:हाकार उडतो तेव्हा तेव्हा ईश्वर अवतार घेऊन तिचे रक्षण करतो आहे, हे दशावतार कथेवरून लक्षात येते. रक्षण करण्यासाठी आवश्यक असते शक्ती!

शक्ती ही वेगवेगळ्या प्रकारची असते. देहातील शक्ती असेल, बुद्धीची असेल, अर्थशक्ती असेल वा नैतिक असेल. कधी तप:शक्ती असेल तर कधी ज्ञानशक्ती असेल. कधी शब्दांचे सामर्थ्य असेल, कधी शस्त्रांचे तर कधी अस्त्रांचे, कधी मंत्रांचे तर कधी तंत्रांचे! कधी धर्मकारणाचे तर कधी राजकारणाचे. कधी प्रेमाचे असेल तर कधी नेमाचे असेल. पण अशी शक्ती, असे सामर्थ्य असणे आवश्यक असते हे निश्चित.

या सामर्थ्याचा उपयोग कशासाठी करायचा हे त्या शक्तीधारकांच्या विचारांवर अवलंबून असते. रामाने आपल्या सामर्थ्याचा उपयोग ऋषी, यज्ञ व राष्ट्र रक्षणासाठी केला तर रावणाने मात्र स्वत:च्या स्वार्थासाठी केला. रामशक्तीने अभय दिले, आत्मविश्वास जागवला, अन्यायाच्या प्रतिकाराची प्रेरणा दिली व दहशतवाद संपवला. रावणाच्या शक्तीने भय निर्माण केले, अनेक युद्धे झाली, भयानक संहार घडला, न्यायनीति पायतळी तुडवली गेली. रामशक्तीने स्त्रीसन्मानाचे रक्षण केले तर रावणशक्तीमुळे स्त्रीवर अन्याय झाला, तिचे अपहरण झाले व तिला बलात्काराला सामोरे जावे लागले. रामाच्या हाती ऋषिगणांनी विश्वासाने धनुष्य बाण सोपवले तर रावणाने भोळ्या सांबाकडून मिळवलेले आत्मलिंग त्याच्या जवळून काढून घेण्यासाठी गणपतीला गुराखी बनावे लागले. रामाने यज्ञरक्षण तर रावणाने यज्ञविध्वंस केला. म्हणूनच कृष्णाला 'परित्राणाय साधूनाम' म्हणून थांबता आले नाही, 'विनाशायच दुष्कृताम' हेही वदावे लागले.

'विद्या विवादाय धनं मदाय बलं परेषां परपीडनाय
खलस्य साधो S विपरितमेतद ज्ञानाय दानाय च रक्षणाय ।।
खळाची, दुष्टाची विद्या विवादासाठी, धन हे अहंकारपूर्तीसाठी, बळ हे दुसऱ्याला पीडा देण्यासाठी असते तर सज्जनाची विद्या ज्ञानदानासाठी, धन हे दानासाठी तर बळ हे सज्जनांच्या रक्षणासाठी असते.

शक्ती प्राप्त झाली की आत्मविश्वासाची मर्यादा ओलांडून ती अहंकाराच्या, मदाच्या प्रांतात कधी शिरते ह्याचा पत्ता लागत नाही हे मात्र खरे! ही मदोन्मत्तता अनेक अनैतिक, दुष्ट, क्रूर कृत्यांची जननी ठरते. विजयामागून विजय मिळत गेले आणि रावण, हूण, सिकंदर, मुस्लिम हे अधिकाधिक क्रूर बनत गेले असे इतिहास सांगतो म्हणूनच मनाची नियंत्रणशक्ती ही शस्त्रशक्तीपेक्षा मोठी असणे आवश्यक असते.

कधी कधी सज्जन लोक हे शक्तीसंपादनाकडे दुर्लक्ष करतात असेही दिसते. वास्तविक आपले सगळे देव शस्त्रयुक्त आहेत. जणू काही सांगत आहेत की सात्विकता, सुजनता, रक्षणासाठीही शस्त्रांची मदत आवश्यक असते. नुसते शस्त्रधारणही दुर्जनांवर काही प्रमाणात नियंत्रण ठेवते. 'अरे' ला 'कारे ' हे प्रत्युत्तर येणार असे वाटले तर मग 'अरे' म्हणण्याचे धैर्य फारसे कोणी दाखवत नाही. भारत अणुशक्तीसंपन्न झाला आणि अनेक देशांची गुरगुर थंडावली हा अनुभव आपण घेतलाच आहे. जगाचा न्यायच आहे, 'अजपुत्रां बलि दद्यात!'

जेव्हा जेव्हा एखादा समाज ह्या शक्ती आराधनेकडे दुर्लक्ष करतो तेव्हा तेव्हा तो समाज इतरांच्या भक्ष्य स्थानी पडतो ह्याची अनेक उदाहरणे जगाच्या इतिहासात सापडतात. वसिष्ठांची कामधेनु हरण करण्याचा प्रयत्न विश्वामित्रांनी केला तेव्हा वसिष्ठ आपले रक्षण करू शकत नाहीत हे पाहून त्या कामधेनुनेच स्व रक्षणासाठी अनेक सैनिक निर्माण केले. अहिंसेचा आत्यंतिक उदो उदो आपण केला तेव्हा आपल्यावर आक्रमणे झाली. साधूचा 'कोणाला चावू नकोस' या उपदेशाचे पालन करताना नाग स्वत:चे फुसकारणे विसरतो आणि लहान मुले दगड मारून त्याला रक्तबंबाळ करतात. मग साधूला सांगायला लागते, चावू नकोस पण फुस्कारायचे विसरू नकोस. "फुसकारणे" हा सुध्दा एक शक्तीचा अविष्कारच असतो.

शक्तीच्या अविष्कारासाठीसुध्दा शक्ती लागते. मनगटात शक्ती असेल तरच शस्त्र चालवता येते. तलवार ज्याला उचलवत नाही तो ती फिरवणार कशी? मनगटात असलेली शक्ती वापरायलाही मनाची शक्ती लागते. ती नसेल तर हातातली तलवार शत्रूला बघताच गळून पडते आणि हातपाय लटपटायला लागतात. म्हणूनच शरीर समर्थ करण्याइतकेच लक्ष मन खंबीर करण्याकडेही द्यावे लागते.

शब्दालासुध्दा किंमत येते ती त्यापाठच्या शक्तीमुळेच. 'स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे व तो मी मिळवणारच' हे लो. टिळकांचे शब्द असतील वा "मेरी झांसी नही दूंगी।" हे झाशीच्या राणीचे शब्द असतील, त्या मागे उभी होती ती त्यांची राष्ट्रार्थ त्यागाची मानसिक तयारी व त्यांचे कार्य. रामायणातही आपण पाहतो की कुबेराने पाठवलेल्या दूताचे तुकडे तुकडे रावण दरबारात झाले पण अंगद जेव्हा रामाचे दूतत्व करायला रावण दरबारात गेला तेव्हा त्याचे तुकडे तुकडे करावेत असा विचार रावणाच्या मनात येउन सुध्दा तो प्रत्यक्षात उतरू शकला नाही. कारण रामाचे सैन्य लंकेजवळ येउन पोचले होते.

फक्त आपण सज्जन असून चालत नाही. आपली सज्जनता, तिची किंमत समोरच्याला कळली तरच तिचा उपयोग असतो. पण शक्तीची भाषा मात्र सर्वांनाच कळते. शक्तीचा, शस्त्राचा उपयोग कदाचित करावाही लागणार नाही. पण ते जवळ बाळगणे नेहमीच आवश्यक असते. किंबहुना शस्त्र नसले तरीही आवश्यकतावश उपलब्ध कोणत्याही गोष्टीचा उपयोग शस्त्रासारखा करण्याची मानसिक तयारी, धैर्य व प्रसंगावधान असणेही आवश्यकच असते. मग ओबव्वा मुसळाने शत्रुला थोपवू शकते तर पद्मिनी सजलेल्या पालखीत बसून जाण्याचा मनोदय जाहीर करून भीमसिंहाची सुटका करते.

कलियुगात महत्व आहे ते संघशक्तीचे. संघटना ही एक अद्वितीय शक्ती आहे. म्हटले तर ती एकीत आहे पण ही शक्ती त्या संघटनेच्या प्रत्येक पाईकांत विखुरलेली अहे. प्रत्येकाच्या मागे ती उभी असते.

आज सगळ्या जगाला प्रत्येक बाबतीत अमेरिकेचा विचार विचारांत घ्यावा लागतो. ह्याला कारण आहे अमेरिकेची अर्थशक्ती आणि तिच्या सहाय्याने घडून आलेली भौतिक प्रगती! सिकंदर जेव्हा भारतात आला तेव्हा शस्त्रसज्ज सैन्य असूनही तो पराजित झाला तो भारतीय ऋषीमुनींच्या अध्यात्मिक शक्तीमुळे व भारतीयांच्या विजिगीषु वृत्तीमुळे!धर्मान्तरणाच्या लाटेत अनेक देश वाहून जात असताना भारत ती लाट बव्हंशी प्रमाणात थोपवून धरू शकला त्याच्या दुर्दम्य इच्छा शक्तीमुळे.

'हा हन्त हन्त नलिनी गज उज्जहार ' ह्या श्लोकाच्या पूर्वार्धात लक्षात येते ती कमळाची आकर्षण शक्ती, जी त्याच्या सौदर्याने, कोमलतेमुळे व सुगंधाने निर्माण झाली आहे. शक्तीची ही विविध रूपे शक्ती आराधनेची आवश्यकताच प्रतिपादन करतात.

म्हणूनच समर्थ उद्गारतात 'शक्तीने मिळती राज्ये।'. किशोरजी व्यास म्हणतात,'श्रीरामाचे कोदंड हे जीवनातील महत्वाचे तत्वज्ञान आहे ' तर राष्ट्र सेविका समितीच्या सेविका विश्वशक्ति व मातृशक्तिला आग्रहपूर्वक विनवतात 'समुत्पादयास्मासु शक्तिं सुदिव्याम।'