गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०२१

वेचलेल्या विचार कणिका - भाग 21

 वेचलेल्या विचार कणिका - भाग 21

( लॉक डाऊन च्या काळात व्हाट्सअँपची माहिती करून घेऊन त्यावर रोज वाचनात आलेले विचार पाठवायला सुरुवात केली. त्याचे हे संकलन. )


चाफा

कुडचाफा- उन्हाळ्यात बहरणारा,घराच्या कुंपणाशी लावतात

पांढरा चाफा- पांढरी शुभ्र फुले, एक वेगळाच गंध, देहभान विसरून समाधिस्थ झालेला तपस्वीच जणू

हिरवा चाफा- सुगंध जणू वेडे करतो. पण फूल शोधायला लागते. 

सोनचाफा- सुगंधाबरोबरच सुंदरही, झाड मात्र ठिसूळ. फुले काढणे धोक्याचे!

शिवचाफा- कधीतरीच दिसणारा' तळहाताएवढे फूल, मधोमध पिवळट आसनावर चिमुकली शुभ्र पिंड तिच्यावर सहस्त्रफणीधर नागांनी सावली धरलेली विशेष म्हणजे ही फांद्यांच्या जोडाशी लागतात. 

कवठी चाफा- टेबल टेनिस च्या चेंडूसारखे फूल, भरगच्च व रुपगंधाने समृद्ध फूल, फूलदाणीला शोभायमान करणारे. 

भुईचाफा- फूलांचे घोस देखणे व सुगंधित देठ लांब जाड व त्यावर फूल. 

(चाफा बोलेना- लेखिका विमला जोशी) 

ही सुमनांजली आज ज्याची जयंती त्या गणेशाला वाहू या!

-------------------

भरभक्कम वाढ होऊन, तीनशे वर्षे जगल्यावर शेवटी कोरडा पर्णहीन व म्लान होणाऱ्या ओक वृक्षासारखे जीवन जगण्याने माणूस श्रेष्ठ ठरत नाही. 

लिलीचे फूल ऐन मे महिन्यात सकाळी उमलते व संध्याकाळी मावळून जाते. पण त्याचे सौंदर्य कायम लक्षात राहते. अल्पायुषी असूनही त्याचे जीवन सार्थकी लागते. 

खजुराचे झाड नुसतेच ऊंच वाढते. सावली कोणालाच मिळत नाही. फळ मिळते पण तेही खूप उंचावर असते. 

व्यक्ती फक्त स्वत: मोठी झाली पण तिचा समाजाला काही च उपयोग झाला तर तिचा विकास स्पृहणीय कसा मानता येईल?

श्री गोळवलकर गुरुजी

------------------------------------

आदिशक्ती

महासती पार्वतीला आदिशक्ती म्हणून ओळखले जाते.

भगवान रामकृष्ण आदिशक्तीला जगन्माता संबोधत.

आदिशक्ती सौम्य व शांत मातृ रुपी आहे, तरीही अधर्म अत्याचार माजला असेल, तेथे ती हाती शस्त्र धारण करून त्याचा नि:पात करते.

परकीय आक्रमणाने येथला समाज हतबल झाला होता. तेंव्हा समर्थ रामदासांनी याच शक्तिला तळमळीने हाक दिली.

काली, दुर्गा, भवानी ही आदिशक्तीची उग्ररूपे आहेत तर लक्ष्मी, पार्वती, सरस्वती ही सौम्यरूपे आहेत.

विद्येचे उपासक आदिशक्तीला सरस्वतीच्या रूपात बुद्धी तेजस्वी व्हावी म्हणून प्रार्थना करतात. 

सुजनांचा विकास करणारी, त्यांना अभय देणारी, दुर्जनांना शासन करणारी अशी ही शक्ती ज्या राष्टात नांदते ते राष्ट्र अतुल तेजस्वी होते. तेथे सर्व प्रकारची समृद्धी नांदते. ते समर्थ बनते. 

अशा आदिशक्तीला वंदन!

-----------------------------

सात्त्विक प्रवृत्ती असणाऱ्या व्यक्तीचे काही गुण

अक्रोध, अहिंसा, क्षमाशील, धैर्य,अनसूयक- कोणाचा हेवा न करणारा, सदाचारी, शुद्ध, सर्वाबद्दल समता बाळगणारा, सत्यभाषी, साधुवृत्ती असणारा, चित्त शांत ठेवून कर्म करणारा, चांगली स्मृती असलेला, अक्रूपण, दक्ष, त्यागी, निरहंकारी, सौम्य स्वभावी, विनयी, श्रद्धावान, संतुष्ट, बुद्धिमान, सर्वां भूती दया बाळगणारा, परोपकारी

या यादीत आणखी अनेक गुण जोडता येतील. तसा प्रयत्न करायला हरकत नाही. 

त्याचबरोबर या यादीतील कोणते गुण किती प्रमाणात आपल्याकडे आहेत त्याचा विचार करून बाकीचे अंगी बाणवण्याचा प्रयत्न करू या. 

 ही यादी संस्कृत दिनदर्शिकेत आहे. 


वेचलेल्या विचार कणिका - भाग 20

वेचलेल्या विचार कणिका - भाग 20

( लॉक डाऊन च्या काळात व्हाट्सअँपची माहिती करून घेऊन त्यावर रोज वाचनात आलेले विचार पाठवायला सुरुवात केली. त्याचे हे संकलन. )


पूजा

अपवित्र पवित्र व्हावे 

बाह्याभ्यंतर शुचि:

कलशात गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी, नर्मदा, सिंधू, कावेरी या भारतातील विविध भागातून वाहणाऱ्या सात नद्यांचे पाणी कल्पनेने भरुन त्याचे पूजन. 

जणू भारतमातेला वंदन व भारतभूमी सुजल, सुफल करणाऱ्या नद्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त! 

सागरातून उत्पन्न झालेल्या व विष्णूंनी हातात धरलेल्या शंखाला वंदन! शंखध्वनी म्हणजे पौरूषाला आवाहन व आत्मविश्वास जागृती. 


घंटानाद - शुभशक्तींना आवाहन व दुष्ट शक्तींना निघून जाण्यासाठी सूचना. 


दीप- अंधार नाहीसा करून प्रकाश निर्माण करणाऱ्या दीपाचे या त्याच्या जगाचे हित करणाऱ्या कार्याला अभिवादन!

--------------------------------


गणपती पूजन

गणांचा पती म्हणजे लोकनायक असलेल्या व बुद्धी दात्या ' विनायक ( विशेषत्वाने पुढारी बनलेल्या) याला वंदन! 

ब्रम्हाचे प्रतीक असलेला ओम् गणेशात सामावलेला आहे त्याची आसनमांडी म्हणजे अकार, विशाल पोट म्हणजेच ऊकार, व महागंडस्थल युक्त मस्तक म्हणजे मकार. 

शिवाय गणपती ही संघटनेचीही देवता होय. समाजजीवन समृद्ध, संपन्न व्हावे ह्यासाठी आपण सर्व प्रयत्नरत राहू या!

------------------------------------------

दीनदयाळजींना अभिवादन व त्यांच्या काही विचारांचे स्मरण

भगवान श्रीकृष्ण याचा सर्वश्रेष्ठ गुण म्हणजे त्यांचे राष्ट् प्रेम त्या साठी त्यांनी व्यक्तिगत मानापमानाची चिंता केली नाही, 

गोकुळ सोडुन मथुरेला जावे लागले.

कंसवधानंतर स्वत: राज्यावर न बसता ते उग्रसेनाला दिले.

जरासंधाला सोळा वेळा पराभूत केले पण केवळ आपल्यामुळेच ही आक्रमणे होत आहेत हे लक्षात घेऊन पळपुटेपणा स्वीकारूनही मथुरा सोडली. शस्त्रधारण न करण्याची प्रतिज्ञा तोडून भीष्मांवर शस्त्र चालवले.

कृत्रिम संध्याकाळ निर्माण करुन जयद्रथाला मारले.

जमिनीत घुसलेले रथाचे चाक काढत असलेल्या कर्णाला मारले. 

नरकासुराच्या कारागृहाला सोळा हजार स्त्रियांना सोडवून त्यांच्याशी विवाह केला.

या सर्व गोष्टी कृष्णाने केवळ राष्ट्र हित लक्षात घेऊन केल्या.

-प्रेरणापुंज लेखक दीनदयाळ उपाध्याय

----------------------------------------------

काही विचार

दैवतापासून ज्याला विभक्त होता येत नाही तो भक्त.

अविश्वासाचे वातावरण नाहीसे करण्यासाठी दोन प्रकारचे परस्पर संबंध हवे.वरुन खाली व खालून वर.


साक्षेप- निश्चित ध्येय' निश्चित मार्ग, तीव्र इच्छाशक्ती, दृढ निर्धार

 चांगली कृती पेरा, त्यातून चांगल्या सवयी, त्यातून चांगले चारित्र्य निर्माण होईल. 

जगाच्या सुखासाठी काया, वाचा, मनाने केलेले वर्तन म्हणजे अहिंसा. 

बेजबाबदार पण योग्य असणे हे जबाबदार व अयोग्य असण्यापेक्षा केव्हाही चांगले. 

कार्यकर्त्यांना एक संदेश

 घाई करा पण सावकाश

-----------------------------------------

प्रत्येक शुभकार्याच्या प्रारंभी वंदन

सद्गुणांचा अधिष्ठात्या गणनायकाला वंदन

परा, पश्यती, मध्यमा, वैखरी या चारी वाणींची प्रेरक शक्ती असलेल्या सरस्वतीला वंदन. 

कर्तव्यनिष्ठेचा मार्ग दाखवणार्या प्रभू रामचंद्र यांना वंदन. 

हिमवंताचा रजतकिरीट धारण करणाऱ्या व हिंदी महासागर जिचे चरण नित्य धूत आहे अशा हिदूभूमीला वंदन. 

जिने मातेप्रमाणे आमचे संवर्धन केले आहे त्या मातृभूमीला प्रणाम. 

जन्मदात्या मातेला नमन. 

मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र, पूर्ण पुरूष भगवान श्रीकृष्ण, राष्ट्रगुरू समर्थ रामदास, क्षत्रिय कुलवतंस छत्रपती शिवाजी, ऋषिवर श्री दयानंद सरस्वती, राष्ट्र द्रष्टे स्वामी विवेकानंद या व सर्व मार्गदर्शकांना प्रणाम. 

सप्त चिरंजीव यांना नमस्कार. 

अल्पायुषी म्हणून जन्माला आलेल्या पण स्वप्रयत्नाने ज्यांनी दीर्घायुष्य प्राप्त केले त्या मार्कंडेय यांना नमन. 

चराचरातील सर्व शक्तींनो, तुम्हाला साष्टांग प्रणिपात. 

-------------------------------------------

सात चक्र

मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञाचक्र, सहस्त्रार चक्र. 


अग्निच्या सात ज्वाला सात समिधा, सात यज्ञ, सात लोक

सात धातू

रस, रक्त, मास, मज्जा, अस्थि, मेद, वीर्य

----------------------------------


वेचलेल्या विचार कणिका - भाग 19

 वेचलेल्या विचार कणिका - भाग 19

( लॉक डाऊन च्या काळात व्हाट्सअँपची माहिती करून घेऊन त्यावर रोज वाचनात आलेले विचार पाठवायला सुरुवात केली. त्याचे हे संकलन. )


ईशवास्योपनिषद

सर्व जग ईश्वराच्या अस्तित्वाने व्याप्त आहे हे लक्षात ठेवा. संकुचित व स्वार्थी वृत्तीचा त्याग करा. 

साधकाने जीवनात ज्ञान व कर्म यांचा समन्वय साधला पाहिजे. कर्माने अभ्युदय व ज्ञानाने निश्रेयस प्राप्त करून प्रवृत्ती व निवृत्ती यांचा समन्वय हाच वेदोक्त मार्ग आहे. 


केनोपनिषद

केन या प्रश्नवाचक शब्दाने सुरवात!

संपूर्ण विश्वाचे संचलन करणाऱ्या ब्रम्हशक्तीला वंदन!

तीच शक्ती आत्मशक्ती बनून ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये, प्राण व मन यांना कार्यक्षम ठेवते. अफाट ऊर्जा निर्माण करते.

या ब्रम्हशक्तीनेच देवांनी आसुरी शक्तीवर विजय मिळवला.


कठोपनिषद

यमराज व नचिकेता संवाद

आध्यात्मिक साधनेने साधकाचे चारित्र्य कणखर झाले पाहिजे. चारित्र्याचा आविष्कार फक्त व्यक्तिगत शूचितेने पूर्ण होत नाही. ती शक्ती समाजाभिमुख व्हावी.


शेवटचा मंत्र आहे

उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान् बोधत! 

स्वामी विवेकानंद यांचा आवडता मंत्र!

---------------------------------------

प्रश्नोपनिषद

प्रश्न व उत्तरे असे स्वरुप

काही उत्तरे

 प्राणशक्ती हीच सर्वश्रेष्ठ! तिच्यातून पंचमहाभूते, पंचतन्मात्रा पंचप्राण यांचे उगम व प्रकटीकरण होते. यांतच मन मिळवले की या सोळा कलाच्या मदतीने शरीराच्या माध्यमातून ब्रम्ह कार्यरत आहेत.


मुंडकोपनिषद

मुंडक - मुंडनयुक्त संन्यासी

सर्वसंगपरित्यागाचे महत्व सांगितले आहे.

‘सत्यमेव जयते’ हा भारताचा बोधमंत्र यातूनच घेतलेला आहे. 

आध्यात्मिक साधकांसाठी सांगितले आहे," नद्या स्वत:चे नामरूप सोडून समुद्रात विलीन होतात. तीच अवस्था साधकाने प्राप्त करायची असते.”


मांडुक्य उपनिषद

सर्वात लहान आहे

ओंकार स्वरूपात भूत वर्तमान भविष्य सामावलेले आहेत

अ- वैश्वानर पाद

उ- तैजस पाद

 म- प्राज्ञपाद

शेवटची शांत अवस्था. 

--------------------------------

त्तैत्तिरीय उपनिषद

प्रामुख्याने गृहस्थाश्रमात प्रवेश करणारासाठी उपदेश. 

श्रुतींचे अध्ययन व विकारांवर विजय मिळवणाराला ब्रम्हज्ञान प्राप्ती सहज शक्य होते. कारण ती अवस्था निर्भयतेची असते. निर्भयता हा आध्यात्मिक साधनेचा मुख्य निकष आहे. 


ऐतरेय उपनिषद

वेदमंत्रांचे द्रष्टेपण व ऋषीपण यांची प्राप्ती जातीवर आधारित नसते. 

परब्रम्हाने विश्व निर्माण करतांना आपले ज्ञान त्यात ओतले आहे. म्हणून प्रत्येक घटकात हे ज्ञान असतेच. 


छांदोग्य उपनिषद

कर्तव्यकठोर ऊद्दालक ऋषी याचे निर्माता

आपद्प्रसंगी केलेली जीवनमूल्यांशी तडजोड, ती स्थिती संपल्यावर ताबडतोब परत स्थापित करावी. 

भौतिक संपत्तीपेक्षा आध्यात्मिक संपत्ती श्रेष्ठ आहे. 

चिंतनातून ज्ञानप्राप्ती होते. 

---------------------------------


वेचलेल्या विचार कणिका - भाग 18

 वेचलेल्या विचार कणिका - भाग 18

( लॉक डाऊन च्या काळात व्हाट्सअँपची माहिती करून घेऊन त्यावर रोज वाचनात आलेले विचार पाठवायला सुरुवात केली. त्याचे हे संकलन. )


तो नच राजा, राजकुमारही

नच कोणी श्रीमंत धनाढ्यही

विख्यात न तो कोणी कवीही

नच असल्या काहीच खुणा

जग वंदी तयासच पुन्हा पुन्हा

हे घडत कसे न कळे कवणा

संतांचे वर्णन करणाऱ्या या ओळी महात्मा गांधीना तंतोतंत

लागू पडतात. 

सत्य, अहिंसा, शांती यांचा ऊद्घोष, असहकार,

सत्याग्रह हे मार्ग स्वत: अनुसरून सर्वांना अनुकरण

करण्यास प्रोत्साहन दिले. 

स्वत: चरख्यावर सूत कातून त्या खादीचे धोतर व पंचा

आयुष्य भर वापरून स्वदेशीव्रताच्या पालनासाठी लोकांना

तयार केले. 

शेळीचे सर्व व्हिटॅमिनयुक्त दूध व जे सर्वांना सहज

उपलब्ध असते ते वापरले व ते वापरण्यास प्रोत्साहन दिले. अशा आदर्शवत असणाऱ्या महात्माजींना शत शत प्रणाम!

--------------------------------------------

आज संकष्टी चतुर्थी

एक गंमत आहे, शुक्ल पक्षातील चतुर्थीचे नाव विनायकी

चतुर्थी असते, पण उपवास मात्र या चतुर्थीला केला जातो. 

व्रातपती, प्रमथपती, गणपती ही सर्व नावे ही देवता

संघटनशक्तीची आहेत हे सूचवतात. 

राष्ट्र कार्य, राष्ट्र संरक्षण यासाठी आम्ही संघटितपणे काम

करू या! 

गणपती हा सर्व विद्या व कलांचा अधिपती आहे. 

आमचे राष्ट्र जीवनावश्यक सर्व क्षेत्रात आघाडीवर असावे

यासाठी सदैव कार्यरत राहू!

जीवनाच्या सर्व क्षेत्रांत नवनवीन संशोधन करून ते ज्ञान

समाजकारणी लावून, समाजजीवन संपन्न व प्रगत बनवू

या!

--------------------------------------------

दान

राजा हर्षवर्धन, वारंवार आपली सर्व संपत्ती गरजूंना दान

देत असे. अगदी अंगावरचे चांगले कपडेही देऊन टाके.

यात त्याला सात्त्विक आनंद मिळत असे. 

राजा दिलीपाने आपला देहच सिंहाच्या क्षुधानिवृत्तीसाठी 

दिला. 

शिबी राजाने कबुतराचा प्राण वाचवण्यासाठी आपल्या

शरीरातील मास दिले. 

राजा कर्णाने स्वदेहाचे रक्षण करणारी कवचकुंडले ही

दान केली एवढेच नव्हे तर रणभूमीवर तो मरणासन्न

अवस्थेत असतांनाही कृष्णाला सोन्याचा दात काढून

दिला.  आपले दानशौर्य शेवटपर्यंत पाळले. 

याच दानपरंपरेत आचार्य विनोबा यांनी श्रमदान, भूदान

अशा कालोचित दानप्रकारांची भर घातली. चला तर

मग, आता आपल्या स्वाभिमान रक्षणासाठी राममंदिर

उभारण्यात आपला वाटा उचलू या. 

-------------------------------------

वेल रूजली की तिला पाने फुटतात, मग फुले येतात,

मग फळे येतात. 

पहाटे अरुणोदय, मग सूर्योदय. सूर्यप्रकाशात सृष्टी

न्हाऊन निघते. 

मनात हेतू येतो, मग संकल्प केला जातो, नंतर कृती

घडते. कर्तृत्व सिद्ध करता येते. 

बालपण संपले की बागुलबुवाला थारा मिळत नाही. ताक

घुसळून काढलेले लोणी ताकात परत एकजीव होत नाही.

 

रात्रीच्या पोटातून उदयाला आलेला सूर्याला रात्र कधी

दिसतच नाही. 

रात्री फुलणारी कुमुदिनी कशी दिसते हे सूर्याला माहीत

नसते. 

वाहता वारा थांबला तरी काहीवेळ झाडाची पाने डोलतच

राहतात. 

 - मामासाहेब दांडेकर

----------------------------------------

भाषासौंदर्य

जाणे अजु मी अजरू, 

अक्षयो मी अक्षरू,

अपूर्व मी अपारू,आनंदु मी! 

अचळू मी अच्युतु,

अनंत मी अद्वैतु,

आद्यु मी अव्यक्तु,

व्यक्तुही मी! 

ईश्य मी ईश्वरू,

अनादि मी अमरू,

अभय मी आधारू,आधेय मी! 

स्वामी मी,सदोदितु,

सहजू मी सततू,

सर्व मीसर्वगतु,सर्वातीत मी! 

अक्रियु मी येकु,असंगु मी अशोकु,

अशब्दु मी अस्रोत्रू,अरूपु मी अगोत्रु, 

समु मी सर्वत्रू,ब्रम्ह मी परू!

-----------------------------------

तामस कर्म

जणू पाण्यात रेघ ओढावी

कांजी घुसळावी

राख फुंकावी

वाळू घाण्यात घालावी

भूस ऊफणावे

वाऱ्याला बांधायला पाश टाकावा

हे सर्व जसे वाया जाते,तसे तामस कर्मही निरूपयोगी

असते. सर्व श्रम वाया जातात. शिवाय अनिष्ट फळही

देतात जसे-

पतंग ज्योतीवर झेप घेतो. स्वत: जळतोच पण ज्योतही

विझवतो. 

माशी घासाबरोबर माणसाच्या पोटात जाते. स्वत: तर

मरतेच, पण खाणाराला वांती होते. 

----------------------------------

कोणाजवळ कोण!

चंद्र तेथे चंद्रिका

शंभू तेथे अंबिका

संत तेथे विवेक

राजा तेथे सैन्य

अग्नि तेथे दाह

दया तेथे धर्म

वसंत तेथे वन

वन तेथे सुमन

गुरू तेथे ज्ञान

ज्ञानी तेथे आत्मदर्शन

आत्मदर्शन तेथे समाधान

भाग्य तेथे विलास

सुख तेथे उल्हास

सूर्य तेथे प्रकाश

 ------------------------------

प्रत्येक घटाघटात ईश्वरी अंश आहे. या सृष्टीतील सर्व जीव,

प्राणी, मानव यांच्यात तो विराजमान आहे. त्याचे अस्तित्व

नसलेली एकही जागा नाही. स्वत:च्या अंतरात डोकावून

बघितलेस की तुला ते कळेल. 

आकाश, जमीन, पाणी, सूर्य, पवन या पाचांचा मिळून

तयार होणारा आसरा सर्वांसाठी असतो. 

या सृष्टीत एकच जमीन, पाणी, अग्नि, आकाश, वायू, सूर्य,

चंद्र, तारे एकच आहे. 

 एकच ईश्वरतत्व सर्वत्र भरलेले आहे. 

 -समर्थ रामदास

-----------------------------

वेचलेल्या विचार कणिका - भाग 17

वेचलेल्या विचार कणिका - भाग 17

( लॉक डाऊन च्या काळात व्हाट्सअँपची माहिती करून घेऊन त्यावर रोज वाचनात आलेले विचार पाठवायला सुरुवात केली. त्याचे हे संकलन. )


आमच्या योग्य प्रगतीसाठी शासनाला सहाय्य करू! ( यजुर्वेद) 

सर्वाचे कल्याण होवो ( यजुर्वेद)

प्रजा अजेय व अक्षय अशा क्षात्रतेज व पराक्रम यांनी युक्त व्हावी(ऋग्वेद)

उत्तम प्रजा'; उत्तम राष्ट्र(अथर्व)

शासन प्रजेचा मित्र व रक्षक असावे( ऋग्वेद)

वेदातील अपेक्षित अपेक्षा पूर्ण होऊ दे !

--------------------------------------------

प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा! 

लोकांचे जीवन सुखमय करणारे शासन यशस्वी ठरते(ऋग्वेद) प्रजा सुखी झाली की शासनाची कीर्ती वाढते( ऋग्वेद)

---------------------------

आज काही म्हणी

जाणार् याचे जाते कोठाळ्याचे पोट दुखते!

नाचता येईना अंगण वाकडे!

हपापाचा माल गपापा!

अंतकाळापेक्षा माध्यान्हकाळ कठीण!

अंगाला सुटली खाज, हाताला नाही लाज!

अन्नछत्री जेवणे, वर मिरपूड मागणे!

सारा गाव मामाचा - एक नाही कामाचा!

घरोघरी त्याच परी, न सांगेल तोच बरी!

घरातल्यांचा काळ, बाहेरच्यांचा प्रतिपाळ!

काम नाही काडीचे, विसावा नाही घडीचा!

माळ्याचा मळा अन् कोल्ह्यांची भांडणे!

----------------------------------------------

आजच्या दिवशी तीन योग एकत्र आले आहेत

१- शाकंभरी पौर्णिमा - यादिवशी देवी भगवतीची आराधना करतात. 

२.गुरुपुष्यामृतयोग - पु्ष्य नक्षत्रात गुरूचे भ्रमण,

गुरुंचे नामस्मरण करावे. 

गजानन महाराजांच्या पोथीचे पारायण करावे. 

दत्तगुरुंचे स्मरण करावे. 

दत्त म्हणजे ‘ब्रम्हा विष्णू महेश’ यांचे एकत्रित कार्य. 

उत्पत्ती- स्थिती- लय यांचा एकत्रित विचार. जणू विश्वाच्या  सदैव चालणाऱ्या कार्याचे स्मरण व जाणीव. 

आपल्या जन्माचे ज्ञान व मृत्यूचे भान असेल तरच मानव आपले कर्तृत्व सिद्ध करेल व कर्तव्य पार पाडेल. त्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी या दिनाची योजना. 

मकरसंक्रमण झाले आहे. अधिकाधिक प्रकाश मिळत आहे. कर्तृत्वाला अधिक वाव मिळतो आहे. असे हे तिन्ही योग एकत्र आले आहेत. त्यापासून प्रेरणा घेऊन कार्यरत होऊ या!

------------------

वंदन

सदर गुणांचा अधिष्ठाता गणनायकाला वंदन. 

वाणींची प्रेरक शक्ती असलेल्या सरस्वतीला वंदन. 

कर्तव्यनिष्ठेचा मार्ग दाखवणार्या रामचंद्रांना वंदन. 

पूर्ण पुरुष भगवान श्रीकृष्ण, राष्ट्र गुरू समर्थ रामदास, क्षत्रिय कुलभूषण श्री छत्रपती शिवराय, ऋषीवर श्री दयानंद सरस्वती राष्ट्रद्रष्टे श्री विवेकानंद यांना वंदन. 

 अंधार दूर करणाऱ्या सूर्याला वंदन. 

वरूणदेवाना वंदन. 

हिमकणांसारख्या शुभ्र चांदण्याचा वर्षाव करणाऱ्या चंद्राला वंदन. 

मार्कंडेय यांचे पूजन, प्रयत्नवादाचा आदर्श, संयम, आरोग्यदायक सवयींचा अंगिकार, युक्ताहारविहार, दृढनिश्चय यासाठी करु या. 

अग्नि, सूर्य, इंद्र व आमचे जीवन यशस्वी होण्यासाठी सहाय्यक ठरणाऱ्या सर्वांना वंदन. 

चराचरातील सर्व शक्तींनो, ही अमुची प्रार्थना

करा अम्हाला निर्भय निर्मल,उजळू द्या जीवना!

-------------------------------------------