बुधवार, २४ डिसेंबर, २०१४

राष्ट्रीय चारित्र्य

चारित्र्य म्हणजे अनेक भल्याबुऱ्या प्रसंगांना तोंड देत असताना अवलंबिलेली नीति वा धोरण. एकदा दोन तरुण भिक्षु नदीकाठाने चालले होते. तेवढ्यात त्यांना नदीत बुडत असलेली एक स्त्री दिसली. एकाने विचार केला, "आपल्या धर्मात स्त्री स्पर्श अनैतिक मानला आहे.तिला वाचवणार कसे? दुसऱ्याने तत्काळ पाण्यात उडी घेतली व स्त्रीला बाहेर काढले. पहिला दुसऱ्याला धर्मभ्रष्ट समजू लागला. दोघांच्यात थोडा वाद झाला. दोघेही तथागतांसमोर गेले व झालेली घटना सांगितली. बुद्धांनी विचारले, "या गोष्टीला किती वेळ झाला?" उत्तर आले, "साडेतीन तास'. बुध्द उत्तरले, "दुसऱ्याने केले तेच योग्य. दया हे धर्माचे एक लक्षण आहे. आता स्त्री स्पर्शाबद्दल म्हणशील तर वाचवणाराच्या मनात तिला बाहेर काढल्या क्षणापासून स्त्रीचा विचारही आला नाही. पण तू मात्र तेव्हापासून त्याच विचारात बुडालेला आहेस. धर्मभ्रष्ट तुलाच म्हणावे लागेल."

गोष्ट वाचत असताना एक विचार मनात आला, समजा वाचवणाराच्या मनात स्त्रीबद्दल अभिलाषा उत्पन्न झाली असती तर? तिला मी वाचवले असा अहंकार निर्माण झाला असता तर? त्याने तिच्यावर केलेल्या उपकारांची फेड तिने येनकेनप्रकारेण करावी अशी अपेक्षा बाळगली असती तर?

मनाने लगेच निर्णय जाहीर केला," दयेबद्दल मिळालेल्या १० गुणातून ९.५ गुण वजा करावे लागतील आणि आलेले विचार जर कृतीत परावर्तित झाले तर त्यासाठी -९ गुण राहतील. पहिल्याची स्थितीही काही वेगळी नाही. कारण एका व्यक्तीचे दुसऱ्या व्यक्तीप्रती असणारे कर्तव्य त्याने पार पाडले नाही म्हणून गुण ०, कर्तव्यच्युतीची शिक्षा व स्त्रीचा सातत्याने विचार यामुळे त्यालाही उणे गुणच मिळतील."

एक छोटा प्रसंग. पण त्याची योग्यायोग्यता ठरवण्याचे निकष कितीतरी! अगदी 'गहनो गति:' म्हणावयास लावणारे हे निकष कोणासाठी? अर्थातच ज्याला नीतिमत्तेची चाड आहे व जाण आहे त्यांच्यासाठी. नीतिमत्तेची बंधने तरी कशाला हवीत? उत्तर आहे समाजधारणेसाठी कोणतीही अनिर्बंध गोष्ट तापदायकच ठरते. उदा. कामभावना - मला हवे आहे ही वृत्ती. त्या पाठोपाठ येते लबाडी, चोरी, अन्याय, लुबाडणे, मारपीट करणे, बलात्कार करणे वगैरे! मग समाजात विश्वास, शांती, स्थैर्य, आपुलकी दिसेल का? तसेच अनिर्बंध स्वातंत्र्याची कल्पना मनात आली की कर्तव्य बंधन वाटते. रहदारीचे नियम तोडावेसे वाटतात. कामाच्या ठिकाणी ठराविक वेळा जाणे नकोसे वाटते. टी.व्ही.चा आवाज वाढलेला राहतो. ध्वनिक्षेपक कर्कश ओरडत राहतात. वाहनांचा वेग वाढतो.सदाचाराच्या कल्पना गायब होतात. तंबाखूच्या पिचकाऱ्या कुठेही मारल्या जातात. कचरा रस्त्यावर टाकला जातो. राष्ट्रीय संपत्तीची तोडफोड होते.
मग 'मी' हाच एक भाव वरचढ ठरतो. स्वत:ची जबाबदारी टाळली जाते. समाजात वृद्धाश्रम, पाळणाघरे, शिकवणीवर्ग, अनाथालये, अपंग गृहे, भिकारी यांची संख्या वाढते. व्यक्तिगत स्वार्थ श्रेष्ठ ठरतो. मग बोफोर्स, भ्रष्टाचार, चारा घोटाळा, पेटंट मिळवण्यासाठी लांडीलबाडी, चोरी, समाजद्रोह, राजद्रोह, match fixing, जळगाव वासनाकांड, एखाद्या अधिकारपदासाठी झुंबड, परस्परांचे पाय खेचणे, आरोप प्रत्यारोपाच्या फेरी, गलिच्छ राजकारण, भेसळ ह्या सगळ्या गोष्टी दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनतात.

कलियुगात नीतिमत्ता कितीही ढासळली तरी अजूनही ह्या सगळ्या गोष्टी अयोग्यच मानल्या जातात. कारण त्या समाजविघातक असतात. या पार्श्वभूमीवर आमच्या त्रिकालदर्शी ऋषीमुनींचे शाश्वत विचार मनाची पकड घेतात. व्यावहारिक पातळीवर तसेच देहाची आवश्यकता म्हणून अर्थ व काम ह्यांनाही पुरुषार्थ मानले गेले आहे पण त्यांच्यावर नियंत्रण आहे धर्माचे व मोक्षप्राप्तीच्या इच्छेचे. कडक ब्रम्हचर्य पालनाच्या सवयीने जीवनाची सुरुवात होते व तो स्वभाव बनतो. गृहस्थाश्रमात अर्थ व काम ह्यांना स्थान मिळते पण ते वरचढ होऊ नयेत अशी काळजी घेतली जाते. वानप्रस्थ व संन्यासाश्रमात सर्व काही पैसा, ज्ञान, अनुभव समाजहितासाठी वेचले जाते. माझे इतरांप्रती असलेले कर्तव्य मनाआड होत नाही. स्वत: कष्ट सोसूनही इतरांना सुखी करण्याची इच्छा बळावते. स्वावलंबन, आत्मविश्वास, स्वाभिमान हा जीवनाचा कणा बनतो. लाचारी, लांगुलचालन, दुष्टवृत्ती, विश्वासघातकीपणा, अहंकार सगळ्यांना हद्दपार केले जाते.

राज्यं येन पटान्तलग्नतृणकं त्यक्तं गुरोराज्ञया। (गुरूच्या आज्ञेवरून राज्य ज्यांनी कपड्याला लागलेल्या गवताप्रमाणे त्यागले) अशी उदाहरणे जागोजाग आढळतात. कारगील जवानांना अन्न पोचवणारा एक तरुण उद्गारतो, ' काम पुरे होण्याआधीच मृत्यू समोर ठाकला तर एकच विचार मनात येईल, माझ्या जवानाला उपाशीपोटी लढावे लागेल" एक डॉ. कमला सोहोनी अमेरिकेत नोकरीची संधी नाकारते. एक डॉ. अब्दुल कलाम भारताला सर्वश्रेष्ठ स्थान मिळावे म्हणून रात्रंदिवस झटत असतात.

अशा एकेका व्यक्तीचे चारित्र्यच राष्ट्रीय चारित्र्य घडवत असते म्हणूनच प्रत्येक 'मी' ला राष्ट्राचा जबाबदार घटक असण्याची जाणीव सतत जागृत ठेवावी लागेल. माझ्या चारित्र्याने राष्ट्राचा गौरव वाढणार आहे तर माझ्या एखाद्या अयोग्य वर्तनाने राष्ट्राला मान खाली घालावी लागेल हे लक्षात ठेवावे लागेल. राष्ट्राचा अपमान मला 'बाणासारखा' बोचला पाहिजे. स्वभुमी, स्वभाषा, स्वभूषा, स्वभोजन, स्वसंस्कृती व इतिहास ह्यांचा अभिमान बाळगला पाहिजे. त्याच बरोबर हेही लक्षात ठेवायला हवे कि अश्या चारित्र्य संपन्न व्यक्ती तुरळक असून चालणार नाही.सगळ्या समाजजीवनाची उंची वाढायला हवी.

आजकाल एक प्रश्न समोर येत आहे, वैयक्तिक चारित्र्य व राष्ट्रीय चारित्र्य यांचा परस्पर संबंध काय? वैयक्तिक चारित्र्यानेच राष्ट्रीय चारित्र्य घडते हे खरे आहे, पण कधी कधी तरतमभावाचा विचार करावाच लागतो. सत्यनिष्ठ युधिष्ठिराला 'नरो वा कुंजरो वा ' म्हणावे लागते. हनुमंताला माझा प्राण शेपटीत आहे सांगावे लागते. 'संभाजी मेला' असे कटू शब्द शिवाजीराजांना मातेसमोर उच्चारावे लागतात. तसेच वैयक्तिक चारित्र्याच्या अहंभावाने कर्णाला कवच कुंडले गमवावी लागतात. बळीराजाला पाताळ गाठावे लागते तर राजे जयसिंहाना स्वजातीयांकडून अनादर प्राप्त होतो.

पण हा प्रश्न मुख्यत: उपस्थित होतो त्या लोकांकडून जे विचार करतात कि माझे वैयक्तिक चारित्र्य हे सामाजिक वा राष्ट्रीय मान्यतेपेक्षा वेगळे आहे. एकपत्नी रामाची भूमिका करणारा नट मदिरा व मदिराक्षीच्या विळख्यात अडकलेला आढळतो. एखादा पुढारी हवाई सुन्दरीबरोबर अश्लील चाळे करतो. अशांचा आग्रह असतो कि ह्या गोष्टी क्षम्य मानल्या जाव्यात. पण हे नेहमीच लक्षात ठेवायला हवे कि समाज अशा गोष्टींकडे कधी कधी कानाडोळा करत असला तरी अशा गोष्टी निन्द्यच आहेत. भारतीय विचार पध्दती समग्र दृष्टीकोन ठेवते. अलग अलग तुकड्यांचा विचार न होता एकसंध जीवनाचा विचार होतो. म्हणूनच वैयक्तिक चारित्र्य व राष्ट्रीय चारित्र्य हे वेगळे मानले जात नाही व जाउही नये.

नमस्कार

"हस्तांदोलन करा व लढत सुरु करा " हा पंचांचा मुष्टियोद्ध्यांना सल्ला असतो. "मग आवळलेल्या मुठींनी एकमेकांवर प्रहार करा. "खरे तर बाहेरही पुष्कळदा हस्तांदोलन हे थोडे बहुत अस्वस्थ करणारे असू शकते. भारत वा आशियाई देशातून कांही दिवसांच्या वास्तव्यानंतर जेव्हा पाश्चिमात्य राष्ट्रांत कोणी जातो तेव्हा, विशेषत: अनोळखी व्यक्तीचा, एकाएकी समोर आलेला हात त्याला भयकारक, अनिष्टसूचक वाटू शकतो. थोड्याच काळात हस्तांदोलनाचे भयकारक दर्शन नष्ट होउन तो परिस्थितीशी जुळवून घेतो.

कदाचित त्या क्षणाची भयकारकता ही हस्तांदोलनाच्या इतिहासातून उत्पन्न झाली असेल. मानववंशशास्त्रज्ञांच्या मतानुसार ही पध्दत सरदारशाहीच्या काळात मध्य युरोपमध्ये सुरु झाली. फारच थोडे जण शूर व उदार होते. पण बव्हंशी आपल्या प्रतिस्पर्ध्यासमोर छुप्या शस्त्रासह येत व योग्य अंतरावर आल्यावर सुरा वा तलवारीने त्याला मारत.

शत्रूच्या दुष्ट हेतुची भीती वाटत नाही असे दाखवण्यासाठी सरदार आपला वरवर मोकळा हात समोरच्याच्या पुढे करीत. ही क्रिया विश्वासाची हमीदर्शक असे. जणू काही सुचवत असे की मी निशस्त्र आहे. आपण सुरक्षितपणे भेटू या. नंतर काही काळानंतर हावभावातील घातकता कमी झाली व एकमेकांना भेटण्याची ती खूण झाली.

पूर्व युरोपमध्ये व अरब राष्ट्रांत आलिंगन देणे वा गालाचे चुंबन घेण्याची प्रथा आहे. जपानमध्ये खाली वाकून आदर दर्शवतात तर हवाई राष्ट्रात 'होनी'ची प्रथा आहे. होनी म्हणजे नाकाजवळ नाक न्यायचे व श्वासात ( जो प्राण वा जीव आहे) सहभागी व्हायचे.

हिंदू मात्र 'नमस्ते'ला प्राधान्य देतात. दोन्ही जोडलेले हात हृदयाशी धरून मस्तक नमवून नमस्ते म्हणावयाचे. नमस्ते म्हणजे एक मंत्र व एक मुद्रा. प्रार्थनेसह हातांची स्थिती म्हणजे मुद्रा -अंजली. (मूळ धातू अंज- भूषवणे, आदर दर्शवणे, सुशोभन करणे)

एकत्र जोडलेले हात द्वैतातून अद्वैत सुचवतात, आत्मा व भौतिक ह्यांना एकत्र आणतात. व्यक्तीची आत्म्याशी ओळख घडवतात. उजवा हात आपल्यातील दैवी गुण तर डावा हात भौतिक स्वभाव सुचवतात.
नमस- अर्थ -नमणे, वंदन करणे, सादर प्रणाम करणे.
नम- नम्रतापूर्वक शरण जाणे, शांत होणे.
ते- तुला, तुम्हाला
नमस्ते- मी तुम्हाला वंदन करतो. परस्परांना भेटण्याची कृती म्हणजे नमस्कार.
नमस्ते ही जे जे भारतीय त्याची प्रचीती आणून देणारी प्रतिमा आहे. खरे तर प्रवासी पुस्तिका, पत्रक, दिनदर्शिका, जाहिरात ह्या सर्वावर जोडलेल्या हाताची प्रतिमा असावी. त्यातून भारताची आतिथ्यशीलता, सभ्यता, अध्यात्मिकता व दयाळू वृत्ती प्रतिबिंबित होईल.

नमस्काराबाबत प्रगाढ पूज्यबुध्दी दर्शविण्यासाठी काहीवेळा जोडलेल्या हाताची बोटे कपाळाच्या मध्यभागी टेकवतात, जो भाग अध्यात्मात तिसरा डोळा मानला जातो.

तिसरा प्रकार म्हणजे जोडलेले हात डोक्यावर ठेवणे. ब्रम्हरंध्रावर जाणीवेला केंद्रित करण्यासाठी हा प्रकार, फक्त देव किंवा सद्गुरुना वंदन करताना उपयोजितात.
छोट्या कृतीतून आपल्या जीवनावश्यक संकल्पना व्यक्तिगतरित्या साकार होत असल्याने, प्रत्येक देश व वंश यांच्या दररोजच्या जीवनातील सांस्कृतिक पध्दती व रीतीभाती, त्यांच्या नैसर्गिक, भावनिक संकल्पना स्पष्ट करतात हे मोठे मौजेचे आहे. उदाहरणार्थ एकच काम करण्यासाठी जपानी व अमेरिकन हत्यार निर्माता वेगवेगळी कृती करतात. लाकूड कापणारी करवत अमेरिकन अशी हलवतो की ती शरीरापासून दूर असताना कापण्याचे काम करते तर जपानी ती करवत स्वत:कडे ओढत असताना कापण्याचे काम होते. छोटी कृती पण फरक मोठा.

अमेरिकन करवत वाकल्यानंतर मोठी शक्ती निर्माण करेल तर जपानी करवत स्वत:वरचे सुताराचे नियंत्रण, कामातील सौंदर्य अगदी थोड्या श्रमात साध्य करेल. दोन्ही करवतीना वैश्विक हत्यारांच्या पेटीत स्थान आहे पण प्रत्येक ( हस्तांदोलन व नमस्काराप्रमाणेच ) मानवाचे त्या वस्तूशी असलेल्या नात्याबद्दल त्यांच्या त्यांच्या संकल्पना स्पष्ट करेल.

पौर्वात्य व पाश्चात्य संस्कृती या स्वागत प्रकारात सामावलेल्या आहेत. हस्तांदोलन 'दुसऱ्याला' भेटण्यासाठी आडवे क्षितिजसमांतर पध्दतीचे असते तर नमस्कार हा लंबरेषात्मक असून अद्वैत दर्शवतो. हस्तांदोलन इतरांशी बरोबरी दर्शवते. स्वत:चे सामर्थ्य वा दौर्बल्य, आक्रमकता वा सहनशीलता व्यक्त करते, भौतिकता स्पष्ट करते.

आपण सर्वशक्तिमान परमेश्वराला, पवित्र व्यक्तीला, पवित्र स्थानालासुध्दा नमस्कार करतो. पवित्रता जाणण्याची आपली आंतरिक शक्ती त्यात प्रतिबिंबित होते. सर्व जीव दैवी आहेत, ही मानसिकता जाणवून देते. परमात्मा सर्वत्र भरलेला आहे व प्रत्येक प्राणिमात्रात त्याचा अंश आहे हा भाव व्यक्त होतो. जणू आपण व्यक्त करत असतो,"आपणां दोघांमधील दैवत्व मला दिसते आहे व त्याच्यापुढे मी लीन होत आहे".
शिवाय सार्वजनिक देवघेवीसाठी तो फारच चांगला आहे. एक राजकारणी, एक नट, एक वक्ता एकाच नमस्कारातून हजारो लोकांना एकाच वेळी भेटू शकतो व तेही त्याला प्रतिसाद देतात.

अंजली मुद्रा हे एक सोपे योगासन आहे, ज्याच्यामुळे शरीराच्या सर्व शक्ती संतुलित व सुसंवादित राहतात, केंद्रीभूत होतात, अंतर्भागात जमतात व मानसिक संरक्षण करतात. आपल्या दैवी जागृतीशी आपल्या आंतरशक्तीशी निगडीत ठेवतात.

सर्व सृष्टी पवित्र व दैवी आहे ही जाणीव जागृत होते. समोरच्यातील दैवी अंशाचा सन्मान व पूजन करते. परस्परसंबंध मृदू करते. मैत्री व दया जागृत करते. आभार व्यक्त करते. अहंभाव, स्वकेंद्रितता नष्ट करते. स्वसामर्थ्य संरक्षून पावित्र्य निर्माण करते.
-सुशील अभ्यंकर


 

शुक्रवार, २१ नोव्हेंबर, २०१४

राम कोदंड

एक साधे धनुष्य! पण ते रामाच्या हातात जाते तेव्हा कोदंड बनते. जणू काही सांगत असते,"दंडनीय कोण आहे? त्यालाच फक्त या धनुष्यापासून भीती आहे." राम हा सातवा अवतार. ज्या ज्या वेळी पृथ्वीवर अधर्म माजतो, काही कारणाने हा:हाकार उडतो तेव्हा तेव्हा ईश्वर अवतार घेऊन तिचे रक्षण करतो आहे, हे दशावतार कथेवरून लक्षात येते. रक्षण करण्यासाठी आवश्यक असते शक्ती!

शक्ती ही वेगवेगळ्या प्रकारची असते. देहातील शक्ती असेल, बुद्धीची असेल, अर्थशक्ती असेल वा नैतिक असेल. कधी तप:शक्ती असेल तर कधी ज्ञानशक्ती असेल. कधी शब्दांचे सामर्थ्य असेल, कधी शस्त्रांचे तर कधी अस्त्रांचे, कधी मंत्रांचे तर कधी तंत्रांचे! कधी धर्मकारणाचे तर कधी राजकारणाचे. कधी प्रेमाचे असेल तर कधी नेमाचे असेल. पण अशी शक्ती, असे सामर्थ्य असणे आवश्यक असते हे निश्चित.

या सामर्थ्याचा उपयोग कशासाठी करायचा हे त्या शक्तीधारकांच्या विचारांवर अवलंबून असते. रामाने आपल्या सामर्थ्याचा उपयोग ऋषी, यज्ञ व राष्ट्र रक्षणासाठी केला तर रावणाने मात्र स्वत:च्या स्वार्थासाठी केला. रामशक्तीने अभय दिले, आत्मविश्वास जागवला, अन्यायाच्या प्रतिकाराची प्रेरणा दिली व दहशतवाद संपवला. रावणाच्या शक्तीने भय निर्माण केले, अनेक युद्धे झाली, भयानक संहार घडला, न्यायनीति पायतळी तुडवली गेली. रामशक्तीने स्त्रीसन्मानाचे रक्षण केले तर रावणशक्तीमुळे स्त्रीवर अन्याय झाला, तिचे अपहरण झाले व तिला बलात्काराला सामोरे जावे लागले. रामाच्या हाती ऋषिगणांनी विश्वासाने धनुष्य बाण सोपवले तर रावणाने भोळ्या सांबाकडून मिळवलेले आत्मलिंग त्याच्या जवळून काढून घेण्यासाठी गणपतीला गुराखी बनावे लागले. रामाने यज्ञरक्षण तर रावणाने यज्ञविध्वंस केला. म्हणूनच कृष्णाला 'परित्राणाय साधूनाम' म्हणून थांबता आले नाही, 'विनाशायच दुष्कृताम' हेही वदावे लागले.

'विद्या विवादाय धनं मदाय बलं परेषां परपीडनाय
खलस्य साधो S विपरितमेतद ज्ञानाय दानाय च रक्षणाय ।।
खळाची, दुष्टाची विद्या विवादासाठी, धन हे अहंकारपूर्तीसाठी, बळ हे दुसऱ्याला पीडा देण्यासाठी असते तर सज्जनाची विद्या ज्ञानदानासाठी, धन हे दानासाठी तर बळ हे सज्जनांच्या रक्षणासाठी असते.

शक्ती प्राप्त झाली की आत्मविश्वासाची मर्यादा ओलांडून ती अहंकाराच्या, मदाच्या प्रांतात कधी शिरते ह्याचा पत्ता लागत नाही हे मात्र खरे! ही मदोन्मत्तता अनेक अनैतिक, दुष्ट, क्रूर कृत्यांची जननी ठरते. विजयामागून विजय मिळत गेले आणि रावण, हूण, सिकंदर, मुस्लिम हे अधिकाधिक क्रूर बनत गेले असे इतिहास सांगतो म्हणूनच मनाची नियंत्रणशक्ती ही शस्त्रशक्तीपेक्षा मोठी असणे आवश्यक असते.

कधी कधी सज्जन लोक हे शक्तीसंपादनाकडे दुर्लक्ष करतात असेही दिसते. वास्तविक आपले सगळे देव शस्त्रयुक्त आहेत. जणू काही सांगत आहेत की सात्विकता, सुजनता, रक्षणासाठीही शस्त्रांची मदत आवश्यक असते. नुसते शस्त्रधारणही दुर्जनांवर काही प्रमाणात नियंत्रण ठेवते. 'अरे' ला 'कारे ' हे प्रत्युत्तर येणार असे वाटले तर मग 'अरे' म्हणण्याचे धैर्य फारसे कोणी दाखवत नाही. भारत अणुशक्तीसंपन्न झाला आणि अनेक देशांची गुरगुर थंडावली हा अनुभव आपण घेतलाच आहे. जगाचा न्यायच आहे, 'अजपुत्रां बलि दद्यात!'

जेव्हा जेव्हा एखादा समाज ह्या शक्ती आराधनेकडे दुर्लक्ष करतो तेव्हा तेव्हा तो समाज इतरांच्या भक्ष्य स्थानी पडतो ह्याची अनेक उदाहरणे जगाच्या इतिहासात सापडतात. वसिष्ठांची कामधेनु हरण करण्याचा प्रयत्न विश्वामित्रांनी केला तेव्हा वसिष्ठ आपले रक्षण करू शकत नाहीत हे पाहून त्या कामधेनुनेच स्व रक्षणासाठी अनेक सैनिक निर्माण केले. अहिंसेचा आत्यंतिक उदो उदो आपण केला तेव्हा आपल्यावर आक्रमणे झाली. साधूचा 'कोणाला चावू नकोस' या उपदेशाचे पालन करताना नाग स्वत:चे फुसकारणे विसरतो आणि लहान मुले दगड मारून त्याला रक्तबंबाळ करतात. मग साधूला सांगायला लागते, चावू नकोस पण फुस्कारायचे विसरू नकोस. "फुसकारणे" हा सुध्दा एक शक्तीचा अविष्कारच असतो.

शक्तीच्या अविष्कारासाठीसुध्दा शक्ती लागते. मनगटात शक्ती असेल तरच शस्त्र चालवता येते. तलवार ज्याला उचलवत नाही तो ती फिरवणार कशी? मनगटात असलेली शक्ती वापरायलाही मनाची शक्ती लागते. ती नसेल तर हातातली तलवार शत्रूला बघताच गळून पडते आणि हातपाय लटपटायला लागतात. म्हणूनच शरीर समर्थ करण्याइतकेच लक्ष मन खंबीर करण्याकडेही द्यावे लागते.

शब्दालासुध्दा किंमत येते ती त्यापाठच्या शक्तीमुळेच. 'स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे व तो मी मिळवणारच' हे लो. टिळकांचे शब्द असतील वा "मेरी झांसी नही दूंगी।" हे झाशीच्या राणीचे शब्द असतील, त्या मागे उभी होती ती त्यांची राष्ट्रार्थ त्यागाची मानसिक तयारी व त्यांचे कार्य. रामायणातही आपण पाहतो की कुबेराने पाठवलेल्या दूताचे तुकडे तुकडे रावण दरबारात झाले पण अंगद जेव्हा रामाचे दूतत्व करायला रावण दरबारात गेला तेव्हा त्याचे तुकडे तुकडे करावेत असा विचार रावणाच्या मनात येउन सुध्दा तो प्रत्यक्षात उतरू शकला नाही. कारण रामाचे सैन्य लंकेजवळ येउन पोचले होते.

फक्त आपण सज्जन असून चालत नाही. आपली सज्जनता, तिची किंमत समोरच्याला कळली तरच तिचा उपयोग असतो. पण शक्तीची भाषा मात्र सर्वांनाच कळते. शक्तीचा, शस्त्राचा उपयोग कदाचित करावाही लागणार नाही. पण ते जवळ बाळगणे नेहमीच आवश्यक असते. किंबहुना शस्त्र नसले तरीही आवश्यकतावश उपलब्ध कोणत्याही गोष्टीचा उपयोग शस्त्रासारखा करण्याची मानसिक तयारी, धैर्य व प्रसंगावधान असणेही आवश्यकच असते. मग ओबव्वा मुसळाने शत्रुला थोपवू शकते तर पद्मिनी सजलेल्या पालखीत बसून जाण्याचा मनोदय जाहीर करून भीमसिंहाची सुटका करते.

कलियुगात महत्व आहे ते संघशक्तीचे. संघटना ही एक अद्वितीय शक्ती आहे. म्हटले तर ती एकीत आहे पण ही शक्ती त्या संघटनेच्या प्रत्येक पाईकांत विखुरलेली अहे. प्रत्येकाच्या मागे ती उभी असते.

आज सगळ्या जगाला प्रत्येक बाबतीत अमेरिकेचा विचार विचारांत घ्यावा लागतो. ह्याला कारण आहे अमेरिकेची अर्थशक्ती आणि तिच्या सहाय्याने घडून आलेली भौतिक प्रगती! सिकंदर जेव्हा भारतात आला तेव्हा शस्त्रसज्ज सैन्य असूनही तो पराजित झाला तो भारतीय ऋषीमुनींच्या अध्यात्मिक शक्तीमुळे व भारतीयांच्या विजिगीषु वृत्तीमुळे!धर्मान्तरणाच्या लाटेत अनेक देश वाहून जात असताना भारत ती लाट बव्हंशी प्रमाणात थोपवून धरू शकला त्याच्या दुर्दम्य इच्छा शक्तीमुळे.

'हा हन्त हन्त नलिनी गज उज्जहार ' ह्या श्लोकाच्या पूर्वार्धात लक्षात येते ती कमळाची आकर्षण शक्ती, जी त्याच्या सौदर्याने, कोमलतेमुळे व सुगंधाने निर्माण झाली आहे. शक्तीची ही विविध रूपे शक्ती आराधनेची आवश्यकताच प्रतिपादन करतात.

म्हणूनच समर्थ उद्गारतात 'शक्तीने मिळती राज्ये।'. किशोरजी व्यास म्हणतात,'श्रीरामाचे कोदंड हे जीवनातील महत्वाचे तत्वज्ञान आहे ' तर राष्ट्र सेविका समितीच्या सेविका विश्वशक्ति व मातृशक्तिला आग्रहपूर्वक विनवतात 'समुत्पादयास्मासु शक्तिं सुदिव्याम।'

मंगळवार, २४ जून, २०१४

भीमरूपी महारुद्रा …

समर्थ रामदासांनी मारुती स्तोत्राची रचना केली आहे. पहिल्या श्लोकातील प्रत्येक शब्द अतिशय सूचक वापरला आहे. 'भीमरूपी' म्हटले की समुद्रोल्लन्घनावेळी मारुतीने धारण केलेला प्रचंड आकार लक्षात येतो. रामायणकाली विमान होते, पण राम वा राममित्र सुग्रीवाकडे ते नव्हते. लंकेच्या मार्गाने, सीतेला नेले आहे ही निश्चित माहिती मिळाली होती. आता तिला लंकेतच ठेवले आहे का, हे शोधायचे होते. ' शंभर योजने' सागर उल्लंघून जायचे होते. मध्येच दम संपला तर सर्वच संपणार होते. एवढेच नव्हे तर समुद्र ओलांडल्यानंतरही शत्रूराज्यात येणाऱ्या संकटांना तोंड द्यायचे होते. अशा वेळी मनाची व शरीराचीही तितकीच तयारी असणे आवश्यक होते. एकदा हे करावयाचे असे ठरले की मानसिक तयारी होते पण शारीरिक तयारी कशी काय इतक्या लवकर केली असेल? असा प्रश्न उभा राहतो.

रामसैन्यात उड्डाण करू शकणाऱ्या वानरांचे एक पथक होते. त्यांचा प्रमुख ऋषभ असून मारुती हा त्यापैकी एक होता. आपल्याला आठवेल की आधी ऋष्यमूक पर्वतावरील वानरांत चर्चा झाली होती, कोण किती लांब जाऊ शकेल त्याची. मारुतीला मात्र त्याच्या शक्तीची आठवण करून द्यायला लागली व मगच तो उड्डाणाला सिद्ध झाला. या उड्डाण पथकातल्या वानरांजवळ उडता यावे अशी काही सामग्री असावी. त्यांचा उपयोग व शरीरसामर्थ्य यांच्या बळावर मारुती एवढे अंतर आकाशमार्गे पार करू शकणार होता. स्वाभाविकच ही सामग्री शरीरावर चढवली की शरीराचा आकार मोठा दिसत असणार. पाणबुडे नाही का, पाणबुड्यांचा वेश चढवल्यावर लठ्ठ दिसतात.

महारुद्रा' -राम - रावण युध्दात एकदा मारुती व रावण एकमेकांस भिडले. बुद्धिमतां वरिष्ठं' मारुतीने रावणाला आठवण दिली, 'वानरांपासून तुला मृत्युभय आहे. तुझा पुत्र अक्ष मीच मारला'. शत्रूचे मानसिक धैर्य खच्ची करण्याचा हा प्रयोग. चिडून रावणाने प्रहार केला अन मारुतीने ठोशास ठोसा दिला, तो इतका जोराचा की महाबलाढ्य रावण कोलमडून पडला.

'वज्रहनुमान' - पुढे सविस्तर वर्णन आहे 'आरक्त देखिले डोळा, ग्रासिले सूर्यमंडळा '- आरक्त फळ समजून जन्मताच सूर्याला खाण्यासाठी मारुती धावला. सूर्य अस्त झाला तर पृथ्वीवरील जीवनच संपणार. सर्व सजीव संपणार. म्हणून इंद्राने वज्राचा प्रहार केला तो मारुतीच्या हनुवटीवर, म्हणून तो वज्रहनुमान. इंद्राने वायुसुतावर केलेल्या प्रहाराने वायु रुसला व दरीत जाऊन बसला. पुन्हा प्रश्न आला. वायुशिवाय जीवन अशक्य. मग इंद्राने वर दिला की वज्राने हनुमानाला मृत्यू येणार नाही.

मारुती -मरुत =वायु. त्याचा पुत्र मारुती, वायुसारखाच वेगवान. लंकेपासून हिमालयात औषधी वनस्पती आणायला जायचे. स्वाभाविकच कोटीच्या कोटी उड्डाणे करावी लागली. 'झेपावे उत्तरेकडे। मंद्राद्री सारखा द्रोणू क्रोधे उत्पाटिला बळे।' ज्या वनस्पती आणायच्या त्या रात्री चमकणार, दिवसा कशा सापडतील? थांबायला तर वेळ नव्हता, मग पर्वतच उपटून उड्डाण केले. वेग किती?
'आणिला मागुती नेला, आला गेला मनोगती ।
मनासी टाकिले मागे, गतीसी तुलना नसे।' म्हणूनच प्रभंजना.
 
मनाचा वेग कधी मोजता आलाय का? आता हे चमकणाऱ्या वनस्पतीचे वर्णन वाचता वाचता मन दक्षिण अमेरिकेतील पेरूमधील विलक्षण चमकणारा व रामायणात ज्याचे वर्णन सापडते तो 'त्रिशूल' बघायला धावले नसेलच असे सांगता येणार नाही.

वरारि - पोचलो न आपण लंकेतील वनात. सीतेची भेट झाली, पण रावण दरबाराची माहिती मिळवायची राहिली अन आपल्याला ज्याच्याशी युध्द करायचे आहे त्याच्या मनात थोडी भीती, थोडीशी आशंका निर्माण करता आली तर अधिकस्य अधिक फलं! मग झाली योजनापूर्वक अशोकवनाच्या विध्वंसाला सुरुवात.

अंजनीसुता -वीरमाता अंजनीचा हा पुत्र. वीरकन्या, वीरभगिनी, वीरपत्नी बनणे हे तसे सोपे पण वीरमाता हे पद महत्प्रयासाने प्राप्त करावे लागते. रावणविजय प्राप्त करून राम परत निघाले आहेत. वाटेत अंजनीमातेची भेट घेण्यासाठी थांबले आहेत. प्रत्यक्ष भेटीत राम उद्गारत आहेत,"हनुमंताच्या मदतीमुळेच मला हा विजय मिळालाय." पुत्राच्या कौतुकाने निथळण्याऐवजी अंजनी संतापली आहे. ती म्हणते आहे, "हनुमान प्रत्यक्ष असताना तुम्हाला एवढे कष्ट पडण्याची आवश्यकता नव्हती. माझे दुध जो प्यायला आहे त्याला अशक्य काहीच नाही."

अशी शिकवण, असे संस्कार ज्याला दुधाच्या घोटाबरोबर मिळाले आहेत तो हा अंजनीसुत स्वाभाविकच.
"ब्रम्हांडाभोवते वेढे वज्रपुच्छे करू शके।
तयासी तुलना कैसी ब्रम्हांडी पाहता नसे।"
रामदूता- हे तर हनुमंताचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य. रामरक्षेत एका श्लोकात वर्णन आहे. 
"मनोजवं मारुत तुल्यवेगं
जितेन्द्रियं बुध्दिमतां वरिष्ठं
वातात्मजं वानरयुथमुख्यं
श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ।"

यातील एकेक विशेषण लक्षात घेतले तरी स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व, स्वतंत्र सत्ता स्थापन करणे हनुमंताला सहज शक्य होते. पण रामकार्यात एक सेवक म्हणून सहभागी व्हायचे त्याने मान्य केले. शक्ती होती,बुध्दी होती, चपळाई (वेग) होती, इंद्रिये जिंकलेली होती, वायुसारखा समर्थ पिता होता, हाताशी वानर समूह होता; पण त्याचसोबत लीनताही होती. स्वत:चे स्वतंत्र साम्राज्य स्थापन न करता, चाललेल्या लोककल्याण कार्यात म्हणूनच तो सहभागी झाला.

या स्तोत्राचा जनकही तसाच 'रामदास' बनला. समर्थ रामदास म्हणजे समर्थ असूनही दास व दास असूनही समर्थ! अशा या रामदुताचे स्मरण सगळ्यांना सामर्थ्य प्रदान करणारे -सकळा उठवी बळे -सौख्यकारी, दु:खहारी न बनले तरच नवल!!!

बुधवार, २३ एप्रिल, २०१४

II मंत्र पुष्पांजली II - भाग 3

स्वाराज्यं
स्वराज्य न लिहिता स्वाराज्यं का म्हणले असेल अशी शंका ताबडतोब मनात येते.स्वराज्य अन स्वाराज्य यात काही फरक असेल का? 'नाही व फारसा नाही' अशी सर्व मते असलेली दिसतात. स्वराज्य म्हणताच आठवतात शिवराय व स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे गरजणारे लोकमान्य! अगदी वरवर पाहिले तर देशातील रहिवाश्यांच्या मताप्रमाणे चालणारे शासन असा अर्थ लक्षात येतो. शिवराय व लोकमान्य दोघांच्याही काळात परकीय लोकांचे शासन येथे होते व जणू काही त्याच्या विरोधात स्वराज्य हा शब्द वापरला आहे असे वाटते.
पण स्वराज्य ही संकल्पना तर भारतात फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. ऐतरेय ब्राम्हणात याचा उल्लेख आहे. पं.सातवळेकर यांचे मते दोन्ही एकच आहेत पण स्वराज्य - शासन यंत्रणा ही प्रत्येक नागरिकाच्या संमतीने बनते व चालवली जाते. स्वाभाविकच "स्व"चे कल्याण, प्रगती ही सर्वोपरी असते. प्रत्येक "स्व" चा उत्कर्ष होईल तितके स्वराज्य भरभराटीला येईल. 

तर डॉ. विश्वनाथ प्रताप वर्मा या शब्दाचे पृथःकरण करतांना म्हणतात, "मनःप्रवृतींवर बुद्धीचे नियंत्रण व त्यानुसार व्यक्तीची वर्तणूक व मग स्वाभाविकच "स्व" च्य विचारांपेक्षा सर्वांच्या कल्याणाचा विचार अधिक प्रभावशाली होईल व असे शासन म्हणजे "स्वाराज्य". हे गतिशील, सुस्वभावी, अध्यात्मिक प्रवृतींच्या हातात जेव्हा शासन असते तेव्हा आदर्श अशा सामाजिक व राजकीय पद्धती निर्माण होतात.
अथर्ववेदात स्वाराज्य ची लक्षणे सांगितली आहेत. 
(१) आपल्या पूर्वसुरींचे, संतांचे व सर्वेश्वराचे स्मरण सतत ठेवणे. 
(२) सदाचरण, सद्प्रवृत्त व नियमाधारित राज्यतंत्र. 
(३) अध्यात्म विचाराधीन जनता. 
सायाणाचार्य लिहितात- वैदिक तंत्राधारित चालणारे राज्य. 
कथक संहिते नुसार- स्वाराज्य हे कल्याणकारक व त्यागाधारित असते. 
पाणिनी म्हणतात - स्वाराज्य हे सुराज्य असायला हवे. 

ऋग्वेदातील "रंतव्य' ऋषींनी गायलेल्या मंत्रानुसार स्वाराज्याच्या प्रमुखाला विशेष शिक्षण दिले जात असे. 
(१) विशाल दृष्टिकोनाचा असावा - सर्वांचे हित, सर्वाना मदतीस तत्पर व पवित्र असावा. समाज निरोगी, सुखी व खंबीर, निर्भय होईल असे त्याने वागले पाहिजे. 
(२) तो मित्र, तत्वज्ञ व मार्गदर्शक असावा. 
(३) तो विद्वान, शहाणा व पवित्र असावा. 
या साठी विविध संस्कारांची व प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाई.
 
स्वाराज्याची वैशिष्ठे. 
(१) व्याशिष्ठ्य- विशालता, सर्वसामावेशकता, लवचिकता, क्षुद्र मनोवृतींपासून मुक्तता. (सर्व कल्याणाची चिंता) 
(२) बहुपाय- विविध संरक्षणव्यवस्थामुक्त 


शासन पद्धत्ती
ऋग्वेदात या संबंधी १६ श्लोक आहेत व त्याला नाव आहे स्वाराज्य अर्चन त्यातील विषय- 
(१) सरहद्द संरक्षण 
(२) सागरसीमा रक्षण 
(३) जलस्त्रोत्र रक्षण 
(४) भूसंरक्षण 
(५) अंतरीक्ष संरक्षण 
(६) शास्रास्त्र संचय 
(अ) निरुपयोगी व झिजलेली नसावीत. 
(आ) संरक्षक व सर्वांवर मात करणारी असावीत. 
(इ) चांगल्या व टिकावू धातूची असावीत 
(ई) अशनी- क्षेपणास्त्रे 
(७) आततायी वध 
(८) शेती व पाटबंधारे 
(९)औषधोपचार 
(११) सेवा 
(१२)पाणीपुरवठा 
(१३) वैभव संपन्नता  
या विवेचनावरून लक्षात येते- स्वाराज्य =स्वराज्य+सुराज्य. 

पारमेष्ट्यराज्य
समर्थ रामदासांनी म्हटले आहे,
"सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करेल त्याचे, 
परंतु तेथे पाहिजे, अधिष्ठान भगवंताचे." 
चळवळ, नवीन कार्याची सुरवात व चालू कार्याचे संचलन आपणच मानवांनीच करायचे आहे पण अधिष्ठान मात्र भगवंताचे, जे जे सत आहे चांगले आहे त्याचे असले पाहिजे आणि हीच भारतीय मनोवृत्ती आहे. 
पारमेष्ट्यराज्य शब्द उच्चारताच मनात कुठेतरी परमेष्टीची जाणीव होतेच आणि पारमेष्ट्यराज्याचा अधिपति राजा याच्याही मनात ज्या राज्यावर आपण राज्य करणार आहोत ते राज्य म्हणजे देवांनी आपल्याला दिलेली देणगी आहे असा भाव असावा असे अपेक्षित आहे. असा जो प्रमुख त्याला "प्रजापती" असे म्हटले आहे. प्रजेबद्दलची आपुलकी, कळवळा, प्रजाहित दृष्टी, तसे कर्तृत्व असा सगळा बोध या शब्दाने होतो. म्हणूनच सर्वात श्रेष्ठ व उत्तमगुणयुक्त व्यक्तीची योजना या पदासाठी होत असे. 

आजही शंकराचार्य, दलाई लामा या पदांची योजना अशीच होते. अशी व्यक्ती शोधणे व त्या व्यक्तीला त्या पदासाठी आवश्यक प्रशिक्षण देणे याची काळजी घेतली जाते. 
हा प्रजापती राज्यातील विद्वान हितचिंतकांच्या सहाय्याने आपले सहकारी शोधतो, निवडतो. त्यांच्या गुणांनुसार त्यांना काम देतो. अधिपतिइतकेच महत्व या सहकारी मंडळाला असते. अथर्व वेदात म्हटले आहे, प्रजापती ब्रम्हचारी असावा. शत्रूविनाशक असावा. शौर्य, धैर्य, सामर्थ्य यांनी परिपूर्ण असावा. असा प्रजापती स्वाभाविकच स्वयंप्रेरित असेल व प्रजेच्या प्रगतीकडे त्याचे लक्ष केंद्रित असेल.
 
शासन पद्धति
खेडे हे एक एकक (कुल) मानून त्यावर एक कुलाप. अशा काही कुलांचा मिळून एक वज्र. त्यावर एक वज्रपती. त्यापेक्षा वरचा गण- गणपती. अशांचा समूह - गणराज्य. 


कुलाप- ही संकल्पना सुद्धा प्रजापती प्रमाणे एक व्यक्ती नसून त्याचे सहकारीही (जे त्याग बुद्धी व कर्तृत्ववान आहेत.) त्यात अंतर्भूत आहेत. या पदावर स्त्रियांचीही योजना केली जात असे. प्रजापतीच्या सहाय्यासाठी सभा व समिति अशी दोन मंडळे असत. अशा मंडळांना प्रजापती म्हणतो, "आपण जेष्ठ श्रेष्ठ लोक मला माझे काम नीट चालावे म्हणून आशीर्वाद द्या. आपण मला सहकारी समजून योग्य वाटत असेल ते मोकळेपणाने बोला. 

न्यायदान अधिकार - अंतिम निर्णय प्रजापतीचा असेल, पण त्याआधी त्याने काळजीपूर्वक व सूक्ष्म दृष्टीने दोन्ही बाजू तपासून पहाव्यात. 

आर्थिक व्यवस्था - प्रजाकल्याणासाठी लागणारे धन अधिकाधिक प्राप्त व्हावे असा प्रयत्न प्रजापतीने करावा. त्याच्या सहाय्यार्थ दोन कोषाध्यक्ष असावेत व राज्यातील सर्व यंत्रणांना योग्य व आवश्यक तितका पैसा पुरवण्याची जबाबदारी व कार्य या तिघांनी करावे. सुक्तांमध्ये याचे वर्णन केले आहे, 'योग्य मार्गाने, शेकडो हातांनी धनसंग्रह करावा व तो सहस्त्र हातांनी वाटावा." 
शेती- भूमीचे संरक्षण व योग्य संवर्धन करून भूमातेला पुरेसे अन्नधान्य देण्याविषयी केलेली प्रार्थना अथर्ववेदात आहे. जमीन सुपीक राहील ही जबाबदारी राजाची आहे व यदाकदाचित अवर्षण जाणवलेच तर त्याची पूर्ती शासनाने करावी अशी स्पष्ट सूचना आहे. 

जल व अन्नवितरण - अन्न वस्त्र निवारा या प्राथमिक गरजा पुरवणे हे सर्वच राज्यपद्धतीत अपेक्षित आहे. पारमेष्टी राज्यांत (अथर्ववेद ) विविध प्रकारचे अन्न लोकांच्या गरजा व आवड लक्षात घेऊन समप्रमाणात (१ मनुष्य २ पोळ्या नव्हे, तर तरुणांना व कष्टकरीना जास्त व वयस्क व दुर्बलांना कमी पोळ्या हे सम प्रमाण मानावे म्हणजेच आवश्यकतेनुसार वाटप ही भारतीय संकल्पना) वाटले जाईल अशी व्यवस्था करावी तसेच पाण्याचे साठवण व वितरण ही व्हावे. 

संरक्षण - सद रक्षणाय व खलनिग्रहाय संरक्षण व्यवस्था व ती राज्यप्रमुखाने करावी. अथर्ववेदातील १९/२०/२ मध्ये याचे सखोल वितरण आढळते.
 
खनिज - आपली भूमी या बाबतीत समृद्ध आहे. उत्खनन व उपयोग योग्य प्रमाणात करावा असे निर्देश.
 
शहर बांधणी व निर्मिती- या काळात (अथर्व वेदाच्या ) शिल्पशास्त्र व वास्तुविद्या यांचे चांगले ज्ञान लोकांना झाले होते. 
अशा राज्यांचा विस्तार हा विशाल होत असे. 

महाभारत सभापर्वात म्हटले आहे, पारमेष्टय राज्य संकल्पनेपूर्वी शांततेचा विचार हा फारसा महत्वाचा मानला गेला नव्हता पण पारमेष्टयराज्यांत शांततेला महत्व प्राप्त झाले. युधिष्ठीर शांततेचा पुरस्कर्ता असल्याने त्याने पारमेष्टय राज्याला सर्वाधिक महत्व दिले आहे. या पद्धतीचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आपला विकास करून घेण्याची सर्वाना असलेली समान संधी. स्वतःच्या गुणांच्या जोरावर कुलाप, वज्रपती, गणपती कोणीही होऊ शकत असे. 
अशा राज्यातील प्रमुखाने यदाकदाचित सर्व सत्ता स्वतःच्या हातात केंद्रित केली व तो अन्याय करू लागला तर त्याला सत्तेपासून हटवले जाई. वेळप्रसंगी त्याचा वधही केला जाई. अनियंत्रित हुकुमशाहीकडे होणारी वाटचाल रोखण्याचा अधिकार प्रजेचा असे. अशी उदाहरणे इतिहास, पुराणात आढळतात. 

महाराज्याम
महाराज्यं ही संकल्पना विस्तारात्मक व गुणात्मक अशा दोन्ही दृष्टीनी विचारात घेतली गेली आहे. 
विस्तारात्मक- राज्याच्या सीमा नेहमी विस्तारल्या जाव्यात. 'सदैव वर्धिष्णू' असावे. अर्थातच आजूबाजूंची राज्ये ही जोडली जावीत. याचा प्रमुख 'महाराजा' असेल. जसे राज्यप्रमुख, राजा, साम्राज्य प्रमुख, सम्राट, स्वराज्यप्रमुख.सत्पथ ब्राम्हणात यालाच राजपती म्हटले आहे. 
उदाहरण- वृत्राला मारून इंद्राने त्याचा विशाल भूभाग स्वतःच्या साम्राज्याला जोडला व स्वतःला तो महाराजा म्हणून संबोधू लागला. त्याने महेंद्र हे नाव धारण केले. 
पं.सातवळेकरांच्या दृष्टीने लहान लहान राज्ये स्वतःहून आपली राज्ये घटनात्मक रित्या समाविष्ट करतात तेव्हा ते महाराज्य बनते. सर्वजण जेव्हा या महाराज्याच्या हिताचा निस्वार्थ पणे विचार करतात तेव्हा त्यांचे परस्पर संबंध सामोपचाराने राहतात. 
ऐतरेय ब्राम्हणात अशा काही महाराजांची नावे दिली आहेत. जनमेजय, सहदेव्य सोमकं, अरिंदम, कृताविद, जनक, विदर्भ, भीम, नागजीत (गांधार), सुदास वगैरे. वैदिक साहित्यात दाशाराज्ञ युद्ध व सुदासाचा विजय ही गोष्ट आढळते. 

गुणात्मक - ऐतरेय ब्राम्हणात खूप धनवंत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तर पाणिनीने अष्टाध्यायीत 'दैवी सामर्थ्ययुक्त' असा अर्थ लावला आहे. दैवी सामर्थ्यचा अर्थ शत्रू पासून मुक्तता. 
एकंदरीत शत्रूपासून निर्भय, धनवान व शांततामय असा अर्थ होईल. अथर्ववेदातील वर्णनाप्रमाणे महाराज्य म्हणजे शत्रूजय, मोठी सेना, परस्पर सौहार्द्र भाव सर्व कल्याणेच्छा. भद्रं कर्णेभि श्रुणुयामि देवः भद्रं पश्येम। (चांगलेच कानी पडेल व चांगलेच दिसेल) अशी स्थिती असावी. 'मृत्यो माअमृतं गमय ' अशी कांक्षा असावी व ती सफल व्हावी, महाराज्याच्या सीमा देशाच्या सीमेला भिडाव्या.
 
राज्यकारभार पद्धति - 
(१) अनेक राज्ये एकत्रित असली तरी सर्वाना सारखेच महत्व, दर्जा व नियम असावा. 
(२) इतर राज्यांना मंडलिक समजले जाणार नाही. 
(३) महाराज्याधीपती हाच आर्थिक स्थितीला जबाबदार असेल. 
(४) प्रांतप्रमुख हा महाराज्याचा सभासद असेल. महाराजा हा त्या त्या प्रांताच्या सल्लागार मंडळाच्या बैठकीस उपस्थित असेल व नियम प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित पाळले जातील इकडे त्याचे लक्ष असेल. 
(५) प्रांताप्रांतातील समस्या या केंद्रीय समितीत चर्चिल्या जातील. महाराजाच्या संमतीने निर्णय होईल. 


आधिपत्यमयं 
पा- रक्षण करणे पासून पाति इति पति असा शब्द तयार झाला. जसे क्षेत्रपति, वसुपति, प्रजापति वगैरे.
वाचस्पत्यम मध्ये तारानाथ भट्टाचार्य लिहितात, अधिकाःपाति इति अधिपति अनेकांचे रक्षण करणारा किंवा पति पेक्षा अधिक अधिकार असलेला. 
पं.सातवळेकर यांचे मते पतिचे नियंत्रण करणारा तो अधिपति. अशा अधिपती पेक्षा अधिक व विशाल अधिकार असणारे आधिपत्यमयं. 
शासनयंत्रणा वेगवेगळे विभाग व त्यावर एक प्रमुख. एक पति. उदा. दिशापति, पशुपति, अन्नपति, वनपति इतकेच काय पण तस्क्रनाम पति. गणपती ला ही 'व्रातपति, प्रमथपति' म्हटलेलेच आहे. 
ऋग्वेदात वरुणाला म्हटले आहे, 'अस्थीरतेकडून आर्ताना स्थिरता देणाऱ्या तू माझ्या राष्ट्राचे आधिपत्य स्वीकार.' हुकुमशाही व एकतंत्री राज्य यापेक्षा आधिपत्यमय थोडे वेगळे असले तरी आधीपतिच्या तंत्रानेच चालणारे असल्याने एकाधिकारशाहीकडे वाटचाल होण्याची शक्यता दाट आहे असे म्हणावे लागेल. 

समंतपर्यायी 
शब्द वाचल्याबरोबर वाटते सामंत राज्य असावे पण सामंतराज्यकल्पना ही नंतरच्या काळातील आहे. वैदिक वाड्मयात सामंत राज्याचा उल्लेख नाही. 
ऐतरेय ब्राम्हणात 'राज्यं समन्तपर्यायी स्यात्।साम्राज्यं समन्तपर्यायी स्यात्।' असे उल्लेख आढळतात. म्हणजेच राज्यप्रकार कोणताही असो तो समंत पर्यायी असावा असे म्हंटले आहे. 

समन्तपर्यायी म्हणजे काय? 
ऐतरेय ब्राम्हणात त्याचे विश्लेषण 'देशतः कालतः सर्वव्यापित्व स्थान्' असे केले आहे. देशत: सर्वव्यापित्व म्हणजे फक्त आपल्याच देशात सीमित न राहता खूप मोठ्या भूभागावर पसरलेले तर कालतः सर्वव्यापित्व म्हणजे काळाचे बंधन नाही. सदासर्वकाळ. 
शुक्लयजुर्वेदात एक राजा म्हणतो, 'माझे राष्ट्र हेच माझे शरीर आहे व प्रजा म्हणजे त्या शरीराचे सगळे अवयव आहेत. 'प्रजेशी राज्यकर्त्यांची मनापासूनची इतकी समरसता समन्तपर्यायी मध्ये अपेक्षित आहे. म्हणजेच लोकांच्या आवश्यक गरजा तर पूर्ण व्हाव्यातच पण त्यांनी एकी निर्माण व्हायला हवी. 'आधीपति सर्व सैन्याला संघटित करणारा असावा. शत्रुंजय असावा. धनदाता ही असावा '- ऋग्वेद. 

थोडक्यात म्हणजे प्रथम आपल्या राज्यांत सुख, शांति, लोककल्याण व प्रगति झाल्यानंतर तशी स्थिती इतरत्र निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे, आपल्या श्रेष्ठ विचारांचा प्रसार करण्यासाठी संघटित गट देशाबाहेर पाठवणे, इतर राज्यकर्त्यांना विचार पटवून देणे व सर्वदूर सुखशांती प्रस्थापित करणे. 
आपला इतिहास सांगतो की भारतीय लोक 'कर्ण्वन्तो विश्वमार्यम'। य विचारांनी संपूर्ण जगात पोचले होते. 

(८)सार्वभौमराज्य 
वैश्विक राजकीय ऐक्याचा हा विचार आहे. राजसूय यज्ञ केल्यानंतर 'राजा' हे बिरूद प्राप्त होत असे. आपल्या राज्याच्या कक्षा वाढवल्यावर वाजपेय यज्ञ करून तो सम्राट बने. तदनंतर अश्वमेध यज्ञाने त्याला एकराट पदवी मिळे.राज्याच्या कक्षा संपूर्ण पृथ्वी व्यापू लागल्या की सार्वमेध यज्ञ संपन्न होई व तो सार्वभौम राजा बने. 
पुराणांमध्ये पृथ्वी म्हणजे नेमके कोणते क्षेत्र याचा उल्लेख सप्तद्वीपांच्या नामोल्लेखाने केला जातो व त्या द्वीपांची भौगोलिक व्याप्ती पाहिली की आजचे आफ्रिका, आशिया व युरोप खंड त्यात संमिलित होते व ही भूमी आसमुद्र पर्यन्ता होती हेही लक्षात येते. ही सर्वं भूमी प्राचीन ऋषीमुनींच्या डोळ्यांसमोर होती व त्या सर्वं भूमीवर साम्राज्य असावे हे त्यांचे लक्ष्य होते. 

का? 
वेगवेगळी राज्ये असतील तर स्वाभाविकच कलह, युद्धे होत राहणार. त्या ऐवजी एकच राज्य असेल तर शान्तता प्रस्थापित होईल. शांततेमुळे विकास व प्रगति होईल. एकी निर्माण होईल. सहनौ भुनक्तु ही कल्पना प्रत्यक्षात उतरेल अशी दाट शक्यता होती. हा आशावाद दृढ होता. अथर्ववेदात हा विश्वास व्यक्त झाला आहे. 'यत् अहं मन्यसे,माम पर्वताः ना वरयन्ते। वगैरे माझ्या वाटचालीत मला कोणीही अगदी पर्वतही रोखू शकत नाहीत. पुढे म्हणले आहे,' तेजोमय किरणांचा सूर्यही माझ्या शक्तीला घाबरेल.' 

'अमृतस्य पुत्रा' सर्व लोकांनी व्हावे. सदगुणात स्पर्धा करावी, सर्वांच्या योगक्षेमाची काळजी सर्वांनी करावी. विविध देशांच्या लोकात व्यापार, सहकार्य, परराष्ट्र व्यवहार, सर्वशांती भाव, आपुलकी व सर्वांच्या कल्याणाचा विचार या मनोभावानेच व्हावेत. त्या साठी विश्व हेच कुटुंब मानण्याचे शिक्षण द्यावे लागेल. सर्व विश्व सर्वांची माता आहे हा भाव जागवावा व वृद्धींगत करावा लागेल. रोजच्या गरजा भागतीलच. नंतर ज्ञानसंपादनाने मानवी संस्कृती विकसित होईल. 

हे फक्त भूमीपुरतेच मर्यादित नाही. 'घौ सन्ति, अन्तरिक्षम साती' (यजुर्वेद) हा भाव अंतरीक्षही व्यापेल. त्यासाठी अन्न, जलस्तोत्रांचे समान वाटप, औषधी वृक्षांची लागवड व संरक्षण, सर्वधर्मसमानता, पर्यावरण या सर्वांचा विचार व नियोजन हवे. त्यासाठी विद्वानांनी योजना आखाव्यात व कृतीत आणाव्यात. ही संकल्पना प्रत्यक्षात येणे हेही कठीण व तशी परिस्थिती टिकणे हेही कठीण. पण हे प्रयत्न भारतीयांनी केले होते हे नक्की. मरुत, पृथु, मांधाता ही अशा काही राजाची नावे. 

फरक - या सर्व विवेचनात लक्षात येते, 
(१) भोज्य व स्वाराज्य हे राज्याच्या क्षमतेनुसार विस्तारलेले असत. 
(२) महाराज्य हे एका देशापुरते मर्यादित मानले जाई. 
(३) पारामेष्ट्य सार्वभौम व साम्राज्य यांच्या सीमांचा विस्तार मोठा असे. 
(४) आधिपत्यमय यांची व्याप्ती संपूर्ण विश्व अशी अपेक्षित आहे. 
पुथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळिति। 
वैश्विक एकराज्याची संकल्पना पुथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळिति या शब्द समूहाने अधिक स्पष्ट केली आहे. पृथ्वीवर जमिनीपेक्षा जलव्याप्त प्रदेश खूपच मोठा आहे व सध्या उपलब्ध असलेली जमीन एकाच वेळी निर्माण झाली असे नाही. पृथ्वीच्या पोटातील लाव्हारसाच्या उत्कालानामुळे तसेच आकुंचन प्रसरणामुळे जमिनीचे भाग वर येत गेले व तिथे तिथे ती भूमी मानवी जीवनायोग्य झाल्यानंतर वस्ती होत गेली. 

मागे उल्लेखिल्याप्रमाणे सप्तद्विपानी ओळखला गेलेला प्रदेश म्हणजे आफ्रिका, युरोप, आशिया खंडांचा समावेश असलेला प्रदेश आपण पाहिला आहेच. पण ही पुराणकालीन माहिती झाली. भारतीय संस्कृतीचा विश्व संचार लक्षात घेतो तेव्हा जाणवते दक्षिण अमेरिकेत पेरू, बाली, ग्वाटेमाला येथील 'इंका' संस्कृती ही भारतीय संस्कृतीचाच अविष्कार होता. उ.अमेरिकेतील मूळ रहिवासी रेड इंडियन्स संस्कृत प्रभावाने उच्चार स्पष्ट (युरीपियन लोकांपेक्षा) करू शकत. त्यांच्या पूजास्थानात यज्ञ कुण्ड असे. ऑस्ट्रेलियातही गगुज्जा जमात त्रिपुंड लावते. हंसनदी (हंसध्वनी ) रागात गायन करते व 'रामा रामा' या उच्चाराने त्यांच्या भजनांची व स्तोत्रांची सुरवात करते असे. वराह पुराणात लोहगिल क्षेत्र कुठे आहे सांगताना म्हटले आहे, ज्या म्लेंच्छ देशाच्या दक्षिणेस हिमालय येतो त्या प्रदेशात आहे. 

मग समुद्रपर्यंताया एकराळ (एकराळ=एकराष्ट्र चा अपभ्रंश) ही नुसती घोषणा नव्हती तर तशी कृतीही घडली होती हे बघून सानंद आश्चर्य वाटते. भारतात इंग्रज राज्य करायला लागल्यानंतरच 'राष्ट्र ' ही संकल्पना भारतीयांना कळली असे म्हणणाऱ्या लोकांच्या बुद्धीभेद करण्याच्या योजनेचा पर्दाफाश होतो. आमची राष्ट्र संकल्पना भारत राष्ट्रापुरती मर्यादित न रहाता ती 'विश्वव्यापी' बनली होती, आहे अन राहीलही. 


सार्वायुष आन्तापरार्धात। 
आशीर्वाद देताना पुष्कळदा म्हटले जाते, 'दीर्घायुषी भव,शतायुषी भव' काही वेळा 'चिरंजीव भव' असाही उच्चार होतो. या मागचा भाव या मंत्रात 'सार्वायुष व परार्धाच्या अंतापर्यंत' या शब्दांनी व्यक्त झाला आहे. विश्वराज्य, विश्वकुटुंबसंकल्पना सदैव जागती राहावी अशी इच्छा प्रदर्शित केली गेली आहे. 


मरुच 
अशा समुद्रपर्यंताया एकराट अशा विशाल साम्राज्याचा पहिला राजा म्हणून मरुताचे नाव पुढे येते. या पुण्यश्लोक राजाचे नाव वैदिक पुराणात मरुतकामप्रिय असे आहे. यापूर्वी यज्ञ संकल्पना आपण पाहिलीच आहे. असे १०० यज्ञ करणारांना देवांचे इंद्रपद प्राप्त होत असे. म्हणून इंद्राला नेहमी भीती वाटत असे. अर्थात १०० यज्ञ करेपर्यंत असणारा मनोनिग्रह, त्यागभव, इंद्रपद प्राप्त झाल्यानंतर मात्र नसे व माझे हे अढळपद कोणी हिरावून घेऊ नये असे वाटून त्यासाठी प्रयत्नही केले जात असे पुराणे सांगतात. आजही आपण राजकारणात स्वतःचे पद टिकवण्यासाठी, वरचे पद मिळवण्यासाठी काय काय केले जाते हे पाहतोच. 

मरुताची १०० वा यज्ञ करायची वेळ आली. इंद्राने त्याचा यज्ञ होऊ नये असा प्रयत्न चालवला. आपले सहकारी यांना आपली तशी इच्छा कळवली. म्हणून बृहस्पतीनी यज्ञाचे पौरोहित्य करायचे नाकारले. बृहस्पतींचे धाकटे बंधू संवर्त यांनीही आधी नकार दिला. पण राजाला वाईट वाटले म्हणून यज्ञ संपन्न केला. पण १०० यज्ञ करूनही मरुताने ना इंद्रपद मागितले ना स्वर्गभोग. शतक्रतू ही पदवी फक्त त्याने धारण केली. 

त्याच्या या त्यागप्रवृत्ती मुळे इंद्र तर आनंदलाच पण सर्व देवही प्रसन्न झाले व ते परिवेष्टारी बनले, त्याच्या भोवताली जमा झाले. त्याच्या राज्यांत सर्व देव सभासद बनले. (अवसन गृहे )(विश्वे देवाः सभासद ). एका राष्ट्राचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले. स्वाभाविकच इंद्रपदाचा त्याग करूनही त्याला सर्वांच्या मनात स्थान मिळाले. अधिकार प्राप्त झाला. मरुत म्हणजे अविक्षत पुत्रा कामप्रेर होय! 
आम्हालाही योग्य वेळी त्यागाची बुद्धी दे व नः वरिवस्यन्तु- सर्व श्रेष्ठ बनू असा आशीर्वाद दे- त्या साठी ही मंत्र पुष्पांजली! 
त्यागमय यज्ञस्वरूप साम्राज्याचा एक घटक 'मी' आहे हे भाग्य मला प्राप्त झाले आहे तदनुसार कर्तव्य करण्याची बुद्धी व शक्ती प्राप्त होवो! 
-सुशील अभ्यंकर 

यांचे सहाय्य घेतले. 
(१) श्री शंकर अभ्यंकर यांची कॅसेट. 
(२) देवे मंत्राचा अर्थ--पं.सातवळेकर. 
(३) Political Thoughts In Vedas--Dr.shiv Acharya. 
(४) हिंदू संस्कृति अंक -कल्याण मासिक

II मंत्र पुष्पांजली II - भाग २


पहिला धर्म अग्नी उपासनात्मक यज्ञ 

पहिला मंत्र..ओम यज्ञेनयज्ञमयजंत देवास्तानि देवाः अर्थ.= देवांनी यज्ञाद्वारे यज्ञनारायणरूप ईश्वराचे पूजन केले व तोच प्राचीनतम धर्म अग्निउपासनात्मक निर्माण झाला. यांतूनच सत्य धर्माचे स्वरूप प्रगट झाले.
यज्ञ संकल्पना हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. यज्ञ= विस्तार, यज्ञ= त्याग, यज्ञ= समायोजन, यज्ञ= कर्तव्य तत्परता, यज्ञ = नियोजन 

यज्ञ कसे केले जात?
जेथे मानव वस्ती स्थिर झालेली आहे अशा भूभागाच्या व्यतिरिक्त एखादा भूभाग निश्चित केला जाई. तो समतल व वस्ती योग्य केला जाई. एखादा राजा यज्ञाचे यजमानपद स्वीकारे. एक यज्ञ करायचा तर त्यासाठी सर्वांचे सहाय्य आवश्यक असे. सर्व खर्चाची व्यवस्था करणे व सर्व कामे सुसूत्रपणे चालवीत यासाठी राजाचा धनकोश व सत्तेचा अधिकार उपयोजिला जाई. यज्ञ भूमी, यज्ञवेदी, यज्ञकुंड तयार करावयासाठी व व्यवस्थेसाठी अनेक कष्टकरी, सुतार, कुंभार, गवंडी, लोहार अशा सर्व व्यवसायी लोकांची मदत लागे. संरक्षणासाठी सैनिक व शिकारी लागत. प्रत्यक्ष यज्ञकर्म करण्यासाठी - दुपारच्या वेळेत मार्गदर्शन करण्यासाठी, विविध राज्यातल्या विचारवंताना पाचारण करण्यात येई. सर्व देशातली स्थिती कशी आहे, काही समस्या आहेत का, त्यावर उपाय काय असा विचार केला जाई. 

आलेल्या सर्वांवर,"अग्नेय स्वाहा.. इदं न मम" हा संस्कार आपोआप होई. अनेक प्रकारच्या कार्यातील सहभागामुळे त्या कार्यासंबंधी स्वतः चे दायित्व मनात निर्माण होत असे. त्या भूमीबद्दल ममत्व वाटू लागे. अनेकांचा परिचय होई. सहकारभाव व आपुलकी वाढत असे. समस्या निराकरणातील सर्वांच्या सहभागामुळे परस्पर विश्वास निर्माण होई. विस्तीर्ण यज्ञभूमीवर मानवी वस्ती साठी नगर निर्माण होई, तर त्याचे संरक्षण, रोजच्या जीवनाची व्यवस्था याची जबाबदारी यजमान राजा स्वीकारे. म्हणूनच "यज्ञनारायण"हा शब्द रूढ झाला.

पण यज्ञ हा मोठ्यात मोठा तसेच लहानात लहान पण होऊ शकतो. विशाल समाज एकत्र येऊन यज्ञ करतो त्याचप्रमाणे एकेक व्यक्तीही यज्ञ करते. एकेका व्यक्तीच्या कष्टाने, सहभागाने, त्यागाने मोठीमोठी कामे संपन्न होतात. म्हणूनच हा त्यागाचा, कर्तव्यपूर्तीचा धर्म 'प्रथामान्यासन्न"

अशा या यज्ञाने "ते ह नाकं महिमानः सचंत यत्र पूर्वे साध्याः साती देवाः" देवांनी स्वर्गाचा महिमा स्थापित केला. त्यागमय जीवनानेच श्रेष्ठता प्राप्त करता येते हे प्रस्थापित केले. मग एक अगस्ती विन्ध्य पर्वत ओलांडून दक्षिणेत उतरतो, तेथील वन्य बंधूंचे जीवन प्रगत करतो. अनेक ऋषीमुनी अनेक संकटाना तोंड देत जगाच्या विविध भागात जातात, विकसित संस्कृती निर्माण करतात. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक जण हौतात्म्य पत्करतात. तर मानवी जीवन अधिक सुखकर करण्यासाठी संशोधक विविध प्रकारचे शोध लावतात. स्वर्ग =सुबत्ता, शांतता, अमरत्व.
सृष्टीनिर्मात्या प्रजापतीने अनेकांना हाताशी धरून सृष्टी निर्माण केली. अनेकांनी तेंव्हा एकेक समिधा टाकली. याच पद्धतीने "पूर्वे देवाः साध्याः संती". पूर्वी देवांनी इष्ट ते निश्चित ठरवलेले त्यागमय मार्गाने साध्य केले.

ओम राजाधिराजाय..............महाराजाय नमः....२
या मंत्रात विश्रवा ऋषींचा पुत्र कुबेर याला वंदन केले आहे. वास्तविक जेष्ठ पुत्र म्हणून लंकेचा अधिकार त्याचाच होता. पण गृहकलह नको म्हणून विश्रवा मुनींनी आज्ञा केल्याबरोबर तो अधिकार सोडून कुबेर दूर निघून गेला. स्वकर्तृत्वाने त्याने स्वतः चे स्थान निर्माण केले.देवांना प्रिय बनला. त्यांचा कोषाध्यक्ष झाला. श्रेष्ठ दाता म्हणून कीर्ती प्राप्त केली व उत्तरेचा लोकपाल ही बनला. विश्रवापुत्र म्हणून वैश्रवण अशा कुबेराला वंदन असो. स्वतः चे श्रेष्ठ स्थान निर्माण केले व अबाधित राखले म्हणून त्या राजाधिराज महाराजाला वंदन! अनेकांच्या कामना पूर्ण करण्यास तत्पर असणाऱ्या त्या कामेश्वराला प्रणिपात! त्याने आमच्या कामना पूर्ण कराव्या ही विनंती.

ओम स्वस्ति......
स्वस्ति==सु+अस्ति. सर्वांचे कल्याण होवो. भारतीयांनी सर्वेपि सुखिनः सन्तु..हा उद्घोष जेव्हा केला तेंव्हा त्यांचा विचार मी, माझे कुटुंब, असा विस्तारत राष्ट्र पर्यंत तर पोचलाच पण त्यापुढे जाऊन विश्वाचाही समावेश त्यात झाला.सृष्टी - चराचर सृष्टी, सजीव निर्जीव सृष्टी.
ही नुसती कामनाच नाही तर हे करूच हा भाव...कृण्वन्तो विश्वआर्यम'...सर्व विश्वाला श्रेष्ठ बनवायचे आहे असा यांत व्यक्त झाला आहे. नुसताच व्यक्त झाला नाही तर भारतीयांनी हा विचार घेऊनच सर्व विश्वात संचार केला. जगातील एकही भूभाग असा राहिला नाही की तिथे ही आपली संस्कृती पोचली नाही. मनात होती विश्व कल्याणाची चिंता, पाठीमागे होता सहस्त्र वर्षांच्या प्रयोगांचा व यशस्वितेचा इतिहास. मनात होती येणाऱ्या सर्व संकटांवर मात करण्याची जिद्द व सामर्थ्य. 

वैराज्य... 
याचा क्रमांक नंतर असला तरी राज्यपद्धतीचे वर्णन करतांनाच याचा विचार प्रथम करावा लागेल. वैराज्य म्हणजे जेथे शासन अस्तित्वात नाही ती स्थिती असे वर्णन पं. श्री. दा. सातवळेकर यांनी केले आहे, तर श्री. विनायक रामचंद्र घटाटे आपल्या अथर्ववेद राजनीती या पुस्तकात राज्य अस्तित्वात नसणे असे म्हणतात, एकूण अर्थ एकच.
महाभारतात म्हटले आहे,"राजा नाही, राज्य नाही, शिक्षा नाही, अपराधी नाही अशी स्थिती. प्रत्येक जण आपल्या धर्मानुसार वागणारा असे. मानवजीवन सुखाने व्यतीत होई. कौटिल्य म्हणतात, "स्वतःचे व इतरांचे हा भेदभाव नसतो ते वैराज्य.' अशा समाजात शांतता व सुराज्य असे.

मनात विचार येतो अशी स्थिती खरंच अस्तित्वात असेल का? मग आठवते वसिष्ठ नंदिनीची कथा. वसिष्ठांच्या आश्रमातील या कामधेनुबद्दल ती सर्वांचे मनोरथ पूर्ण करणारी होती, त्यामुळे सर्वांच्या मनात आदर भाव व प्रेम होते. तिची सेवा करण्यास सर्व तत्पर असत. पण ब्रम्हर्षी पदावरून जेंव्हा विश्वामित्रांच्या मनात असूया निर्माण झाली तेव्हा स्वाभाविकच वसिष्ठांची सर्व बाबतीत बरोबरी केलीच पाहिजे असे वाटू लागले. मग एकदा नंदिनीमुळे वसिष्ठांना अनेक गोष्टी प्राप्त होतात हे लक्षात आले व ती आपल्याला मिळावी असे वाटू लागले.
ते वसिष्ठांकडे आले व म्हणाले, "मला ही नंदिनी द्या." वसिष्ठ म्हणाले, ' देणारा मी कोण? तिच्या जर मनात असेल तर तुमच्या बरोबर ती येईल.' विश्वामित्रांनी तिला ओढून न्यायचा प्रयत्न केला. वसिष्ठ आपले रक्षण करीत नाहीत हे कळल्यावर नंदिनीने स्वतःच्या शरीरातून सैन्य निर्माण केले व विश्वामित्रांना पळवून लावले.

या प्रसंगातून वसिष्ठांना रक्षणाची व्यवस्था करण्याची गरज वाटू लागली व पुढे शासनव्यवस्था निर्माण झाली. याचे विश्लेषण असे सांगितले जाते की सत्ययुगात शासनाची आवश्यकता जाणवत नव्हती.पुढे त्रेतायुगापासून हा विचार अस्तित्वात आला.रामाने भरताला अराजकापासून सावध केले होते हे आपण पाहिले आहेच. आजच्या भौतिकवादी समाजात अशी स्थिती अशक्यप्राय वाटत असली तरी अगदी अशक्य नाही. आजही काही कुटुंबे अशी आढळतात की परस्पर सहकार्याने,सर्वांचा विचार आधी मग स्वतःचा अशी वर्तणूक ठेवत सुखाने नांदत आहेत. अर्थातच हे प्रमाण फार कमी आहे.भारतीय समाजाचे हे अध्यात्मिक अधिष्ठान पाश्चात्यांच्या लक्षात येणे कठीण आहे. मग हॉब्ज ला वाटते, 'ही मानवाची अगदी प्राथमिक अवस्था होती. नीती, कल्याण, कर्तव्य याचा स्पर्शही झालेला नव्हता. 'तर रुसो म्हणतात, 'सुखसोयींची काहीच कल्पना नव्हती- घर, कुटुंब, संपत्ती सगळ्या बाबतीत अनभिज्ञता होती" म्हणून वैराज्याचा अर्थ त्यांनी 'अराजक, anarchy " असा लावला.

पं. सातवळेकर 'विराज" शब्दाची व्युत्पत्ती सांगताना अशी अशी स्थिती कायद्यांची आवश्यकता भासण्या पूर्वीची शासन यंत्रणा होती असे सांगतात. पुढे म्हणतात 'विराज' हा अराजक शब्दाचा समानार्थी नाही. पण कुठल्याच समाजात अशी आदर्श स्थिती फार काळ राहत नाही. महाभारतातल्या शांतिपर्वात याचे वर्णन आढळते. " हळूहळू ही स्थिती सांभाळणे कठीण झाले, मानवाची परस्परांना समजून घ्यायची शक्ती कमी होऊ लागली. स्वार्थ व लोभ वाढला. लोभातून मत्सर, राग निर्माण झाला. दुसऱ्याचे बळकावून घेण्याची वृत्ति वाढली. मास्यन्याय=मोठा मासा लहान माश्याला खातो. तो प्रस्थापित होऊ लागला. अंदाधुंदी माजली. जीवनातील स्थैर्य नाहीसे झाले. शासन व शासक यांची आवश्यकता भासू लागली. विविध प्रकारच्या संस्था निर्माण झाल्या. या संस्था म्हणजेही शांतता निर्मितीसाठी व समाज सुसूत्रपणे चालावा म्हणून केलेले विविध प्रयोगच होत. ऐतरेय ब्राम्हणात वैराज्य म्हणजे धर्माधारित, शासन विहीन राज्य असे म्हटले आहे. पं. सातवळेकर म्हणतात, 'लोकच स्वतःच्या नियमाने समाज चालवतात." पण असे राज्य मोठ्या भूभागावर स्थापन होऊ शकत नाही.

साम्राज्य 
शब्द वाचताच आठवतात अलेक्झांडर, नेपोलियन, हिटलर व ब्रिटीश साम्राज्य. साम्राज्य म्हणजे राज्यविस्तार
( अर्थात येनकेनप्रकारेण ). हीच आज आमची समजूत झाली आहे. मग अशा साम्राज्याचा उल्लेख मंत्रपुष्पांजलीत अशा आमच्या भुवया उंचावल्या जातात. साम्राज्याची भारतीय संकल्पना समजावून घ्यावी लागेल. साम्राज्यप्रमुख अर्थात सम्राट. शुक्ल यजुर्वेदात सम्राटाचा अर्थ दिला आहे सदाचरणी व ज्ञानी. महीधर म्हणतात, "न्यायाने राज्य करणारा". तर दयानंद सरस्वती म्हणतात, "सुचारू व ज्ञानप्रकाश पसरवणारा."अर्थातच या पद्धतीने राज्यविस्तार म्हणजे साम्राज्य.
वेदांमध्ये वर्णन आहे, युद्धात जय मिळाला की सम्राट जीत राष्ट्रातील विद्वानांना, धुरिणांना भेटायला जात असे व चर्चा करत असे. (ऋग्वेद ) जीत राष्ट्रात जेत्यांबद्दल विश्वास निर्माण झाला पाहिजे. जे धर्माचे पालन करतात, चांगली वर्तणूक असते, कर्तव्ये पार पाडण्यात तत्पर असतात त्यांनीच सम्राट व्हावे. याज्ञवल्क्य सांगतात,"जीत राष्ट्रांच्या चालीरीती व परंपरा यांचा मान राखूनच सम्राटाने राज्य करावे."
साम्राज्यासाठी युद्धे धर्मयुद्धाच्या नियमांनुसारच व्हावी.त्यातील काही नियम असे,
(१) निशस्त्राशी शस्त्रधारी लढणार नाही.
(२)युद्ध सकाळ ते संध्याकाळच चालावे.
(३) कमरेखाली वार करू नये.
(४).पळत्याला मारू नये.
(५).एकाशी अनेकांनी लढू नये.
(६).शरणागताला अभय द्यावे. इत्यादी.
श्रीराम, विक्रमादित्य यांनी युद्ध जिंकल्यावरही त्या भूमीचे राज्य तेथीलच लायक लोकांहाती सोपवलेले आपण पाहतोच. ऐतरेय ब्राम्हणात म्हटले आहे, 'विशाल भूभागात राहणाऱ्या राज्यांना एकत्र करून त्यांना आपल्या अधीन करणे म्हणजेच साम्राज्य स्थापन करणे. पं.सातवळेकर म्हणतात, 'शत्रूला जिंकून त्यांना आपली आर्यन घटना (राज्यघटना) देणे.' तर श्री.शंकर अभ्यंकर या बाबतीत "अनंत कोटी ब्रम्हांड नायक" कडे निर्देश करतात.
पाश्च्यात्यांची साम्राज्यवादाची संकल्पना पूर्णतः वेगळी आहे. किंबहुन विरोधी आहे. स्वतःच्या फायद्यासाठी आक्रमण करावयाचे. राज्य जिंकायची. जीत राष्ट्रांची लूट करायची. अनन्वित अत्याचार करायचे. स्वाभाविकच याची परिणती होते ती त्यांच्या विरुद्ध बंद, उठाव,युद्धे. आज २०११ मध्येही इजिप्त व शेजारच्या राष्ट्रांत चाललेल्या अंगावर शहारे आणणाऱ्या घडामोडी आपण रोज वाचतोच आहोत. 

सौराज्याम 
ही संरक्षणवादी राज्यव्यवस्था आहे, भौज्य मधील मूळ धातु भुज ज्याचा अर्थ आहे संरक्षण व राज्य करणे. ऐतरेय ब्राम्हणात सांगितले आहे, 'उंबराचे झाड पोषक फळे देते." हा वृक्ष औषधी आहे. लिव्हर संबंधी समस्या, अभिसरणसंस्था, श्वसनसंस्था यातील दोष नाहीसे करतो. अल्सर शोधतो व बरा करतो.
(अशीच 'प्रियंगु' नावाची एक वेलही औषधी आहे. बुध ग्रहाच्या मंत्रात प्रियन्गुकालिका असे वर्णन आहे) संरक्षण व पोषण दोन्ही कामे करणारा हा वृक्ष 'भौज्य' मानला जातो.
मात्स्य न्यायानंतर स्वाभाविकच ही पद्धति विकसित झाली. सर्वांची प्रार्थना होती, 'ऐहिक पापांपासून, अंतरीक्ष वगैरे उद्भवणाऱ्या संकटांपासून आमचे रक्षण कर.

संरक्षणाचे विषय कोणते? या बाबतीत अथर्व ऋषी म्हणतात.
अस्मिन ब्रम्हणी- अध्ययन, अध्यापन, समाजकारण, हितकर वातावरणनिर्मिती व धार्मिक कार्यपालन यात निर्माण होणारे संदेह.
अस्मिन कर्मणी - कर्तव्य व धार्मिक कार्यपालनात येणाऱ्या अडचणी.
अस्याम पुरोधायाम - पुरोहित हा राजाचा मुख्य सल्लागार असे. सल्ला देताना व दिलेल्या सल्ल्यांचे पालन करतांना येणारे अडथळे.

अस्मान प्रतीष्ठायाम - सद्गुणी लोकांच्या सहकार्याने प्राप्त कर्म करून शांतता प्रस्थापित करण्याचे कार्याची स्थापना.
अस्याम सित्याम - वैदिक विचारांचे संरक्षण.
अस्यात अकुलाम - वैदिक विचारांचे पालन करण्याचा केलेला निश्चय. यासाठी,
अस्याम आशी षी - सर्वेश्वराचा आशीर्वाद हवा.
अस्याम देव्हुत्याम - देवाच्या सत्कृत्यांपासून प्रेरणा घेऊन त्यानुसार कार्य करणे.
स्वाहा - या सर्व उच्च आदर्शानुरूप कार्य करण्यासाठी मी माझे सर्वस्व अर्पण करण्यास तयार आहे. तसे सामर्थ्य प्राप्त होवो. 
यालाच एक वाक्य अजून जोडलेले आहे द्विपाद अन चतुष्पादांचे रक्षण तसेच धनाचे रक्षण.
भौज्य या शासन व्यवस्थेत विविध सामाजिक गट व त्या प्रत्येक गटाला एकेक अधिपति असे.(गणपती) त्या गटाचे स्थैर्य परस्पर सहभाग, सद्वर्तन, सर्व उपलब्ध स्त्रोत्रांचा योग्य उपयोग याची जबाबदारी या अधिपतींची असे. या शासनातील नागरिक कायदेसंस्था व स्वतःचे सुख यांच्यात संतुलन राखण्यासाठी तत्पर असे. त्यासाठी अग्नीची प्रार्थना केली जाई.

थोडक्यात (१) वैदिक चालीरीतींचा आदर करून पालन केले जावे.
(२) शासनाद्वारा सर्वाना सुख प्राप्त व्हावे.
(३) परस्पर व्यवहार सौहार्दाचे असावे, निसर्गाचे सहाय्य असावे, धन प्राप्त व्हावे.

या तीन गोष्टी भौज्य शासन व्यवस्थेतील प्रमुख मानल्या जात. म्हणजेच सुजलाम सुफलाम भूमी असावी. सर्वाना पुष्टी, तुष्टी, शांति प्राप्त व्हावी. दीर्घायुष्य प्राप्त व्हावे. स्वाभाविकच राज्याच्या क्षमतेनुसारच राज्यविस्तार अपेक्षित असे.

II मंत्र पुष्पांजली II - भाग १



Mantra Pusphanjali in marathi

केव्हा म्हणतात? 
देवाची साग्रसंगीत पूजा झाली की आरती, कापूरारती, घालीन लोटांगण म्हणत प्रदक्षिणा वा साष्टांग नमस्कार झाल्यावर ही पुष्पांजली वाहिली जाते. वाईला दशहऱ्यात कृष्णामाईची संध्याकाळी आरती होत असे. त्यावेळी आरतीनंतर देवे म्हटले जात व त्यात शेवटी मंत्र पुष्पांजली असे. म्हणून मनात आरती, देवे व मंत्र पुष्पांजली असा एक दृढ संबंध निर्माण झाला आहे.
यानंतर येते क्षमाप्रार्थना. काही चुकले माकले असेल तर क्षमा करा. आवाहनं न जानामि|मंत्रहीनं क्रियाहीनं अन हे सर्व का तर रक्ष रक्ष परमेश्वर!

रक्षण कशासाठी?
मानवी जीवनांत अन्न, वस्त्र, निवारा व निर्भयता जेंव्हा प्राप्त होते तेंव्हाच मानव स्वतःचा विकास, प्रगती करू लागतो. कुटुंब, समाज व राष्ट्र यांच्या संबंधात असलेल्या कर्तव्याचे त्याला स्मरण होते. जीवनाच्या हेतूचा शोध घ्यायला तो प्रवृत्त होतो. भौतिक विकास व अध्यात्मिक विकास हातांत हात घालून चालत राहतात. म्हणूनच सर्वात प्राचीन व अखंडपणे जिचा प्रवाह वाहत आहे अशा भारतीय संस्कृतीने अभ्युदय व निश्रेयस यांना समान महत्व प्रदान केले आहे.

रक्षणाची आस - 
या सर्वांसाठी जीवन सुरक्षित असायला हवे, हाच भाव वरचेवर प्रगट होत राहतो. मग ती रामरक्षा असेल, अथर्वशीर्ष असेल, गणेश कवच, विष्णू पुराण असेल किंवा अन्य आराधना असतील. संरक्षण विषय आला की आठवते सैन्य, सैनिक, त्यांना सहाय्यक ठरणारे अश्व, गज, शस्त्रास्त्रे वगैरे. मग श्रीसूक्तात उल्लेख येतो, अश्वपुर्वाम रथमध्यां वगैरे. तर देवे म्हणतांना "वृद्ध्सेनः, पृषद, अश्वासहः, अवनयः, रिश अदसः अर्थ मोठी प्रबळ सेना सज्ज ठेवणारे, धृष्ट पुष्ट घोडे जवळ बाळगणारे, सर्वांचे रक्षण करण्यास तत्पर असणारे, शत्रूंचा निःपात करणारे. आम्हाला सुखाने राहू देवोत. शत्रूपासून रक्षणाची ही व्यवस्था तर निसर्गापासून रक्षणही आवश्यकच. 

निसर्गापासून रक्षण
या साठी होते पंचमहाभूतांची प्रार्थना.पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश यांनी सहाय्यक व्हावे हा भाव प्रगट होतो. पण एवढ्यानेही भागत नाही. सर्व सजीवांनी परस्परांना साथ द्यायला हवी. त्यासाठी समाज नियम तयार झाले. यांचे स्वतःहून पालन होत होते तोपर्यंत सगळे ठीक होते पण हळू हळू त्यात बदल होऊ लागला. मग शासन यंत्रणेची आवश्यकता निर्माण झाली. स्वाराज्य, वैराज्य आदि राज्य प्रकार निर्माण झाले व मंत्रपुष्पांजलीत त्यांचा उल्लेख होऊ लागला.
याच सर्व गोष्टी आता आपण विस्ताराने विचारात घेऊ या. हे सर्व लिहित असतांना पुष्पांजलीतील काही शब्द, रचना समजल्या नाहीत हे जाणवते आहे. अभ्यासकांनी त्यावर अधिक प्रकाश टाकावा अशी विनंती. 

मंत्र पुष्पांजली 
मंत्र रूप पुष्पांजली. मंत्र हीच फुले कल्पिली आहेत. मंत्र पुष्पांजली म्हणतांना हातात फुले व अक्षता घेतात. सभासद इति असा शेवट झाला की ती फुले देवाला वहातात. 


मंत्र (मननात त्रायते इति मंत्र)
मननाने उच्चारल्या जाणाऱ्या शब्दांना सामर्थ्य प्राप्त होऊन ते आपले रक्षण करतात. अर्थात मननाने शब्दार्थ उलगडतोच शिवाय शब्दामागे दडलेला भाव लक्षात येतो. वारंवार चिंतनाने तो दृढ होतो. स्वाभाविकच आत्मविश्वास निर्माण होतो. शंका कुशंकांपासून रक्षण होते. बुद्धी स्थिर होते व एक प्रकारचे संरक्षक कवच निर्माण होते. अशा अनेक मंत्रांची ही पुष्पांजली आहे. 


मंत्राचे ३ प्रकार आहेत 
(१) बीजमंत्र- ओम, (गम), (र्हीन), क्लीं वगैरे एकाक्षरी मंत्र. 
(२) मूलमंत्र- १० ते २० अक्षरांपर्यंत असतात. रामाचा १३ अक्षरी- श्रीराम जय राम जय जय राम. गणपतीचा ७ अक्षरी- गणपतये नमः 
(३) माला मंत्र- अधिक विस्तृत असतात. यात साधारण पणे स्तोत्रमंत्र येतात. रामरक्षा, प्रज्ञाविवर्धन वगैरे. पुष्पांजली हा माला मंत्र आहे. 


देवे - ऐतरेय ब्राम्हणात मूळ ऋग्वेद देवे आले आहेत व पुष्पांजली हा त्या देव्यांचा शेवटचा भाग आहे. देवे हे नाव पडण्याचे कारण पं. श्री. दा. सातवळेकर सांगतात, "प्रत्येक मंत्राच्या शेवटी "देवाः" हा शब्द आला आहे. ऋग्वेदी देवे हा प्रार्थना मंत्र आहे. ऋग्वेद, अथर्ववेद, वाजसेनीय संहिता, तैतरीय संहिता, सामवेद, तैतरीय आरण्यक, ऐतरेय ब्राम्हण यात हे मंत्र आहेत. एकूण ५१ मंत्र आहेत, त्यातील २ ते ३१ मंत्रांशेवटी देवाः हा शब्द आला आहे.

देव्यांमध्ये व्यक्त अपेक्षा 
(१) सूर्य आम्हाला हर्ष देवो. आम्हाला मेधा - चपळ व तीक्ष्ण बुद्धी प्राप्त होवो.(मंत्र ३). 
(२) नः वारीवस्यन्तु----नः आम्ही, आम्हाला शिरोभागी राहण्या इतके श्रेष्ठ बनव. (मंत्र ३) 
या श्रेष्ठत्वाची भारतीयांची संकल्पना काय आहे? श्री.दत्तोपंत ठेंगडी यांनी म्हटले आहे, "आम्हाला सर्वात अधिक संपत्तिवान होण्याची ईच्छा नाही किंवा जगातील सर्व भूप्रदेश जिंकून घेण्याचीही लालसा नाही. आम्ही आमची मते व धर्म लोकांवर लादणार नाही. पण आमच्या श्रेष्ठ विचारांनी, सहृदय व योग्य आचाराने, आमच्या ज्ञानाने, आमच्या शौर्याने, आमच्या प्रगतीने सारे जग आपण होऊन आम्हाला वंदन करेल अशी स्थिती प्राप्त करण्याची आमची मनीषा आहे." 
(३) (अशुशाणाम शु च यान्त) अग्नी जसा जवळ येणाराला शुद्ध करतो तसे आम्ही व्हावे. (मंत्र ४) 
(४) आम्ही प्रगतिशील, निष्कलंक, शूर वीर, आजीवन उन्नती साठी प्रयत्नशील असावे. त्यामुळे वाडवडिलांचे यश वाढेल, मातृभूचा गौरव होईल.(मंत्र ६ ). 
(५) परोपकारासाठी सदैव सिद्ध राहावे. त्यासाठी वेळ प्रसंगी आत्मसमर्पण रुपी यज्ञ करण्याचीही आमची तयारी असावी. (मंत्र ७ ) 
(६)आमच्या जवळ मोठी, प्रबळ सेना सज्ज असावी. धष्टपुष्ट अश्व असावेत.(रिश अद सः) शत्रूंचा निः पात करून सर्वांचे रक्षण करण्याची तत्परता व सिद्धता असावी. (मंत्र ९ ). 
(७) मित्रयुजदेवः न - मैत्री करणाऱ्या देवांसारखे सहाय्यक असावेत. (मंत्र ९ ). 
(८) उतस्थाः न - रथीमहारथी प्रमाणे पराक्रम असून जीवन सुखी व्हावे. 
(मंत्र ९) 
(९) रुभावः देवाः - रुभू हे देवांचे कारागीर आहेत. ते सर्वांशी मिळून मिसळून राहतात. देवांचे ऐश्वर्य वाढवतात. या कार्यात स्वतः ला विलीन करतात. तसेच मानव कारागीरांनाही करावे. (मंत्र १४). 
(१०) वीर युक्त धनध - नाबरोबर तेजस्विता, बल, वीरता, अन्न, पुष्टी, उत्तम वाणी हवी आहे. (मन्त्र२०). 
(११) क्षपः उस्त्राः विश्वं आयुः परीवस्यन्तु - पूर्ण आयुष्य लाभावे, अपमृत्यू नको. (मन्त्र२१). 
(१२)(अस्मे)(आमच्यासाठी)--(वृत्त हत्ये ) घेरणाऱ्या शत्रूच्या नाशासाठी,(भरुहुतौ) आव्हानपुर्वक आरंभलेल्या युद्धात (पर्वतासः)पर्वताप्रमाणे स्थिर राहून (रुद्रः देवा)वीरभद्रा सारखे दिव्य वीर (इंद्र ज्येष्ठाः) आपल्या अधिपतिसह (अस्मान अवन्तु )आमचे रक्षण करोत. (मन्त्र २२) 
(१३) अत्यंत पौष्टिक समजला जाणारा सोमरस, (इंद्र) शूर राजा व सेनापती,(भग) भाग्यवान व धनवान (पूषा ) 
सर्वांच्या पोषणाची चिंता वाहणारे (मित्र ) मित्राप्रमाणे योग्य वेळी सहाय्यास धावून येणारे यांनामिळावा. श्रीसूक्त...पिबसोमं पिबंतु(मंत्र २३) 
१४) आम्हाला बल, तेज, पौरुष प्राप्त होवो व ते सतत वाढते राहो. आम्हाला दीर्घायुष्य लाभो. (मंत्र २३). 
(१५) गुंगू... वक्तृत्व शक्ती, (सरस्वती) विद्या व ज्ञान शक्ती (सोनोवाली) अन्नाद्वारे पोषण होऊन प्राप्त होणारी शक्ती, (रांका) दातृत्व शक्ती (वरुणानी) जीवनशक्ती, (इंद्राणी ) प्रभुत्व शक्ती या सर्व प्राप्त होवोत. (मंत्र ३७).. 

वर ज्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत त्यातून काही गोष्टी उठून दिसतात. 
(१) व्यक्तिगत अपेक्षा नाही. सर्वांच्या कल्याणाची मनीषा आहे. सोमरस सर्वाना मिळावा. 'सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मां काश्च्छित दुः खामाक भवेत' या वैदिक प्रार्थनेतील विचारच पुन्हा एकदा व्यक्त झाला आहे. 
(२)विश्वाच्या शिरोभागी राहण्याची ईच्छा आहे त्यासाठी अशा राष्ट्रातले लोक कसे असावेत याचे वर्णन १, ३, ४, ५, ८, १०, ११, १४, १५ या मंत्रात व्यक्त झाले आहेत व तसे बनण्याचा प्रयत्न आम्ही करणार असेही सूचित केले गेले आहे. 
(३) दुर्बलाचे मनोरथ कधीच सिद्धीस जात नाही, सामर्थ्याची पाठराखण असावीच लागते. इतरांवर आक्रमण व हल्ला करण्यासाठी नाही पण स्वसंरक्षणासाठी शस्त्र व शक्ती असावीच लागते. आपले सर्व देव ही याचसाठी शस्त्रसज्ज मानले गेले आहेत. म्हणूनच सेना, वीर, शस्त्रे वगैरेची अपेक्षा आहे. 
(४) समाजातील विविध वर्गांचाही विचार आहे. समाजधारणेसाठी सर्वांचीच आवश्यकता असते व त्या दृष्टीने सर्वांचे महत्व सारखेच असते हा समतेचा व समरसतेचा विचार शस्त्रसज्ज शूर सैनिक, कुशल कारागीर, कर्तव्यदक्ष सेनापती, धनिक यांच्या उल्लेखातून प्रकट होतो. 
(५) हे सर्व आहे पण परस्पर संबंध चांगले नसतील तर? म्हणून (मित्रयुज देवःन ) मित्रता करणाऱ्या देवांसारखे सहाय्यक असावेत. तरीही अहंकार अशा मैत्रीचा नाश करतो.

म्हणून.... 
(अ) सेनापती इतर शूर सैनिकांच्या सहकार्यानेच मोठीमोठी शौर्याची कृत्ये करण्यास व प्रबळ शत्रूचा नाश करण्यास समर्थ होतो. (यात सैनिकांच्या सहकार्याचे महत्व दाखवून दिले आहे.) तर अनेक शूर सैनिक सेनापतीच्या बुद्धीकौशल्याने चालवलेल्या योजनेतील आपापली कामे करण्यास तयार होतात. सेनापतीचे योजकत्व व नियोजन योग्य असावे लागते हे सुचवतानाच प्रत्येकाने योजनेनुसार आपापली कामे, इतरांच्या कामात ढवळाढवळ न करता व मी श्रेष्ठ हा भाव जागा न होऊ देता करायची आहेत असे स्पष्ट पणे दिग्दर्शित केले आहे व तरच 
(१) यश मिळते. 
(२) दोघांचेही बल वाढते. ही सूचना देऊन सहकार्याचे सामर्थ्य पटवून दिले आहे. (मंत्र २४) 

(ब) इतरांकडून प्राप्त सहकार्याबद्दल कृतज्ञता बुद्धी हवी याची जाणीव देण्यासाठी म्हटले आहे "हे वीरपुत्र तुला अनेक स्त्रियांनी (भगिनी, माता, शुश्रुषा करणाऱ्या स्त्रिया, दासी व.)वाढवले आहे. वेगवान नद्यांनी तुझे भरणपोषण केले आहे. तुला जीवन (पाणी)व अन्न प्रदान केले आहे. (तुझ्या आयुष्यात निसर्गानेही तुला बरेच काही दिले आहे.) तसेच देवांनी शत्रुनाश करणाऱ्या युद्धासाठी वाढवले आहे. (शिक्षकाची तुझ्या जीवनात महत्वाची भूमिका आहे व जीवनाचे ध्येय ही स्पष्ट आहे.) (मन्त्र२८)
 
(क) असा तयार झालेला वीर सर्वांचे रक्षण करेल व राष्ट्राचे कल्याण करेल.(येथे जीवनाच्या ध्येयाचा स्पष्ट निर्देश केला आहे) व्यक्तिजीवन राष्ट्रासाठी समर्पित असले पाहिजे.
 
(ड) (सद्याजा तःयज्ञ व्यामिमीत) जन्मा पासून यज्ञ करणारा अग्निः देवांना पुरोगाः अभवत देवांचा पुढारी बनला. ऋतस्य हेतुः अस्य ऋताची शाश्वत सत्याची प्रतिष्ठापना करणे हा त्याचा हेतू आहे. प्रादेशि वाणी त्याची वाणी उत्तम दिशा दाखवणारी आहे. (स्वतः ची ध्येय भावना इतरांच्यात संक्रमित करता येण्यासाठी प्रभावी वक्तृत्व,श्रोत्याला समजून घेण्याची वृत्ती असावी लागते. ध्येय भाव संक्रमित झाला तरच अनुयायी सर्वार्थाने काम करेल), स्व -आ-हा-कृतं हवि. त्यासाठी तो पुढारीही स्वतः सर्वस्व त्यागासाठी तयार आहे.(आधी केले मग सांगितले). देवाः अदन्तु देवांना खायला मिळो. (मंत्र ३०).
 
अग्नी स्वतः जळतो व प्रकाश देतो, म्हणून तो पुढारी आहे असा त्याग सिध्द पुढारी आहे म्हणून अनुयायी देव त्याच्या तोंडातून मिळेल त्यावर (याज्ञाशिष्टशीनहः ) संतुष्ट असतात. दोघांमध्ये परस्पर सहकार्य, परस्परांना समजून घेण्याची वृत्ति आहे. असे पुढारी व असे अनुयायीसमाजात असावेत. 

(ई)तरीही पुढाऱ्यासाठी, संघाध्यक्षासाठी व संघभावनेसाठी काही नियम सांगितले आहेतच. 
(१) संघाध्यक्ष ज्ञानी व कर्तबगार असावा. (अशाच माणसाची योजना त्या पदावर व्हावी. घराणेशाही नको.) 
(२) त्याने संघामध्येच राहावे. अनुयायांना सोडून राहू नये. (त्याच्या जीवनात पारदर्शकता असली पाहिजे. मी वेगळा, श्रेष्ठ हा भाव ना त्याच्या मनात असावा ना अनुयायांच्या मनात निर्माण व्हावा. पण आदरयुक्त आज्ञापालन सहज होईल असे वातावरण निर्माण व्हायला हवे. अतिपरीचायाद्वज्ञ होऊ नये. सर्वांशी सतत संपर्क व कर्तव्यभाव असावा. 
(३) त्याची आज्ञा उल्लंघली जाऊ नये. (संघाध्यक्ष कर्तबगार असेल,तर त्याचे विचार अनुभवसिद्ध व दूरगामी असतील. सर्वांनाच त्याची भूमिका समजेल असे नाही पण आज्ञा पालन व्हायला हवे.) 
(४) ऐक्याने वागावे. संघ शक्ती कलौ युगे हे लक्षात ठेवावे. संघटन हे नेहमीच सामर्थ्यशाली ठरते. 
(५) निर्णय. त्याच्या अनुमतीने व सर्वांच्या विचाराने व्हावेत. लोकशाहीत असेच असते. सर्वांचा विचार घेतला जातो. तरीही राष्ट्रपतीची सही व्हावी लागते. 
(६ ) त्याचे गुणगान इतरांना प्रेरणा देईल. गुणाची पारख सगळ्यांकडे असतेच असे नाही. ती सारखीच असते असेही नाही. संघाध्यक्षाचा व्यवहार जर राष्ट्रहिताला पोषक असेल तर तो लोकांच्या दृष्टीस आणून द्यावा लागेल.(प्रसिद्धी माध्यमे) (मंत्र ३८ ). 

(उ ) पूर्ण ब्रम्हचर्यानंतर विवाह व्हावा. मंत्र २९. योग्य शिक्षण व व्यक्तित्वनिर्माण झाल्यानंतरच गृहस्थाश्रम म्हणजेच समाजासाठी स्वकर्तव्य पालन, समाजकल्याणाचे चिंतन व व्यवहार यासाठी व्यक्ती अधिक उपयुक्त ठरेल. 

आतापर्यंत अपेक्षा व्यक्त झाली. व्यक्ती व समाज यांच्या परस्पर व्यवहारांचा सामाजिक विचार झाला. तरीही समाजनियंत्रणासाठी शासनसंस्था आवश्यक वाटू लागली. तसे प्रयोग झाले व त्याचे वर्णन मंत्र पुष्पांजलीत उमटले. 
मानवी जीवन विकासाचे टप्पे समाजशास्त्राच्या अभ्यासात आपण पाहतोच. एकेकटा रहाणारा माणूस संरक्षणाच्या दृष्टीने टोळ्या करत राहू लागला. स्वाभाविकच परस्परव्यवहारांसाठी काही नियम ठरले. अर्थातच हे नियम उल्लंघन करणाऱ्यांसाठी शिक्षा अस्तित्वात आल्या. शिक्षा करण्याचा अधिकार कोणाचा हा विचार पुढे आला व अशी राज्यशास्त्राची सुरवात झाली. बदलती परिस्थिती, मानसिकता,आवश्यकता या नुसार त्यांत बदल होत गेला. 

भारतीय जीवनदृष्टीचा विचार करता व्यक्तीविकासासाठी जीवनाची रचना- चार आश्रम संकल्पना स्थापित झाली. समाजविकासासाठी चार पुरुषार्थाची रचना झाली. धर्म या पुरुषार्थाची अभ्युदय निश्रेयस - भौतिक व आध्यात्मिक प्रगती ही प्रमुख अंगे ठरली तशीच अर्थ - अर्थनीती व दंडनीती यावर भर दिला गेला. 

व्यक्तीविचारांच्या विकासासाठी व्यष्टी, समष्टी, सृष्टी, परमेष्टी असा सोपान मांडला गेला. तर समाजजीवनात व्यक्ति, कुटुंब, समाज, राज्य, राष्ट्र, विश्व यांच्यात सुसूत्र संबंध निर्माण केला गेला. अथर्ववेदात यांचा स्पष्ट उल्लेख आढळतो. "उत्क्रांतीच्या प्रक्रियेत प्रथम विवाहसंस्था, कुटुंबव्यवस्था निर्माण झाल्या. मग समाज व्यवस्थेसाठी सभा, समिती, आमंत्रणपरिषद निर्मिती झाली. सर्वांच्या विचाराने व सहमतीने नीतीनियम (आजचे कायदे ) तयार झाले. यांतून हळूहळू विविध प्रकारच्या शासनव्यवस्था, शासनपद्धती तयार झाल्या व तसे उल्लेख आपल्या(वाग्मयात) आढळतात. 

मंत्र पुष्पांजलीचा मंत्र ऐतरेय ब्राह्मणात आहे. यांत आपल्या पूर्वजांच्या राज्यशास्त्रपद्धतीचा जसा उल्लेख आहे तसाच निर्देश संहितांमध्येही आहे. यांत जनराज्याचे नांव प्रामुख्याने आढळते. ब्रम्हसुत्र व कल्पसूत्र यातही तसे वर्णन आहे. राजसूय, वाजपेय, अश्वमेध अशा विविध प्रकारचे यज्ञ राजे करीत. त्यानुसार राज्यपद्धतीचा अवलंब केला जाई.
 
त्रेतायुगात भेटीला आलेल्या भरताला रामाने राजा व शासनाविना माजणाऱ्या अंधाधुन्दीचे व तिच्या परिणामांचे वर्णन करून सांगितलेले आढळते. तर द्वापार युगात शरपंजरी पडलेल्या भीष्मांनी युधिष्ठीराला वैराज्यवाद व राज्योत्पत्ती संबंधी माहिती दिलेली दिसते. आर्य चाणक्याच्या अर्थशास्त्रातही राज्यशासनाच्या विविध पैलूंचे व धोरणांचे वर्णन आहे. 

आजच्या राज्यशास्त्रातल्या प्रचलित संकल्पनाही आपल्या प्राचीन राजधर्मात आढळतात. धर्माचा अर्थ धारयति इति धर्मः असा असून सर्वांच्या सुखशांतीचा विचार करतांना आवश्यक कर्तव्यांचा निर्देश केला गेला व राजधर्म- राजाचे कर्तव्य व त्यासाठी राजनीती अस्तित्वात आली. आज त्यालाच आपण राज्यशास्त्र म्हणतो. आजच्या स्वातंत्र्य या शब्दाऐवजी 'स्वाधीनता' हा शब्द होता. 'स्व' संबंधी उपनिषदात म्हटले आहे,"अनुरेणीयाम महतो माहियान " म्हणजे 'स्व' हा रेणु पेक्षा हीं लहान आहे. तर 'मोठेपण' या शब्दाने सूचित केल्या जाणाऱ्या अर्थापेक्षाही मोठा आहे. म्हणजेच स्वाधीनता म्हणजेच बंधनयुक्त स्वाधीनता. 

आजच्या कम्युनिझमच्या समता संकल्पनेपेक्षा आमची समता संकल्पना विशाल आहे. समानोमंत्र, समितिसमानी, ( समान मस्तु वो मनः, समान हृदयानि वः)" आपले व्यक्तिगत प्रगटीकरण व सामुहिक निर्णय समान असोत, आपली मने व हृदय समान कार्ये करोत." 
एव्हढ्या विवेचना नंतर आपण मंत्र पुष्पांजलीत काय वर्णिले आहे, ते पाहू .