मंगळवार, १४ जुलै, २०२०

दर्शनाने धन्यता सहवासाने कृतकृत्यता! भाग ११

 दर्शनाने धन्यता सहवासाने कृतकृत्यता! भाग ११

श्रीमती सुशील प्रल्हाद अभ्यंकर यांना ज्यांचे दर्शन झाले, सहवास लाभला, अशा प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व राष्ट्रसेविका समितीतील व्यक्तींविषयी लिहिलेल्या आठवणी. या सर्वांविषयी तसेच राष्ट्रसेविका समिती मुळे मिळालेल्या समाज सेवेच्या संधींविषयी कृतज्ञ भाव व्यक्त करण्याचा हा एक मार्ग. आत्ता वयाच्या ९१ व्या वर्षी, वाढत्या विस्मरणातून देखील, जशी आणि जेवढी शाबूत राहिली तितकी - एक स्मरण मालिका.

-------------------------------------------------


जम्मू ची एक मजेशीर आठवण -


इथल्या छात्रावासातील मुली वयाने आठ ते बारा वर्षांच्या होत्या. सकाळचे कार्यक्रम झाल्यानंतर धुतलेले पातळ वाळत टाकायला लागले तर त्या मुलींनी माझ्या हातातून पातळ जवळ जवळ ओढून घेतले. त्यांना इतके मोठे नऊवारी पातळ वाळत टाकायला जमणार नाही हे सांगितले. पण त्या ऐकायलाच तयार नव्हत्या. एका कार्यक्रमाची वेळही झाली होती. शेवटी त्यांच्या कडे ते पातळ वाळत टाकायला देऊन मी बाहेर गेले.

 दिवसभर कार्यक्रम चालू होते. रात्री खोलीत कपडे गादीवर आणून ठेवलेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळची रेल्वे होती. नेसायला घेतले तर पातळ मातीने माखलेले होते. पण बदलायला वेळ नव्हता. तशीच नेसून निघाले. दिवसभर मातीच्या वासातच प्रवास झाला. पण त्या मुलींचे ताईजी हम डालते है.. हे वाक्य मात्र कायम लक्षात राहिले. प्रवासात बहुतेक वेळा छात्रावासात मुक्काम असायचा.


सीआयडीच्या अशाच काही आठवणी


पाकिस्तानचे लियाकत अली खान नेहरूंना भेटायला आले त्यावेळी गडबड नको म्हणून संघ कार्यकर्त्यांना आठ दिवस पकडून ठेवले होते. आग्री पाड्याला आम्ही रहात होतो. त्या वेळी मधल्या पॅसेजच्या समोरच्या कोपऱ्यावर सीआयडी उभे असले की चटकन लक्षात यायचे. आग्रीपाडा पोलिस स्टेशनही जवळच होते. 

हे घरी येऊन पाय धुतात तोच इन्स्पेक्टर दारात आले. मी सांगत होतेच सीआयडी बद्दल. तुम्हाला न्यायला आलो असे म्हणाले. 

हे म्हणाले,” थांबा, दोन घास जेवतो व येतो.”

 इन्स्पेक्टर दारात उभे राहिले. बिऱ्हाडाची जागा म्हणजे एक खोली व तीन फुटाचे स्वयंपाकघर. मजल्यावरची एकेक जण येऊन पाहून गेली. आधीच मी दोघा-तिघांना सांगितले होतेच. जेवण झाल्यावर चला म्हणाले. 

तेव्हा मी त्यांना विचारले,” कुठे पोलीस स्टेशन वर नेणार आहात का?”

 ते म्हणाले,” नाही “. 

“ मग कुठे?”

“ का विचारताय?”

“ दोन तीन तासात सोडणार असाल तर प्रश्न नाही. पण ठेवून घेणार असला तर आंघॊळीचे व घालायचे कपडे द्यायला हवेत.”

“ कपडे द्या.”

 जाताना यांना म्हणाले,” धन्य आहे. यांच्यासारख्या गृहिणींमुळेच तुमचे काम वाढत असावे.”

हे आठ दिवस ऑर्थररोड जेलमध्ये होते. मग सुटका झाली. गंमत म्हणजे अगदी घरी आणून सोडले. 


साने गुरुजी गेले तेव्हा असेच घरावर लक्ष ठेवले गेले. हे आल्या आल्या एक अधिकारी आत आला, खुर्चीवर बसला आणि म्हणाला,” साने गुरुजींनी प्राणत्याग केला त्याचे कारण काय असेल?”

 हे उत्तरले,” ते शोधून काढणे तुमचे काम आहे, माझे नाही.”

 दुसऱ्या दिवशी शोकसभेत मला बोलायचे आहे असे सांगितल्यावर जमणार नाही, ठराविकच लोकच बोलतील व सभा संपेल असे सांगितले गेले व विचारल्यानंतर दोन तीन नावे सांगितली. हे उत्तरले," यांच्याखेरीज कोणीही स्टेजवर आला तर मात्र मी बोलणारच" आणि गंमत म्हणजे यांचे बोलणेही झाले.


रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाच्या वेळी काही ठिकाणी निदर्शने तर काही ठिकाणी सभा असा कार्यक्रम चालू होता. क्रांती चौकात सभा होती. मी भाजीची पिशवी घेऊन उस्मानपुऱ्यातून क्रांती चौकातून नूतन कॉलनी कडे गेले. पण वाटेतच सीआयडीने पकडले. म्हणाले चला तुरुंगात, आम्ही तुम्हाला ओळखतो. 

पोलिसांच्या गाडीत बसवले व पदमपुऱ्यातील पोलीस स्टेशनमध्ये नेले. तेथे असेच पन्नास साठ जणांना आणले होते. मनावर ताण होता. पण वरचेवर विचारपूसही चालू होती. दुपारी सर्वांना जेवण मिळाले व अडीच वाजण्याच्या सुमारास सोडले. त्यावेळी फोन नव्हते. घरी कळवायला हवे असे म्हटल्यावर पोलीस म्हणाले, आम्ही कळवतो व त्यांनी कळवले होते. 

  • सुशील प्रल्हाद अभ्यंकर 









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा