दर्शनाने धन्यता सहवासाने कृतकृत्यता! भाग ७
श्रीमती सुशील प्रल्हाद अभ्यंकर यांना ज्यांचे दर्शन झाले, सहवास लाभला, अशा प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व राष्ट्रसेविका समितीतील व्यक्तींविषयी लिहिलेल्या आठवणी. या सर्वांविषयी तसेच राष्ट्रसेविका समिती मुळे मिळालेल्या समाज सेवेच्या संधींविषयी कृतज्ञ भाव व्यक्त करण्याचा हा एक मार्ग. आत्ता वयाच्या ९१ व्या वर्षी, वाढत्या विस्मरणातून देखील, जशी आणि जेवढी शाबूत राहिली तितकी - एक स्मरण मालिका.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
राष्ट्र सेविका समिती
वंदनीय मावशी
वंदनीय मावशी वाईला आल्या होत्या. त्यांचे बौद्धिक मधल्या ओळीतील रंगमंदिरात झाले. त्यावेळी परिचय व प्रास्ताविक मी केले होते. माझे वय तेव्हा पंधरा-सोळा असेल. मावशींना बहुदा प्रास्ताविक आवडले असेल. बौद्धिक संपल्यावर पुढच्या कार्यक्रमाचे निरोप द्यायला मी काही घरी गेले आणि इकडे त्यांनी मला त्या मुलीच्या घरी जायचे आहे असे सांगितल्यामुळे एक प्रौढ सेविका त्यांना घरी घेऊन आलेल्या होत्या. आई माजघरात मशीन वर शिवत बसली होती. तिलाही काहीच कल्पना नव्हती आणि मावशी तिच्या शेजारी जमिनीवर बसून गप्पा मारू लागल्या. मी घरी आल्यावर ते पाहिले तेव्हा मावशींना खाली जमिनीवर बसवले म्हणून आईचा खूप राग आला व मावशींच्या साधेपणा मनात भरून राहिला. ही पहिली ओळख.
मग वरचेवर भेटी होत गेल्या. औरंगाबादला त्यांची रामायणावरची पाच दिवस प्रवचने झाली.नंतर प्रश्नोत्तरांच्या वेळी त्यांनी रोज एक दोन प्रश्नांची उत्तरे मला द्यायला लावली होती.
औरंगाबादच्या रामायण प्रवचनांच्या वेळेची आठवण. माझ्याबरोबर चि वृंदा होती. सात-आठ वर्षांची असेल. प्रवचन संपल्यानंतर वंदनीय मावशी उतरल्या होत्या त्या घरी कोल्हटकर ह्यांच्याकडे गेलो होतो. वंदनीय मावशींनी वृंदाला विचारले ऐकलेस ना रामायण? सांग बघू काय ऐकलं ते? वृंदाने मावशीनी सांगितलेले एक-दोन प्रसंग सांगितले. वंदनीय मावशी उद्गारल्या," सुशीलताई, ही तुमच्या वरचढ होईल. मावशींचा आशीर्वाद सुफळ झाला नसता तर नवलच!
नंतर घरी हि एक दिवस राहायला आल्या होत्या सोबत एक प्रचारिका होती. साडेदहाच्या सुमारास काही ठिकाणी भेट द्यायला यायचे होते. सकाळी बागेत जाऊन त्यांनी फुले तोडून आणलेली आठवतात.
वंदनीय मावशी राधामोहन कॉलनीतल्या घरी आल्या होत्या. त्या वर्षाचा कार्यक्रम मागास वस्त्यांना भेट देणे व सार्वजनिक संस्थांना भेटी देणे असा होता. सकाळीच शेजारीच असलेल्या वस्तीला भेट झाली. नंतर रमा नगरला भेट झाली. महिला कामाला जाणाऱ्या असल्यामुळे सकाळीच भेटणे आवश्यक होते. घरी जाऊन जेवण, थोडीशी विश्रांती व दुपारी तीन वाजता रोकडा हनुमान कॉलनीत जायचे होते. त्यावेळी सर्वसाधारणपणे प्रत्येक घरासमोरच्या अंगणात रांगोळी होत असे. जाताना मावशींचे लक्ष रांगोळ्याकडे होते. एक रांगोळी त्यांना खूप आवडली. कार्यक्रमाहून परत येताना त्यांच्या म्हणण्यावरून त्या घरात गेलो. गंमत म्हणजे रांगोळी घरातल्या 14 वर्षाच्या मुलीने काढलेली होती. प्रेमाने तिची पाठ थोपटली व जवळची खडीसाखर तिला दिली. त्यांच्या याच गुणग्राहकतेमुळे समितीला कार्यकर्त्या मिळाल्या असतील.
रामायण सांगताना सुरुवातीला त्यांनी घातलेली मांडी प्रवचन संपेपर्यंत कधीच हलत नसे.
मी असलेल्या एका वर्गावरची वंदनीय मावशींची आठवण. दुपारच्या विश्रांतीच्या वेळी मुलींच्या गप्पा चालू असत. वंदनीय मावशी दोन-तीन दिवस वर्गावर आल्या होत्या. त्या मुलींना म्हणायच्या," झोपा आता. बोलू नका".मावशींची चाहूल लागली की मुली डोळे मिटून गपचूप पडत. एकदा त्या आल्या तेव्हा म्हणाल्या,” दुपारची झोप म्हणजे वामकुक्षी. डाव्या कुशीवर झोपायचे.” झोपेचे सोंग घेतलेल्या सर्वजणी पटकन डावीकडे वळल्या! मावशी म्हणाल्या," आत्तापासून चांगलेच जमते आहे, झोपेतही आज्ञा पाळली." सर्वांनाच हसू आले.
पुढे मी बौद्धिक कार्यवाहिका झाल्यावर बैठकांच्या वेळी वंदनीय मावशींची भेट होत असे.
-सुशील प्रल्हाद अभ्यंकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा