मंगळवार, ७ जुलै, २०२०

दर्शनाने धन्यता सहवासाने कृतकृत्यता! भाग 3

 दर्शनाने धन्यता सहवासाने कृतकृत्यता! भाग 3

श्रीमती सुशील प्रल्हाद अभ्यंकर यांना ज्यांचे दर्शन झाले, सहवास लाभला, अशा प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व राष्ट्रसेविका समितीतील व्यक्तींविषयी लिहिलेल्या आठवणी. या सर्वांविषयी तसेच राष्ट्रसेविका समिती मुळे मिळालेल्या समाज सेवेच्या संधींविषयी कृतज्ञ भाव व्यक्त करण्याचा हा एक मार्ग. आत्ता वयाच्या 91 व्या वर्षी, वाढत्या विस्मरणातून देखील, जशी आणि जेवढी शाबूत राहिली तितकी - एक स्मरण मालिका. 



दर्शनाने धन्यता -सहवासाने कृतज्ञता भाग 3

दर्शनाने धन्यता सहवासाने कृतकृत्यता! भाग ३

श्रीमती सुशील प्रल्हाद अभ्यंकर यांना ज्यांचे दर्शन झाले, सहवास लाभला, अशा प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व राष्ट्रसेविका समितीतील व्यक्तींविषयी लिहिलेल्या आठवणी. या सर्वांविषयी तसेच राष्ट्रसेविका समिती मुळे मिळालेल्या समाज सेवेच्या संधींविषयी कृतज्ञ भाव व्यक्त करण्याचा हा एक मार्ग. आत्ता वयाच्या ९१ व्या वर्षी, वाढत्या विस्मरणातून देखील, जशी आणि जेवढी शाबूत राहिली तितकी - एक स्मरण मालिका. 

---------------------------------------------------------------------------------------------------------------------


माननीय मोरोपंत पिंगळे


 लग्नाच्या आधीपासून ओळख होती. वाईचा ओटीवरचा झोपाळा ही त्यांची आवडती जागा होती. ती. अण्णा प्रचारक निघाला (राम साठे) म्हणून नानांचा संघावर राग होता. ते फारसे बोलायचे नाहीत. पण मोरोपंत त्यांच्याशीहि गप्पा मारू शकत! 


नेऊरगावच्या बैठकीत खिडकीजवळच्या लोडावर बसत. तेव्हा नेऊरगावला संडास नव्हता. पण लोटी घेऊन जाताना आपण जणू फिरायला निघालो आहोत अशा ऐटीत जात! कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेऊन आनंदाने राहण्याचा प्रचारकांचा गुण प्रेरणादायी आहे.

 

माझ्या प्रवासातही मोरोपंतांशी अनेक ठिकाणी भेटी झाल्या. ते मुलांचे आवडते काका होते. एकदा ते पुण्यात दवाखान्यात होते. एक स्वयंसेवक मदतीसाठी होता. डोक्याकडची पलंगाची बाजू वर करून बसलेल्या स्थितीत जास्त वेळ असत मी भेटायला गेले तेव्हा व्यवस्थेतील स्वयंसेवक म्हणाला,” त्यांना भेटता येणार नाही”. 

 मी त्यांना म्हणाले,” ठीक आहे. पण ते जागे असतील तर सुशील अभ्यंकर आल्या आहेत एवढेच सांगा" 

नाव ऐकल्याबरोबर त्या स्वयंसेवकाला सांगितले ताबडतोब आत आणा. त्याआधी माझे पांघरुण नीट कर. कुठून आलीस? प्रवास कुठे आहे? वगैरे चौकशी झाली. सोबत पेरू नेले होते. त्यांना आवडत. फार चटकन हसत नसत, पण हसतील तेव्हा गडगडाटी हसत होते. त्यांच्या शरीराला ते हसणे शोभून दिसे.

 

नेउरगावची आणखी एक आठवण. लागोपाठच्या प्रवासात कपडे धुतले जायचेच असे नाही.एकदा त्यांचे कपडे बाईने धुतले. धुणं वाळत घालताना ती म्हणाली,” काकू पाहुण्याचे धोतर खूपच फाटले आहे.” वाळलेल्या कपड्यांच्या घड्या करताना त्या ऐवजी दुसरे नवे धोतर ठेवून कपडे बैठकीत गेले. दुसऱ्या दिवशी अंघोळीला जाताना म्हणाले,” अरे वा! काय जादू आहे! फाटलेले धोतर नवे झाले.”

 ते आले की मळलेले कपडे गड्याला सांगून एकत्र करायचे व बाई नसेल तर गड्यांकडून धुऊन घ्यायचे हा ठरलेला कार्यक्रम होता. 


मा. शिवराय तेलंग 


मुंबईला प्रचारक होते. कामाठीपुऱ्यात व आग्रीपाड्याला नेहमीच येत. एकदा यांच्यासाठी लांब बाह्यांचा व बंद गळ्याचे स्वेटर विणला होता. त्यांनी तो पाहिला व म्हणाले,” आपल्याला असा स्वेटर मिळाला तर काय गंमत येईल!” त्यांच्यासाठी तसाच स्वेटर विणला. त्यांचा स्वेटर विणून झाल्यावर त्यांनी घालून पाहिला व म्हणाले,” या स्वेटर चे पोट मोठे झाले आहे! “ त्यांचे पोट मोठे होते. मी म्हंटले स्वेटरला ही कळते घालणार्‍याला सोईस्कर रित्या लहान मोठे व्हायचे असते! कितीतरी प्रचारकांना मी स्वेटर विणून दिले होते, नेहरू शर्ट ही शिवून दिले होते.


स्वेटरची गंमत 


 यांचे (प्रल्हादजींचे ) स्वेटर केव्हा कुणाला दिले जातील याचा नेमच नसायचा. एकदा असाच नवा विणलेला स्वेटर घालून गेले. घरी आले तेव्हा स्वेटर नव्हता. मी विचारले काय झाले? उत्तर आले,” एक आजारातून उठलेला स्वयंसेवक भेटला. माझ्यापेक्षा त्याला स्वेटरची जास्त आवश्यकता आहे हे लक्षात आले म्हणून त्याला देऊन टाकला.”

खरं म्हणजे राग आला. कारण तसा स्वेटर विणायला कितीही वेगाने विणले तरी महिना लागायचा. पण त्या स्वयंसेवकाला किती बरे वाटले असेल असा विचार करून शांत झाले. 



दामूअण्णा दाते 


 अगदी व्यवस्थित राहणी. घरचेच वाटायचे इतक्या भेटी व त्यांचा स्वभाव! आम्हा दोघांनाही चांगले ओळखायचे. एके वर्षी संघातर्फे ठिकठिकाणी कौटुंबिक मेळाव्याचे आयोजन केले गेले होते. असे बऱ्याच ठिकाणी गेलो होतो. एकदा संध्याकाळच्या चारच्या चहा पाण्याच्या वेळी, मी नंतरच्या सत्रात बोलावे की यांनी अशी कार्यकर्त्यात चर्चा चालली होती. त्यावेळी त्यांनी सांगितले होते की हसत-खेळत विषय हवा असेल तर प्रल्हादजीना सांगा व अभ्यासपूर्ण हवा असेल तर वहिनींना सांगा.

ते आले कि मुले ही खुश असत. विशेषतः वृंदा. भरपूर गप्पा चालायच्या.


 दुसरे दामुअण्णा म्हणजे टोकेकर.

 कायगावजवळच्या टोक्याचे होते. स्वभाव जरासा अबोल होता. दोन तीनदाच घरी आले होते. 


दोन्ही दामुअण्णा म्हणजे एखाद्या विषयाचा सांगोपांग अभ्यास.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा