दर्शनाने धन्यता सहवासाने कृतकृत्यता! भाग 5
श्रीमती सुशील प्रल्हाद अभ्यंकर यांना ज्यांचे दर्शन झाले, सहवास लाभला, अशा प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व राष्ट्रसेविका समितीतील व्यक्तींविषयी लिहिलेल्या आठवणी. या सर्वांविषयी तसेच राष्ट्रसेविका समिती मुळे मिळालेल्या समाज सेवेच्या संधींविषयी कृतज्ञ भाव व्यक्त करण्याचा हा एक मार्ग. आत्ता वयाच्या 91 व्या वर्षी, वाढत्या विस्मरणातून देखील, जशी आणि जेवढी शाबूत राहिली तितकी - एक स्मरण मालिका.
----------------------------------
मा. आबाजी थत्ते
मला बहिण मानायचे. माननीय सिंधुताई फाटक ह्या त्यांच्या भगिनी. परमपूज्य गुरुजींचे ते स्वीय सहाय्यक अशी त्यांची प्रामुख्याने ओळख होती. त्यामुळे गुरुजींच्या प्रत्येक भेटीच्या वेळी तेही घरी आलेले आहेत. गुरुजींची व्यवस्था व्यवस्थित ठेवताना त्यांचा साहजिकच ज्यांचे घरी मुक्काम असे त्या कुटुंबीयांशी जवळचे संबंध असत. आत्मीयता निर्माण होई.
मा. यादवराव जोशी
दक्षिण भारतात क्षेत्र प्रचारक होते. हैदराबाद संघ कार्यालयात त्यांची अनेकदा भेट झाली. संघाचे ज्येष्ठ प्रचारक श्री.रामभाऊ साठे, माझे बंधू त्या कार्यालयात असायचे. प्रवासात मी हैदराबादला गेले की स्वाभाविकच संघ कार्यालयात जायची. माझा मुक्काम समिती कार्यालयात असे. दोघांच्याही खोल्या एकाच मजल्यावर होत्या. यादवरावांकडेही जाणे होत असे.
एक आठवण-
प्रवासात मी जम्मूला गेले होते. ठरलेल्या कार्यक्रमात संघ कार्यालयात भेट होती. मी व पंकजा गेलो. त्यावेळी तिथे यादवराव जोशी होते का जगन्नाथराव जोशी आता नक्की आठवत नाही. त्यादिवशी आग्रहाने कार्यालयात थांबवून घेतले. अन्य प्रचारकांच्या बरोबर जेवण झाले. नंतर म्हणाले, वहिनी तुमच्या हातची साबुदाण्याची खिचडी खायची आहे. उद्या सकाळचा नाश्ता तोच! सामान सांगा, इथे तयारी करून घेतो. जम्मूला त्यावेळी शेंगदाण्यांचा फार वापर होत नसे. कार्यालयात त्यांनी शेंगदाणे भाजून कूट करायला सांगितले. साबुदाणा मात्र मी समितीच्या कार्यालयात बरोबर घेऊन गेले. साबुदाणा रात्री भिजवून तयार करून घेतला. खिचडी सर्वांनीच मनापासून खाल्ली. विस्थापित मुलींचे आमचे छात्रावास होते. त्यांच्यासाठीही थोडी पाठवली. पुढचा प्रवास विचारून घेतला व आवश्यक त्या सूचना व घ्यावयाची काळजी सांगितली.
के सूर्यनारायण राव
बेंगलोर च्या प्रवासात त्यांच्या घरी गेले आहे.. त्यांची बहिण म्हणजे आमच्या रुक्मिणी अक्का. केंद्र सहकार्यवाहिका म्हणून अनेक वर्षे त्यांच्याकडे जबाबदारी होती.
श्री इंद्रेशजी
पहिली भेट दिल्ली कार्यालयात झाली. तेथूनच मी जम्मू-काश्मीर कडे गेले. त्यावेळी काही वेळा त्यांच्या भेटी झाल्या. काश्मीर बचाव अभियाना अंतर्गत जम्मूला सभा होती. इंद्रेशजी अध्यक्ष व मी वक्ता होते.
त्या नंतर, त्याच प्रवासात, आणखी एक कार्यक्रम होता सरहद्दीवर मृत्युमुखी पडलेल्या जवानांना अभिवादन व त्या वीरपत्नींच्या सत्काराचा. सुरुवातीला वीरपत्नींचे नाव उच्चारले जाई व त्यांनी स्टेजवर येऊन सत्कार स्वीकारावा अशी कल्पना होती. पण पती निधनाला सहा महिने जेमतेम झाले असताना स्टेजवर येऊन सत्कार स्वीकारणे त्या वीरपत्नींना अवघड वाटत असावे असे जाणवले. मग मी खाली उतरले व त्या जेथे असतील तेथे जाऊन शाल व पाकीट देऊ लागले. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. एक म्हणाली कि त्यांनी त्यांचे कर्तव्य केले. आम्हाला सत्कार नको. मी तिला म्हटले,” हा सत्कार तुझा नाही. त्या जवानांनी केलेल्या कार्याचा आहे. एकीने तर तिचे तान्हे मूल माझ्या हातात दिले व म्हणाली,” यह भी पिता जैसा देश कार्य के लिए तयार होगा ऐसा आशिष दो.”
कार्यालयात परत आल्यानंतर सर्वजण गप्प गप्प होते. इंद्रेशजीनी नमस्कार केला व ते निघून गेले. ते पण भारावलेले होते.
-सुशील प्रल्हाद अभ्यंकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा