दर्शनाने धन्यता सहवासाने कृतकृत्यता! भाग १
.जबलपुर जवळ त्रिपुरी काँग्रेस अधिवेशन झाले होते. सरकारी नोकरी म्हणून नानांना जाणे शक्य नव्हते पण आई बरोबर आम्ही भावंडे अधिवेशन पाहायला गेलो होतो. पंडित नेहरू भाषण करीत होते. महात्माजी व वल्लभभाई पटेल स्टेजवर होते.
त्या वेळी वल्लभ भाईंना त्यांच्या रोख ठोक स्वभावामुळे जरा बाजूला सारले जात होते अशी चर्चा होती. 1941 42 च्या सुमारास महाबळेश्वरला विश्रांतीसाठी पंडित नेहरू थांबले होते. तिथून पुणे मुंबईकडे जाताना गाड्या वाईवरून जात. त्या वेळीही त्यांना पाहायला गेल्याचे आठवते. साने गुरुजींची गोष्टींची पुस्तके त्या वयात खूप आवडायची. मुंबईला शिवाजी पार्कवर सभा होती. लहान मुलांशी बोलावे तशाच भाषेत भाषण व त्यांची बसण्याची पद्धत आवडली नव्हती हे अजून आठवते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
नाना दुसऱ्या महायुद्धात दीड-पावणेदोन वर्ष युद्ध भागात होते. तेव्हा आधी जबलपूरला राईट टाऊन या भागात बिर्हाड करून राहात होतो. राईट टाऊन वरून डॉक्टर हेडगेवार यांचे भाषण ऐकायला गेलो होतो.
माननीय गोळवलकर गुरुजी
गुरुजींची अनेक वेळा भेट झाली आहे. वाईला त्यांच्या उपस्थितीत संघ कार्यकर्त्यांची बैठक पुढच्या माडीत झाली होती. त्यांचा मुक्काम संघचालक डॉक्टर गोखले ह्यांच्याकडे गंगापूरी आळीत असे. वहिनी गोखले या समितीच्या वाईच्या कार्यवाहिका होत्या.त्यांच्याकडे संघाचे जास्त पाहुणे आले तर आम्ही त्यांच्या मदतीसाठी जात असू. त्या वेळीही तिथे अनेकांना पाहिले होते. गुरुजी आमच्या लग्नाला येणार होते, पण येऊ शकले नाहीत.
महाराष्ट्र प्रांत संघचालक माननीय बाबाराव भिडे आले होते. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी बहुतेक शिवाजी पार्कला गुरुजींचे जाहीर भाषण होते. लग्नानंतर मुंबई संघचालक यांचेकडे गुरुजींना नमस्कार करण्यासाठी गेलो होतो. मी समितीची वाईची बौद्धिक कार्यवाहिका होते हे त्यांना अण्णा मुळे(श्री. रामभाऊ साठे ) माहिती होते. त्यांनी आशीर्वाद दिला,” दोघांचीही कामे चालू राहू द्या”.
चिरंजीव जयंतचा जन्म वाईचा. त्याला घेऊन मी मुंबईला आले त्यावेळी आग्रीपाड्याला महानगरपालिकेच्या चाळीत राहत होतो. एकच खोली होती. मुंबईला गुरुजी आले त्यावेळी त्यांनी आपण होऊन मी मुलाला पाहणार पाहायला येणार आहे असा निरोप पाठवला. वेळ फक्त अर्धा तास होता पण मजल्यावर संघ कार्यकर्ते बरेच असल्याने त्यांच्या स्वागताला पायघड्या घातल्या गेल्या.
मला घटसर्प झाला म्हणून मी दवाखान्यात होते. तिथे पाहायला श्रीगुरुजी आले होते. ते म्हणाले लहान मुलांनाच घटसर्प होतो असे माहिती होते. बोलता येत नव्हते तरी मी उत्तरले, आपल्यासारख्या थोरांच्या समोर मी लहानच आहे!
जयंत मोठा झाला. चालायला बोलायला लागला होता. गुरुजींना भेटायला गेलो होतो. त्याला घ्यायला गुरुजींनी हात पुढे केला. मी नाही दाढीवाल्या कडे जाणार असे म्हणून त्याने मान वळवली आणि गुरुजींच्या खोखो
हसण्याने हॉल भरून गेला.
माननीय बाळासाहेब देवरस -
गंभीर व अबोल वाटायचे. ते औरंगाबादला दोन दिवस घरी राहायला होते. पलीकडचा फ्लॅट त्या वेळी भाड्याने दिलेला होता. त्यामुळे चिरंजीव जयंतच्या खोलीत त्यांची व्यवस्था केली होती. माधवी लहान होती. ती सवयीने सारखी खोलीकडे जायची. ती आत गेली की तिला चॉकलेट देऊन बाहेर पाठवायचे!
मी शाळेकडे रजा मागितली होती पण इन्स्पेक्शन असल्याने मिळाली नाही. योगायोगाने इन्स्पेक्शन रद्द झाले व काही शिक्षकांनी रदबदली केली म्हणून मी घरी येऊ शकले. संध्याकाळी समितीच्या सेविका त्यांना भेटायला आल्या होत्या.
माननीय रज्जूभैय्या, सुदर्शनजी यांच्याशी भेटी झाल्या.
सुदर्शनजी गोव्यात प्रचारक होते. माझ्या गोव्याच्या प्रवासात त्यांची भेट झाली होती.
माननीय मोहनजी भागवत घरी आले होते.
माझ्या विदर्भाच्या प्रवासात त्यांच्या आईची देखील भेट झाली होती.
हे सर्वजण घरी आले होते.
महाराष्ट्राच्या संघकार्यात एकाच वेळी तीन वसंत फुलले होते. आपटे केळकर व भिडे. शिवाय एक वसंतराव उपाध्ये नावाच्या प्रचारकांनी काही वर्षे मुंबईत काम केले.
सगळ्यात जास्त भेटी वसंतराव भिडे यांच्या झाल्या. उर्मिलाताई भिडे पण प्रवासात तीन-चारदा भेटल्या.
वसंतराव भिडे यांची पंच्याहत्तरी होती. सांगलीला कार्यक्रम होता. खूपच आग्रहाचे बोलावणे होते.
हे आजारी होते, अगदी अंथरुणावर होते. त्यामुळे मलाही जाता येत नव्हते. त्यांची तगमग चालली होती. जयंताने सांगितले,” आई तु जा. मी बाबांना सांभाळीन” रात्री निघून मी सांगलीला गेले, कार्यक्रमानंतर रात्री निघून औरंगाबादला परत आले. वसंतरावांबद्दल थोडे बोलावे असा आग्रह झाला आणि वसंतरावांनी आग्रहाने स्टेजवर खुर्ची मांडून बसवले. उर्मिला ताईनाही मी गेल्याने खुप आनंद झाला होता.
एकदा प्रचारकांची बैठक नेउरगावला होती. प्रांत संघचालक श्री बाबाराव भिडे ही होते. नऊ दिवसांची बैठक होती. करायला मी एकटीच. त्यावेळी वसंतराव पाने मांडणे वगैरे मदत करत असत.
वसंतराव केळकर देखील नेउरगावला राहायला आले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा