रविवार, १२ जुलै, २०२०

दर्शनाने धन्यता सहवासाने कृतकृत्यता! भाग ९

 दर्शनाने धन्यता सहवासाने कृतकृत्यता! भाग ९

श्रीमती सुशील प्रल्हाद अभ्यंकर यांना ज्यांचे दर्शन झाले, सहवास लाभला, अशा प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व राष्ट्रसेविका समितीतील व्यक्तींविषयी लिहिलेल्या आठवणी. या सर्वांविषयी तसेच राष्ट्रसेविका समिती मुळे मिळालेल्या समाज सेवेच्या संधींविषयी कृतज्ञ भाव व्यक्त करण्याचा हा एक मार्ग. आत्ता वयाच्या ९१ व्या वर्षी, वाढत्या विस्मरणातून देखील, जशी आणि जेवढी शाबूत राहिली तितकी - एक स्मरण मालिका.

------------------------------------------------------------------------------------------------------------------


माननीय प्रमिल ताई मुंजे 


माननीय प्रमिल ताई मुंजे ह्यांचे प्रसिद्ध घराणे व श्रीमंतही. मी त्यांना पाहिले ते त्यांच्या प्रौढ वयात. समितीच्या कार्याची रचना प्रांत, जिल्हा, तालुका, शहर अशी झाली तेव्हा त्या पश्चिमांचल च्या प्रमुख झाल्या. 

महाराष्ट्र गुजरात व राजस्थान या तिन्ही प्रांतांचे मिळून पश्चिमांचल होते. त्यांचा चेहरा गंभीर असे पण हसत तेव्हा समोरच्याचे मन जिंकत. केंद्र कार्यालय अहिल्या मंदिर नागपूर येथे वरचेवर भेट होई. तेव्हा एका बैठकीत त्यांच्याच आग्रहाने मला प्रांत बौद्धिक कार्यवाहिका, आंचल बौद्धिक कार्यवाहिका या पदावरून अखिल भारतीय बौद्धिक कार्यवाहिका या पदावर उडी मारावी लागली. औरंगाबादला एकदा घरीही आल्या होत्या. माझ्या कामाबाबत त्या एकदा म्हणाल्या माझी त्यांनी केलेली निवड योग्य ठरली. 


माननीय बकुळताई देवकुळे 


माननीय बकुळताई देवकुळे ह्यांचे माहेर पुण्याचे. वंदनीय ताई आपटे ह्यांचा सहवास लाभलेली हि बकुळ नातू. देवकुळे मंडळी वाईची. काहीतरी नवीन योजना असेल त्यावेळी आधी काही जणीशी चर्चा करायची पद्धत होती. अशा वेळी माझा उल्लेख माझे माहेर वाईचे असल्याने नणंद म्हणून व्हायचा! गौरवर्ण, उंचापुरा देह, शारीरिक चांगले. वर्गावर शिक्षिका म्हणून असायच्या. दंड फिरवण्यात कौशल्य होते. आवाज मोठा होता. शिस्त कडक असे. दादरच्या हिंदू कॉलनीत राहत असत.

रुईया कॉलेजमध्ये प्रारंभिक प्रवेश वर्ग होते. मी त्या वर्गावर प्रारंभिक ची विद्यार्थी होते. मी देखील दंड सफाईदार करते याचे त्यांना कौतुक होते. तेव्हा त्या मुंबईच्या कार्यवाहिका होत्या.

एकदा समितीच्या विविध आयामांसकट विस्तारित कामाची माहिती देणारे बौद्धिक झाले. साधारणपणे १९४५ साल असावे. माझे वय पंधरा-सोळा. बौद्धिक ऐकल्यानंतर शंका निरसनासाठी वेळ असे. एवढ्या मोठ्या कामांसाठी आपण योग्य आहोत का? असा विचार मी बोलून दाखवला. वक्त्या काही बोलायच्या आधीच बकुळ ताई कडाडल्या,” असे वाटत असेल तर उद्यापासून येऊ नकोस. सायं शाखा, सायंस्मरण झाले व घरी जायला निघालो. त्यावेळी मुक्कामाची सोय वर्ग स्थानी नव्हती. संध्याकाळी घरी जायचे व सकाळी जेवणाचा डबा घेऊन यायचे. निघताना मी ज्या मैत्रिणी झाल्या होत्या त्यांचा निरोप घ्यायला लागले. सगळ्यांनाच हा प्रसंग बोचला होता. खरं म्हणजे बकुळताईंनाही जरा जाणीव झाली असावी. त्यांनी शिक्षिका इंदुताई देव, विमलताई वर्तक ह्यांना लक्ष ठेवायला सांगितले होते.मी निघाले त्यावेळी विमलताई वर्तक म्हणाल्या,” तुला बकुळ ताईंनी बोलावले आहे. मी म्हटले,” मला त्यांना भेटायचे नाही. जिना उतरून खाली आले तो बकुळ ताई समोर उभ्या! म्हणाल्या,” उद्या यायचे आहे. नाही म्हणून चालायचे नाही. मोठ्यांचे ऐकायला हवे.

 माझ्या वर्ग पुरा झाला. वाईला परतले पण लग्नानंतर मुंबईला गेल्यावर समिती कामामुळे वरचेवर भेटी होत गेल्या. माझा प्रवेश वर्ग ठाण्याला झाला त्यावेळी काही लहान मोठ्या जबाबदाऱ्या माझ्यावर सोपवल्या गेल्या होत्या.

 

रुक्मिणी अक्का.


 केंद्र सहकार्यवाहिका म्हणून अनेक वर्षे त्यांच्याकडे जबाबदारी होती. प्रकृती अस्वास्थ्यामुळे काम करायच्या थांबल्या. स्वतः करून सर्वांना खायला घालणे खूप आवडायचे. नागपूरला आल्या तरी रोज काहीतरी करत असत. स्वभाव वैशिष्ट्य म्हणजे मातेसारखे वात्सल्य. दृष्टीमध्ये कौतुक भरलेले असे. लोकरीचे विणकाम हा छंद होता. एकदा मी ठाण्याला वृंदाचे घरी गेले होते त्यावेळी त्या ठाण्याला घरी आल्या होत्या. आत्ताच्या प्रमुख संचालिका माननीय शांताक्काही बरोबर होत्या. 


इंदुताई देव 


या गोऱ्या उंच होत्या व सडपातळ होत्या. शारीरिक बरोबरच चर्चा घेण्यात त्यांचा हातखंडा होता. स्वभावाने सौम्य होत्या.


 विमलताई वर्तक


 या पुण्याच्या होत्या. काळ्यासावळ्या, बेताचा बांधा पण पाहताच करारीपणा जाणवत असे. बोलणे कमी होते. जरासा धाकच वाटायचा. अनेक वर्षे समिती कामात सहभागी होत्या. 


 वीणाताई बोडस 


समिती काम विस्तारले त्या काळातील बकुळताईंच्या सहकारी. सगळ्यांशी हसून बोलून राहण्याची पद्धत असल्याने सर्वांच्या आवडत्या होत्या. त्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे डोळे मोठे होते. प्रवासात ज्या घरी उतरत तेथे मोकळे वातावरण निर्माण करत. नक्की आठवत नाही पण बहुदा दादरला राहायला होत्या. श्री राजाभाऊ बोडस यांचीही ओळख होती. मग नंतर पार्ल्याला राहात होत्या असे वाटते.


  • सुशील प्रल्हाद अभ्यंकर 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा