सोमवार, १३ जुलै, २०२०

दर्शनाने धन्यता सहवासाने कृतकृत्यता! भाग १०

 दर्शनाने धन्यता सहवासाने कृतकृत्यता! भाग १०

श्रीमती सुशील प्रल्हाद अभ्यंकर यांना ज्यांचे दर्शन झाले, सहवास लाभला, अशा प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व राष्ट्रसेविका समितीतील व्यक्तींविषयी लिहिलेल्या आठवणी. या सर्वांविषयी तसेच राष्ट्रसेविका समिती मुळे मिळालेल्या समाज सेवेच्या संधींविषयी कृतज्ञ भाव व्यक्त करण्याचा हा एक मार्ग. आत्ता वयाच्या ९१ व्या वर्षी, वाढत्या विस्मरणातून देखील, जशी आणि जेवढी शाबूत राहिली तितकी - एक स्मरण मालिका.

--------------------------------------------------------------------------------------------------------------


प्रतिभाताई भावे


 संस्कृत डॉक्टरेट व प्रोफेसर. अहिल्या मंदिरात वरचेवर येत असत. त्यावेळी भेट होई. अगदी निरभिमानी व्यक्तिमत्व. मराठी प्रार्थनेचे संस्कृत भाषांतर कोणी केले माहिती नाही. कदाचित प्रतिभाताईंनीही केले असेल. पण नमस्काराचे संस्कृत भाषांतर त्यांनी केले आहे असे वाटते. नमस्कारात पृथ्वी, आप, तेज, आकाश होते. पंचमहाभूतांपैकी वायू नव्हता हे माझ्या लक्षात आले. त्यांच्याशी बोलले आणि त्यांनी लगेच "चतुर्थ मे नमस्कार नमो वायू देवताय" हा श्लोक जोडला..


शकुनताई वऱ्हाडपांडे


 विदर्भ प्रांताच्या कार्यवाहिका. सर्व लहान मोठ्या सेविकांना मायेने सांभाळून घेणे हे वैशिष्ट्य होते. मनातल्या शंकेचे निरसन योग्य व्यक्तीकडून सहजपणे करून घेत असत. नीटनेटकी राहणी होती.


मीनाताई देव


अहिल्या मंदिर मध्ये रहायला ठरवून आल्या होत्या. अहिल्या मंदिर च्या जणू व्यवस्थापक होत्या. गृहिणी सारखा त्यांनी कारभार सांभाळला. खूप काम पडले तरी सदैव प्रसन्न असायच्या. मा. सिंधुताई,वं.उषाताई यांचे पथ्यपाणी व्यवस्थित सांभाळले. सकाळी नेमाने फिरायला जात असत. भजनी वर्गातही सहभाग असायचा. मला हार्ट अटॅक आला तेव्हा जवळच्या दवाखान्यात तीन-चार दिवस होते. दुपारच्या वेळी मीनाताई सोबत असत.


माननीय सिंधूताई फाटक 


श्री आबाजी थत्ते यांची बहीण. समितीच्या एक जेष्ठ प्रचारिका. यांचे निवासस्थान दादरला होते ते ओझरते आठवते. वैधव्य तारुण्यातच आले. एकदा आग्रीपाड्याला आल्या होत्या. काहीतरी विषय निघाला आणि फाटक यांच्या आठवणीने त्यांना रडू आले. मी वयाने लहान. त्यांच्या शेजारी बसून फक्त हात फिरवत राहिले. 

आबांच्या सल्ल्याने व समिती कार्यकर्त्यांच्या आग्रहाने हळूहळू समिती कार्यात रुळल्या. उत्तर भारत व पुढे दिल्ली हे त्यांचे केंद्र बनले. आवश्यक असेल तर सेविकांची दोन तीन पथके सैन्याच्या मदतीला पाठवू असे आत्मविश्वासाने सांगण्याजोगे उत्तर भारतात काम वाढले. प्रवासही चालू असे.

 वय झाले, प्रवास होईनासा झाला. मग नागपूरला केंद्र कार्यालयात राहिल्या. छात्रावासातल्या मुलींना छोट्या छोट्या गोष्टी सांगत असत. टेबलाजवळ बसून आल्या गेल्याची नोंद, दूरध्वनी घेणे, उत्तर देणे वगैरे चालू असे. व्हीलचेयरवरून येणे जाणे असे. त्यांना भेटायला कोणी गेले कि छान हसून स्वागत होई व उजवा हात जणू आशीर्वादासारखा वर उचलला जाई. शेवटपर्यंत पांढरी साडी ब्लाऊज हाच वेष कायम राहिला.

 त्यांना खारे दाणे खूप आवडायचे म्हणून नागपूर ला जाताना त्यांच्यासाठी व इतरांसाठी नेहमी करून नेत असे तसेच आणखी एक गोष्ट त्या माझ्याकडे हक्काने मागायच्या. ती म्हणजे नऊवारी साडीची चौघडी. मी शिवलेलीच पसंत पडत असे.

 काही वेळा इतर प्रचारिका त्यांच्याकडून चौघडी घेऊन जायच्या. मग मला निरोप यायचा कि चौघडी पाठव संध्याकाळी गच्चीत जाऊन बसणे त्यांना खूप आवडायचे


माननीय कुसुमताई साठे

पहिल्या अखिल भारतीय बौद्धिक कार्यवाहिका! संस्कृतचा आणि अनेक विषयांचा सखोल अभ्यास होता. विद्वत्तेचे तेज होते पण कधीच धाक नव्हता. शिक्षा वर्गावर पहिली भेट झाली. त्यावेळी मीही साठेच होते. सुशीलताई महाजनही त्यावेळी साठे होत्या. शीलाताई लेले यांचेही माहेरचे आडनाव साठे होते असे अंधुक आठवते. रुईया कॉलेजमध्ये वर्गावर मी व सुशिलताई महाजन शिक्षार्थी होतो.

चर्चेच्या वेळी त्या म्हणायच्या,” ए वाईची साठे, उठ!”. त्यांची कधी भीती वाटली नाही. नाशिकच्या प्रबोधच्या वर्गावर त्या आल्या असताना मी वर्गाधिकारी होते. त्या वेळी ठरवून त्यांच्या उपस्थितीत ‘गायत्री मंत्र’ हा विषय प्रथमच मांडला. सुरुवातीलाच,” चुकले तर सांगा व आवश्यक त्या सुधारणाही सांगा” अशी त्यांना विनंती केली होती. त्यांना विषय मांडणी खूप आवडली. 

ह्या वर्गापूर्वी प्रबोधचे वर्ग केंद्रात होत असत. माननीय बकुळताईंच्या आग्रहाने तो प्रथमच नाशिकला झाला अन वर्ग ठरल्या ठरल्या मला निरोप आला,” तुला सर्वाधिकारी म्‍हणून पूर्णवेळ राहायचे आहे. पुढे पूर्णवेळ प्रचारिका व काही काळासाठी विस्तारिका निघालेल्या अनेक जणी वर्गावर होत्या. त्यांच्याकडे अधिक लक्ष पुरवायचे आहे ह्याही सूचना होत्या.


माननीय नीलाताई जोशीराव 


संस्कृतच्या प्राध्यापिका. नागपूरला शक्तीपीठात वर्ग असला की त्यांचे मार्गदर्शन मिळत असे. व्यक्तिमत्वाचा जरासा दबदबा असे. एकदा त्यांच्या घरी गेल्याचे आठवते. माझी रामायण प्रवचने त्यांना आवडली होती.


-सुशील प्रल्हाद अभ्यंकर 



















कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा