दर्शनाने धन्यता सहवासाने कृतकृत्यता! भाग 4
श्रीमती सुशील प्रल्हाद अभ्यंकर यांना ज्यांचे दर्शन झाले, सहवास लाभला, अशा प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व राष्ट्रसेविका समितीतील व्यक्तींविषयी लिहिलेल्या आठवणी. या सर्वांविषयी तसेच राष्ट्रसेविका समिती मुळे मिळालेल्या समाज सेवेच्या संधींविषयी कृतज्ञ भाव व्यक्त करण्याचा हा एक मार्ग. आत्ता वयाच्या 91 व्या वर्षी, वाढत्या विस्मरणातून देखील, जशी आणि जेवढी शाबूत राहिली तितकी - एक स्मरण मालिका.
----------------------------------
श्री एकनाथजी रानडे -
यांची बहीण तुलसीदास तेजपाल दादर बिल्डिंग च्या पलीकडे राहत असे. नाव आता आठवत नाही. त्यांच्याकडे समितीमुळे वरचेवर जाणे होत असे. यावेळी एकनाथजी बऱ्याच वेळा भेटायचे. तुलसीदास तेजपालमध्ये ही संघ कार्यालयाची एक खोली होती. तेथेही येत असत. विवेकानंद शिला स्मारक निधी आम्ही जमा केल्याचे आठवते. तरुणपणीचा धोतर, सदरा, उपरणे हा वेष शेवटपर्यंत राहिला. स्वभाव थोडा आग्रही होता. अर्थात त्यामुळेच एवढे मोठे काम उभे राहिले हे निश्चित.
मधुकरराव जोशी -
प्रामुख्याने मराठवाडा कार्यक्षेत्र. आवाज चांगला होता. त्यांचे गीत श्रोत्यांना मुग्ध करून टाके. मंद हास्य ही त्यांची आल्याची खूण होती. धोतर किंवा पायजमा शर्ट हा त्यांचा नेहमीचा पोशाख असे. आणीबाणीत पॅन्ट शर्ट घातलेले मधुकरराव पाहिले व गंमत वाटली.
राधामोहन कॉलनीतल्या घरात स्वयंपाक घरालादेखील दार होते. त्यातून बाहेर पडून, घराला लागून असलेल्या बोळातून गुपचुप बाहेर जाता येत असे. वेळ प्रसंगी, बोळातून उडी मारून शेजारच्या मोकळ्या जागेत झुडपात लपता येत असे. त्यामुळे आणीबाणीत स्वयंपाक घरात पुष्कळदा बैठका होत.
शेवटच्या दुखण्यांत मधुकररावांना भेटायला गेले तेव्हा तेथे असलेल्या खुर्चीवर बसले. त्यांनी खुणेने खुर्ची जवळ घ्यायला लावली. फारसे बोलवत नव्हते. निजुनच नमस्कार केला. “तुमची भेट झाली, खूप बरे वाटले” असे म्हणाले.
दत्ताजी भाले -
एक गंभीर व्यक्तिमत्व. आणीबाणीत पुष्कळदा रात्री उशिरा घरी येत. हळूच दार वाजवत. ते आले की बाहेरच्या खोलीतली कॉटवरची जागा त्यांना रिकामी करून द्यायची ह्याची मुलांना सवय झाली होती. कारण व्हरांड्याला जाळी होती. पडदा असला तरी तो उघडून फटीतून बाहेर पाहता येत असे.
मी पिंपरीला नोकरीला होते. शनिवारी रात्री उशिरा घरी यायचे व सोमवारी सकाळी परत जायचे. पण मुलांनी, विशेषतः बिंदाने सर्व व्यवस्थित सांभाळले.
श्री लक्ष्मण राव इनामदार -
गुजराथचे प्रचारक. 1973 पासून पश्चिमांचल क्षेत्र प्रचारक झाले. महाराष्ट्र त्यांच्या कार्यक्षेत्रातील एक भाग. गुजरात प्रवासात त्यांची ओळख झाली होती.
औरंगाबादला स्वागत मध्ये काही वेळा आले होते. त्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे घरात शिरल्या शिरल्या पंख्याचे व संध्याकाळ असेल तर दिव्याचे बटन दाबायचे. सात-आठ बटनांमधून ते नेमके बटण दाबत. सततचा प्रवास, शेकडो घरी येणे-जाणे, तरीही त्यांना हे कसे जमायचे कुणास ठाऊक
काशिनाथ धायगुडे कच्छ भूकंपानंतर त्या भागात प्रवासाला गेले तेव्हा भेट झाली. गंमत म्हणजे ते वाईचे होते. मीही वाईची होते. ते प्रचारक निघाले तेव्हा मी मॅट्रिक झालेली होते. तरी कधी परिचय झाला नव्हता. ते देखील संघ प्रचारकांचे घरी सतत येणे-जाणे असूनही.
ब. ना. जोग
माहीमला राहत असत. त्यांनी अनेक पुस्तके लिहिलेली आहेत. दादर आग्रीपाडा येथे नेहमी येत असत. त्यांची बहीण सुमती जोग समिती सेविका होती.
चं. प. भिशीकर
दांडगे वाचन! त्यांच्याकडे अनेक वेळा जाणे झाले आहे. सौ कुसुमताई भिशीकर ह्यांच्याकडे समितीचे प्रकाशनाचे काम होते. वंदे मातरम शताब्दीनिमित्त दैनिक तरुण भारतमध्ये प्रसिद्ध झालेले माझे लेख त्यांच्या वाचनात आले होते. समितीतर्फे वंदे मातरम वर पुस्तका पुस्तिका प्रकाशित करायचे ठरवले तेव्हा त्यांनी कुसुमताईना सांगितले,” विचार कसला करता? सुशीलताईंना सांगा. त्यांचा अभ्यास आहेच.”
नंतरची ही माझी पुस्तके त्यांनी वाचली होती. कुठला ते नक्की आठवत नाही. पण एका जाहीर कार्यक्रमात ते अध्यक्ष होते. मी वाकून नमस्कार केला व बोलायला सुरुवात केली. भाषण संपल्यानंतर त्यांनी सुंदर हा एकच शब्द उच्चारला पण त्यांच्या चेहर्यावर आनंदी भावाने खूप प्रोत्साहन मिळाले.
कुसुमताई आजारी होत्या. मी भेटायला गेले तेव्हा म्हणाले की,” हि खात-पीत नाही. तुमचे ऐकेल”. त्यावेळी चहा-बिस्किटे बळजबरीने त्यांना दिली होती. पण प्रवास ठरलेला होता. त्यामुळे आणखी थांबता येणार नव्हते.
-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा