स्त्री शिक्षण या विषयावर लिहायचे असे ठरल्यानंतर हा शब्द कोणत्या वर्गवारीत बसतो असा विचार सुरु झाला. प्रारंभिक शिक्षण, बाल शिक्षण, शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, पदव्युत्तर शिक्षण वगैरे. पण यात स्त्री शिक्षणाचा कसा समावेश होणार?
मग वैद्यकीय शिक्षण, व्यवसाय शिक्षण, वाणिज्य, कला इत्यादी मध्ये? छे! यातही बसत नाही. स्त्री शिक्षणाला म्हटले तर जरासा सारखा किंवा म्हटले तर विरूध्दार्थी शब्द 'पुरुष शिक्षण'! पण तो तर अस्तित्वातच नाही. ह्या कोणत्याही वर्गवारीत बसत नसला आणि तरीही ह्या सर्व वर्गवारीचा समावेश ज्याच्यात आहे असा 'स्त्री शिक्षण ' हा विषय 'अवघे विश्व व्यापून दशांगुळे उरला' आहे ही जाणीव झाली.
इतर प्राण्यांपेक्षा मनुष्य श्रेष्ठ ठरला तो त्याच्या बुद्धीमुळे! ईश्वराने निर्माण केलेल्या सजीव निर्जीव सृष्टीपेक्षा स्त्री आगळीवेगळी ठरली ती तिच्या सृजन क्षमतेमुळे! मग चटकन आठवते ती छोट्या अहिल्येची कथा - स्वत:च्या जीवाची पर्वा न करता स्वत: निर्माण केलेल्या वाळूच्या महादेवाच्या पिंडीच्या रक्षणासाठी त्यावर ती ओणवी होऊन उभी राहिली. "तुला भीति नाही का वाटली ?" ह्या मल्हारराव होळकरांच्या प्रश्नाला उत्तर मिळाले,"आपण जे निर्माण केले, ते प्राणपणाने रक्षण करायचे असते, असे माझी आई सांगते!"
स्त्री अशीच आहे. दोन कुटुंबाना जोडणारा सेतु! दोन कुटुंबांच्या रक्षणाची जबाबदारी सहजगत्या सांभाळणारी! स्वत:च्या अपत्याचा सांभाळ करायचा आहे. त्याच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील राहायचे आहे. कधी कुसुमाहून कोमल बनून तर कधी वज्रापेक्षाही कठोर बनून त्याच्यात विविध गुणांचा परिपोष करायचा आहे, त्याच्याद्वारा समाजाची प्रगती साधायची आहे. राष्ट्राला वैभव प्राप्त करून द्यायचे आहे. त्यासाठी दोन्ही परिवार सक्षम करायचे आहेत.
वरील अहिल्येच्या गोष्टीतील पिंड निर्जीव होती पण स्त्रीची निर्मिती सजीव असते. प्रतिक्रिया वेगवेगळ्या प्रकारच्या असणार आहेत. म्हणूनच काम अधिक अवघड आहे. पण तरीही प्राचीन काळापासून स्त्री ही जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळते आहे. कारण आहे तिला मिळणारे शिक्षण! अगदी स्पष्ट शब्दात सांगायचे तर 'भोवतालच्या परिस्थितीतून अनुभवाचे कण वेचून, त्यावर संस्कार करीत ते एकत्र करायचे, त्याचे अनुकरण करायचे, पुढच्या पिढीला अधिक संपन्न कण मिळतील ह्याचा विचार करून तशी कृती करायची 'ह्या तिच्या स्वभावसिध्द 'कणाद 'वृत्तीचा उपयोग करून ती ते शिक्षण ग्रहण करत असते.
पण तरीही ह्याला शेवटी मर्यादा आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या क्षमतेनुसार ग्रहण कमी जास्त होणार आहे. परावर्तीत करायची संधी व गतीही कमीजास्त असणार आहे. गति कमी झालेले वाहन शेवटी थांबतेच. तसे होऊ नये, ते चालू राहावे, वेग वाढता असावा म्हणून शिक्षण महत्वाचे आहे. स्त्रीशिक्षण हे अधिक आवश्यक, अधिक फल देणारे असावे. त्याचा विचार सर्वंकष, सखोल व सविस्तर व्हायला हवा.
खरे शिक्षण कोणते?
डॉ. सुहास पेठे- जीवनातील समस्या सोडवता येणे, सर्वांशी योग्य संबंध ठेवता येणे, कर्तव्याची जाण असणे व त्यासाठी स्वत:ची तयारी असणे.
श्री. भारवि खरे - शिक्षण ही विकासाची मोजपट्टी असून जीवनाची एक शाखा आहे.
स्वामी विवेकानंद - स्त्रियांचे शिक्षण हे प्रत्येक क्षेत्रात दृष्टी विकसित करणारे असावे. त्यासाठी धर्म, ईतिहास, आरोग्य, पाकक्रिया, शिवण, गृह्संचालन याच बरोबर चांगल्या चारित्र्य निर्माणाची तत्वे, नैतिक व अध्यात्मिक शिक्षणही त्यांना द्यायला हवे. शिक्षित व धार्मिक मातांच्या घरातच थोर पुरुष जन्माला येतात.
श्री. रामकृष्ण दास - 'दिव्य युग स्थापना मे नारी' ह्या पुस्तकात लिहितात, "धर्माचरण व कर्तव्य पालन अनिवार्य आहे. धर्माची ही भिंत पक्की असायला हवी व भारताची धर्मभिंत ही 'स्त्री' आहे. भारतात धर्म हा महिलांच्या हृदयात निवास करतो. भारतीय स्त्री आपल्या प्रज्वलित धर्मज्योतीने केवळ भारतातीलच नव्हे तर सर्व विश्वातील अंधार नष्ट करेल"
श्री. गोविंदप्रसाद शर्मा -शिक्षणाची शक्ती अद्भुत आहे. ते विकासाचे साधन आहे आणि सांस्कृतिक वारश्याच्या संरक्षणाची प्रेरणा पण आहे.
गोस्वामी तुलसीदास - "स्त्री ही श्रद्धा रुपिणी आहे. "
आई हा बालकाचा पहिला गुरु आहे असे प्रतिपादन भारतीय संस्कृतीने केले आहे व त्याचा अनुभव आपण प्रत्यही घेत असतोच. या 'आई' च्या शिक्षणाबद्दल एका शिष्याने 'स्वामी रामकृष्ण परमहंस ' ह्यांना विचारले तेव्हा ते उत्तरले," आईच्या शिक्षणाची सुरुवात बालकाच्या जन्माआधी १६ वर्षे होते." यावरून स्त्रीशिक्षणाचे महत्व लक्षात येते. विज्ञान व समाज कितीही उन्नत झाला, स्त्री पुरुषांचे कार्यक्षेत्र व व्यवहार क्षेत्र यात कितीही समानता आली तरी स्त्री शिक्षण हे अधिक व्यापक, स्त्री जीवनाशी निगडित, तिच्या विचार व भावनांशी सुसंगत असे असायला हवे. वात्सल्य, कर्तव्य, ज्ञान, त्यागभाव, सेवाशीलता, सर्वांबद्दलची आपुलकी व कणव, सर्वांच्या कल्याणाची चिंता, समन्वयाची भूमिका या स्त्रीच्या मुलभूत व समाजधारणेसाठी आवश्यक वृत्तींचा परिपोष होईल ह्याकडे लक्ष द्यायला हवे. पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात शिक्षण प्राप्त करत व कर्तृत्व गाजवत असतानाही ह्या गोष्टी दुर्लक्षित होता कामा नयेत. एका चिंतकाने म्हटले आहे, "अन्नाचा दुष्काळ पडतो तेव्हा माणसे मरतात, पण संस्कारांचा दुष्काळ पडतो तेव्हा माणुसकी मरते". संस्कारग्रहण, संस्कार, संक्रमण यात स्त्रीसंवेदना अधिक तरल असते व वृत्ति अधिक आक्रमक असते.
म्हणूनच भारतीय संस्कृतीने स्त्री शिक्षणाचे काही उद्देश्य रेखांकित केले आहेत .
१) धर्माधारित चारित्रिक सुदृढता
२) कुटुंबाचा केंद्रबिंदू 'आई ' -शिशुसंवर्धनाची भुमिका,
मातृत्वभावाचे स्थैर्य -विशाल मातृत्व
३)धर्म, संस्कृती, परंपरा, जीवन मूल्यांचे संरक्षण, संवर्धन व युगानुकूल परिवर्तनाचे सामर्थ्य .
४)समाज, राष्ट्र, विश्व यांचे कल्याण, सुस्थिती, सुखसमृध्दी या दृष्टीने भूमिका निभावण्याची शक्ती
५)व्यष्टी समष्टी बाबत एकात्मभाव, भौतिक व अध्यात्मिकची सांगड घालण्याची क्षमता
६) राष्ट्र रथाची सारथी बनण्याएवढी पात्रता
७)महिलासंबंधी कायद्यांची, हक्कांची माहिती इत्यादि उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी पाठ्य क्रमाचाही विचार करावा लागेल.
एक कुटुंब तिला चालवायचे आहे. अर्थातच गृह्सुशोभनासाठी सौदर्य दृष्टी, व्यवस्थितपणा, स्वच्छता, पाकशास्त्र, संगोपनवृत्ती, आरोग्यशास्त्र व औषधी ज्ञान, मानस शास्त्र, सामान्य विज्ञान, आजच्या जमान्यात नवनवीन यंत्रे व सुविधा हाताळण्याची व काही अंशी दुरुस्तीचीही क्षमता, ईतिहास, नीतिमूल्ये, परंपरा, रूढीमागचे विज्ञान व समाजशास्त्र, गृहस्थाश्रमाच्या समाज कर्तव्यांची जाणीव, प्रसूति शास्त्राची कामचलाउ माहिती, घरेलू उद्योगांचे ज्ञान व शिक्षण, अर्थव्यवस्था, स्वसंरक्षण सिध्दता, सामाजिक उपक्रमात सहभागाची तयारी, शिक्षण शास्त्र … यादी खूपच लांबेल. सुरुवातीला म्हटलेच आहे ना, ' विश्व व्यापूनी दशांगुळे उरला!!'
( उर्वरित मजकूर दुसऱ्या भागात )
( समर्पिता -२०१० मध्ये पूर्व प्रकाशित )
खूप छान ..पण एक suggestion आहे ...
उत्तर द्याहटवातुम्ही font दुसरा वापरलात तर मजकूर अजून आकर्षक पद्धतीने मांडता येईल
amal dabke :)
blogger @ ... http://gud-life.blogspot.in
Thanks Amal. Good suggestion. I will surely think over it.
हटवाविश्व व्यापूनी दशांगुळे उरला!
हटवाही दशांगुळे म्हणजे काय ते कृपया विस्ताराने सांगा 9822978257