सामाजिक दृष्ट्या धार्मिक शिक्षण, कृषी, गोपालन, राजनीति, युद्धशास्त्र, अर्थशास्त्र, स्थापत्य, वस्त्रकला, साहित्यनिर्मिती, चित्रकला यांचेही शिक्षण मिळायला हवे. काहीजणी एखाद्या विषयात पारंगतताही प्राप्त करू शकतील. तरीही स्वविकासापेक्षा कुटुंबाचे हित याला अधिक प्राधान्य असेल. याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे हे सर्वंकष शिक्षण मिळण्याची स्थाने, साधने व प्रवेश सहज उपलब्ध असावेत. लक्षात ठेवायला हवे की ही फक्त आदर्श स्थिती नाही, अत्यावश्यक आवश्यकता आहे.
सर्व बाबतीत स्त्री परिपूर्ण झाली तर मग वैश्विकरण, बहुराष्ट्रीय उद्योग, विश्व लहान झाल्याने होणारे परिणाम व आत्ता आत्ता येऊ घातलेली बहुराष्ट्रीय विद्यापीठे या सर्व वावटळीला आपण सहजपणे तोंड देऊ शकू. हे अशक्य असे स्वप्नरंजन नाही तर भारताने ह्या गोष्टी प्रत्यक्षात उतरवून दाखवल्या आहेत, आजही उतरवत आहे आणि पुढेही चालू राहील हे नक्की.
अथर्व वेद म्हणतो, " ब्रम्हचर्येण कन्या युवानं विन्दते पतिम (११,५,१८) "
ब्रम्हचर्याचे पालन केल्यानंतरच (शिक्षण प्राप्त केल्यानंतरच) कन्येने युवा पति मिळवावा. पाणिनीच्या काळात सहशिक्षण होते तरीही स्त्रीशिक्षणासाठी स्वतंत्र पाठशालाही होत्या. उत्तर राम चरित्रात सद्योद्वाहा (शिक्षणानंतर विवाह) व ब्रम्हवादिनी (विवाह न करता ज्ञानार्जन करत राहणाऱ्या) स्त्रियांचे वर्णन आढळते. तेव्हाचे शिक्षणाचे विषय होते भाषा, संगीत, नृत्य, ईतिहास, काव्य, नाटक, धार्मिक शिक्षण, अर्थशास्त्र, राजनीति, युध्दकला वगैरे.
मध्ययुगातही समर्थ रामदासांच्या शिष्या अक्काबाई व वेणाबाई साहित्यिक क्षेत्रात प्रसिध्द होत्या. मीराबाईंची भजने तर सर्वोमुखी आहेत. पण त्या काळाच्या गणिकानाही चौसष्ट कलांबरोबरच राजनीति, हेरगिरी, तलवार चालवणे, गणित शिकवले जात असे. बौध्द श्रमणा, जैन क्षपणिका अध्ययन व अध्यापन देखील करत असत. सावित्री गुरुकुल चालवत होती. त्यात वसिष्ठ पत्नी अरुंधतीने शिक्षण घेतले होते. मिहिर पत्नी ज्योतिर्गणित शिकलेली होती.
कलकत्ता येथे १८१२ मध्ये मुलींसाठी शाळा उघडली. सावित्रीबाई फुले, ताराबाई मोडक, रखमाबाई राउत, पं. रमाबाई ही नावे शिक्षण क्षेत्रात सर्वपरिचित आहेत. पं. रमाबाई ह्यांनी स्थापन केलेले शारदासदन, कर्वे ह्यांची हिंगणे शाळा, S.N.D.T. विश्वविद्यालय, व्यावसायिक शिक्षण देणारे सेवासदन, अकोल्याला मनुताई बापट ह्यांनी सुरु केलेला लेडीज होम क्लास, कमलाबाई होस्पेट ह्यांचा मातृसेवा संघ ह्या गेल्या शतकातील काही शिक्षण संस्था आहेत.
आज तर सर्वच क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग दिसतो. अगदी जी क्षेत्रे पुरुषांचीच मानली जात अशा विमान चालवणे, और्ध्वदेहिक कर्म करणे,सैन्य अशा क्षेत्रातही. पण तरीही विचारार्थ २१ व्या शतकातील ह्या काही बातम्या पाहू या.
२६/०६/२००१ - नवभारत टाईम्स - मलेशिया सरकारने शाळेच्या सुट्टीच्या काळातच प्रसूती होईल अशा वेळी गर्भधारणा करावी अशी सूचना शिक्षिकाना केली आहे .
०४/०२/०९ - पुढारी- परित्यक्तांमध्ये अशिक्षितांचे प्रमाण मोठे. ५.४ % स्त्रिया परित्यक्ता व त्यांतील ४४.७ % अशिक्षित .
१५/०२/०९ - इंडियन एक्स्प्रेस - जम्मू काश्मीरमध्ये महिला साक्षरतेचे प्रमाण ९% वाढले आहे .
०८/०३/०९ - नवभारत टाईम्स - ९४% मुलींनी मत नोंदवले आहे ,' देवानेच स्त्रीला कमजोर बनवले आहे' . ह्या मताशी ८६% मुले सहमत आहेत. तरीही मुली स्वत:चे रक्षण स्वत:च करू शकतात असे ५५. ८८ % मुलींना तर ६६. ६% मुलांना वाटते.
०८/०३/०९ टाईम्स ऑफ इंडिया - ५३ % स्त्रियांनी वेतन व बढती यात भेदभाव असल्याचे म्हणले आहे .
१४/०७/०९ -सकाळ - मुंबई पालिकेने १-७ वीच्या विद्यार्थिनीना
२९/०८/०९ - महाराष्ट्र टाईम्स - अफगाणिस्तानात कंदाहार जवळ तालिबान्यांनी ४७८ शाळा उध्वस्त केल्या तरीही दहशतीच्या वातावरणातही मिरवाईज मिना गर्ल्स स्कूलमध्ये ३०० मुली शिक्षण घेत आहेत.
१२/०१/१० - सकाळ - अमेरिकेतील दुतावासांमध्ये १८२ पैकी २५ दूतावासांच्या प्रमुख महिला आहेत.
१४/०१/१० सकाळ - भारतात सर्वाधिक स्त्री सी ई ओ आहेत. भारतात २०० कंपन्यांमध्ये ११ % तर जगात फक्त ३ %.
१४/०१/१० नवभारत टाईम्स - सीमा सुरक्षा दलात भारत चीन सीमा सुरक्षा करणाऱ्या आय टी बी पी मध्ये २०९ महिलांची तुकडी दाखल .
१४/०१/१० - सकाळ - तामिळनाडू च्या पहिल्या महिला पोलिस महासंचालक म्हणून 'लतिका शरण ' ह्यांची नियुक्ती .
२५/०२/१० -सकाळ - देशातील एक महत्वाचे ग्लायडिंग सेंटर पुण्यामध्ये आहे. पण फक्त ३ महिलांनीच तेथे प्रशिक्षण घेतले आहे .
या बातम्यांचा विचार करू, बोध घेऊ व कृती करू !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा