रविवार, ३० मार्च, २०१४

श्री गणपत्यथर्वशीर्ष - प्रकरण पहिले- भाग पहिला

रक्षा सूत्र

श्री गणपतयेनम:
प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा
अज्ञानत्व हरोनि बुध्दि मति दे आराध्य मोरेश्वरा।
चिंता क्लेश दरिद्र दु: अवघे देशांतरा पाठवी।
हेरंबा गणनायका गजमुखा चित्ता बहु तोषवी
अथर्वशीर्ष हा शब्द उच्चारताच त्याच्या अर्थाबद्दल मन विचार करू लागते. +थर्व+ शीर्ष-थर्व म्हणजे स्थिर, शीर्ष म्हणजे मस्तक- अर्थात स्थिर मस्तक ज्याचे आहे तो! पण हे गजाननाचे विशेषण नाही. कारण अथर्व हे गजाननाचे एक नाव आहे. म्हणजेच जे म्हटल्याने आपले शिर स्थिर होते ते असा अर्थ लावावा लागेल.

हे अथर्ववेदात आहे. अथर्ववेदातील शिरोस्थानी आहे. शीरामध्ये  बुध्दिकेंद्र मेंदू असतो मेंदूतूनच सर्व शरीराचे नियंत्रण होत असते. गणपत्यथर्वशीर्ष असल्याने गणांचा अधिपति त्याचे समाजावर नियंत्रणसामर्थ्य असाही एक अर्थ प्रतीत होतो.
हे स्तोत्र आहे असा स्पष्ट उल्लेख कोठेच नाही. रामरक्षास्तोत्र, नारदपुराणे, गणेशस्तोत्रं, रामदासविरचितं मारूतीस्तोत्रं असे आपण म्हणतो. पण इथे मात्रइति श्री गणपत्यथर्वशीर्ष समाप्तअसे आपण म्हणतो. शिवाय प्रत्येक स्तोत्राला एक छंद आहे, चाल आहे. यातल्या ओळी मात्र लहान मोठ्या आहेत. तरीही एक थोर विचारवंत प्रा. श्री. शिवाजीराव भोसले यांच्या प्रतिपादनानुसार,’जे स्तवनीय आहेत, त्यांच्या गुणरुपांचे वर्णन म्हणजे स्तोत्रहा निकष लावला तर हे स्तोत्र आहे हे नक्की!
स्वामी स्वरूपानंद सरस्वती (पावस) म्हणतात, "गणेशाचे सगुण, निर्गुण, अध्यात्मिक, आधिदैविक स्वरूप+गणेशविदया=अथर्वशीर्ष". याहीशिवाय लक्षात येते ते अथर्वशी्र्षातील रक्षासूत्र!

रामरक्षेत शिरो मे राघव:पातु ते रामोsखिलं वपु: पर्यंतचे रक्षासूत्र लक्षात घेतां तीन गोष्टी लक्षात येतात. प्रत्येक अवयवांचे रक्षण कर असे सांगण्यासाठी रामाची वेगवेगळी नावे उपयोजिली आहेत. त्यांतून शरीराचे डोक्यापासून पायापर्यंतच्या अवयवांबरोबरच भारताचे काश्मीर ते लंका हे चित्रही स्पष्ट होत जाते रामाचे लंकाविजयापर्यंतच्या आयुष्याचे वर्णनही क्रमाने आढळते.

शिरो मे राघव: पातु! इक्षाकुवंशातील रघूने हिमालयापलिकडील भागही आपल्या साम्राज्यांत समाविष्ट केला होता. ’राघवंशब्द उच्चारतांच त्याचा हा पराक्रम, भारताचा मुकुट हिमाद्रि राघववंश अशा सर्व गोष्टीच डोळ्यांसमोर येतात.

पुढे येते तेभालं दशरथात्मज: मस्तकानंतर उल्लेख "भालाचा’- नजर आपोआपच वरून खाली येते. दशरथात्मज:-आधीचे कुलाचे नाव म्हणजे आडनांव, मग पित्याचे नाव- दशरथाच्या साम्राज्याखालील उत्तर भारत असे करत करत शेवटी आहे, पादौ बिभीषणश्रीद: -बिभीषणाला श्री ( राज्यवैभव) देणारा-लंकाविजय प्राप्त झाला तरी ते राज्य बिभीषणाला प्रदान करणारा "लंकाधिपती" बनवणारा! भारताच्या पायाशी असलेली लंका! मध्यं पातु खरध्वंसी"वगैरे वर्णनातूनही रामाच्या चरित्रांतील घटना, शरीराचे अवयव भारताचे वर्णन सर्व एकाचवेळी अनुभवायला मिळते.

विष्णूपुराणांत 'शिरस्ते पातु गोविंदा। कंठं रक्षतु केशव: गुह्यं जठरं विष्णु:।जंघे पादौ जनार्दन:।मुखं बाहु प्रबाहुच। मन:सर्वेंद्रीयाणिच। रक्षत्व व्याहतैश्वर्यस्तव नारायणोSव्ययम' हे रक्षासूत्र आहे.
अशाच प्रकारचे वर्णन गणेशकवचातही आढळते. "विनायक: शिखां पातुं"ने सुरूवात केलेली आहे शेवट आहे, "अंगुलीश्च नखां पातु पद्महस्तोsरिनाशन: " इतकेच नव्हे तर "सर्वांगानि मयुरेशो। "म्हणत असतानाच आजकालच्या आभारप्रदर्शनाप्रमाणे "अनुक्तमपि यत्स्थानं धुम्रकेतु:सदाsवतु"असे काही राहिले असेल तर त्याच्या रक्षणाचीही जबाबदारी धूम्रकेतु -( धूम्र-धूर-सर्वव्यापी) वर सोपविली आहे.

प्रत्यक्षांत अथर्वशीर्षात जे रक्षासूत्र आढळते ते ’अव त्वं माम् अववक्तारं।' वगैरे. माझे रक्षण कर, तुझे गुणगान करणाऱ्या वक्त्याचे रक्षण कर असे. अथर्वशीर्ष म्हणणारा घरी देवासमोर वा मंदिरात असणार. मग त्याला एवढे असुरक्षित का वाटावे असा विचार पहिल्या झटक्यांत मनात येतो मग त्यांमागील अर्थ पाहण्याची प्रेरणा मिळते.
अव त्वम् माम्- माझे रक्षण कर. "मी " ही एक व्यक्ती तिचा देह असा अर्थ नाही तर "मी " म्हणजे सर्व साधकांचा समुदाय! भारतीय संस्कृती सदैव सर्वांचा, अखिल विश्वाचा विचार करते. "सर्वेsपि सुखिन: संतु।सर्वे संतु निरामया:।सर्वे भद्राणि पश्यंतु। मा कश्चित् दु:खभाक् भवेत्।" ’अवघे विश्वचि माझे घरहे भाव मनात पिढ्या्नुपिढ्या रुजलेले आहेत. म्हणूनमीहा एकटा जीव नसून बुध्दी्दात्या, गणांचा पति असलेल्या, सौख्यकारी दु:खहारी ही विशेषणे प्राप्त करणाऱ्या गणपतीची आराधना करणारे सर्व आणि ह्या सर्वांचे रक्षण कर.

रक्षण कशापासून अपेक्षित आहे? आधि (मानसिक ताप ), व्याधी ( शारीरिक दु:), चंचलता (मनाची अस्थिरता), संदेह (करत असलेल्या कामाबद्दल वा निवडलेल्या मार्गाबद्दल मनात संशय असणे), प्रमाद (घडणाऱ्या चुका वा दोष), आळस (सातत्य रहात नाही), विरति (खंड पडणे), भ्रांतिदर्शन (दुसऱ्या कशाचा तरी मोह पडणे), अलब्धभूमिकत्व (अपेक्षित प्रगती झाली नाही असे वाटून थोडी निराशा येते प्रयत्न ढिले होतात, प्रगति खुंटते), अनवस्थितत्व (एकाग्रता होणे) अशा साधनेत व्यत्यय आणणाऱ्या सर्व गोष्टींपासून माझे सर्व साधकांचे रक्षण कर. सर्व सत्प्रवृत्त, अनहंकारी, स्थिरबुद्धी अनालसी असोत. मी, माझा समाज, माझे राष्ट्र यांचेही दृश्य अदृश्य (मानसिक) शत्रूंपासून रक्षण कर.

अव वक्तारम्-वक्त्याचे रक्षण कर. वक्त्यासंबंधी काय कल्पना आहेत?वक्ता कसा असावा अशी अपेक्षा आहे? त्याचा प्रतिपाद्य विषय कसा असावा?
) ज्ञानदीप प्रज्वलित करणारा असावा. स्वत: ज्ञानी तर असावाच पण ते ज्ञान दुसऱ्याला संक्रमित करण्यासाठी ते ऐकणाराला कशा प्रकारे समजेल ह्याचा विचार करून तसे प्रतिपादन करण्याची क्षमता असणारा असावा.
)वक्ता पाहिजे अनुभवाचा-त्याचे ज्ञान प्रतिपादन वरवरचे नको. प्राप्त ज्ञानाचे चिंतन, मी ते व्यवहारात कसे किती आणू शकतो याचा विचार कृती हवी. ते ज्ञान समाजाला किती कसे उपयुक्त आहे याचे आकलन असावे. यालाच विषयाचे यथार्थ ज्ञान असावे असेही म्हणता येईल. वक्ता विविधांगी अनुभवांनी संपन्न असावा.
) विचारांची मांडणी  स्पष्ट असावी. वक्ता अनुभवी असेल, मनांत स्पष्टता असेल तरच हे घडू शकेल. गुळमुळीत विचार ना वक्त्याचे समाधान करतात ना श्रोत्यांना ते समजतात.
) भाषेवर प्रभुत्व असावे.वरच्या सर्व गोष्टींनी हे प्राप्त होईल. पण त्यासाठीही विविध प्रकारचे वाचन असावे लागेल..आपले म्हणणे सोदाहरण पटवून देता आले पाहिजे.तसेच उच्चार स्पष्ट असावेत.भाषेतील विविध छटांचे शब्द,वाक्प्रचार यांचाही अभ्यास असावा.
)"जे जे आपणांसी ठावे ते ते इतरांसी सांगावे।" समर्थांनी दासबोधात म्हटले आहे. मी "वक्ता " आहे म्हणजे इतरांपेक्षा कोणी वेगळा नाही किंवा मी त्यांना ज्ञानी "बनवणार "आहे असा विचार मनांत नसाव. तर मला जे काही चांगले समजले आहे ते इतरांना सांगावे असे उत्स्फूर्तपणे वाटणारा असावा. ही उत्स्फूर्तता,इतरांबद्दल मनांत ममता असेल, आपुलकी असेल कळवळा असेल तरच निर्माण होईल.
या उत्स्फूर्ततेतूनच वक्तृत्व हे सर्वांना खुले असेल. त्याबाबत मोबदल्याची (धन, कीर्ती) अपेक्षा रहाणार नाही.
) "ईशस्तवन करणारा असावा" - ईशस्तवन आपण केव्हा करतो? आपल्यापेक्षा ज्ञानवंत, बु्ध्दिमंत, कर्तृत्ववंत कोणी आहेत हे स्मरणांत असावे. (मीच मोठा हा अहंकार नसावा). गुणांची पारख करता आली पाहिजे. त्याची स्तुती करण्याची लीनताही असावी.

अर्थातच वरील सर्व गोष्टींना बाधक असणाऱ्या, कुपमंडूकवृत्ति, अहंकार, कशाचे प्रतिपादन करायचे याच्या सारासार विचाराचा अभाव, उन्मत्तता अशा गोष्टींपासून रक्षण कर.
या सर्वांबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे विचार प्रकटनाचे स्वातंत्र्य! भारताच्या राज्यघटनेत याचा समावेश केलेला आहे. इतकेच नव्हे तर फार प्राचीन काळापासून त्याचा अंमल होत असल्यानेच विविधमतांतरे, पंथ, संप्रदाय, दर्शने, श्रुति, स्मृती, परंपरा या उदयास आल्या. कोणाचीही मुस्कटदाबी झाली नाही. चांगल्यावाईटाचा विचार स्वाभाविक ठरला. चांगले आवश्यक ते रुजत गेले. समाजजीवनाचा तो एक भाग बनला.
अव श्रोतारम्- शब्द उच्चारतांच आठवली एक गोष्ट! तुकाराममहाराजांच्या कीर्तनश्रवणासाठी शिवाजीराजे गेले होते सामान्य श्रोत्यांतच बसले होते. मुसलमानांना ही बातमी कळली राजांना पकडण्यासाठी त्यांनी कीर्तनस्थळी जाण्याचे ठरवले. राजांना ही बातमी कळताच ते गुपचुप तिथून निघुन गेले. आपल्यामुळे श्रोत्यांवर संकट येऊ नये तसेच रंगाचा बेरंग होऊ नये म्हणून! अर्थात ही घटना ह्या स्तोत्रनिर्मितीच्या खूपच नंतरची. पण मग ह्या स्तोत्रांत कोणत्या संकटाविषयी उल्लेख आहे?
माणसांचे मन अत्यंत चंचल असते. त्याचा इकडे तिकडे धावण्याचा वेगही प्रचंड असतो म्हणूनच बुधकौशिक ऋषींनी वर्णन केले आहे,"मनोजवम् मारूत" स्वाभाविकच यापासून रक्षण होणे आवश्यक असते. तरच स्थिरचित्ताने सावधानतेने श्रवण करता येते. असे श्रवणच व्यक्तीला बहुश्रुतता प्राप्त करून देते. म्हणूनच श्रीसमर्थांनी नवविधाभक्तीमधे श्रवणभक्तीचा अंतर्भाव केला आहे. श्रवणभक्ति म्हणजे नुसताच श्रवण करणारा नव्हे. या कानाने ऐकलेले दुसऱ्या कानाने बाहेर पडते असा श्रोता नको तर श्रध्देने ऐकणारा ऐकले त्याचे चिंतन करणारा असेल तरच "श्रवण केलियाचे फळ।क्रिया पालटे तात्काळ" ( अर्थात सत्क्रिया) असा अपेक्षित परिणाम होईल.

अथर्वशीर्षात "भद्रं कर्णेभि: श्रुणुयाम देवा:"असे म्हटले आहे. ’कानांवर चांगलेच पडोहेही आवश्यक असते. न्यायमूर्ती रानडे यांनी आपला अनुभव लिहिला आहे. एका घरात ते मुक्कामाला असताना त्या घरातील युवक स्नान करताना सिनेमातील गाणी म्हणत होता. त्यांनी ते ऐकले. तो भेटला तेव्हा त्यांनी विचारले,"स्नानाच्या वेळी गीतेचा अध्याय का म्हणत नाहीस?" त्याने उत्तर दिले,"माझ्या कानावर सतत सिनेगीतेच पडतात. तीच तोंडातून बाहेर पडतात. जर सतत गीता कानावर आली तर ओठांतून तेच श्लोक उमटतील." अन म्हणूनच, भद्रं श्रुणुयामची आवश्यकता असते. प्रत्यक्षात त्याचे प्रमाण फ़ारच कमी असते. भारतीय कुटुंबसंकल्पनेत सुसंस्कारांची आवश्यकता व्यवस्था असावी असा प्रयत्न हेतूपूर्वक केलेला आहे. तुकोबारायांनीही म्हटले आहे,"तुम्ही ऐकारे कान, माझ्या विठोबाचे गुण".
हेच मुलभूत तत्व लक्षात घेऊन शत्रूला जिंकण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे Brainwashing असे मानले गेले. भारतावर राज्य करू इच्छिणाऱ्या इंग्रजांनी याच नीतिचा अवलंब केला कम्युनिस्टांनी तर याला फ़ारच प्राधान्य दिले हे आपण अनुभवतोच. यापासूनसुध्दा रक्षण व्हायला हवे. प्रयत्न करणाऱ्यांनी कितीही प्रयत्न केले तरी सारासार विचार श्रोत्याने करून त्यातील योग्य तेवढेच ग्रहण करायचे सामर्थ्य त्याचेजवळ असावे. त्याचबरोबर श्रध्दा निष्ठाही असावी. अशा विविध मारक अवगुणांपासून श्रोत्यांचे रक्षण कर.




1 टिप्पणी:

  1. आदरणीय मावशी🙏🙏🙏
    आता अथर्वशीर्ष म्हणतांना हा अर्थ लक्षात घेऊन म्हणणार खूप खूप धन्यवाद !!
    संपुर्ण अर्थ पाठवा plz

    उत्तर द्याहटवा