अव अनूचान -
अनु+उचान = अनूचान. अनु- अनुज,अनुयायी = नंतर किंवा पाठीमागे येणारा. अनूचान=म्हटलेले पाठोपाठ म्हणणारा, पुनरुच्चार करणारा.
वेदकाळापासून लिपी अस्तित्वांत असली तरी ज्ञान संक्रमित करण्याची मौखिक परंपराच भारतात अनेक वर्षे प्रामुख्याने अस्तित्वात होती. पाठांतर मोठ्या प्रमाणात व्हायचे. आश्रमांत सहस्त्रावधी विद्यार्थी वेगवेगळ्या शाखांचे शिक्षण घेत असत. सर्वच ज्ञानशाखांत तात्विक भाग, आज ज्याला theory म्हणतात तो असायचाच. संथा देणे, समजावून सांगणे व कृती करून घेणे हे शिक्षणाचे प्रामुख्याने तीन भाग असतात. शिक्षक सर्वांनाच सारखे शिकवत असले तरी शिष्यांच्या आकलन क्षमतेनुसार ग्रहणक्षमता व त्यानुसार त्यांचे वर्गीकरण होत असतेच.
अनूचान हाही असाच एक वर्ग. पाठांतर चांगले पण समजशक्ती कमी. पुढच्यांना संथा देण्यास उपयुक्त असला तरी ज्ञानाच्या उपयोजनात ढिला असणारा. चांगले वाईट समजण्याची शक्ति कमी. विद्येचा उपयोग कुठे व कसा करावयाचा याचा पोच फारसा नाही. येत असलेल्या संजीवनी मंत्राचा प्रयोग गुरूगृहातून परतणाऱ्या एका विद्यार्थ्याने मेलेल्या सिंहावर केला व स्वत: सिंहाच्या भक्ष्यस्थानी पडला ही गोष्ट आपल्याला माहीत आहेच.
सेवकांचे तीन प्रकार समर्थांनी वर्णिले आहेत. श्रेष्ठ, मध्यम, कनिष्ठ. सांगितलेले काम कसेतरी अर्धवट करणारा कनिष्ठ. तेच काम सांगितल्याबरहुकूम करणारा मध्यम तर ते काम करून तदनुषंगिक इतर गोष्टीही लक्षात घेऊन करणारा श्रेष्ठ! श्रीहनुमंताने सीतेचा शोध तर लावलाच, पण लंकेच्या रक्षणाची व्यवस्थाही कशी आहे? रावणाबद्दल लंकावासीयांचे मत काय आहे? हीही माहिती मिळवली. रावणदरबाराचे निरीक्षण केले व लंकादहन करून लंकावासीयांच्या आत्मविश्वासाला हादरा दिला. सीतामाईला विश्वास प्रदान केला की तुझी सुटका लवकरच होईल.
’अनूचान' या वर्गाबद्दल आणखी एक शक्यता असते व ती म्हणजे’अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे! ’शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पोथीत असे एक उदाहरण आहे. स्वामींचा मीच आवडता आहे. मीच त्यांचे सर्व काम करतो हा भ्रम एकाच्या मनात निर्माण होतो व परगावहून आलेल्या लोकांना दर्शन दिले जावे म्हणून अहंमन्यतेने निद्राधीन महाराजांना तो उठवतो. अशा गोष्टींपासून अनूचानांचे रक्षण व्हावे. पुढे,"अशिष्याय न देयम " अशी सावधगिरीची सूचना दिलेली आहेच.
अव शिष्यान् -
शिष्य-ज्ञान पचवणारा, श्रद्धावान, निष्ठावान, पुढे परंपरा नेणारा. अशा शिष्यांतही काही उच्च श्रेणी प्राप्त करतात, त्यांना पट्टशिष्य असे संबोधिले जाते. निष्ठावानचे उदाहरण आहे समर्थांचा कल्याण तर श्रध्दावानाचे आहे एकलव्य. परंपरा चालविणाऱ्या शिष्यांत अग्रणी नाव आहे स्वामी विवेकानंदांचे. ज्ञान पचवून समाजोत्थानासाठी त्याचा उपयोग करणारांत शीर्षभागी चमकतात आद्य शंकराचार्य. लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस अशांसारखे इतिहासांतून प्रेरणा घेताना दिसतात.
अशांच्या मार्गात अनेक संकटे येतात. इतरांच्या मनात त्यांच्याबद्दल मत्सर निर्माण होतो. उदा. कल्याण, संत तुकाराम. कधी त्यांना मारून टाकण्याचाही प्रयत्न होतो जसा शंकराचार्यावर झालेला विषप्रयोग. त्यांची परीक्षा घेतली जाते, जशी विवेकानंदांची नर्तकीने घेतली होती. या सर्व संकटांवर मात करण्याचे सामर्थ्य त्यांना देऊन त्यांचे रक्षण कर.समाजासाठी यांच्या कार्याची आवश्यकता आहे.
अव पश्चातात्-
आत्तापर्यंत समाजोपयोगी काही वर्गांचे रक्षण कर असे म्हटल्यांवर आता सर्व दिशांकडून राष्ट्राच्या व राष्ट्रवासियांच्या रक्षणाची प्रार्थना केली जात आहे. पश्चातात्-पाठीमागून,पश्चिमेकडून! उपासना करणाऱ्या उपासकाने पूर्वेकडे तोंड करून बसावे असा प्रघात आहे. म्हणून पाठीमागील दिशा पश्चिम आहे. ’पश्चात् ’ ही पश्चिमेचाच निर्देश करतो. पश्चिमेचा स्वामी आहे वरूण व वरूणपाश प्रसिद्ध आहे. क्षात्रतेज व विज्ञानाची ही दिशा.
क्षात्रतेज म्हणजे पराक्रम व पराक्रमाच्या पाठोपाठ सत्ताभिलाषा व साम्राज्यलोलुपता या येतातच. तरीही भारतीयांचा पराक्रम व पाश्चात्यांचा पराक्रम यात फरक आढळतो. भारतांत अश्वमेध यज्ञ करण्याची प्रथा होती. जे आपणहुन मांडलिकत्व पत्करायला तयार होत नसत त्यांना समरांगणावर जिंकले जाई. सम्राट मानणे व मांडलिकत्व कबूल करून काही खंडणी देणे येथपर्यंतच मर्यादा होती. लुटालूट, कत्तली, जाळपोळ किंवा अंतर्गत कारभारांत हस्तक्षेप नसे. त्यांची राज्ये त्यांना परत दिली जात. इतरांच्या पराक्रमांत मात्र कत्तली लुटालुटी इत्यादि गोष्टी असत. मग तो ग्रीक अलेक्झांडर असो वा मुस्लीम महमूद गझनी असो. पाश्चात्य जेथे जेथे गेले तेथेतेथे त्यांनी त्या देशांतील मूळ निवासी लोकांना नामशेष करण्याचा जणू विडाच उचलला. उदा. रेड इंडियन्स, निग्रो.
विज्ञानाचा उपयोग मानवी जीवन विकसित व समृध्द करण्यासाठी व्हावा ही मूळ संकल्पना. पण पाशवी वृत्ती वरचढ ठरते व अणुविस्फोटांतून प्राप्त होणाऱ्या उर्जेचा उपयोग बॉंब बनवण्यासाठी होतो. हिरोशिमा नागासाकी कांड घडते. शत्रूसैन्यात व्हायरस सोडून ते मारले जाते.
पश्चिम दिशेचे आणखी एक नाव आहे, ’मावळती’. एका कवीने म्हटले आहे, ’अत्युच्च शिखरावर पोचल्यावर खाली उतरणे याशिवाय पर्यायच नसतो. पुर्णोत्थापन काल तोच पतनप्रारंभही होतसे’ हे जगाचे रहाटगाडगे लक्षांत ठेवले तर अत्युच्च स्थानी पोचू शकलो हे लक्षात राहील. खाली जाण्याचे वाईट वाटणार नाही. शिवाय ’ रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उष:काल ’ हे लक्षात ठेवून निराशा येणार नाही. पश्चिमेला सूर्य मावळतो असे जरी आपल्याला वाटले तरी सूर्य कधीच मावळत नाही. पृथ्वीच्या स्वत:भोवती फिरण्याने तसे भासते हे भारतीयांनी फार पूर्वीच ज्ञात करून घेतले आहे.
भारताचा विचार करता, गझनी, फ़्रेंच, डच, पोर्तुगीज, इंग्रज हे सर्व पश्चिमेकडूनच आले व अगदी आत्ताचा म्हणजे २६/११/०९ चा हल्लाही पश्चिमेकडूनच झाला. म्हणूनही अव पश्चातात!
अव पुरस्तात्-
पूर्वेकडून रक्षण कर. पूर्वेचा स्वामी इंद्र. पूर्व दिशा ही प्रकाशाची व ज्ञानाची दिशा. या दोन्हीचे स्वागत सर्वच करतात. भारत=भा:रत, प्रकाश व ज्ञानाने लुब्ध होणारा, त्यांची पूजा करणारा. मग रक्षणाची अपेक्षा का? तर यांच्या पाठोपाठ येणाऱ्या अहंकारापासून, इतरांना दिपवून टाकण्याच्या मनीषेपासून रक्षण. भारतीयांनी ह्यावर विजय मिळवला आहे असे आपला ईतिहास सांगतो. सुवर्णभूमी वाच्यार्थाने तर होतीच पण ज्ञान-विज्ञान, अध्यात्मिकता, विविध कला, विविध प्रकारचे उत्पादन, यंत्रे या सर्वांनी समृद्ध असणारी ही भूमी. स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथील भाषणांत म्हटल्याप्रमाणे सर्वांना उदार आश्रय देणारी ही भूमी! भारतीयांनी सर्व विश्व पादाक्रांत केले ते ’कृण्वंतो विश्वमार्यम्, सर्व विश्वाला श्रेष्ठ बनवू या. आपल्याला सापडलेले ज्ञान वाटू या ’ या भावनेने. ना हातात तलवार घेतली ना इतरांना लाचार बनवण्यासाठी धनाचा वापर केला ना धर्मांतरण घडवून आणले. हीच वृत्ती कायम रहायला हवी. पण त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपासूनही सावध रहायला हवे. भोळेपणापासून रक्षण कर.
१९९९ साली भारताने अणुविस्फोट घडवून आणला. भारताला दुर्बल समजणारांचे डोळे उघडावे म्हणून! आपल्याला जराही थांगपत्ता लागू न देता भारताने हे घडवले म्हणून संतापून अमेरिकेने आर्थिक बंदी जाहीर केली. त्यापाठोपाठ जपान या पौर्वात्य देशानेही केली. भारतावर या बंदीचा फारसा काही परिणाम झाला नाही. उलट या राष्ट्रांना 'आपली बाजारपेठ बंद झाली, प्रचंड आर्थिक नुकसान होऊ लागले’ याची जाणीव झाली व ही बंदी त्यांनी आपण होऊनच उठवली हे आपल्याला माहीत आहेच.
पूर्वेकडील चीनने ६२ च्या युद्धात भारताचा काही भाग बळकावलेला आहेच. आज अरूणाचलबाबत वाद उभा करत आहे. भारताविरूद्ध पाकिस्तानला मदत करत आहे. सीमेवर लोहमार्ग, रस्ते, सैनिक छावण्या वाढवत आहे. या सर्वांपासून रक्षण कर.
अव उत्तरातात् -
उत्तर दिशेचा स्वामी कुबेर. देवांचा कोषाध्यक्ष व धनपती! ही देवांची दिशा. देव विविध प्रकारच्या सामर्थ्याने युक्त असलेले, अमर, स्वर्गनिवासी, कृपाळू! मागचा पुढचा विचार न करता दानवांनाही वर देऊन पुष्कळदा देव-मानवांना संकटात पाडणारा भोळा शंकर! इंद्रपद निर्विघ्न रहावे यासाठी प्रयत्नशील असलेला इंद्र! प्रत्येकजण आपल्यांच विश्वात दंग असलेला व म्हणून असंघटित. असे जे देवांचे दोष आहेत त्यापासून रक्षण कर.
कुबेर हा धनपती! धनाची आवश्यकता जीवनासाठी असतेच. सध्यातर शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अवेळी झालेल्या पावसाने झालेले नुकसान, वादळाने दिलेला तडाखा या पार्श्वभूमीवर ती आवश्यकता प्रखरतेने जाणवते पण धनाला काही शाप आहेत. येनकेन प्रकारेण धन प्राप्त करण्याची वासना, धनापाठोपाठ येणारा अहंकार, क्रोध, लोभ, व्यसनलोलुपता, चोरीची भीति व त्यासाठी हिंसेचा बागुलबुवा, मत्सराने उत्पन्न झालेले शत्रू या सर्वांपासून रक्षण हवे. श्रीसूक्तांत अलक्ष्मीचे वर्णन आहे. तसेच धनाचा प्रथम उपयोग ’दान’ हा सांगितला आहे.
स्वामी विवेकानंद अमेरिकेत असतां रॉकफेलर नावाचे धनाढ्य गृहस्थ त्यांना भेटण्यासाठी आले. स्वामींनी ते आल्यावर उठून उभे रहावे अशी त्यांची अपेक्षा होती, कारण इतर सर्वजण तसे करत असत. पण स्वामी उठले नाहीत. असे दोनचारदा झाले. त्यांचा अहंकार दुखावला गेला. त्यांना वाटले यांना खूप मोठी रक्कम दिली की ते आपोआपच नमतील म्हणून त्यांनी लक्ष डॉलरचा चेक दिला. तरीही स्वामींच्यात बदल नाही. शेवटी ते म्हणाले,"कमीतकमी आता तरी आभार माना" स्वामीजी उत्तरले,"मी नाही, तुम्हीच माना. कारण तुमचे दातृत्व जागे झाले आहे. चांगल्या कामासाठी धन द्यायची इच्छा निर्माण झाली आहे. " मग रॉकफेलर फाउंडेशन स्थापन होऊन समाजासाठी कार्यरत झाले.
अव दक्षिणातात् -
दक्षिणेचा स्वामी आहे यम. मृत्यूचे खाते त्याच्याकडे सोपवलेले आहे. मृत्यू ही कल्पनासुद्धा भयंकर असते.
’ये मृत्यो ये" म्हणून त्याचे स्वागत करणारे एखादेच सावरकर, ’महाराज गडावर पोचले " म्हणत सुखाने मृत्यूला सामोरे जाणारे एखादेच बाजीप्रभू, जीवनाची कृतकत्यता झाली म्हणून समाधी घेणारे एखादेच ज्ञानेश्वर. जीवनकार्य संपले तरीही समोर उभा राहिलेला मृत्यू प्रत्येकाला घाबरवतोच. मरतेवेळीही 'वासरू केरसुणी खाते आहे’ हे सांगायचा आटापिटा करणारेच आपण सर्वजण! स्वाभाविकच यापासून रक्षण कर ही आळवणी अगदी मनाच्या गाभ्यातून उमटते.
एका कवीने म्हटले आहे,
" विचार लो कि मर्त्य हो न मृत्यू से डरो कभी,
मरों परंतू यो मरों कि याद जो करे सभी ।
देह गेला तरी समाज ज्यांची आठवण विसरत नाही असे अनेक लोक होऊन गेले आहेत. समर्थांनीही म्हटलेले आहे, "मरावे परी कीर्तीरूपे उरावे "दत्ताजी शिंदे उद्गारतात,"बचेंगे तो और भी लडॆंगे ।" आपले जीवन पण याप्रमाणेच सार्थकी लागो यासाठी प्रयत्न चालू ठेवायला हवेत.
अव चोर्ध्वातात्-
उर्ध्व दिशा. उर्ध्व दिशेच्या उल्लेखाने भारतातील दहा दिशांची कल्पना लक्षात येते. बव्हंशी जगात चार मुख्य व चार उपदिशा अशा आठच दिशा मानल्या जातात.
उर्ध्व- आकाश-अवकाश, आकाशातील चमचमती नक्षत्रे, तारका. उन्हाळ्यांत रात्री बाहेर झोपलो की हे सगळे आपले लक्ष वेधून घेतात. पण त्याचवेळी एखाद दुसरा तारा पडतांनाही दिसतो व आपण चुकचुकतोच! अशा स्खलनापासून रक्षण कर.
अवकाश म्हटले की विमाने डोळ्यांसमोर येतातच. अवकाशयानांचेही अनेक प्रकार आपण ऐकतो. दुसऱ्या महायुद्धात ’ब्लॅक आऊट' हा शब्द सर्वांचे जीवन व्यापून उरला होता. विमानांतून टाकल्या जाणाऱ्या बॉंबपासून आपले रक्षण कसे करायचे याचे पाठ सर्वांना द्यावे लागले होते. अशा संकटापासूनही रक्षण कर.
अवोधरात्तात्-
अधर( ओठ नव्हे) म्हणजे पाताळलोक. पृथ्वीच्या पृष्ठभागाखालचा भाग! वरचा पृष्ठभाग कडक झाला असला तरी त्याखाली असंख्य हालचाली चालू असतात. त्यातूनच एखादा ज्वालामुखीचा उद्रेक होतो तर कधी भूकंप होतो, कधी जमिनीचा एखादा भाग खचून खाली जातो. भूपृष्ठाची रचना बदलते.
पूर्वी आफ्रिका भारताशी संलग्न होती व ब्रम्हदेश, सयाम हे टोकही ऑस्ट्रेलियापर्यंत जोडलेले होते. काही भाग खचल्याने ते वेगळे झाले व समुद्राने कापले गेले. अशा नैसर्गिक आपत्तींपासून रक्षण कर.
पाताळ या संकल्पनेनुसार नागांसारख्या विषारी प्राण्यांचे वसतीस्थान हा बोध होतो. आतांच्या काळात सद्दाम हुसेन यानेही भूमीखाली स्वत:साठी सुरक्षित व सर्व सुखसोयींनी युक्त असा प्रासाद बांधला होता हे लक्षात घ्यायला हवे. अशा दुष्ट प्रवृत्तींपासून रक्षण होऊ दे. अध:पात हा शब्द आपण पतन ह्या अर्थी वापरतोच.
या सर्व वर्णनात वायव्य, नैऋत्य, अग्नेय, ईशान्य या दिशांचा वेगळा उल्लेख नाही हे लक्षात येते. खरे तर या उपदिशांना आपण स्वतंत्र मानले आहे व तशी नावेही दिली आहेत. इंग्रजीत त्यांचा उल्लेख North West, North East,South West व South East असाच केला जातो. उर्ध्व व अधर दिशांसाठीही काही विशेष नावे नाहीत. पृथ्वी सपाट नसून गोल आहे, ही बाब भारतांत प्राचीन काळापासून ज्ञात आहे. म्हणूनच या उपदिशांचा उल्लेख नसावा. सर्वतो मध्येच त्यांचा समावेश केलेला आहे.
पण गणेशकवचात पुढून, मागून, पूर्व, अग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम, वायव्य, उत्तर, इशान्य असा क्रम असून दिवस, रात्र, संध्या यांचाही रक्षणासाठी उल्लेख आहे. राक्षस, वेताळ वगैरे पण आहेत. सर्वतो माम् पाहि पाहि संमतात्- येथे ’अव’ च्या ऐवजी ’पाहि पाहि ’ चा उपयोग आहे. सर्व बाजूंनी, सगळीकडून रक्षण कर असे आवाहन केले आहे.
अर्थात रक्षण कर असे आवाहन म्हणजे परीक्षेला जाताना देवाला नमस्कार करून मला पास कर सांगण्यासारखेच आहे. महत्वाचा असतो तो मानसिक आधार व स्वत:चे ओझे दुसऱ्यावर सोपवले असे ( खोटे) मानसिक समाधान. मानसिक ताण कमी होण्याला मदत होते इतकेच. वास्तविक जसा अभ्यास आपणच करायचा असतो तसे रक्षणही आपणच करायचे आहे.त्यासाठी सतत प्रयत्नशील रहायचे आहे. त्याचबरोबर रक्षणकार्यात समाजाचाही सहभाग अपेक्षित आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा