वादळाची दे गती पण भान ध्येयाचे असू दे ,
उसळत्या रक्तात माझ्या ज्वालामुखीचा दाह दे!!
वरील काव्यपंक्ती आजच्या स्त्रीच्या मानसिकतेला योग्य ठरतील. निसर्गाची किमया अशी आहे की स्त्रीच्या ठायी जननशक्ती असल्यामुळे त्या शक्तीला पोषक अशा वात्सल्य, प्रेम, कारुण्य, क्षमा, दया इत्यादि गुणांसाठी तिची शक्ती सत्वगुणाने नियंत्रित असावी. तशी ती असतेही! यात बदल केव्हा होतो? ज्या वेळी तिच्या मनात बंडखोरी वृत्ती निर्माण होते तेव्हा! ही बंडखोरी वृत्ती, तिच्यावर अन्याय होऊ लागला की तिच्या जन्मजात स्वभावानुसार निर्माण होते. रक्त उसळू लागते. भावनाप्रधान वृत्ती असल्याने वादळाची गती प्राप्त होते. पण असे जाणवते की कधी कधी ‘ध्येयाचे भान’ सुटते. स्त्री मुक्ती, स्त्री संघर्ष, अन्यायाविरुध्द झगडा ह्या शब्दांचा तिच्या मनावर पगडा बसतो अन घड्याळाच्या लंबकाप्रमाणे ती दुसरे टोक गाठू पहाते, असे स्त्री चळवळीकडे काळजीपूर्वक बघितले की लक्षात येते. कोणाचे तरी अनुकरण, कशाला तरी भारावून जाउन, भारतीय स्त्री, स्वत:चे भारतीयत्वच काय पण स्त्रीत्वही विसरते आहे की काय असा संभ्रम मनात निर्माण होऊ लागतो.
इंग्लंडमध्ये सन १९१८ च्या 'representation of people’s act‘ ह्या नुसार स्त्रियांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला. १९७५ मध्ये ‘समान वेतन व समान हक्क‘ कायद्याची कार्यवाही पूर्ण झाली. हॉलंड मध्ये सन १९२२ मध्ये डच स्त्रीला मतदान हक्क व १९५७ मध्ये समान हक्क मिळाले. गर्भपाताबद्दलचा निर्णय घेण्याचा हक्क स्त्रीचा स्वत:चा असावा ही ही मागणी मान्य झाली. पण उच्च शिक्षणासाठी मात्र तिला संघर्ष करायला लागला. नॉर्वेमध्ये असाच संघर्ष करायला लागला व १९०७ मध्ये मतदानाचा हक्क मिळाला. रशियामध्ये १९१७ च्या क्रांतीनंतर स्त्रीने एवढी भरारी मारली की आज सर्व क्षेत्रात ती नुसती पोचलीच आहे असे नसून तिने आघाडी घेतली आहे. तरीही खाणकाम व युध्दात आघाडीवर प्रत्यक्ष लढणे या कामात मात्र प्राधान्य क्रम पुरुषाला असतो. जपानमध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर समानता व १९५७ मध्ये समान शिक्षण मिळू लागले. जर्मनीत गर्भवतीची वैद्यकीय तपासणी, बाळंतपण व आजारपणाचा खर्च वगैरे सवलती मिळत असल्या तरी ६५ वर्षावरील ७०% स्त्रियांना कुटुंबाविना एकटे रहावे लागते. ऑस्ट्रेलियात एकही स्त्री निरक्षर नाही.
भारतातील स्त्री शिक्षणाचा विचार करताना लक्षात येते की लॉर्ड डलहौसीच्या सूचनेवरून १८५४ च्या वुड खलित्यानुसार सरकारने स्त्रीशिक्षणाची जबाबदारी स्वीकारली पण प्रतिसाद फारच कमी होता. १८७५/७६ मध्ये सुतिकाशास्त्र व रुग्ण शिक्षण या विषयातील शिक्षण मिळू लागले. उच्च शिक्षणास १८८१/८२ पर्यंत काहीच प्रतिसाद नव्हता. १८८८ मध्ये मिस कार्नेलीया सोराबजी या प्रथम पदवीधर महिला बनल्या. त्या अगोदर १८८६ मध्ये आनंदीबाई जोशी अमेरिकेत जाउन डॉक्टर बनल्या. तरी सावित्रीबाई फुले, आगरकर, महर्षी कर्वे वगैरेच्या प्रयत्नांमुळे स्त्रीही शिक्षित होऊ लागली.
बाल विवाहास प्रतिबंध, द्विभार्या प्रतिबंधक कायदा, घटस्फोट, पोटगी ,दत्तक घेण्याचा हक्क, वारसा हक्क वगैरेसाठी प्रयत्नात सुध्दा भारतात स्त्रियांबरोबर रॉय प्रभूती अनेक पुरुषांनी सहभाग नोंदवलेला आहे. सगळे जरी नाही तरी बरेचसे साध्य झाले आहे. नोकरदार स्त्री हे चित्र सर्वसामान्य आहे. राजकारणात देखील अनेक स्त्रिया गाजत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा