गुरुवार, २० मार्च, २०१४

लढा अजून सुरुच आहे

विषय वाचला अन गंमत वाटली. वातावरणात गुंजत असलेल्या ध्वनींचाच हा प्रतिसाद असेल. सातत्याने चालणाऱ्या वेगवेगळ्या निवडणुका, त्यासाठीचे राजकारण, शह प्रतिशह, बंडखोरी व घोडे बाजार, वाढता भ्रष्टाचार व दहशतवाद, सभ्य वस्तीत चालणारे कुंटणखाने, दरोड्यांचे सत्र, शैक्षणिक क्षेत्रातील अनाचार, गरीब लोक व गरीब प्रवृत्तींवर होणारे अत्याचार अन असेच बरेच काही! या सर्वांमुळे मनावर असणारे भीतीचे अनामिक सावट अन म्हणूनच स्वत:तल्या प्रतिकारशक्तीला जागे करायला पाहिजे ही जाणीव - ह्या सर्वांचा परिणाम म्हणजे विषयाचे शीर्षक!अन्यथा ते असते 'अजून बरेच मिळवायचे आहे. '
लढा कोणाशी चालू आहे? शासनाशी? समाजाशी? पुरुषांशी? अयोग्य प्रवृत्तीशी? कोणाविरुध्द लढायचे आहे ही कल्पनाही स्पष्ट व्हायला हवी, नाही का? शत्रू जेव्हा उघडपणे दिसत असतो तेव्हा शौर्य, बुध्दी, आवश्यक ती शस्त्र साधने, डावपेच यांचा वापर करून त्याचा पूर्णपणे नायनाट करायचा असतो. तशी ही लढाई सोपी असते. पण आपल्याला स्वत:विरुध्द वा स्वकीयांविरुध्द लढायचे असेल तर ते खूप कठीण असते. अवघड जागीचे दुखणेच म्हणा ना! शिवाय शत्रूला नाहीसे तर करायचे नसतेच उलट त्याचे उन्नयन घडवून आणायचे असते. तर कधी कधी स्वत: मोठी रेघ बनून समोरची रेघ न पुसता लहान करायची असते. 
आपल्याला नक्की काय करायचे आहे? आत्तापर्यंत आपण काय केले? काय करण्याची योजना आहे व लढा संपला असे म्हणायची वेळ नक्की काय साध्य झाले म्हणजे येईल? ते साध्य झाले की आणखी एखादे साध्य समोर असेल का? सगळाच विचार करायला हवा. नाहीतर अंधारात वार मारण्यासारखेच होइल. 
मला तरी वाटते हा लढा आपल्याशीच लढायचा आहे. सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्तरावर आपल्याला हक्क मिळाले पाहिजेत असे वाटत असेल तर तशी पात्रता आपल्यात आहे हे सिध्द करायला हवे. डॉ. कमला सोहोनींनी त्यांना प्रवेश नाकारला गेला तेव्हा त्याची कारणे विचारली. वरिष्ठांना वाटणारी भीती अनाठायी आहे हे सिद्ध केले. एवढेच नव्हे तर स्वत:च्या परिश्रमाने त्यांच्याकडून कौतुक प्राप्त केले. मान हा मागून वा झगडून मिळत नाही. यदाकदाचित मिळालाच तरी वरवरचा व देखाव्यापुरता असतो व समोरच्याच्या मनात आपल्या अपयशाची, अपकीर्तीची कामना सूक्ष्मपणे का होईना असतेच. आपल्या गुणांमुळे, क्षमतेमुळे मान आपोआप दिला जातो व तो टिकाऊ असतो.
शासनाशी वा समाजाशी लढायचे असेल तर आपल्या मागण्यांची आवश्यकता व अनिवार्यता पटवून द्यायला हवी. आपल्या समर्थकांची संख्या वाढवायला हवी. त्या मान्य करण्यात समाजाचे काय हित आहे? मान्य न करण्यात काय अनहित आहे? दीर्घकालीन परिणाम काय आहेत हे सुस्पष्ट असायला हवे, सांगायला हवे, पटवून द्यायला हवे. त्या साठी स्वत:वर नियंत्रण ठेवायला हवे. चारित्र्य जपायला हवे. कोणाच्या तरी हातची बाहुली आपण बनणार नाही ही काळजी घ्यायला हवी. आपल्या विचारांवर ठाम रहायला हवे. एखाद्या नगरसेवकाचा उन्मत्तपणा, भ्रष्टाचार, चारित्र्यहीनता समाजाला टोचते. पण एखाद्या नगरसेविकेचे तसेच बेताल वागणे मात्र समाजमनावर जखम करते. कारण भारतात प्राचीन काळापासून चालत आलेली स्त्री बद्दलची आदरयुक्त भावना होय! 
ह्याच भावनेमुळे इतर देशातील स्त्री चळवळ व भारतातील स्त्री चळवळ यात महदंतर आहे. मतदानाच्या हक्कासाठी इंग्लंड, हॉलंड, नॉर्वे, जपान सर्व देशात स्त्रियांना बराच काळ झगडावे लागले. भारतात मात्र स्वातंत्र्याबरोबरच तो हक्क मिळाला. स्वातंत्र्य संघर्षात स्त्री सहज सहभागी झाली. शिक्षण व नोकरी ह्या क्षेत्रात संधीसाठी तुलनात्मक दृष्ट्या कमी झगडावे लागले. आजही सर्व क्षेत्रात भारतीय स्त्री आघाडीवर आहे. मग मुख्य दुखणे व खंत काय आहे? स्त्रीला नगण्य मानले जाते. बरोबरीचे स्थान नाही. निर्णय प्रक्रियेत महत्वाची भूमिका नाही याचीच बोच आहे.
प्राचीन काळापासून चालत आलेली पुरुष प्रधान सामाजिक स्थिती हे प्रमुख कारण आहेच. पुरुषी मानसिकता बदलायला हवी असेल तर एकतर त्यांचे मानसिक उन्नयन घडवायला हवे व तेही आपणच! दुसरी गोष्ट आपल्यातला न्यूनगंड सोडायला हवा. स्वत:ची क्षमता वाढवायला हवी. ती सिद्ध करायला हवी. त्या साठी झगडा नाही, कृती हवी!
स्वत:च्या मानसिकतेचे, कृतीचे, भावनांचे योग्य विश्लेषण करता यायला हवे परिस्थितीला सामोरे जाण्याचा धीटपणा हवा. कोणतेही आव्हान पेलायची तयारी हवी. करियर करायचे असेल तर कौटुंबिक अडचणींवर उपाय शोधायला हवे. कुटुंबातून वा कडून अपेक्षा कमी करायला हव्या व हे सर्व करायला हवे, मनाने जराही विचलित न होता अन सारासार विचार ढळू न देता!
मग झगडावे, लढावे लागणारच नाही का? लागेल. निश्चितपणे लागेल. कारण कोणीही सुखासुखी स्वत:कडे कमीपणा घ्यायला वा स्वीकारायला तयार नसते. स्वत:च्या अधिकारांचा संकोच झालेला कोणालाही चालत नाही. स्वत:वर बंधने घालून घ्यायला कोणीच तयार नसते. काहींची मानसिकता गव्हाणीतल्या कुत्र्यासारखीही असते. ज्ञानेश्वरांना सुध्दा म्हणावे लागले,’ खळांची व्यंकटी सांडो’!
मलेरिया झाला तर क़्विनाइन द्यावेच लागणार पण ते शुगर कोटेड करून दिले तर रोग्याचे तोंड वेडे वाकडे होत नाही. तो खळखळ करत नाही व आजार बरा होतो.
आपल्याला काय, का व कसे प्राप्त करायचे आहे ते स्पष्ट असले तरी ते प्राप्त करताना भावनात्मकता, संताप, जमावाची मानसिकता या गोष्टी टाळायला हव्यात. स्त्रीच्या नैसर्गिक गुणांचा उपयोग करायला हवा. थोड्या श्रमात व वेळात अधिक काम करायची हातोटी, अष्टावधानीपणा, आपले म्हणणे पटवण्याची क्षमता,' पुत्राचे सहस्त्र अपराध, माता काय मनी तयाचा खेद' ही क्षमाशील वृत्ती या स्वभाव सुलभ गुणांचा योग्य उपयोग करून साध्य करायला हवे. म्हणून लढा स्वत:शीच आहे!
- सुशील अभ्यंकर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा