अव दातारम् - दात्याचे, दान करणाऱ्याचे रक्षण कर. दान देऊ इच्छिणाऱ्यांच्या मूळ धनावरच हल्ला करून ते हस्तगत करू पाहणारे तर अनेक असतात. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी केल्या जाणाऱ्या मदतीतील जास्तीत जास्त आपल्याला मिळावे असा प्रयत्न शारीरिक सामर्थ्याच्या जोरावर अनेक जण करतात, याचा अनुभव आपण घेतोच. अशांपासूनही रक्षण आवश्यक असतेच. पण येथे फक्त तेच अपेक्षित नाही. धनदान, ज्ञानदान, अन्नदान, जलदान वगैरे ज्ञानाचे विविध प्रकार आहेत. दान करण्यापूर्वी दात्याने काय काळजी घ्यायला हवी याचाही विचार व्हायला हवा.
१) दान सत्पात्री व योग्य असावे. पूर्वी आपल्याकडे संक्रांतीला ’लुटणे’ हा प्रकार असायचा. जे दान करायचे आहे त्याची रास ठेवली जायची व हळदीकुंकवाला येणारीने तिला आवश्यक तेवढी वस्तु त्यातून घ्यायची असायची. अर्थातच जिला आवश्यक ती जास्त घ्यायची. जिला आवश्यकता नसेल ती फक्त कणभर उचलायची. कितीही आवश्यकता असली तरी कोणी सगळी रास उचलून नेत नसे. तसेच कणभर उचलणारीच्या मनातही दात्याबद्दलचा आदरभावच असे.
दुसरा एक प्रकार असे तो म्हणजे ज्याला जे हवे ते द्यावयाचे.धान्य,पैसे,कपडे,भांडी! अर्थात यासाठी शेजारीपाजारी जवळचे, आपुलकीचे संबंध असतील तर कशाची आवश्यकता आहे हे लक्षात यायचे.
२) परतफेडीची अपेक्षा नसावी. कीर्ती मिळावी, सत्ता प्राप्त व्हावी किंवा माझ्या अडचणीचे वेळी मदत मिळावी अशी कोणतीही अपेक्षा नसावी. ’माझे नाव द्या, तरच देणगी देतो ’ हा प्रकार आजकाल सर्रास झाला आहे.
३) ज्याला द्यायचे त्याचा स्वाभिमान दुखावला जाणार नाही ही काळजी घ्यायला हवी. वं.मावशी केळकर (राष्ट्र सेविका समिती संस्थापिका व आद्य प्रमुख संचालिका) एका संमेलनात उपस्थित होत्या. संचलनाची तयारी मैदानात चालू होती. बाजूच्या व्हरांड्यात एक सेविका बराच वेळ त्या तयारीकडे पहात उभी होती. चेहऱ्यावर आनंद होताच पण विषादाची एक बारीक छटाही होती. चौकशी केली तेव्हा लक्षात आले की तिच्याजवळ गणवेष नाही व तो ती विकतही घेऊ शकत नाही. वं. मावशींनी पैसे देऊन, एकीला भांडारात पाठवून गणवेषाची साडी आणवली. तिला बोलावून घेतले. साडीबरोबरच स्वत:चे एक ब्लाऊज घेतले. (साधारणपणे अंगकाठी सारखी होती.) दोन्ही तिला देताना म्हणाल्या, "या वर्षी मी ठरवले होते, एका सेविकेला गणवेष द्यायचा. पटकन साडी नेस व संचलनात जा." होते दानच पण रूप दिले गेले होते संकल्पाचे.
ज्ञानदान करताना हातचे काहीही राखून ठेवू नये. इतकेच नव्हे तर,’शिष्यादिच्छेत् पराजयम्’ अशी वृत्ती असायला हवी. ज्ञान दिल्याने वाढते अशीही धारणा असावी.
धनदानाबद्दल श्रीसूक्तांत म्हटले आहे, ’संपत्तीचा पहिला उपयोग दान हाच आहे.
अन्नदानाबाबत तर ते शिजविणाऱ्याच्या वृत्ती त्या अन्नात उतरतात असे मानले जाते आणि प्रयोगाने ते सिध्दही झालेले आहे. वं. ताई आपटे तर आत्मविश्वासाने म्हणत, "माझ्या हातचे अन्न खाणारी व्यक्ती कधीच वाममार्गाला जाणार नाही व समाजकर्तव्य विसरणार नाही."
जलदान ही तितकेच महत्वाचे मानले जाते. म्हणूनच उन्हाळ्याचे दिवसांत जे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देऊ शकतात ते सार्वजनिक ठिकाणी तशी व्यवस्था करतात. गुरू नानकांनी एका लक्षाधीशाला अनेक जलकुंभ बांधण्यास प्रवृत्त केले होते तर उत्तरप्रदेशातल्या एकाने, "प्रवासात स्वत:च्या मुलीला तहान लागली असतां गाडीतल्या गर्दीमूळे स्टेशनवर उतरून पाणी आणणे शक्य झाले नाही’ ह्या अनुभवाने आपल्या काही मित्रांच्या मदतीने स्टेशनवर गाडी आली की डब्याशी जाऊन पाणी द्यायची व्यवस्था केली होती. एका गरीब बाईने पैसा पैसा वाचवून प्रवासाच्या वाटेवर विहीर खोदली. रहाट, दोरी, बादली सर्व उपलब्ध करून दिले.
विंदा करंदीकरांनी म्हटले आहे," देणाराने देत जावे, घेणाराने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे." प्रथमदर्शनी हा स्वार्थविचार वाटतो. गोड लागला म्हणून ऊस मुळासकट खाल्ला या म्हणीची आठवण येते. पण देणाराचे हातच घ्यावे, याच्या अर्थाचा विचार करताना लक्षात येते की फक्त घेण्यासाठी हातांचा उपयोग न करता आपले देणाराचे हात व्हावेत असा प्रयत्न, तसा विचार सदोदित असायला हवा.
’दैनिक सकाळ ’च्या ’SMS आते है ’ या सदरात एक गोष्ट आली होती.एक खूप छान गाडी रस्त्यावर उभी असते. शेजारी एक छोटा मुलगा कुतुहलाने तिचे निरीक्षण करत असतो. गाडीचा मालक गाडीजवळ येतो तेव्हा तो मुलगा म्हणतो, "खूपच छान आहे तुमची गाडी!" मालकाला वाटते, "गाडीतून ह्याला एक चक्कर मारून आणली तर त्याला खूप आनंद होईल. म्हणून तो त्या मुलाला गाडीतून फिरवून आणतो.उतरताना तो मुलगा म्हणतो, "बाहेरून पाहिली तेव्हा जे वाटले त्यापेक्षा अधिक चांगली आहे गाडी. महाग असणार.काय किंमत आहे?" मोटारमालक उत्तरतो,"मला माहिती नाही कारण माझ्या मोठ्या भावाने मला दिलेली आहे." मुलगा विचारात बुडलेला दिसतो. तेव्हा मालक म्हणतो,"तुला असे वाटत असेल ना, मलाही असा मोठा भाऊ मिळाला तर किती छान होईल." त्यावर त्या मुलाचे उत्तर असते, "अंहं, मला वाटतेय की तो मोठा भाऊ मीच व्हावे तरच खूप आनंद होईल." देणाराचे हात त्याला मिळालेले असतात. दाता हा उत्तम दाता होण्याआड येणाऱ्या सर्व गोष्टींपासून त्याचे रक्षण कर.
अव धातारम् - देणारा देतो आहे, घेणारा घेतो आहे. पण कोठावळ्याचे पोट दुखतेय अशी एक म्हण आहे. तिची आठवण ’अव धातारम् ’ म्हणताना येते. आजकाल भ्रष्टाचार हा शिष्टाचार बनला आहे. साहेबाला मिळालेल्या चिरीमिरीत पट्टॆवाल्याचाही हिस्सा असतो. असा साहेब ’अव धातारम ’ ही इच्छा प्रकट करत असेल कदाचित!
लहानपणापासून आपण ज्या विविध गोष्टी ऐकत असतो, त्यांत एक असते विजयादशमीबद्दल. कौत्स नावाच्या एका शिष्याला (त्याच्याच आग्रहावरून गुरूंनी सांगितलेली) गुरूदक्षिणा द्यायची असते. त्यावेळचा रघू राजा जसा शौर्यासाठी प्रसिद्ध असतो तसाच उदारतेसाठीही प्रसिद्ध असतो. स्वकष्टार्जित तसेच स्वत:च्या मालकीची असलेली सर्व संपत्ती दर दहा वर्षांनी वाटून टाकतो. अगदी कपडेलत्ते, भांडीकुंडीसुद्धा. त्याच्या दाराशी आलेला याचक रिकाम्या हाताने परत जात नाही, हा सर्वांचा अनुभव असतो. तत्कालीन सामाजिक न्यायानुसार क्षत्रिय व वैश्य ह्यांनी दान द्यावयाचे व ब्राम्हण व शूद्र यांनी ते स्वीकारायचे हे समाजसंमत होते.
कौत्स रघु राजाकडे जातो. तेव्हा त्याला दिसते की त्याच्याकडे मातीचे एक पातेले व एक परळ एवढेच शिल्लक आहे. म्हणून काही न बोलताच तो परत निघतो. रघु राजा आपल्याला काही देऊ शकणार नाही हे स्पष्ट दिसत असताना त्याच्याकडे सुवर्णहोन मागण्याइतका निर्लज्जपणा त्याच्याजवळ नव्हता व आपली मागणी म्हणजे राजाच्या स्वाभिमानावर मारलेला डंख ठरेल हीही जाणीव त्याला होती. रघुच्या लक्षात त्याची ही मानसिकता आली. तरीही त्याने आग्रह धरला म्हणून नाईलाजाने कौत्साला येण्याचे कारण सांगावे लागले. रघु म्हणाला, "थांब तुला धन देतो." रघु जवळ स्वत:चा संकल्प न तोडण्याचा खंबीरपणा होताच व स्वपराक्रमावरही विश्वास होता. स्वत:ची खाजगी संपत्ती लुटवली असली तरी राजा म्हणून त्याचे सैन्य त्याच्याजवळ होतेच. त्याने देवांचा खजिनदार असलेल्या कुबेरावर स्वारी करायचे ठरवले. ही बातमी (सक्षम हेरखाते असल्याने) कुबेराला कळली. रघूच्या स्वारीचा उद्देशही कळला. रघूला फक्त थोडे धन हवे होते. म्हणून कुबेराने रघूच्या अंगणातील आपट्याच्या झाडावर सुवर्णमुद्रांची वृष्टी केली. रघूच्याही लक्षात कुबेराची स्थिती आली. कौत्साला तो म्हणाला," घेऊन जा या साऱ्या मुद्रा!’
पण कौत्स हाही लोभी नव्हता. त्याला फक्त गुरूदक्षिणा देण्यापुरत्या एक हजार मोहरा हव्या होत्या. त्याने तेवढ्याच घेतल्या व परतला. खरे तर विद्यार्थी दशा संपवून तो आता गृहस्थाश्रमात प्रवेश करणार होता. त्यासाठी काही मूलभूत गरजा त्याला भागवाव्या लागणार होत्या. तरीही त्याने एकही मोहर जास्त घेतली नाही. निस्पृहता होतीच पण आपण आपल्या आवश्यकता भागवू शकू हा आत्मविश्वास होता व त्यासाठी कष्ट करायची तयारीही होती. गुरूजी स्वत:साठी या धनाचा उपयोग करणार नाहीत, तर आश्रमातल्या गुरूकुलासाठीच करतील हा विश्वास अनुभवातून निर्माण झाला होता. गुरूकुलातील तरूण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ आहेत ही जाणीव होती.
तो गृहस्थ म्हणून जे काही कमावणार होता, त्याचा बराचसा भाग समाजासाठी, राज्यासाठी देणारच होता. (तशी त्यावेळी प्रथा होती.) म्हणजेच रघुराजाचे पैसेही फिटणार होते. धातारम् ने किती घ्यायचे व कशासाठी घेत आहोत ह्याचे भान सदैव ठेवायला हवे. मिळालेले ज्यासाठी घेतले आहे, ते काम पूर्ण करण्याची जबाबदारीही त्याचीच असते. अन्यथा आपण दरवर्षी मार्च च्या सुरूवातीला कोणत्या खात्याची, सरकारकडून प्राप्त रकमेपैकी किती रक्कम उपयोग न झाल्याने परत गेली अशा पुष्कळ बातम्या वाचतो.
एका म्हातारीला देव प्रसन्न झाला. त्याने सुवर्णमोहरा देऊ केल्या. म्हातारीला लोभ सुटला. झोळी गच्च भरली तरी तिने पदरातही काही मोहरा घेतल्याच. त्या वजनाने तिला चालताही येईना. दमून गेली अन् मोहरांच्या भाराने झोळीही फाटली. फाटक्या झोळीशेजारीच म्हातारीने कायमचे डोके टेकले. हीही गोष्ट घेणाऱ्याला लोभ नसावा हेच सुचवते.
श्री.प्रविण दवणे यांनी आपला एक अनुभव सांगितला. त्यांच्याकडे खूप चांगली चांगली पुस्तके होती. त्यांना एकदा वाटले,’ही आपल्या कपाटांत साठवून ठेवण्यापेक्षा आणखी काही जणांना वाचायला द्यावीत’ म्हणून त्यांनी काही पुस्तके शेजारीपाजारी दिली. त्याची प्रतिक्रिया ऐकायला आली, ’त्यांच्या घरातील रद्दी त्यांनी काढली’. देणाराचा उद्देशही धातारम् च्या लक्षात रहायला हवा, नाही का?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा