सगुणरूपवर्णन
एकनाथी भागवताच्या अकराव्या अध्यायात म्हटले आहे, "निर्गुणाचा बोध कठीण। मन बुद्धी वाचे अगम्य जाण। (क्र.१४६०) तर सगुण मूर्ती ही "सुलभ आणि सुलक्षण। देखतां जाय भूकतहान " (क्र. १४६२ ) अशी. सर्वसामान्य तुम्हा आम्हाला सगुण मूर्तीचे ध्यान अधिक सोपे असते. शिवाय अगदी मानसपूजा करायची म्हटली तरी बंद डोळ्यांपुढे व मनापुढे जे चिंतायचे त्याचे काहीतरी रूप असावे लागते.
अथर्वशीर्षात आधी गणेशाचे आध्यात्मिक वर्णन केलेले असले, गणेशविद्येतही गॅंचे वर्णन केलेले असले तरी नंतर एकदंतं चतुर्हस्तं पासून ते रक्तवाससं असे सगुणरूपवर्णनही आहे. त्यातील प्रत्येक शब्दांला काही पार्श्वभूमी व वेगळा असा अर्थ आहे. विज्ञानकथेचे ही स्वरूप आहे.
आपल्याकडे अशा अनेक विज्ञान कथा रूपक कथेच्या स्वरूपांत प्राचीन काळापासून प्रचलित आहेत. उदा.उत्तरेकडे धृवतारा, हा आपले स्थान बदलत नाही. त्यासाठी धृवबाळाची गोष्ट, कृत्तिका मावळल्यावर सप्तर्षी उगवतात म्हणून सप्तर्षी कृत्तिकांचे तोंड पहात नाहीत असे वर्णन, सप्तर्षीतील वसिष्ठ तारा जोडतारा (बायनरी स्टार ) म्हणून वसिष्ठ अरुंधतीची कथा वगैरे कथा प्रसिद्ध आहेत. या दृष्टीने त्या स्वरूपाचाही अर्थ आता आपण लक्षात घेणार आहोत.
एकदंत-
एकच दांत असलेला म्हणजे एकच दांत शिल्लक राहिलेला! देवांतकाशी गणेशाचे युद्ध चालले होते. देवांतकाने गणेशाचा एक दांत उपटला. (मोठा व लांब दांत असल्याने त्याला ते सहज शक्य झाले.) वास्तविक पहाता एकच दांत राहिला, शत्रूने एक उपटला, ही गोष्ट अवमानकारक ठरली असती. पण ती भूषणावह ठरली व यांतच गणेशाचे मोठेपण लक्षात येते. देवांतकाने दांत उपटल्यावर अधिक खिजवण्यासाठी त्याला तो दाखवला. गणेशाने तोच पकडला व त्या धारदार दांतानेच देवांतकाला मारले. उपटलेला दांत हेच शस्त्र बनवले. प्राप्त परिस्थितीत हताश न होता, त्या परिस्थितीचा त्याने संधी म्हणून उपयोग केला व एक मौलिक संदेश दिला.
या वेळी आठवतात ते माजी पंतप्रधान अटलबिहारी यांचे उद्गार! गुजराथमधे भूकंप झाला. घरांची पडझड झाली.अपरिमित हानी झाली. पण दु:खावेगात बुडून न जाता भारतीयांच्या अंगभूत विजिगीषु वृत्तीला साद घालत ते म्हणाले, "या गोष्टीचा संधी म्हणून उपयोग करू या. पुन्हा सुंदर, सुरचित गांवे व शहरे उभी करू या!"
एकनाथांनी एक वेगळाच दृष्टीकोन मांडला आहे. ते म्हणतात, "एकी दाविसी अनेकता। परी एकात्मता न मोडे। (अध्याय १.२) दोन्हीत एकी होती. वरवर दोन दिसत असले तरी कार्यशक्ती व ध्येय एकच असल्याने एक मोडला तरी त्याने काही फरक पडत नाही.
स्वामी स्वरूपानंद याचे वर्णन आणखी वेगळेच करतात. इतिहास त्यातून लक्षात येतो. ते म्हणतात,
"बौद्ध वार्तिकांचे। जे कां बौद्धमत। तोचि छिन्नदंत। योगाहाती ॥
वाचल्यावर लगेच आद्य शंकराचार्यांचे जीवनकार्य डोळ्यांसमोर तरळते. सर्व धर्म वा संप्रदाय यांची मुलभूत तत्वे चांगलीच असतात. पण सर्वसामान्यांच्या धारणाशक्तीनुसार व कर्तृत्वाच्या क्षमतेनुसार त्यांना कधीकधी वेगळे वळण लागते.
बौद्ध संप्रदाय सुरू झाला. गीतेतील अहिंसेचे तत्वज्ञान त्याने उचलून धरले. सर्वसामान्यांना त्याचे नीट आकलन झाले नाही. चुकीचा अर्थ लावला गेला. सर्व समाज दुबळा बनला. भोगप्रवृत्तीवर नियंत्रण असावे या दृष्टीने काही अध्यात्मिक गोष्टी सांगितल्या गेल्या. घड्याळाचा लंबक एका दिशेलाच गेला होता. त्याला मध्यवर्ती आणण्यासाठी प्रयत्न करता करता तो विरुद्ध टोकाला गेला. समाजात उदासीनता पसरली. स्वसंरक्षणाचेही भान राहिले नाही. भिक्षुंची संख्या खूपच वाढल्यामूळे गृहस्थाश्रमी वर्गावर त्याचा आत्यंतिक ताण पडला. अर्थव्यवस्था बिघडून गेली. त्याचवेळी समाजांत अनेक पंथोपपंथात चुरस निर्माण झाली. समाज असंघटित झाला. विजिगिषु वृत्ती जाऊन जीवनांत नैराश्य आले. समाजाला पुन्हा सबल, एकसंध, विजिगिषु करण्यासाठी शंकराचार्यांनी कंबर कसली. अन्य आचार्यांना वादात जिंकले. प्रभावी असलेल्या बौद्ध संप्रदायाशी त्यांना अधिक शक्तीने झगडावे लागले. बौद्ध संप्रदायातील अयोग्य गोष्टी नाहीशा कराव्या लागल्या व पुन्हा एकसंधता निर्माण केली गेली. जणू बौद्ध भिक्षुंचे बौद्धमत हा दंत योगाहाती आला. योग = एकत्रीकरण असाही अर्थ हिंदीत केला जातो.
चतुर्हस्तं -
चार हात असलेला. ’चार’ या संख्येला एक वेगळेच महत्व भारतीय संस्कृतीत आहे. चार आश्रम, पुरुषार्थ, वर्ण, मुक्ती, चार वाक वगैरे. एक ही एकमेव संख्या एक ह्या अर्थी असते. नंतर असतात त्या अनेक(अन+एक). चारचा अर्थ तसाच आहे. विविध आवश्यक कार्ये करण्यासाठी विविध प्रकारच्या क्षमता असाव्या लागतात. त्या त्या क्षमतांनुसार कृती घडत असते. पण सर्व कार्य समाजहितकारक होण्यासाठी त्यांच्यात एकीची, एक विचाराची, परस्परसहाय्याची आवश्यकता असते. चार हात त्याचेच निदर्शक आहेत. आपल्या बव्हंशी देवतांना चार, सहा, आंठ, दहा, सोळा असे हात आहेत. कारण समाजहितचिंतकांनाच आपण देवस्वरूप मानत.
गणेशाचे रूपही विविध कालावधीत विविध स्वरूपाचे होते असे वर्णन आहे. गणेशकवचातही तसा उल्लेख आढळतो. प्रथम युगात-सत्ययुगात त्याला आठ हात असून त्याचे वाहन सिंह होते. त्याचे महाविनायक नाव होते व देवांतकाचा वध हे प्रमुख कार्य होते. त्रेतायुगात सहा हात व मयुर वाहन होते. शिवपुत्र नाव होते व दुंदु दैत्य वध हे प्रमुख कार्य होते. द्वापारात चार हात व रक्तवर्णी होता. शिवपुत्र गजानन हे नाव होते व सिंदुरासुर वध हे प्रमुख कार्य होते. कलियुगात तो द्विभुज असुन धूम्रवर्ण आहे.अर्थात सामान्य मानवापेक्षा त्याच्या अधिक असलेल्या क्षमतेची जाण आपण अनेकहस्ती मूर्तीतून दाखवत असतो. हात अनेक पण कार्य एकच हा संदेश लक्षात रहातो.
भारतीय संस्कृतीचे एक प्रतिक स्वस्तिक आहे. मुळातल्या दोन रेघा विविध दिशांना जातात. त्यांनी त्या दिशेने किती वाढावे यावर बंधन नाही. पण चारही दिशांनी वाढणाऱ्या रेषांनी सारखेच वाढायला हवे. एकच रेषा खूप वाढली आणि दुसरी तितकीच राहिली तर चालणार नाही. तसेच त्यांच्या दिशाही ठरलेल्या आहेत आणि तरी त्यांचा केंद्रबिंदु एक आहे. तो केंद्रबिन्दु नष्ट झाला तर सर्व रेषा भरकटतील.काटल्या गेलेल्या पतंगाप्रमाणे दिशाहीन होतील. मग स्वस्तिक हे (सु +अस्ति +क) हितकारी रूप नष्ट होऊन जाईल. हात कितीही असले तरी ते धडालाच जोडलेले रहायला हवेत व त्यांचे नियंत्रण मेंदूकडूनच व्हायला हवे. एका अर्थी हे समाजपुरूषाचेच वर्णन असावे असे वाटते.
पाशांकुशधारिणं
विठ्ठलाखेरीज आपले सर्व देव शस्त्रधारी आहेत. विठ्ठल हा शस्त्रधारी नसला तरी त्याचे हात खंबीरपणे कटीवर ठेवलेले आहेत. संकटाला घाबरून तो पळणारा नाही हे त्याचे निशस्त्र हातही सांगतात. टीकाकार विशेषत: बुद्धिभेद करू पहाणारे म्हणतात, "शस्त्रधारी आहेत याचा अर्थ युद्धप्रवृत्त
म्हणजेच साध्या शब्दात भांडायला केव्हाही तयार असे भांडकुदळ आहेत." गंमत म्हणजे अशा लोकांनीच सतत इतरांवर आक्रमणे केलेली आहेत. अणुबॉंब तयार करण्यात व वापरण्यात तेच अग्रेसर राहिलेले आहेत.
भारताचे देव शस्त्रधारी असले तरी भारताने कोणावरच अन्यायाने आक्रमण केलेले नाही. पण आपल्यावर आक्रमण होऊ नये म्हणून स्वसंरक्षणसिद्ध तो राहिला आहे. हे भान जेव्हा सुटले किंवा आपल्यासारखेच इतरही सद्विचारीच असतील असे भोळेपणाने मानले गेले तेव्हा तेव्हा तो आक्रमणाचे लक्ष ठरला. अगदी आत्ता आत्ताच्या काळात ’हिंदी चिनी भाई भाई' ही घोषणा वातावरणात निनादत असतानाच चीनने आक्रमण केलेले आपण पाहिले आहेच.
गजाननाच्या हातातही शस्त्रे आहेत. पाश व अंकुश. गणेशपुराणात सहा वर्षाच्या गणेशाला ही शस्त्रे विश्वकर्म्याने दिली अशी गोष्ट आहे. विश्वकर्म्याच्या मुलीचे संज्ञाचे, सूर्याशी लग्न झाले. पण तिला सूर्याचे तेज सहन होईना म्हणून ती घोडीचे रूप घेऊन वनात लपली. विश्वकर्म्याने तिची समजूत घातली व सांगितले,"मी सूर्याला तेज कमी करायला सांगतो." सूर्यानेही संमती दिली. विश्वकर्म्याने त्याला चक्रावर धरुन घासले. सूर्याचे तेज कमी झाले. संसार सुखाने चालू झाला.
चक्रावर घासताना खाली जो चुरा पडला त्याची विश्वकर्म्याने शस्त्रे बनवली. गदा व चक्र विष्णूला, त्रिशुल शंकराला, पाश, अंकुश, परशु व कमळ गणेशाला दिले. गणेशाच्या शौर्यकथा ऐकून विश्वकर्मा त्याला बघायला आला होता, तेव्हा त्याने ही दिली.
पाश हा फेकून फास टाकून जवळ ओढून घेण्यासाठी वापरतात तर अंकुश नियंत्रण ठेवण्यासाठी योजतात. वानरांची शेपटी व हत्तीची सोंड यांचाही पाशासारखाच उपयोग केला जातो. सर्वसामान्यांतील विषयवासना, धनलोभ, व्यसनांची आवड या साऱ्या गोष्टी गणेश पाश टाकून नाहीश्या करतो. तर विवेक, बुद्धी, संयम, उपासना या अंकुशाने दुर्वासनांवर नियंत्रण ठेवतो.
स्वामी स्वरूपानंद म्हणतात, "तर्क तो परशू। न्याय तो अंकुश ।"
रदं च वरदं हस्तैबिभ्राणं मूषकध्वजं।
गजाननाच्या विविध मूर्ती व फोटो पाहिले तर त्याच्या हातात वेगवेगळी शस्त्रे दिलेली दिसतात. वरील कथेत परशु व कमळाचा उल्लेख आहे. पण अथर्वशीर्षात तो नाही. देवांतकाने उपटलेल्या दातानेच गणेशाने त्याला मारले ही कथा आपण पाहिलीच आहे. या ठिकाणी तो दांत गणेशाच्या एका हातांत आहे व चौथा हांत वरदहस्त आहे. वरद म्हणजे वर देणारा, अभय देणारा. गणांचा प्रमुख असल्याने आपल्या लोकांना धीर देणे, आश्वासन देणे ( कोरडी नव्हेत ) यासाठी हा वरदहस्त आहे. तो दिसतांच पहाणाऱ्याच्या मनातील भय कमी होते. आपला रक्षणकर्ता कोणीतरी आहे ही भावना विश्वास निर्माण करते.
मूषकध्वजं
मूषकाचा वाहन म्हणून उल्लेख नसून मूषकचिन्हांकित ध्वज असे वर्णन आहे. उंदीर हा सामान्यातील सामान्य. आपल्या कार्यात सर्वसामान्यांचा सहभाग घेणारा हा गणनायक आहे. रामाने रीस वानर यांच्या सहकार्याने रावणासारखा प्रबल शत्रू नष्ट केला. शिवरायांनी मावळ्यांना आपल्या कार्यात सहभागी करून घेतले. लोकमान्य टिळकांना इंग्रजांनी पदवीबहाल केली होती, "तेल्या तांबोळ्यांचे पु्ढारी." सर्वसामान्यांसह सर्वांचा सहभाग असेल तर कार्य यशस्वी होते. सैन्य हेही सामान्य माणसांचेच असते. अशांना मार्गदर्शन करून यश प्राप्त करतो तो सेनापती, नायक, राजा!
उंदीर हा कुठेही प्रवेश करू शकतो. सर्व गोष्टी कुरतडू शकतो. त्याच्या हालचाली चपळ व वेगवान असतात. पहाता पहाता बिळात अदृश्य होऊन यशस्वी माघार घेतो.जणू सम्राटाचे कुशल हेरखातेच! या सर्व गुणांचा उपयोग समाजकार्यासाठी गणेशाने करून घेतला आहे. उंदीर गणेशाचे वाहन कसे बनला याची एक गोष्ट आहे. क्रौंच गंधर्व आपल्याच नादात घाईघाईने जात असताना वामदेव ऋषींना त्याचा पाय लागला. पण त्याबाबत जराही अपराधित्व त्याला वाटले नाही. ऋषींनी त्याला शाप दिला व तो उंदीर झाला. उंदराच्या नैसर्गिक गुणांनुसार त्याने पराशर ऋषींच्या आश्रमात नासधूस करून धुमाकूळ घातला. ऋषींनी गणेशाला, त्याला आवरायची विनंती केली. गणेशाने त्याला बोलावले. (एवढ्याश्या प्राण्याने आश्रमवासीयांना दे माय धरणी ठाय केले आहे असे पाहून बहुधा आश्चर्य वाटले असेल.) व म्हणाला, "वर माग". आपल्या विध्वंसक शक्तीचा विजय झालाय ह्या कल्पनेने उंदराला जरा गर्व झाला असेल. तो म्हणतो, "मी का वर मागू? तूच माग." गणपतीने वर मागितला,"तू माझे वाहन हो." वाहनावर नियंत्रण ठेवता येते. म्हणूनच गणेशाचे कौतूक वाटून एकनाथी भागवतांत नाथ म्हणतात,"सुक्ष्माहूनी सूक्ष्म सान। त्या मानी तुझे अधिष्ठान ॥
अथर्वशीर्षात मात्र मूषकवाहन न म्हणता मूषकध्वज म्हणले आहे. असे का ? यासाठी थोडे खगोलशास्त्राकडे वळू या!
दक्षिणेकडे एक हलणारा तारकासमूह आहे. त्या नक्षत्राचे नाव ’एकदंत गजमुख’ आहे. यालाच ग्रीक भाषेत मोनोसेरॉस असे म्हणतात. गजमुखाखाली एक तारकापुंज आहे. त्याचा आकार मूषकासारखा आहे. बदलत्या आकारामुळे या मूषक आकाराभोवती इतर ताऱ्यांची ध्वजासारखी आकृती तयार झाली असेल व म्हणूनच मूषकध्वज उल्लेख असेल. यात २१ प्रखर तारे आहेत म्हणुन २१ ह्या संख्येला गणेशपूजेत महत्व प्राप्त झाले आहे. २१ दुर्वा, २१ मोदक, २१ आवर्तने वगैरे. यातलाच एक तारकापुंज NGC 2264 हा परस्परांस जोडला तर जुडीचा आकार दिसतो.
मूषकध्वज, गनिमी काव्याचा प्रणेता गजानन आहे असे सुचवतो.
रक्तम् -
अस्थिर असा जो हुबलचा तेजोमेघ आहे त्यात M 50 या प्रकारचे लाल तारे आहेत. जणू काही त्यांचा हार गजमुखाभोवती घातलेला आहे असे वाटावे असा त्यांचा आकार आहे. लाल रंगाची किरणे दृष्टी आकर्षून घेतात. (सिग्नलचा दिवा सर्व जगात लालच असतो.) म्हणून गजाननाला लाल रंग आवडतो असे मानतात. लाल रंगाची फुले वाहतात. पुढे रक्तवाससं चा उल्लेख आहे. लाल वस्त्र धारण करणारा असा तो आहे.
नेता, मुख्यत: सेनापती सर्वांना दिसत असला तर कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळते म्हणुन लाल रंगाची योजना असेल. मंगळ हाही लाल आहे व निरभ्र आकाशात तो लक्ष वेधून घेतो. स्वामी स्वरूपानंदांनी अनेकवेळा उल्लेख केला आहे,"जो मंगल करत नाही (मंगळ पत्रिकेत असला तर लग्न जुळत नाही ) त्याला आपण नाव दिले आहे’मंगळ "! गजाननाची लाल वस्त्रे शत्रूला धोकादायकच वाटत असतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा