सोमवार, २४ जून, २०१९

विष्णुसहस्त्रनाम -भाग ३

 विष्णुसहस्त्रनाम -भाग 3

अशी सर्व क्षमता प्राप्त केली असली तरी कधी कधी शस्त्रांची आवश्यकता भासते व ती वापरण्याचे कौशल्यही प्राप्त करावे लागते. 
म्हणूनच चक्रगदा (९९५,९९७)धारण केली आहे. 
तो हलायुध बनला आहे. (५६२). 
सुधन्वा (५६७) आहे. 
कधीही खंडित न होणारा परशु (५६८)त्याने हातात घेतला आहे.
तो धनुर्धर:( ८५७) आहे व त्यासाठी आवश्यक असणारे ज्ञान त्याच्याजवळ आहे. 
धनुर्वेद: (८५८) शासन व नियंत्रण याचे प्रतीक दंड (८५९) तो स्वत:च बनला आहे.
महाभारत युद्धाचे वेळी कौरव व पांडव सेना समोरासमोर आल्यानंतर दोन्ही सैन्यातील पुढाऱ्यांनी शत्रूच्या मनात धाक उत्पन्न व्हावा म्हणून शंखनाद केला. हा पुढारी शंखभृत (९९३) आहे. असा सर्वप्रहरणायुद्ध: भगवान आमचे नेतृत्व करत आहे.

स्वाभाविकच ह्या सृष्टीतील पंचमहाभूतांशी संबंध येणारच.

पृथ्वी - धारण करणारा शेषनाग, पृथ्वी बुडू लागली असता तिला वाचवणारा वराह, आपल्या टणक पाठीवर तोलून धरणारा कूर्म ह्या वेगवेगळ्या रूपांनी तो धरणीधर बनला आहे.

आप - तो स्वत:च अपांनिधी :( ३२३) जलाचा अथांग संचय करणारा, कधीही न आटणारा, समुद्र आहे. 
तो अंभोनिधी आहे. अंभ म्हणजे देव,मनुष्य,पितर व असुर हे चार अंभ त्यांत सामावतात. जलप्रलयाचे वेळी सर्व जलसाठे एकत्र येतात. 
अशा महोदधीमध्येही एका वटपत्रावर शांतपणे निद्रिस्त असणारा हा बालक याचेच नाव महोदधीशय: (५१९) व जलाची देवता वरुण याचेच स्वरूप आहे.

तेज- अग्नि,चंद्र,सूर्य,तारे हि तेजाची रूपे. 

अग्नी-वन्हि (२३३)यज्ञात हवन केलेली द्रव्ये वाहून नेणारा. पावक -पवित्र करणारा पावत:(८११), अनल: (२९३)जो अमर्याद आहे.

सूर्य -सहस्रांशु म्हणजे सहस्रावधी किरणांनी युक्त. सहस्रार्चि(८२६), गभस्तिनेमी (४८६)प्रकाशमान (८८३) सूर्यसविता (८४४)रवि :(८८१)

वायू -अनिल -सर्वत्र संचार करणारा म्हणून निवासस्थानरहित. सतत हालचाल करत राहणारा. वाहत राहणे हा ह्याचा धर्म.
पवन: (२९१)पवित्र करणारा, 
प्राणद:(३२१) -अन्न,पाणी ह्यांवाचून काही काळ राहता येते पण हवेवाचून क्षणभरही राहता येत नाही. हा गतिरूप तर आहेच पण गंधस्वरूपही आहे. अनिल:(८१२)याला वेगळ्या प्रेरणेची आवश्यकता नसते. प्रेरणा हि सदैव त्याच्याजवळच असते. प्राप्त करण्यासाठी तो सहजसुलभ आहे. तो सदैव सोबतच असतो.

आकाश - दिसते,असते,अनुभवास येते पण धरता येत नाही. पृथ्वी आहे तिथे आकाशही आहेच. आप धारण करणाऱ्या मेघांना तेच धारण करते. तेजाचे स्रोत सूर्य चंद्र आकाशात राहतात. आकाशव्याप्त हवेचे वायू हे रूप आहे. असे सर्वधारक आकाश ज्यामध्ये लिन होते असा विहायसमति (८७६)भगवान आहे. सर्वव्यापी आकाशाप्रमाणेच भगवानही विभु :(८८०)आहे. जलप्रलयाचे वेळी पृथ्वी बुडते पण आकाश असतेच. त्याचे रूप सनातनतम्:(८९७)आहे. ते पर्यवस्थित: (९३१)आहे.
 
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा