रविवार, २३ जून, २०१९

विष्णू सहस्त्रनाम - भाग २

विष्णू सहस्त्रनाम - भाग २ 

रक्षक म्हटले कि त्याच्याजवळ शस्त्रे,अस्त्रे आणि क्षमता असायलाच हवे. अर्थातच तो महाबल:(१७२), महावीर्य: (१७४), महाशक्ति: (१७५)आहेच. पण आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी आवश्यक म्हणून तो महोत्साह:(१७१) आहे. या सर्व सत्कार्याचे तेज अंगावर असल्याने महाद्यूती (१७६)आहे. हे काम करताना सत्यधर्माचे असे आवश्यक आचरणही (८७०)करणारा आहे. असे व्रत पत्करणारा तो सुव्रत (८१८) आहे. हे सर्व करताना वा करुनही प्रसन्नात्मा (२३७)आहे. कारण आपण चांगलेच काम करत आहोत,सत्कर्ता (२४१) आहोत हा आत्मविश्वास त्याचेजवळ आहे. म्हणूनच तो सत्कृत:(२४२) आहे हे नक्की. 

हे सर्व करताना विचारशक्ति व निरीक्षणशक्ति चांगली असणे आवश्यक. "सहस्रमुर्धा: (२२४) व सहस्राक्ष: (२२६)आहे. यासाठी सर्वत्र संचारक्षमताही आहे. तो सहस्रपाद (२२७) आहे. आपला अनुभव सर्वांना समजावून सांगण्यासाठी तो सप्तजिव्हा ( ८२७)आहे. (ते सांगणे परिणामकारक व्हावे म्हणून वेदशास्त्ररूपी थोर शब्द समुच्चय त्याला प्राप्त झाला आहे.) व या सर्व सत्कृतीचे तेज पसरवणारा सहस्रार्चि ( ८२६)आहे. 

 स्वास्य(८४४)असे हे धर्म संस्थापनेचे चांगले व्रत स्वीकारणारा सुव्रत (८१८) आहे. स्वत:च्या इच्छांवर त्याने विजय मिळवलेला आहे. सिद्ध (८१९)या कामात सहभागी होणारांचे मार्गदर्शन करणारा नेता (२२२) आणि अग्रणी 
(२१८) बनला आहे. कार्य करत असताना विरोध होत असतोच. अशा विरोधकांना त्रस्त करणारा शत्रुतापन (८२१)आहे व त्यात तो यशस्वी, शत्रुजित (८२०) झाला आहे. आवश्यक तेव्हा पुरंदरही (३३५) झाला आहे.

रक्षक तर तो आहेच- तारण:(३३७). कार्यावरील विश्वासाने कराव्या लागलेल्या काही अयोग्य गोष्टींचेही त्याला दुःख नाही. -अशोक: (३३६). असा तो अमितविक्रम (५१६),सुवीर(९४४), भीम: ( ९४८),भीमपराक्रम (९४९) आहे. म्हणून तो जितामित्र आहे. तो त्रिदशाध्यक्ष (स्वर्ग,मृत्यू,पाताळलोक) बनला आहे. त्रिपदात तिन्ही लोक व्यापणारा वामन झाला आहे. म्हणून तो महार्द्र -पूजनीय बनला आहे. मुकुंद (मोक्ष देणारा ) बनून त्याने लोकांचा उद्धार केला आहे. त्या साठी आवश्यक तेव्हा महशृंग (५३६),महा वराह (५३८) हि झाला आहे. 
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा