शिवपरिवार
सर्वसामान्यांपेक्षा विशेष गुण विशेषता, निर्मितीक्षमता, सामर्थ्य व मानवी जीवनसंबंधित विविध प्रकारच्या गोष्टींवर प्रभाव पाडण्याचे सामर्थ्य ज्यांच्या जवळ आहे, मानवाला जे उपकारक आहेत त्यांना 'देव' ही संज्ञा दिली आहे.
रामायणकाळात संपत्तिमान, विज्ञानात प्रगत अशा लंकेला 'सोन्याची लंका' म्हटले गेले.
प्राचीनभारतात निर्यात व्यापार मोठा असल्याने संपन्नता होती, तसेच विविध कला, शास्त्रे, ग्रंथनिर्मिती यातही तो अग्रेसर होता. मानवी जीवन प्रगत होते. म्हणून भारताला 'सुवर्णभूमी' म्हणत असत. सुखसोयींच्या सर्व साधनांनी समृध्द, शांत व ऐष आरामी जीवन जिथे जगता येईल असा प्रदेश 'स्वर्ग' गणला जाई व देवांचे निवासस्थान स्वर्ग होते.
या देवांनाही आपापले कुटुंब होते. पण सर्वांपेक्षा 'जरा हटके' निवासस्थान व कुटुंब होते ते शंकराचे! 'शं करोति इति शंकर:!' अनेकांचे कल्याण करणारा तो शंकर, तोच शिव! शंकर शब्द उच्चारताच आठवते ते त्यांनी नेसलेले व्याघ्रचर्म, हातातला डमरू व त्रिशूल, माथ्यावरची गंगा व चंद्र, गळ्यात, कमरेभोवती नाग व आजूबाजूला गण तसाच त्यांचा भोळा स्वभाव व भक्तांवर चटकन प्रसन्न होण्याची वृत्ती! त्यांचे निवासस्थान कैलास व स्मशान!
भारतात आत्ता गंगा यमुनांचा जो प्रदेश आहे, तेथे पूर्वी गोड्या पाण्याचे सरोवर होते. भूगर्भातील हालचालीनी त्या सरोवराचा तळ वर उचलला जाऊ लागला. स्वाभाविकच पाणी वाहून जाऊ लागले. दक्षिणेकडे उतार असल्याने तिकडे पाणी वाहू लागले. असे म्हणतात की भारत आणि दक्षिण आफ्रिका पूर्वी जोडलेले होते, पण पाणी तेथे साठू लागल्याने ते विभक्त झाले. तळ वर उचलला गेल्याने पृष्ठभागाला घड्या पडू लागल्या व हिमालय अधिक उंच होऊ लागला. हळूहळू ते सरोवर, तळ सतत वर होत असल्याने नष्ट होण्याच्या मार्गावर आले. तेथील समाज जीवनावर त्याचा परिणाम होणे अपरिहार्य होते. म्हणून भारताच्या कल्याणाची चिंता करणाऱ्या इक्ष्वाकूवंशीयांनी हिमालयाच्या उत्तरेकडून वाहणाऱ्या गंगेचे पात्र बदलून ती या भागातून वाहावी यासाठी प्रयत्न सुरु केले. हिमालयातून बोगदे खणले गेले. हे काम तीन /चार पिढ्या चालले. भगीरथ राजाच्या काळात ते पूर्णत्वाला गेले.
हा गंगेचा प्रवाह जिथे वेगाने पडेल तो भाग काहीसा खोलगट व टणक असणे आवश्यक होते. खोलगट नसेल तर पाणी सर्व दिशांनी वाहून जाईल व टणक नसेल तर तेथे खड्डा पडून तो अधिकाधिक खोल होत जाईल व पाणी वाहणारच नाही हे लक्षात घेणे आवश्यक होते.
हिमालयातील कैलास पर्वतावर निवास असलेल्या शंकरांना हे सहज शक्य होते. शिवाय गंगेचा प्रवाह हा अपेक्षित दिशेलाच प्रवाहित करावयाचा होता. हे शंकरांनी केले व रूपककथा तयार झाली. गंगेला शंकरांनी माथ्यावर झेलले, तिला गर्व झाला म्हणून डोक्यावरील जटामध्ये अडकवून ठेवले व मग जन्हूतून तिला सोडले. (म्हणून जान्हवी ). यावरून सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी झटणारे शंकर लक्षात येतात.
समुद्र मंथनातून हलाहल निघाले. सर्व भिऊन पळू लागले. मंथनाचे काम थांबणार अशी स्थिती निर्माण झाली व म्हणून शंकर ते विष प्याले. पोटांत गेले तर सर्व शरीरांत पसरेल व तोंडातून बाहेर तर काढता येत नाही म्हणून त्यांनी ते गळ्यात साठवून ठेवले. या विषाने होणारी दाहकता शमविण्यासाठी शीतल चंद्र धारण केला व विषाला विष मारक म्हणून नागाला अंगाभोवती गुंडाळून घेतले अशी रूपक कथा आहे.
देव दानवात सतत होणाऱ्या युध्दांमुळे दोन्ही पक्ष त्रासले होते. वाटाघाटी चालू झाल्या. बोलता बोलता एकमेकांवर कटू प्रहार होऊ लागले. वाटाघाटी मोडण्याची चिन्हे दिसू लागली. तसे झाले तर सामोपचार तर दूरच राहिला, उलट परस्परांतील द्वेष व कलह अधिकच वाढेल ही शक्यता होती. म्हणून शंकरांनी प्रयत्न केला. आजकाल संसदेत किंवा कोर्टात काही वेळा ' हे शब्द काढून टाका किंवा यांची नोंद करू नका' असे सांगितले जाते तसेच शंकरांनी केले. डोक्यावर चंद्र म्हणजे सर्वांनी डोके शांत ठेवा असे सांगणे होय. विषारी सर्पाच्या शरीरातील विष मुखावाटे बाहेर येत असते पण त्याचा स्पर्श थंडगार असतो. तेव्हा या गार स्पर्शाला अधिक महत्व देऊन म्हणजेच गुणांकडे अधिक लक्ष देऊन दोषांकडे दुर्लक्ष करा ही जाणीव दिली व समन्वय घडवून आणला. स्वत: त्रास सहन करून इतरांच्यात सुसंवाद निर्माण करणारे शंकर!
त्यांचे व्याघ्रचर्म निर्देश करते ते त्यांच्या रानावनातील संचाराकडे. वनवासी, मूळ पर्वतीय निवासी यांच्यात त्यांचा वावर होता. त्यांच्या अडी अडचणी सोडवाव्या, त्यांचा सहचर बनावे हे तर केलेच पण त्यांच्यातील शौर्य, वनौषधींचा अभ्यास, निसर्गाशी एकरूपता इत्यादि गुणांचा परिपोष करून त्यांचे गण बनवले म्हणजे त्यांची संघटना निर्माण केली. त्यांचे हे कार्य म्हणजे आजच्या वनवासी कल्याण आश्रमाचेच कार्य होय!
कितीही भयंकर शत्रू असला तरी त्याचा नाश करायचे सामर्थ्य त्रिशूल दर्शवतो व तसे त्यांनी केले आहे हे त्यांचे जीवन सांगते. या त्यांच्या पराक्रमामुळेच असेल, रावणासारखा बलाढ्य राक्षसही त्यांची दररोज पूजा करतो.
डमरू त्यांची नृत्यकुशलता दर्शवितो. या कलेचा उपयोगही त्यांनी समाजासाठी केला आहे. भारतातील ज्ञान संक्रमणाची मौखिक परंपरा हळू हळू लुप्त होऊ लागली. समाजहितचिंतक चिंतीत झाले व शंकराकडे गेले. त्यांनी एक आगळा वेगळा नृत्याविष्कार केला व त्यातून माहेश्वरी सूत्रे निर्माण झाली. त्यामुळे वेदकालापासून असलेल्या लिपीमध्ये सुधारणा झाली.
स्वर्गातील सुखोपभोगी आरामदायी जीवन सोडून असे सेवाभावी जीवन जगणाऱ्या शंकरांकडे आत्कृष्ट झाली एक राजकन्या - हिमनगराजपुत्री!! हिमालयाचीच मुलगी असल्याने लहानपणापासून दऱ्याखोऱ्यात, रानावनात वावरणारी होती. तिच्या सख्याही त्याच प्रदेशात राहणाऱ्या होत्या. वनजीवन सवयीचे होते. जवळच कैलास पर्वतावर राहणाऱ्या शिवांचे कार्य व गुण सतत कानावर पडत होते अन मनात जाण निर्माण झाली, आपल्याला हाच पती योग्य आहे. त्याच्या कार्यात सहभागी होणे आपल्याला सहज शक्य आहे व मनापासून आवडणारेही आहे. शिवाय एका देवाचा साधेपणा, सुखोपभोगांचा त्याग, एका विशिष्ट कार्यासाठी जीवन झोकून देण्याची वृत्ती हे सर्व तिला भावले. पिता जावई म्हणून एका 'देवाची' योजना करत होता. पण हिला ते मानवणारे नव्हते. मग शिवप्राप्तीसाठी कठोर व्रत सुरु झाले. कर्णोपकर्णी शंकरांना हे समजत होतेच. परीक्षा घेतली गेली. पार्वतीच्या निश्चयाने शंकर व हिमालय दोघांनाही जिंकले व विवाह झाला.
विवाहानंतरचे आयुष्य खडतर होते. सतत भटकंती, सुखसोयींचा अभाव, भक्तांच्या हाकेला केव्हाही धावून जाणारे पती, अज्ञानी सहकारी, नेसते वस्त्र सोडून देण्याइतकी शंकरांची उदारता व राक्षसांचा कावा न ओळखता त्यांना वरदान देण्याची भोळी वृत्ती हे सर्व होते. पण या सर्वांना तोंड देत, त्यांच्या कार्यात पार्वती सहभागी झाली. पतीकार्य समर्पित अर्धांगी! ती आधीच्या जन्मात पतीचा अपमान सहन न होऊन पित्याकडील यज्ञात उडी मारणारी उमा होती. केवळ याच जन्मी नव्हे जन्मोजन्मी हाच पती लाभो असे इच्छीणारी ही पतिव्रता!
तिलाच पळवण्याचा विचार करणाऱ्या त्रिपुर व सिंदुरासारख्या राक्षसापासून स्वत:चे रक्षण करण्याची सिध्दता असणारी शूरा, मानिनी. स्वरक्षणासाठी दारावर पहारेकरी म्हणून मातीची मूर्ती बनवून तिच्यात प्राण फुंकण्याची अमोघ शक्ति असणारी शक्तिमती!
तारकासुराच्या भयाने शिव लपले. तारकासुराचा वध शिवपुत्र करेल ही योजना होती. लपलेल्या शंकरांना शोधायचे व वैराग्यवृत्ती असलेल्या शिवाना पुत्रनिर्मितीसाठी उद्युक्त करायचे. काम अवघड होते. तारकासुराने तर हाहा:कार माजवला होता. पार्वती भिल्लीण बनली. बरोबर विनंती करून मदनाला घेतले. शिवांचा शोध लागला. मदन जाळला गेला. भिल्लीण पुढे झाली. ओळख सांगितली. उपाय सांगितला. पुत्रनिर्मितीचे वचन शिवांनी देवांना दिले. कैलासी परतले पण गर्भ राहीना. शेवटी अग्नीची मदत घेतली. शंकराचे वीर्य दिले व कार्तिकेयाचा जन्म झाला. तारकासुराला कार्तिकेयाने मारला.
देवांचे सेनापतीपद भूषविणारा कार्तिकेय! अगदी लहान असतानाही युध्दात निपुण! देवकार्यासाठी आपला जन्म ही जाणीव सदैव ठेवून देवांना साहाय्य करण्याचे व्रत घेतले. लग्न केले नाही. अविवाहित राहून देवकार्याला वाहून घेतलेला वाहून घेतलेला प्रचारकच!
गणेश - पार्वतीने रक्षक म्हणून निर्माण केलेला हा पुत्र सर्वांचाच रक्षणकर्ता बनला. योगायोग असा की बालपणातच त्याला अनेक राक्षसांशी युध्द करून त्यांना मारावे लागले. विघ्नहर्ता हे नाव त्याने प्राप्त केले ते स्वत:वर आणि देव राष्ट्रावर आलेली अनेक विघ्ने नाहीशी करून. प्रलयकाळात अणु रूपाने अनेक वर्षे अज्ञात स्थळी राहिला. सृष्टी कशी निर्माण करावी, नेमके काय करावे अशा चिंतेत असणाऱ्या ब्रम्हदेवाला,' सर्व जलमय आहे पण तो एक वटवृक्ष उभा आहे, त्या कडे पहा' असे सांगून त्यांचा आत्मविश्वास जागवला. भोळ्या शंकराने भक्त रावणाला आत्मलिंग दिले पण दुष्टाहातीची शक्ति भयानक विनाशकारी असते हे ओळखून गुराख्याचे रुपात समोर येउन युक्तीने आत्मलिंग परत मिळवले. जबाबदारीची अनेक पदे स्त्रियांवर सोपवणारा, स्त्रियांना समरांगणावर पाठवणारा हा एक सुधारक. सैन्याचे २१ चा एक गण, २१ गणांचा एक मोठा गण अशी व्यवस्थित मांडणी व रचना करून प्रत्येकावर अधिकारी नियुक्त करून कामाचे विकेंद्रीकरण करूनही एकसूत्रता कायम ठेवणारा हा चतुर गणाध्यक्ष!
देवांतकाने उपटलेल्या दातानेच त्याचा नाश करणारा हा एकदंत विपरीत परिस्थितीलाही संधी मानून तीवर मात करण्याचा संदेश देतो. पाशांकुश धारणाने सदैव सिध्द राहण्याचा इशारा देतो. लंबोदर, शूर्पकर्णक व वक्रतुंड हे त्याचे रुप. अपराधाला क्षमा करण्याची शक्ति, ऐकलेल्यापैकी काय ग्रहण करायचे ह्याचा सारासार विवेक व वक्र असतील किंवा होतील त्यांच्या दमनाचे सामर्थ्य हे नेतृत्वासाठी आवश्यक गुणांचे दर्शन घडवतात. मूषकाला वाहन स्वीकारून सर्वसामान्यांचा सहभाग नोंदवला जातो. लहान डोळे सूक्ष्म निरीक्षणशक्ती सुचवतात तर शुंडा ही बोलण्यावर नियंत्रण असावे असे दर्शवते.
बुध्दिदाता आहेच पण युक्ती व शक्तीनेही युक्त आहे. मातेला तीन प्रदक्षिणा घालून विश्व परिक्रमा झाली असे मानणारा मातृभक्त आहे तर व्रातपती व प्रमथपति बनून पित्याचे कार्य पुढे चालवणारा अनुचर आहे. सर्वसामान्यांना अगदी जवळचा वाटावा असा हा लोकनेता आहे.
मूषक वाहन म्हणून प्रसिध्द असला तरी कृतयुगात त्याचे वाहन सिंह होते. वनराजावर नियंत्रण ठेवण्याची शक्ति व बुध्दि होती. त्रेतायुगात त्याचे वाहन मयुर होते. एकदा कार्तिकेयाच्या पराक्रमाने हर्षित होऊन त्याने हा मयुर कार्तिकेयाला दिला अशी कथा आहे.
व्यासांच्या अमोघ प्रतिभेला तुल्यबळ ठरेल इतका तो लेखन विद्येत पारंगत आहे. गणेशविद्या त्याच्या लिपीशास्त्रातील अभ्यासूपणाचे द्योतक आहे. अशा या गजाननाने आपले सर्व जीवन जनसामान्यांच्या उध्दारासाठीच व्यतीत केले आहे.
शिव परिवारातील हे प्रमुख चार घटक समाजहितरत कार्यकर्ते आहेतच पण इतरही त्यांच्या कार्यात सहभागी आहेत. शिव वाहन नंदी कृषीप्रधान भारतातील एक महत्वाचा घटक आहे. नाग उंदरांचा नाश करून शेतीचे रक्षण करतात व धनाची राखण करतात. मयुर हा मेघ पाहून आनंदित होतो. शेतीसाठी आवश्यक जलाची तीव्र आस त्याच्याजवळ आहे. उंदीर हा उत्तम हेरगिरी करू शकतो. पार्वतीचे वाहन सिंह हा शौर्याचे प्रतिक. परस्पर विरोधी असूनही हे सर्व गुण्या गोविंदाने एकत्रित राहतात हेही एक वैशिष्ट्य. श्रेष्ठ कार्यासाठी सर्वांनी कसे एकत्रित यावे याचा जणू वस्तुपाठच.
म्हणूनच हा आगळा वेगळा शिव परिवार आपल्याला सदैव प्रेरणा देतो.
(पूर्वप्रकाशित )
-सुशील अभ्यंकर
🙏🙏🙏धन्यवाद वृंदा !!
उत्तर द्याहटवामावशींचा लिखाण असाच जतन करून ठेव 👍👍