रुद्र शब्द उच्चारताच लगेच आठवतो 'रौद्र ' हा शब्द! अर्थ आहे 'भयंकर'! तरीही तो देव? त्याला वारंवार नमस्कार?
नमस्कार हा वेगवेगळ्या भावनांमुळे केला जातो. वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध,तपोवृद्ध समाजाची निरलस सेवा करणारे कार्यकर्ते, समाजातील सर्वांबद्दल आपुलकीची भावना ठेवून योग्य वेळी त्यांना योग्य ती मदत करणारे उदारवृत्ती लोक अशा स्वरूपाच्या लोकांना नमस्कार आपोआपच केला जातो तो त्यांच्याबद्दल वाटणाऱ्या आदरामुळे!
श्रीमंत, सत्ताधारी यांनाही नमस्कार 'केला ' जातो तो त्यांच्या धनशक्तीमुळे, सत्तेमुळे त्यांच्या हातात असलेल्या बरेवाईट करण्याच्या सामर्थ्यामुळे! अधिकाराची पदे उपभोगणारानाही याच कृतीने नमस्कार केला जातो. कधी कधी अशा नमस्कारामध्ये थोडा आदरभावही डोकावतो पण अधिक प्रमाण असते ते भीतीचे!
जेता - शत्रूवर जय मिळवणारालाही नमन केले जाते. यातही आदर व भय यांचे मिश्रण असते. समाजाला त्रास देणारांवर विजय मिळवला असेल तर, आक्रमकाला चोख प्रत्युत्तर दिले असेल तर त्याबद्दलच्या आदरभावात कृतज्ञताही काही प्रमाणात असते. हे सर्व विवेचन करावेसे वाटले ते रुद्राध्यायात असलेल्या 'नमक विभागा' मुळे!
नमक विभागात एकूण ११ अनुवाक आहेत आणि ऋचांची एकूण संख्या १६७ आहे. गम्मत म्हणजे पहिला नमस्कार रुद्राच्या क्रोधाला केलेला आहे. रुद्र - शिव - शंकर अशी त्याची नावे बदलत गेलेली दिसतात अन मनात विचार येतो मानवी जीवनाची होत गेलेली प्रगतीच या नावातून जणू दिसत आहे.
सृष्टी निर्माण झाल्यानंतर सजीवांची उत्पत्ती व प्रगती कशी होत गेली याचे वर्णन दशावतार संकल्पनेतून स्पष्ट दिसते. मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कलकी. जलचर, उभयचर, भूचर, पशु व मानव यांचे मिश्रण, पूर्ण पोषण न झालेला मानव, हिंस्त्र व नाशक शस्त्रांचा उपयोग करणारा परशुराम याप्रमाणे विस्तार होत गेला. सुरवातीला मानवांची संख्या कमी होती. निसर्गाचे बदलते रूप - पुष्कळदा वादळ, बर्फवृष्टी, अतिवृष्टी, भूकंप, मनुष्यभक्षी हिंस्र प्राण्यांचे आधिक्य - यामुळे मनात भय मोठ्या प्रमाणात होते तेव्हा त्या रौद्रपणाच्या आविष्काराचे नाव होते रुद्र.
हळू हळू निसर्गावर आधिपत्य मिळवत त्याचा उपयोग मानवी जीवनाकरता होऊ लागला तेव्हा [ साधारण यजुर्वेद्कालापर्यंत ] रुद्र 'शिव' बनला - कल्याणकारक बनला - पण त्यात त्रास न देणारा हाच भाव अधिक होता.
निसर्गावर बव्हंशी विजय प्राप्त झाला तेव्हा शिव ' शंकर' बनला. शं करोति इति शंकरः। कल्याण करणारा! कल्याणकारक बनला.
तरीही स्वसंरक्षण विचार हा सदैव मानवी मनावर अधिराज्य गाजवतच राहिला.
शिवाची आयुधे आहेत त्रिशूल,परशु व प्रामुख्याने धनुष्य बाण! ५-६ ठिकाणी खड्गाचा ही उल्लेख आहे. त्रिशुलाचा एकदाच तर परशूचा उल्लेखही नाही. सातत्याने धनुष्य बाणाचा निर्देश आहे - त्यांना वंदन केले आहे, त्यांचा उपयोग शत्रू निर्दालनासाठी करावा मात्र आमचे - आमच्या संततीचे - गुराढोरांचे, संपत्तीचे रक्षण करण्यासाठीच त्यांची योजना व्हावी. आम्हाला त्यांनी कधीही त्रास देऊ नये अशी विनवणी केलेली आढळते. निम्म्यापेक्षा अधिक ऋचांमध्ये हा भाव व्यक्त झाला आहे.
रुद्र हा शत्रूवधप्रवीण असून शत्रूला मात्र अवध्य आहे. शत्रूला रडवणारा अशीही काहींनी व्युत्पत्ती केली आहे.
रुद्र १) रोदयति सर्वमंतकाले इति रुद्रः = अंतकाळी सर्वाना रडवणारा- असे सायणाचार्यानी म्हटले आहे.
२) रुत संसाराख्यम दुख्खम तत्र द्रावयती, अपगमयति, विनाशयती इति रुद्रः :- संसार रुपी दुक्ख नाहीसे करणारा असे वर्णन वेदोत्तरकालात केले गेले आहे तर
३) अथर्व वेदात म्हटले आहे रुद्र= भव +शर्व. रुद्री पाठात भव म्हणजे प्रत्येक कल्पात योग व ज्ञान यांची स्थापना करणारे असा अर्थ सांगितला आहे व शर्व देवांचा सार्वभौम सम्राट मानले आहे. रुद्राध्यायात रुद्र हा शत्रुनाशक असून रणगर्जना करणारा, सैन्याधीपती, शीघ्रगामीरथधारक, कवचधारी, शिरस्त्राण घातलेला, समोरासमोर युध्द करणारा, दूर राहूनही वध करणारा, शस्त्र उपसणारा, प्रहार करणारा, शत्रूला क्लेशदायी, हजारो रुद्रगण असणारा, अस्त्रे फेकणारा असे वर्णन वरचेवर आढळते. तुझी शस्त्रे आमच्या पासून दूर राहोत, सिंहाप्रमाणे उग्र असलेले तुझे सैन्य आम्हाला न मारो, तुझ्या बाणांची टोके आमच्या दिशेला न वळोत, तुझी संहारक बुद्धी आम्हाला स्पर्श न करो अशी विनंती तर सातत्याने केलेली आढळते.
मग हळू हळू जाणीव होऊ लागली असावी की ही जी अगम्य शक्ती आहे ती सर्व व्यापी आहे. अनुवाक १ मध्ये सुर्यालाही रुद्र म्हटले आहे. गुराखी व पाणी आणणाऱ्या स्त्रिया तुला रोज पहातात असे वर्णन आहे. वृक्ष, हरीतपर्णे, गवत यांचा रक्षक पालक या पदांबरोबर च पशुपालक हे बिरुद ही प्राप्त झाले. गिरीवासी रुद्र वृषभारूढ झाला, सर्पांना निर्विष करणारा बनला. मनाच्या कोपऱ्यातल्या भीतीने त्याला पिशाच्य खाणारा बनवले. त्याचे एक नाव भूताधिनाथ आहे. भूत पिशाच्य या जाती होत्या, त्यांचेही संघटन याने केले. तो जगपालक व सज्जनांचा रक्षक बनला.
मानव समुहाने राहू लागला व शिवाभोवती असलेल्या भूत गणांचे अस्तित्व लक्षात आले. हजारो रुद्रगण आहेत असे जाणवले. काही प्रमुखांना न|वे दिली गेली. ११ वा अनुवाक तर यांच्याच वर्णनाचा आहे. पाणी,अन्न,इतर पेये यातून होणाऱ्या बाधेचे रूप रुद्र आहे व अशी बाधा होण्यास कारणीभूत असणारे जंतूही रुद्र आहेत असे म्हटले गेले. दशदिशात राहणारे अगणित रुद्रगण,वृक्षांवरचे रुद्रगण, पृथ्वीवर,अंतरिक्षात व स्वर्गातही राहणारे रुद्रगण व त्यांची शस्त्रे यांच्यापासून संरक्षण मिळावे अशी याचना केलेली आहे.
हळू हळू समूहाने राहणारा पण अन्नासाठी भटकंती करणारा मानव समूह स्थिर होऊ लागला. स्वतःच्या जीवनातील आवश्यकतांची पूर्ती करण्यात समर्थ झाला. आवश्यक साधनांची निर्मिती होऊ लागली. सुतार, कुंभार, लोहार, धनुष्य बाण करणारे, पारधी, मच्छिमार कोळी, शिकारी, रथ बनवणारे रथकार, रथचालक, योद्धा, सैनिक, शत्रुभेदक, हेर अशा विविध स्वरुपात मानवी जीवन बहरू लागले. तरीही एक सर्वव्यापक शक्ती आहे हि जाणीव राहिली व या सर्वांचा पालक व रक्षक रुद्र बनला.
आता स्थिर झालेल्या मानवाने घरे बांधली, गुरांसाठी गोठे तयार झाले, आजूबाजूला असलेली ओसाड जमीन, दगडाने व्याप्त जमीन, पर्वतातील गुहा, डोंगरांचे कडे, काटेरी प्रदेश, जाण्या येण्यासाठी बनलेल्या व बनवलेल्या पाऊल वाटा, राजमार्ग, नद्या,धबधबे, सरोवर, लहान मोठे जल प्रवाह, त्यांच्यावर उठणारे तरंग व लाटा, फार काय पाण्यावर येणारा फेसही, पाण्याचे पाट, आड, विहीर, दलदलीची जमीन, नदी व समुद्रकाठची वाळू या सर्वांचे अस्तित्व, त्याची जाणीव व उपयोगिता यांच्या बद्दलचा कृतज्ञ भावही रुद्र स्वरूपातच व्यक्त झाला. खनिज स्रोतांचीही माहिती झाली.
आपण सगळेच मानव असलो तरी शारीरिक, मानसिक, बौद्धिकदृष्ट्या काही भेद आहेत हे लक्षात आले. बुटका उंच, संथगतीने व शीघ्रगतीने चालणारा, शरीराने विशाल, वय, ज्ञान, बुद्धी यांनी श्रेष्ठ कनिष्ठ, कृपाळू, रक्षक, जटाधारी, मुंडण केलेला, फेटेवाला असे शब्द वापरून ते भेद दर्शवले जाऊ लागले.
आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे मानवाची इतरांना लुबाडण्याची प्रवृत्तीही ध्यानात आली म्हणून चोरांचे विविध प्रकार उल्लेखले गेले. लुटारू, शेतीवाडी बळकावणारे, विश्वास घात करणारे, पूर्णपणे फसवणारे, घरात राहून चोरी करणारे, चोरीसाठी सार्वजनिक ठिकाणी फिरणारे, अरण्यात वाटमारी करणारे, शस्त्र धारण करून वेळप्रसंगी हत्या करणारे, धन्याचा धान्न्यादी माल चोरणारे, रात्रिंचर वगैरे. आणि रुद्र यांचाही अधिपती बनला. शिवाची मंदिरे गावाबाहेर असतात ती चोरांची आश्रयस्थाने बनू शकतात असे म्हटले आहे. काही ठिकाणी तर चोरीच्या मालातील एक वाटा शिवाचा काढत असा उल्लेख आहे.
ऐहिक जीवन, त्यातील सुख व उपभोग, त्यातून मिळणारा आनंद यांची इच्छा व लोलुपता वाढली. त्यासाठी तुझी पूजा नमस्काराने करतो असा स्पष्ट उल्लेख झाला ( १०. ४) या सुख कल्याणाचा निर्माता मनु आहे. तुझी कृपा असू दे ( आता निर्माता मनु व रुद्र फक्त पालक व रक्षक) अशी विनंती केली गेली. यज्ञांना सुरुवात झाली. त्यातील हवन द्रव्ये, त्यांच्या आहुति या तुला अर्पण करतो असे वचन दिले गेले. 'सर्वत्र त्राही अस्माकं' असे म्हणून नमक विभाग संपला.
- सुशील अभ्यंकर.
Khup Sunder abhyaspurna mahiti. Dhanyavad.
उत्तर द्याहटवाकिती अभ्यासपूर्ण लिखाण आहे🤗मनापासून धन्यवाद !!
उत्तर द्याहटवा