एवं प्रवर्तितं चक्रं
हाताने काम चालू असताना कशी कोण जाणे ‘एवं प्रवर्तितं चक्रं नानु वर्तयतीह य: ‘ही गीतेतील ओळ मनात गुंजारव करू लागली . विचारचक्र सुरु झाले . पाहता पहाता अनेक चक्रे माझ्याभोवती चक्राकार फिरू लागली . ती सर्व मला काहीतरी सांगत आहेत असे जाणवू लागले अन हळू हळू त्यांचे म्हणणे लक्षातही येऊ लागले .
चक्र म्हटले की आठवतो त्याचा गोलाकार आणि त्याची गती . अनेक आरे आहेत . प्रत्येकाचे तोंड वेगवेगळ्या दिशेला आहे. पण एक गोल पट्टी त्यांच्या भोवती लावली की स्वत:च्या तोंडाची दिशा न बदलताही सगळे कसे अहमहमिकेने एका पाठोपाठ धावू लागतात . भवतालची पट्टी मात्र गोलच असावी लागते . तिला कुठेच टोक वा कोन असून चालत नाही . ही पट्टी चौकोनी झाली तर गती मिळणारच नाही असे म्हणता येणार नाही . पण ती गती सुलभ व सलग असणार नाही . प्रत्येक कोनावर झटके तर बसतीलच पण गती थांबवायलाच कारणीभूत होतील . कडेचा गोलाकार उत्कृष्ट संघटकाचेच प्रतिक असावे .
असा नुसता सांगाडा तयार झाला तरी गतीशिवाय चक्राला ‘चक्रता ‘ येत नाही . पण गतिमान होणे ही चक्राच्या स्वत:च्या ‘बस की बात नही’. त्याला गती कोणाकडून तरी, कशामुळे तरी मिळावी लागते . म्हणजेच असा कोणीतरी योजक व प्रवर्तक असावा लागतो .
आणखी एक गोष्ट आवश्यक असते ती म्हणजे त्या चक्राला कशाचा तरी आधार असावा लागतो . निराधार चक्र अधांतरी फिरू शकत नाही . खरे तर राहू ही शकत नाही . अगदी अधांतरी धावणारे श्रीकृष्णाचे सुदर्शन चक्रही ह्याला अपवाद नाही . शिशुपालाचा वध करणाऱ्या , ब्रम्हहत्या केली म्हणून ऋषीच्या मागे त्रिलोकात धावणाऱ्या या सुदर्शन चक्रालाही श्रीकृष्णाच्या बोटाच्या ‘आधारा’नेच ‘गती’प्राप्त झालेली दिसते . समर्थांनी म्हटलेलेच आहे ,”सामर्थ्य आहे चळवळीचे ,जो जो करील तयाचे ,परंतु तेथे पाहिजे अधिष्ठान भगवंताचे “
“जगाच्या कल्याणा “कष्ट सोसणारी क्षमाशील धरित्री साधारणत:अनेक चक्रांना आधार देते व तिच्या आधारानेच हे सर्व विश्वाचे चक्र चालू आहे .
गती देणारे मात्र वेगवेगळे असतात . बैल गाडी चालवतील . घोडे रथ पळवतील . वारा पवनचक्की चालवेल तर पाण्याचा प्रवाह पाणचक्कीला कार्यरत करेल . शिवण यंत्रात मोठे चक्र पायडल मुळे आधी गतिमान होऊन मग लहान चाकाला गती देईल तर घड्याळात लहान चाक मोठ्या चाकाला गती देईल . मोठमोठ्या कारखान्यात अवजड व प्रचंड यंत्रे आपण पाहतो ,त्यांना लहान मोठ्या चक्रांद्वारेच गती मिळते . चक्राशिवाय यंत्र नाही असे म्हणणे वावगे ठरणार नाही . या चक्रांची जात मात्र वेगळी आहे . आधी वर्णन केलेल्या चक्राप्रमाणे ती साधी भोळी नाहीत . त्यांच्या कडेला आटे आहेत . गावांचा कारभार सध्या जसा गावच्या सन्मान्य पंचांकडून कुटिल राजकारणपटू पुढाऱ्यांच्या हातात आला आहे तसेच साध्या भोळ्या गोल चाकांचे प्रमाण कमी होऊन आटेदार चाकेच आता अधिक प्रमाणात कार्यरत आहेत . समर्थ रामदासांनी सांगूनच ठेवले आहे ,”शठाशी व्हावे शठ उध्दटासी उध्दट “! ही आटेदार चाके आपल्या आट्यामध्ये दुसरे आटेदार चाकांचे आटे खुशाल अडकू देतात अन मग त्यांना जोरात ढकलतात .
गती देणारे सजीव असोत ,पंच महाभूतांपैकी असोत वा लहान मोठी चक्रे असोत . ह्या सर्वांमागे मानवाचीच प्रेरणा, बुध्दी ,योजना असते . वं . लक्ष्मी बाई केळकर नेहमी म्हणत असत ,”स्त्री ही सारथी आहे . “ ते का? हे आत्ता मात्र प्रकर्षाने जाणवते .
ही गतीशील चक्रे आपल्या बरोबर आणखी कशाला तरी गती देतात व गतिमान करतात , त्यांच्याशी ज्याची जोड सांधली जाइल त्याला ! जसे गती घेणे चक्राच्या हातात नाही तसे कोणाला गती द्यायची हे ही त्याच्या हातात नाही . चक्रांची जोड योजनापूर्वक एखाद्या गाडीशी ,यंत्राशी घातली गेली तर त्यांच्या गतीमुळे गती प्राप्त होऊन प्रचंड काम होते . पण अशा कुठल्याही चक्राशी गलथानपणाने ,चुकीने ,क्रुरतेने एखाद्या सजीवाची जोड झाली तरी तो गलथानपणा ,ती चूक, ते क्रौर्य त्याच्या खिजगणतीतही नसते व ते आपल्याबरोबर त्यांना फरफटत नेतात . ते सजीव प्राणी मात्र प्राणाला मुकतात आणि म्हणूनच मानवाने यांचे नियंत्रणही आपल्याच हातात ठेवले आहे . गती प्राप्त होणे ,गती देणे व गतीवर नियंत्रण ठेवणे यातील कोणतीच गोष्ट स्वाधीन नसतानाही ती चक्रे पूर्णपणे मानवाधीन होऊन निष्ठावंत सेवकाप्रमाणे मानवाला सातत्याने हातचे काही न राखता मदत करत असतात . त्यांनी आपले जीवन पूर्णपणे समर्पित केले आहे . जणू ते म्हणतात ,”श्वास हे निश्वासले निष्ठेतूनी नेत्यावरी “ . त्यांना मोबदला मिळतो तो फक्त तेल पाण्याचा . तरीही क्षणा क्षणाला कणा कणाने झिजत “परोपकाराय सतां विभूतय: “ही उक्ती सार्थ करणारे जीवन जगत आहेत .पण ह्या सृष्टीत अशीही आणखी काही चक्रे आहेत जी मानवाधीन नाहीत . मानवाचे सहाय्य ती चक्रे सुरळीत चालण्यास मदत करते . ही सारी चक्रे अखंडितपणे चालूच होती ,आहेत व चालू रहातीलही . ती आहेत निसर्गचक्र ,दिनचक्र ,ऋतू चक्र व कालचक्र .
१) निसर्गचक्र - मातीतून गवत ,धान्य ,झाडे उत्पन्न होतात . त्याचा उपयोग कीटक ,पक्षी ,पशु ,मानव करतात , निरुपयोगी व जीर्ण शीर्ण अवशिष्ट भागांचे खत होते . ते पुन्हा मातीत मिसळते -पुन्हा उत्पादन होते .
पाण्याची वाफ होते ,वाफेचे ढग आणि मग ढगाचे पुन्हा पाणी होते . असेही हे एक निसर्गचक्र ! निसर्ग व मानव यांच्यात सतत स्पर्धा चालू आहे . कधी निसर्ग आघाडीवर असतो . तर कधी मानव निसर्गावर मात करतो . निसर्ग चक्रावर मानवाने प्रभुत्व मिळवले नसले तरी त्यात तो ढवळाढवळ - कधी जाणीवपूर्वक तर कधी नेणतेपणी -करतो आणि निसर्ग चक्राच्या गतीत ,कार्यात जरूर फरक पडतो . असा फरक हा मानवाच्या जीवनाला हानीकारकच ठरतो . परिणामत: आज पर्यावरण संतुलनासाठी जागतिक परिषदा बोलवाव्या लागतात .
२) दिनचक्र -पहाट ,सूर्योदय ,माध्यान्ह ,सायंकाळ ,रात्र ,मध्यरात्र ,पहाट असे हे चक्र सतत चालू आहे . मानवी बुध्दीने प्रखर प्रकाश निर्माण केला असला तरी सूर्यप्रकाशाची सर त्याला येत नाही आणि प्रखर प्रकाश आहे म्हणून सूर्य प्रकाशायचा थांबणार नाही .
३) ऋतूचक्र -उन्हाळा ,पावसाळा ,हिवाळा हे ऋतू अगणित कालापासून ज्या क्रमाने येत आहेत ,तसेच आजही येत आहेत . आज उन्हाळ्याची प्रखरता वाढत आहे . पावसाळ्याचा काळ बदलत आहे आणि हिवाळ्यातील थंडीचे प्रमाणही कमी अधिक होत आहे .
४) कालचक्र -हे चक्रही कोण आले ,कोण गेले ,कोण चढले ,कोण पडले ह्या कशाचाही विचार न करता सातत्याने चालू आहे .
चक्र मानव नियंत्रित आहे . पण अशा मानवालाही पुष्कळदा एका अगम्य शक्तिपुढे हात टेकावे लागतात . जीवनचक्र सुरळीत चालणे वा न चालणे हे ठरवणारे अनेक घटक आहेत . जीवनचक्र थांबते,तो मृत्यू मानवी हातात नाही .
मग श्रीकृष्णाचे ‘एवं प्रवर्तितं चक्रं’ -मी सृष्टीचक्र सुरु केले आहे हे कथन सार्थ वाटते .
-सुशील अभ्यंकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा