वंदे मातरमव्यक्तां व्यक्तांच जननीं परां
दीनोSहं बालक: कांक्षे सेवां जन्मनि जन्मनि ।।१।।
एका कवीने म्हटले आहे,
"हा भारत नाचवी ज्याच्या भक्तीचा सिंधू । तोच खरा हिंदू ।।
भारतभू बद्दल अनेक कवींनी अनेक लेखकांनी भारताला भेट देणाऱ्या प्रवाशांनी अगदी भरभरून लिहिलेले आढळते. बंकीमाचान्द्रांचे वन्दे मातरम आजही आबालवृध्दांच्या ओठावर आहे.
तुम्ही आम्ही समितीसेविका रोज "नमो भारत जनन्ये। स्वाभिमान प्रतीमाये" असे म्हणत सकाळी सकाळी भारतमातेला वंदन करतो.
"नित्यं वदामि सुगुणान तव जन्मभूमे" यासाठी उत्सुक असतो आणि भारतभूमीचा गौरव, कौतुक, श्रेष्ठता गाता गाता थकून जातो तरी वर्णन संपत नाही. अनंत रत्न मंदिरं अगाध ज्ञान सागरं" अशी कितीतरी विशेषणे एका पाठोपाठ एक उद्गारत 'नमामि राष्ट्र भारतं" म्हणत तिला नमस्कार करतो. प्रत्येक भारतीयाचा भावनासागर उचंबळेल अशा भारत भू स्तोत्राबद्दल आपण विचार करणार आहोत.
१० कडव्यांच्या या स्त्रोत्रातील पहिले कडवे वन्दे मातरं ने सुरु झाले आहे. त्या परां जननीला आपण अभिवादन करत आहोत. त्याच वेळी व्यक्तां व अव्यक्तां ह्या दोन विशेषणांनी तिचे विशालत्व दर्शवले गेले आहे.
आपल्या प्राचीन ते अर्वाचीन साहित्यात व्यक्तिविकासाचा सोपान व्यक्ति, समष्टि, सृष्टि, परमेष्टी असा वर्णिलेला आढळतो. त्यातील सृष्टीचा विचार चराचर (चर +अचर ), सजीव निर्जीव अशा व्यापक शब्दाने करतो तरीही चराचर सृष्टि ही व्यक्त आहे. तिची निर्मिती झाली आहे म्हणून व्यक्ताम च्या पुढे जननीं -जन्म देणारी असा उल्लेख आहे. त्याहीपेक्षा विशाल कल्पना अव्यक्तां ह्या शब्दांत व्यक्त होते.
माता ही व्यक्त तर मातृत्व भाव अव्यक्त असतो. प्रेमळ स्पर्श, कल्याणाची चिंता, बालकाच्या सुखासाठी चाललेली धडपड ह्या गोष्टी ह्या मातृत्वभावाला काही प्रमाणात व्यक्त करतात. पण जसा हिमनगाचा ५/६ भाग पाण्याखाली असतो, फक्त १/६ भाग पाण्यावर दिसतो. तसा हा मातृत्व भाव मोठ्या प्रमाणात अव्यक्तच राहतो. जननी रूपातून व्यक्त झालेल्या पण कितीतरी पटींनी अव्यक्त असणाऱ्या ह्या भारतभू ला आम्ही वंदन करतो. पर्वत, नद्या, सागर, खनिज संपत्ती, वृक्ष संपत्ती, धान्य समृद्धी वगैरे व्यक्त गोष्टी आहेतच पण विदेशातून प्रवास करून आल्यानंतर भारत भू वर पाउल ठेवल्या ठेवल्या येथील माती कपाळाला लावून आनंदित झालेल्या स्वामी विवेकानंदासारख्यांचे समाधान हे तिचे अव्यक्त रूप आहे.
अशा ह्या मातेची सेवा जन्मोजन्मी करण्याची आकांक्षा आहे. कदाचित मी 'दीन' असेन पण माझा सेवाभाव मात्र समृध्द आहे. म्हणून अनेक जण जन्म जन्मांतरी भारतातच जीवन प्राप्त होवो अशी इच्छा व्यक्त करतात. किंबहुना तशी खात्री बाळगतात. मग फाशीची शिक्षा झालेला एक तरुण सहज उद्गारतो," भेटेन ९ महिन्यांनी "
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा