शुक्रवार, १५ एप्रिल, २०१६

भारतभूस्तोत्र -2

सागरा लिङ्गितां लक्ष्मीं जगज्जनक कन्यकां
स्थिताम हिमनगस्यांके पार्वतीमपरां भजे ।।२।।

१)लक्ष्मीचा जन्म सागरात झाला आहे असे मानले जाते. म्हणून सागराला आलिंगन देणारी त्याची कन्या लक्ष्मी असा अर्थ होईल. लिङ्गिनचा अर्थ चिन्ह धारण करणारा असा आहे. चिन्ह प्रत्यक्षात धारण केले नसले तरी सागराइतकी विशाल असाही अर्थ होईल. लिङ्गिनचा आणखी एक अर्थ हत्ती आहे व गजांत लक्ष्मी हा शब्दप्रयोग विपुल संपत्ती ह्या अर्थी वापरला जातो. अशा लक्ष्मीला वंदन असो.

 २)जगज्जनक कन्यकां - जगत +जनक +कन्यकां - जगाचा जनक ब्रम्हा आहे व त्याची कन्या सरस्वती तिला नमन करत आहे. (येथे सरस्वती असा स्पष्ट उल्लेख नाही)

३)हिमानागास्यांके स्थिताम - अपरां पार्वतीम - हिमालयाच्या मांडीवर स्थित असलेल्या अतुलनीय पार्वतीला भजतो.
लक्ष्मी, सरस्वती व पार्वती ह्या तिघींना वंदन असो. मानवी जीवनातील अत्यावश्यक गोष्टी,धन, विद्या व स्थिरता ह्यांचेच जणू दर्शन होते.

हिमालयाच्या अंगाखांद्यावर बागडणाऱ्या तेथील रानावनात विहार करणाऱ्या पार्वतीने, सर्वांचे मंगल करणाऱ्या (शं करोति इति शंकर:) शंकराला तो स्मशानवासी, बैरागी, निर्धन, अविकसित जमातीच्या लोकात वावरणारा आहे हे माहीत असूनही सर्व सामान्यांचा उध्दार करण्याची त्याची वृत्ती, हलाहलासारखे जालीम विष पिउन टाकण्याची त्याची तयारी व ते पिऊनही फक्त कंठ निळा होण्यापलीकडे त्याला काहीच अपाय झाला नाही इतकी त्याची शारीरिक शक्ती ह्या सर्वांचा मोह पडून त्याच्या प्राप्तीसाठी वर्षानुवर्षे केलेलं कठोर तप तिच्या दृढ निश्चयाचे व स्थिरतेचे दर्शन घडवतो.

आपण दिवाळीत लक्ष्मी पूजन करतो. नवरात्रात शारदेची सरस्वतीची आराधना करतो तर प्रत्येक युवती लग्नाआधी गौरीहर - पार्वती व शंकर ह्यांची पूजा करते. हरितालिकेलाही पार्वती तिच्या सखींसह पुजली जाते.

साधारणतया लक्ष्मी सरस्वती व दुर्गा ह्या त्रयीला पूजले जाते. वंदेमातरम गीतातही दुर्गा कमला व वाणी म्हणजेच पार्वती, लक्ष्मी व सरस्वती ह्या सर्वांचे दर्शन हे भारतमाते तुझ्यात घडते असे श्री. बंकिमचंद्र म्हणतात. काली हेही दुर्गेचेच रूप आहे. दुर्गेने अनेक अवतार धारण करून देवांना मदत केली आहे. स्त्रीची विद्वत्ता, स्व संरक्षण सिध्दता व शत्रू विनाशक शक्ती ह्या रुपांमधून दिसते.
वरील श्लोकात भारताचे दक्षिण ते उत्तर दर्शन घडते. सागर हा प्रामुख्याने भारताच्या दक्षिणेला आहे तर उत्तर टोकाला हिमालय आहे.

जगज्जनक कन्यकां - भारतीयांनी ज्ञान विज्ञान कला भौतिक व अध्यात्मिक क्षेत्रात केलेली प्रगती ह्या वरून त्यांना सरस्वतीचे वरदान प्राप्त आहे हे कळते. तिला मध्यवर्ती स्थान आहे. ह्यातूनच स्पष्ट होतो, भारतीयांचा जीवनाबद्दल असलेला समतोल. भारत अध्यात्माच्या उच्च शिखरावर पोचलेला होता. (सरस्वती) पण त्याच वेळी त्याने भौतिक गोष्टींकडे (लक्ष्मी) दुर्लक्ष केलेले नव्हते. तसेच स्वत:चे अस्तित्व टिकावे ह्यासाठी इथे शौर्याची परंपरा निर्माण झाली आहे.(दुर्गा)

योगी अरविंद म्हणतात," कधी कधी भारत राखेचा ढिगारा झाल्यासारखा भासतो पण त्या राखेच्या अंतर्भागात धगधगणारी ठिणगी जर संधी सापडतच प्रज्वलित होते.

 एक विचारवंत श्री. दत्तोपंत ठेंगडी म्हणतात, "भारताने संपत्ती मिळवली पण मदांध बनून इतरांना नृशंस वागणूक दिली नाही. सर्व जगाची शासकीय सत्ता मिळवून इतरांना गुलाम करण्याचा विचारही केला नाही व आजही तशी इच्छा नाही. तरीही भारताच्या सर्वंकष श्रेष्ठतेपुढे नतमस्तक होऊन सर्व विश्व त्याला गुरुस्थानी मानेल ही खात्री आहे व त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
लक्ष्मी,दुर्गा व सरस्वती ह्या तिघींना वंदन म्हणजेच सर्वांगीण प्रगतीची अपेक्षा!
 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा