मंगळवार, ७ जुलै, २०१५

चिंतन सूत्र - २. 'ईश्वर: सर्व भूतानाम!'

सर्व भूतांमध्ये ईश्वर आहे. इथे भूत याचा अर्थ सर्व सजीव! फ्रेंच राज्यक्रांतीची मूलतत्वे होती, 'स्वातंत्र्य, बंधुता, समता'. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्यघटनेने १८ वर्षे वय पूर्ण केलेल्या सर्वाना मतदानाचा हक्क देऊन समता प्रस्थापित केली. जातिजातिंमध्ये असणारा विद्वेष नष्ट करण्याकरिता, गेल्या २५/३० वर्षांपासून, समरसता निर्माण व्हावी म्हणून प्रयत्न केले जात आहेत.
 
खरे तर या सर्व गोष्टी अतिप्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीने प्रतिपादल्या आहेत, सर्व प्राणीमात्रात ईश्वराचा अंश आहे असे म्हणणे याचाच अर्थ स्वाभाविकत: सर्व समान आहेत. उच्चनीचभाव, श्रेष्ठकनिष्ठवृत्ती हीच कृत्रिम आहे. 

प्रत्येक व्यक्तीमध्ये काही गुण असतात तर काही दोष असतात. सर्वगुणसंपन्न कोणीच नसतो. तसाच केवळ दोषाचा पुतळाही कोणीच नसतो. प्रत्येक व्यक्तीमधील गुण, सद्भाव, मदत वा सेवा करण्याचा भाव वगैरे गोष्टी म्हणजे ईश्वराचा अंश! हा अंश ओळखायचा, वाढवायचा व समाजकार्यासाठी त्याचा उपयोग करायचा. चांगल्या गोष्टीचे कौतुक झाले कि त्या अधिक करण्याची प्रवृत्ती निर्माण होते व वाढत जाते हे लक्षात घेऊन तसा प्रयत्न प्रत्येकाने करायला पाहिजे. 

मराठीत एक म्हण आहे, दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते, आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही. आपल्याला दुसऱ्याचे दोष पटकन दिसतात पण तिकडेच अधिक लक्ष न देता त्याच्या गुणांवरच अधिक लक्ष केंद्रित करायचे. स्वत:तील गुण हे माणसाला लक्षात येतात. दोष मात्र येत नाहीत. आले तरी ते झाकण्याची प्रवृत्ती असते. इथे मात्र प्रयत्नपूर्वक असे दोष शोधून ते घालवण्याचा प्रयत्न हवा. 

थोडक्यात दुसऱ्यातले गुण शोधायचे व स्वत:तील दोष घालवायचे असे केले तर सर्व समाज सुखी होईल. प्रत्येक व्यक्तीतला ईश्वरी अंश जोपासला जाईल व 'ईश्वर सर्व भूतानां' याची प्रचीति येईल.
 
अशी प्रचीति आली की एक एकनाथ काशीहून आणलेली गंगा वाळवंटात तडफडणाऱ्या गाढवाला पाजेल, एक ज्ञानेश्वर रेड्यामुखी वेद वदवेल, एक देशपांडे दांपत्य मानसिक दुर्बलांसाठी बुटीबोरी येथे संज्ञा संवर्धन संस्था चालवेल, एक भावनाताई केऱ्रकर स्वमग्न मुलांसाठी कांदिवलीला उमंग नावाची शाळा चालवेल. एक हेमंत बेलसरे ज्यांचा स्मृतिभ्रंश झाला आहे अशा रस्त्यावरच्या लोकांना रोज घरून जेवण नेउन खाऊ घालेल. 

'जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, 
तोचि साधु ओळखावा, देव तेथेचि जाणावा ।।'
असे साधू व असा देव घरोघरी प्रगटेल. 
 

1 टिप्पणी:

  1. बापरे ! . केव्हढी ही तपश्चर्या !! . विशेषत: मार्च २०१४ चे 'अथर्वशीर्ष' ते अगदी आजपर्यंत. सुशिलताई व कन्या, दोघींमुळे, आमची ज्ञानलालसा पुरी होण्यास दिशा मिळतेय. मीराला नेटवर जायला शिकवलेच पाहिजे. . . . . प्रदीप लिमये; ७ जुलै १५.

    उत्तर द्याहटवा