ज्यांच्यापुढे मस्तक आपोआप लवते अशा तीन व्यक्तींचा उल्लेख आज आपण करत आहोत. आई आपल्याला जन्म देते, लालनपालन करते. स्वत: कष्ट सोसून, त्याग करून आपल्या कल्याणाची चिंता करते अन म्हणूनच कवी यशवंत ह्यांनी म्हटले आहे,'आई थोर तुझे उपकार!'
आपल्या जडणघडणीत पित्याची भूमिकाही तितकीच महत्वाची असते. स्वत:च्या कणखरपणाने, ते बाहेरच्या संकटांना आपल्यापर्यंत पोचू देत नाहीत, स्वत:च्या शौर्याची, पौरुषाची ढाल करून आपले संरक्षण करतात.
विविध प्रकारचे ज्ञान देऊन. कौशल्ये शिकवून, आपल्या बुद्धीला खतपाणी घालून एक 'माणूस' म्हणून जगण्यासाठी गुरूची शिकवण आपल्याला योग्य बनवत असते.
प्रामुख्याने या तिघांच्या मुळे आपले जीवन सुखकर होते, सार्थ होते व सफल होते. यांतील प्रत्येकजण स्वतंत्ररीत्या मदत करत असला तरी सर्वांचा उद्देश एकच असतो तो म्हणजे आपले हित, आपला विकास, आपले कल्याण अन म्हणूनच आपला माथा त्यांच्यापुढे आदराने झुकतो. हा वंदन करण्याचा संस्कार भारतीय संस्कृती घडवत असते.
आपल्या संस्कृतीने पाच माता प्रमुख मानल्या आहेत. जन्मदात्री माता, भूमाता, गोमाता, गंगामाता आणि गीतामाता!
भूमाता - सकाळी उठल्या उठल्या समुद्रवसने …. हा श्लोक म्हणून आपण तिला वंदन करतो. ही आपल्याला आधार तर देतेच पण विविध प्रकारचे धान्य, भाजीपाला, कंद, फळ देणारे वृक्ष तिच्यामुळे वाढतात. सोने, चांदी, तांबे अशी खनिजेही तिच्याच पोटातून आपल्याला मिळतात. तिच्या भोवती असणाऱ्या वातावरणामुळे आपण श्वास घेऊ शकतो. तिच्यावरून वाहणाऱ्या नद्यांचे, तिच्यात खोदल्या गेलेल्या विहिरींचे पाणी आपण पितो. तिच्यावर आपण चालतो, खणतो, वेगवेगळे आघात करतो, घरे बांधतो- खरे तर तिला त्रास होतो पण ती आपल्या आईसारखेच हे सगळे सहन करते व आपल्यासाठी झटते.
गोमाता - जिचे दुध आपली भूक भागवते ती गोमाता. हिचे मुलगे म्हणजे बैल ते आपल्या शेतीला मदत करतात. गाईचे शेण व मूत्र हे खत म्हणून उपयोगी पडते. ती मेल्यावरही तिचे कातडे आपल्या उपयोगी पडते.
गंगामाता - नदीमाता. पिण्यासाठी, शेतीसाठी हिच्यामुळेच पाणी मिळते. तिच्याजवळ येणाऱ्या प्रत्येकाला ती श्रीमंत-गरीब, लहान-मोठा हा फरक न करता, मदत करते.
गीतामाता - श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली त्यांत, आपण कसे जगावे हे सांगितले आहे.
गुरु - म्हणजे फक्त शाळेत शिकवणारे शिक्षकच नाहीत, तर ज्यांच्याकडून आपल्याला काही शिकायला मिळते ते सर्व गुरूच आहेत. दत्तात्रेयानीही मुंगी, पतंग असे २४ गुरु केले होते.
एका संतकवीने -कबीरांनी तर देवापेक्षाही गुरूला श्रेष्ठ मानले आहे. ते म्हणतात, "गुरु गोविद दोउ खडे, काके लागू पाव?" गुरु व ईश्वर दोघेही समोर उभे असताना आधी कोणाला वंदन करायचे? पण ह्या प्रश्नाचे उत्तर त्यांना ताबडतोब मिळते. ते म्हणतात, " देवाला आधी वंदन करून त्याला श्रेष्ठ मानले तर आपल्यावर फक्त देवाचीच कृपा होईल. पण गुरूला वंदन केले तर मात्र गुरूची कृपा तर होईलच पण गुरूच आपल्याला देवाची भेटही घडवून आणेल. म्हणून गुरु हाच देवापेक्षा श्रेष्ठ आहे. राष्ट्रसेविका समितीने भगव्या ध्वजाला गुरु मानले आहे.
ज्यांची आपल्याला मदत होते, ज्यांच्यामुळे आपण घडतो, त्यांची जाणीव आपल्या मनात सदैव राहते, रहायला हवी व तो भाव आपण व्यक्त करायचा म्हणजे त्यांना वंदन करायचे, आपली कृतज्ञता व्यक्त करायची. या लीनतेने प्रसन्न होऊन ते सदैव आनंदाने आपल्या पाठीशी उभे राहतील, मार्गदर्शन करतील व यशही देतील.
पण याचबरोबर हेही लक्षात ठेवायचे आहे की आपल्याला जे मिळाले ते फक्त आपल्यापुरतेच न ठेवता पुढच्या पिढीला ते द्यायचे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा