सोमवार, १३ जानेवारी, २०१४

संक्रांती

                                                                    संक्रांती

 १) परिवर्तन-बदल - जसजसा काळ पुढे सरकत असतो तसतसा प्रत्येक वस्तूत बदल घडून येतच असतो . फुल कोमेजते , सुकते . फळे व भाज्या शिळ्या दिसतात . कापड जीर्ण होते . घासून ठेवलेली भांडीही न वापरता मळकी  होतात .  हा बदल सावकाशीने होत असतो . समाजातही असाच सावकाशीने बदल होत असतो . पण काळाच्या एका टप्प्यानंतर विचार केला तर तो जाणवतो .
२) क्रांती- एकदम वेगाने झालेला बदल -
    अ)  लष्करी क्रांती- तिची तयारी आधीच असते , पण परिणाम वेगाने दिसतो .
    आ) औद्योगिक क्रांती- नवनवे शोध , त्यामुळे उत्पादनात वाढ व उत्पादनाचा साठा , त्याच्या विक्रीसाठी बाजारपेठांचा शोध , परिणाम वसाहतवाद व अनेक देश पारतंत्र्यात पडतात .
   इ) फ्रेंच राज्यक्रांती - वाढता असंतोष पण एकदम उठाव झाला . लुटालूट ,जाळपोळ ,कत्तली वगैरे घडून राज्यसत्ता दुसऱ्याच्या हातात गेली . स्वातंत्र्य , समता , बंधुत्वाचा उद्घोष झाला . पण प्रत्यक्षात फारसे काहीच उतरले नाही .
३) उत्क्रांती -विकास . पण उत्क्रांतीचे उद्दिष्ट काय ह्यावरच ती चांगली किंवा वाईट ठरते . चांगल्या दिशेने विकास झाला तरच त्याला उत्क्रांती म्हणतात . उदाहरणार्थ , आज जे नवनवे शोध लागले आहेत ,त्यातीलच अणू विभाजनातून उर्जा मिळते हा एक शोध . चांगल्यासाठी उपयोग करणे शक्य व तेव्हाच ती उत्क्रांती . पण प्रथम तरी अणू विभाजनाच्या शक्तीने बॉम्बच बनला .
४) संक्रांती  म्हणजे सम्यक क्रांती . एका निश्चित ,समाजकल्याणाच्या दिशेने , विचारपूर्वक घडवून आलेला व घडून आलेला बदल म्हणजे संक्रांती .  स्वार्थाकडून विश्व कल्याणाकडे होणारी वाटचाल म्हणजे संक्रांती . प्राचीन काळापासून भारतात संक्रांती ही विशिष्ट दिशेने झालेली आहे . व्यष्टी ,समष्टी ,सृष्टी व परमेष्टी म्हणजेच व्यक्ती <  कुटुंब < समाज <राष्ट्र <विश्व <चराचर सृष्टी <परमेष्टी (चरम साध्य )
५) मकर संक्रांती - सूर्याचे भ्रमण बारा राशीतून होत असते . प्रत्येक महिन्यात एक संक्रांती येते . चंद्राच्या आकाशातील स्थितीवरून तिथी  ठरतात . सूर्योदय व सूर्यास्त ह्या मधील काळ व ती तिथी यांचा संयोग ज्या प्रकारे होईल त्या वरून तिथींचा क्षय व वृध्दी होते .  पृथ्वीवरील कालगणना त्यावर अवलंबून असते . म्हणजेच प्रत्येक महिन्यातील संक्रांती ही चंद्र ,सूर्य व पृथ्वी ह्या सर्वांशी संबंधित असते . चंद्र  पृथ्वीभोवती व पृथ्वी सूर्याभोवती फिरते . दिवस ,रात्र , ऋतू ह्या मुळेच घडतात . पृथ्वीच्या भ्रमणामुळे व तिचा आस तिरपा असून कलल्यासारखा वाटत असल्यामुळे सूर्य उत्तरेकडे वा  दक्षिणेकडे सरकल्यासारखा वाटतो .  
         जेव्हा तो दक्षिण गोलार्धातील मकर वृत्ताकडून उत्तरेकडे सरकतो तेव्हा उत्तर गोलार्धात दिवस मोठा होऊ लागतो . दिवस मोठा म्हणजेच जास्त वेळ प्रकाश,उष्णता , काम करायला अधिक वेळ उपलब्ध . स्वाभाविकच उत्तर गोलार्धात असलेला भारत ( भा : रत - म्हणजेच तेजाचा उपासक ) ह्या गोष्टीचे आनंदाने स्वागत करतो व मकर संक्रांती थाटामाटाने आनंदाने साजरी केली जाते .  मकर संक्रांतीची ही नैसर्गिक ( निसर्गानुसार ) उपपत्ती झाली .
        संक्रांती शब्दाचा अर्थ पहात असताना आपण म्हटले आहे, विश्व वा समाज कल्याणाच्या दृष्टीने घडवून आणलेला बदल . - अशी उदाहरणे आपल्या इतिहासात पानोपानी आहेत .
             चाणक्य -भारत राष्ट्रात आपण व  जास्तीत जास्त आपले राज्य ह्याचाच विचार करण्याची प्रवृत्ती निर्माण झाली होती . राष्ट्रावर होऊ घातलेले परकीय आक्रमण थोपवणे व आपले राष्ट्र सुरक्षित राखणे हा विचार राज्यकर्त्यांच्या मनात येत नव्हता . शेजारचे राज्य आक्रमणाला बळी पडले तरी उद्या आपल्यावर तीच वेळ येईल हा विचार , स्वार्थात व उपभोगात बुडालेल्याना सुचत नव्हता . जात्यातले रडत होते पण त्यांच्या किंकाळ्यांनी सुपातल्याना जाग येत नव्हती . परिणामत: संपूर्ण राष्ट्र परक्यांच्या टाचेखाली चिरडले जाइल अशी शक्यता निर्माण झाली होती . ही स्थिती बदलायला हवी होती . अशा वेळी ज्याच्या हाती सत्ता नाही ,धन नाही पण होते एकच खंबीर मन व स्वातंत्र्य रक्षणाचे ध्येय .  अशा आर्य चाणक्याने प्रयत्नपूर्वक राष्ट्र एक केले . राष्ट्राच्या इतिहासातील ही एक महत्वाची संक्रांत .
       आद्य शंकराचार्य - राष्ट्राच्या ,समाजाच्या,व्यक्तीच्या आयुष्यात चढउतार चालूच असतात . एका कवीने म्हटले आहे ,” पुर्णोत्थापन काल तोच पतन प्रारंभ ही होतसे “ उत्कर्षाची स्थिती प्राप्त होते ,काही काळ टिकते , मग तिचा हळूहळू ऱ्हास होऊ लागतो .
       असाच एक काळ आला . समाजात पंथोपपंथ निर्माण झाले . अर्थात समाजाच्या जिवंतपणाचेच हे लक्षण होते . पण हळूहळू या पंथात स्वत:च्या मोठेपणाचा अभिनिवेश निर्माण झाला व त्याची परिणिती एकमेकांवर आघात करण्यात झाली . समाजात फुटीरता आली . संपूर्ण समाजाचा विचार लोप पावला . पंथाभिमानाने इतरांना नुसते क्षुद्रच नव्हे तर शत्रूस्थानी मानले जाऊ लागले . आत्यंतिक अहिंसेच्या कल्पनेने समाज दुर्बल झाला . जीवनाचा योग्य आस्वाद घेत ‘मुक्तीकडे वाटचाल ‘ ही कल्पना दृष्टीआड झाली . भौतिक व अध्यात्मिक विचारातील परस्पर पूरकता नाहीशी झाली . जीवनाबद्दल अरुची निर्माण झाली . समाजात निराशा मातली . जीवनापासून पलायन हेच मोठेपणाचे लक्षण मानले जाऊ लागले . मातृस्थानींची स्त्री पापाची राशी बनली .
      समाजाची विनाशाकडची वाटचाल रोखायला केरळ मधला एक युवक पुढे आला . संबंध भारतात पायी भ्रमण करून त्याने समाजाला योग्य दिशा दाखवली . अध:पतन थांबले . विकासाकडे दृष्टी वळली . आम्ही सर्व एक हा भाव निर्माण झाला . विश्व शक्ती व क्षात्र शक्ती एक झाली . हे सर्व ज्याने घडवून आणले तो नामानिराळा राहिला . . हे सर्व घडविता करविता होता एक शंकर . ‘ शं करोति इति शंकर:’ कल्याण करणारा तो शंकर आणि हा शंकर म्हणजे आद्य शंकराचार्य .
      आणखी कितीतरी  वर्षे लोटली . पुन्हा एकदा भारत परक्यांच्या टाचेखाली तुडवला जाऊ लागला.क्रौर्याची ,अन्यायाची परिसीमा झाली . जीवनाची शाश्वती उरली नाही.पाण्याला नदीवर गेलेली स्त्री घरी सुखरूप येईल ही  खात्री राहिली नाही.शेतातील धान्य कापले जाइल ही टांगती तलवार सदैवच होती . भर दरबारात रक्ताचा सडा पडू लागला . भ्रष्टाचार व लांगुलचालन यांचे राज्य स्थापन झाले.स्वाभिमान हा शब्द कोशातून नाहीसा झाला व एक माता खंबीरपणे उभी राहिली . शिवाईला प्रार्थना केली गेली.कर्तव्यमार्गावर पाउलवाट निर्माण झाली.  जोडीला ‘जय जय रघुवीर समर्थ’ हा घोष निनादला अन छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापले . समाधानाचे उद्गार निघाले,”उदंड जाहले पाणी ,स्नानसंध्या करावया “ !
        पुन्हा एकदा अशाच दुर्बलतेच्या ,विस्मृतीच्या क्षणी शिकागोमध्ये उमटला हिंदू धर्माचा जयजयकार ! माझाच देश संपूर्ण विश्वाला शांततेचा ,कल्याणाचा मार्ग दाखवू शकेल,दाखवेल असा विश्वास प्रभावीपणे मांडला गेला . ‘ धारयति इति धर्म: “हे सांगून पंथोपपंथांच्या आचार्यांच्या माझाच पंथ (ज्याला ते धर्म मानत होते ) श्रेष्ठ ह्या दुराभिमानाला छेद दिला गेला .
       ब्रिटीश गेले . राजकीय स्वातंत्र्य प्राप्त झाले पण मानसिक गुलामी अंमल चालवतच होती . या गुलामीतून वर निघण्यासाठी ,हिंदूंचा स्वाभिमान जागवण्यासाठी ,त्यांना संघटीत करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले . रोग बरा होण्यासाठी नव्हे तर तो समूळ नष्ट व्हावा म्हणून ‘संघे शक्ती कलौयुगे ‘ हे ओळखले गेले . डॉ. हेडगेवारांनी त्या साठी प्रयत्न केले .
        भावी तेजस्वी राष्ट्राचे स्वप्न स्त्रियांच्या मनामध्ये वं . लक्ष्मीबाई केळकर यांनी उभे केले . स्त्री स्वत:ची शक्ती विसरली होती.त्या शक्तीला जागृत करून स्त्रियांना स्वसंरक्षणक्षम व संघटित करण्यासाठी राष्ट्र सेविका समिती स्थापन झाली . सातत्याने  कार्यरत असणारी ही समिती भारतातच नव्हे तर विदेशातही पोचली आहे .  
        अशाच अनेक संक्रांती भारताने अनुभवल्या आहेत . एका वर्षात बारा राशी ओलांडून संक्रमण करणारा सूर्य या राष्ट्रावर वर्षानुवर्षे तेजाने तळपत आहे . आज भारताला दहशतवादाला तोंड द्यावे लागत आहे . तरीही फक्त स्वत:पुरता विचार न करता या वैश्विक समस्येला तोंड देण्यासाठी तो कटिबध्द होत आहे . एका नव्या संक्रमणाची सुरुवात झाली आहे .
       म्हणूनच ‘ जुने जाऊ द्या मरणालागुनी ,फोडुनी किंवा जाळूनी टाका ‘ असा आत्यंतिक विचार न करता ,समाजात दृढमूल झालेल्या नीतीमुल्यांवर  आघात न करता, वाईटाचा त्याग व चांगल्याचे उन्नयन घडवून आणून ,समाजजीवनात संक्रमण घडवून आणण्यासाठी कटिबध्द होऊ या . या अतीप्राचीन ,सातत्याने प्रवाहित राहिलेल्या व ‘’कृण्वन्तो विश्वमार्यम ह्या कर्तव्याने बध्द असलेल्या भारतीय संस्कृतीचा थोडासा अवरुध्द झालेला प्रवाह पुन्हा मुक्तपणे प्रवाहित करू या .
                                                              - सुशील अभ्यंकर .

1 टिप्पणी: